मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

शक्तीस....

गुंतला गुंतला | तुझ्यामध्ये जीव |
अवांतर हाव | निवर्तली ||

तुझ्या अभावाने | उरातले उर |
सलतसे फार | रात्रंदिन ||

वाळवंटा घरी | जळाचा अभाव |
तसा माझा जीव | तुझ्याभावी ||

प्राणहीन देह | आणि शक्तीहीन |
यासाठी प्रमाण | पुतळा तो ||

माझे निम्मे जिणे | चालले सतत |
जशी देहगत | पाषाणाची ||

-मनोज बोबडे

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

गझल

शोधून सार पाहिले ते दार-दार पाहिले
कित्त्येक माणसास रे मी थंडगार पाहिले

रे वंद्य तुझे दिव्य ते फ़क़्त पुस्तकामध्ये
वागताना सामोरी किती विखार पाहिले

जेत्यास येथल्या कुणी विचारती, ना पाहती
मात झालेल्याच मी गळ्यात हार पाहिले

ना कोणत्याच राहिला तो स्नेहभाव मानसी
फ़क़्त द्वेषाचेच येथे आरमार पाहिले

आभाळ भाळ रंगले, त्या तेज तारकांमुळे
हा भास- 'त्याच' शोधकाने आरपार पाहिले
(त्याच=खगोलशास्त्री, संशोधक)

गे बाळगू कशास मी, हे वेदने, तमा तुझी!
पाषाण हृदयीच मी आजार फार पाहिले

-मनोज बोबडे

मंगळवार, १७ जुलै, २०१२

पावसासवे!


गीत एक गाईले मी पावसासवे
वाटते असेल ही नभाची आसवे
सौख्य जाहले असे की दुःख अंबरा
कळेच ना असे कसे मनास भासते 

शांत जाहली तरु ही हर्ष पावली
एकजीव जाहली सर्वत्र सावली
हासला हा आसमंत धुंदशा गुणे
लाजली जी द्वाड खुळी लाही कावली

आज लाभला जीवा नवाच गारवा
का न खगांचा दिसे नभात ‘कारवॉं’!
असतील पाखरे अधि घरास परतली
तरारल्या रानचा तो रंग हिरवा

सडक डांबरी चकाके न्हाउनी जळी
रंग लेउनी जणू देहास काजळी
आणि निवासे चिंब ही प्रसन्न जाहली
‘कोण ओती अमृताच्या वरून ओंजळी?’

भिजशी तिथे तू मी इथे तो रंग पाहिला
भाव खुळा तो जणू अभंग राहिला
अनमोल हे निमिष सखी कोण पळविते?
पूस पावसास जो अरंग राहिला

-मनोज बोबडे (‘परिमळ’ या संग्रहातून)




गुरुवार, २१ जून, २०१२

व्हिलचेअर ’ चा हुंकार



कवी मनोज बोबडे यांचा व्हीलचेअर हा ६३ कवितांचा सुंदर संच आहे. ‘वत्स-विनायक प्रकाशन’ पुणे, नागपूर द्वारा तो प्रकाशात आला आहे. प्रख्यात चित्रकार श्री अरुण मोरघडे ह्यांनी मुखपृष्ठ साकारले आहे. खगोलीय ऋतुचक्री रंगाकृतीद्वारे ‘व्हीलचेअर’च्या पार्श्वभूमीवरील गती, व्याप्ती व विशाल जीवनार्थ प्रकट करणारा भव्य चित्राविष्कार आहे. हे आविष्करण आतील काव्यात्म आशयाला पूरक ठरले आहे. सोबतच या काव्यसंग्रहातील ५७व्या ‘मी जळावानी’ या कवितेतील चार ओळी अंकित करून आयुष्यरूपी वाहत्या नदीच्या जीवनात डबक्याप्रमाणे कुठेच साचून न राहता वाहत राहून ग्रंथातीत नैसर्गिक काव्यानंद अनुभवण्याचा संदेश देण्यात आला आहे. एकंदरीत मुखपृष्ठ ही वाचक रसिकांची आतील कविता वाचण्याची जिज्ञासा तीव्रतेने जागृत करते.
मुखपृष्ठाप्रमाणे मलपृष्ठही खूप काही सांगून जाते. मलपृष्ठावरील कवी मनोज बोबडेंचे रंगीत छायाचित्र त्यांचे व्यक्तिमत्व प्रकट करते पण महत्वाचे म्हणजे महाकवी सुधाकर गायधनी व महान विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे ह्यांची व्हीलचेअर काव्यकलेबाबतची गौरवपर प्रशस्तीपत्रे आहेत. यामुळे वाचक रसिक हा कविता संग्रह वाचण्यास एकदम आतुर होतो आतील पान उघडताच माननीय आ.ह साळुंखे हयांच्या प्रस्तावनेतून आतील कावितांचे सामर्थ्य नकळत कळून येते. या पुस्तकाची बांधणी, छपाई, व मुद्रणमूल्य उच्चदर्ज्याचे आहे. या संग्रहातील कवितांचा आशय मर्मभेदी असून समाज व्यवस्थेला सुव्यवस्थित करण्याची परिवर्तनशील विधायक मानसिकता यातून प्रकट झाली आहे.
कवीराज मनोजने ६०व्या क्रमांकावर ‘व्हीलचेअर’ नावाची कविता दिली आहे. व तेच शीर्षक त्याने या कविता संग्रहाला बहाल केले आहे. तसेच अपंग असलेला हा मनोज ‘व्हीलचेअर’चा वापर करून नित्त्यानेच वाहत असतो. हेही आपण बघतोच शिवाय निर्भयतेची, निरामयतेची, निर्भ्रांततेची सुमने त्याला हातात बाळगता यावी म्हणून सुद्धा तो असा वावरतो.
इहवादी मानवीय वैज्ञानिक दृष्टीकोनातल्या विवेकरूपी धाग्यात कवीने सर्व कवितांची माळ गुंफलेली दिसते. जीवनातले सार-असार, खरे-खोटे, चुक- बरोबर, धर्म-अधर्म, जुने-नवे, सुंदर-असुंदर, श्रद्धा-अंधश्रद्धा, ज्ञान-विज्ञान, सुख-दुःख, चढ-उतार ही सर्व द्वंद्वे ओळखून योग्य ते निवडण्याचा विवेक इथे मांडण्यात आला आहे. विवेकाधिष्टीत स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा सत्तत्वांचा स्वीकार करण्याचे आवाहन येथील कवितांतून करण्यात आले आहे. यासाठी भगवान गौतम बुद्ध, महात्मा कबीर, संत नामदेव, महात्मा जोतिबा फुले, संत तुकाराम, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, डॉ. बाबासहेब आंबेडकर, गाडगेबाबा, या सर्व मानवतावादी विचारकांची इथे आराधना करण्यात आली आहे. या संग्रहातून कवीने आपला नेकांगी हुंकार अभिव्यक्त केला आहे. सृष्टीतल्या कणाकणातून व मनामनातून नवनवीन शिकण्याचा विचार कवीने मांडला आहे. ‘शिक्षक’ या कवितेतील पुढील ओळी बघा.
हे शिक्षक ब्रह्मांडातील, धरतीतील कणकण सारे
ते ज्ञान मिळविण्यासाठी, राहीन मी सजग सदा रे

कवीच्या विवेकी मानव्याबाबतचे काही काव्यांश नमुन्या दाखल सांगता येतील.
सुंदर हे किती| जगणे मरणे|
प्रेम देणेघेणे| अनुदिन|| (सुंदर हे किती)
           
सनातन्यांची नको झुंड ती
तुका, नामदेव, कबीर माझे.....  
अक्षर माझे शब्द राहतील
जरी वागणे फकीर माझे...(जरी वागणे)

‘प्रेम हाच देव गुरु| प्रेम भक्ती भाव
कशास तू घेतो| परलोकासाठी धाव!...’(प्रेमाचा प्रभाव)

‘विज्ञान विवेकासंगे
माणूस म्हणोनी घडलो...(ऱ्हास)

‘उदंड झाले साहस माझे, उदंड झाले बाहू
अन्यायाची सक्ती आता ती मी कशाला साहू!...(बंद करा चिवचिवाट)

अशा विधायक विज्ञानवादी वृत्तीने भारलेला हा कवी नभांगणी भरारतांना दिसतो.’जाऊ दे नभात त्या’ या सुंदर कवितेत कवी म्हणतो...
‘मी असा आहे परंतु बांधल्यापरी इथे
रोप मोकळ्या मनाचे लावू दे नभात त्या!    

कवी शेतकऱ्यालाही लढायला सांगत आहे...
...हक्क मागाया उठ, निट वागाया उठ
होय पोशिंदा खरा तू, जगाया उठ!....(दे लढा!)

देशभावना व्यक्त करताना ‘आवाहन’ कवितेत कवी म्हणतो....
‘बंधू भावना उरी धरू       
देशास ह्या उज्ज्वल करू...’

‘सगळेच मनाचे साथी’ या कवितेत कवी उद्गारतो...
‘भरभरून देऊ प्रीती
करू दुनिया मानवतेची....’

पण असे करताना ‘पडतील लाख काटे’ असा इशाराही कवी देतो. बोचणारे काटे, अडथडे येणारच पण ते ओलांडत ‘मी चालणार आहे’ असा दृढविश्वसाही कवी व्यक्त करतो.
एकंदरीत कवीने ‘व्हीलचेअर’ मधून स्वातंत्र्य-समताधिष्ठित मानवतेचा जागर करीत बहुसंख्य सर्वसामान्यांनाही जग सुंदर वं रमणीय करण्याचा कल्याणकारी विचार मांडलेला आहे. ‘कवीचा हा टाहो, घरोघरी जाओ!’
मनोजच्या काव्यप्रवासास हार्दिक शुभेच्छा!


ना. गो. थुटे
वरोरा (२०१२)

शुक्रवार, १८ मे, २०१२

कुठवर राखावे भोळेपण?



देव-देवतांच्या आधारेफलज्योतीष्याचे बळ सारे|
दुकान थाटून बसले कोणीस्वतःस श्रेष्ठत्तम जाणोनी|
गुलाम होईल ऐशा ज्ञानाजनतेमध्ये पसरविताना|
लाज मुळी मानसी न काहीफक्त हित अपुलेच पाही|   

किती आजवर केले भाकीतवेळ ती येता बसले झाकीत|
भाकीत खोटे ठरते जेव्हाकरी सारवा-सारव तेव्हा|
भीती कशाला जनी पसरवीस्वतःस का ते असे घसरवी|
खोटे-नाटे सांगून येथेघरी तुंबडी भरून नेते|
मुर्ख जाणोनी जनतेला कादेत चालले सदाच धोका|

सुज्ञ येथली जनता होतासुख-दुःखाच्या करती बाता|
त्या आधारे बसते घोकीतश्रद्धा अपुली असते राखीत|
शब्दमय जंजाळाचे तेजनतेवरती जाळे टाकते|
निराश इथली भोळी जनताशरण जातसे हा हा म्हणता|
अज्ञानाची हीच परिणतीअशी घडविते सदा अवनती|

व्हा व्हा जनहो जागे आतानको राहणे मागे आता|
कुठवर राखावे भोळेपणस्वत्व आपुले इथे गमावून|
अस्मितेची कास धरा रेबाणेदार हे जीणे करा रे|
कशास पोथी हवी खुळी तीजी देते जीवनाला गळती|
आणिक त्यांचा कशास मक्ताशोषित जाईल तुमच्या रक्ता|

सोडा त्यागा खुळेपणाशीसप्रेमाने जगा जीवाशी|
स्थान अंध जर विश्वासालाखरे निमंत्रण ते ऱ्हासाला|
हाती येत असे कर्माचे फळनसे कोणते दैवाचे बळ|
मर्यादेने सदाच वागाविवेक राखा अखंड जागा|
नको नको ती व्यर्थ गुलामीमानवतेला द्या ना सलामी|

कास धरा या विज्ञानाचीआणिक सुंदर शिव ज्ञानाची|
नको कोणती निर्मम आशाडावबाज जी सुंदर भाषा|
या जपण्याशी समता प्रेमळविषमतेचा सारून तो मळ|
नीच कुणाशी जाणू नका रेदूर करा जी बात फुका रे|
वैभव मग इथले ते सारेया सगळे जण लुटावया रे|

-मनोज बोबडे (व्हीलचेअरया कवितासंग्रहा मधून)

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

हीच खरी नीती ....


मती-नीती-गती-वित्त गेले विद्येविना
दिला मंत्र ज्योतीबाने मतलबाविना

तयासाठी कुणाच्याही मुखी नाही गाणी
जयामुळे झाला हरजीव स्वाभिमानी

भेदाभेद प्रस्थापित करी त्याचा मान
ठेवी, करी मेंदूतील ज्ञानाचे पतन

ज्योतीबास राष्ट्रद्रोही म्हणतात ‘भिडे’
असे वळवळ करी ‘मनोहर?’ किडे

त्यांचे इथे शब्द ज्यांनी प्रमाण मानिले
मेंदू-मने सारे त्यांचे रसातळी गेले

अशा गुरुजना काय मान-पान द्यावा?
आदरास त्यांच्या एक पुरे ती खडावा 

नीती अशी भ्रष्ट, बडेजाव श्रेष्ठतेचा 
म्हणे 'द्रोही' त्यांना, सत्य ज्ञान सांगे वेचा!

अशा नरा माराव्यात पैजारा अनेक 
अरे गड्या हीच खरी नीती आहे नेक! 

-मनोज बोबडे (डिसेम्बर२००७)

¼आज ११ एप्रिल क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्या निमित्य विनम्र अभिवादन! त्या निमित्यानेच ही एक कविता½

बुधवार, २१ मार्च, २०१२

किंमत,


कुसुमास भाव मोठा
गंधास ना कहाणी
पद्यच श्रेष्ठ जेथे
काव्यास कोण मानी?

कृत्रिमता कशी ही
नांदावयास पाहे
टरफले हासती अन्
गाभा झुरून राहे

प्रतिभा उणी कशी ही
वाहे वेड्याप्रमाणे
कीर्तीस हपापल्यांचे
असती कैक बहाणे

-मनोज बोबडे ('परिमळ' या कविता संगहातून)

घेतलेली फारकत

  मोगर्‍याचा वास अंगोअंगी संचारला मोगर्‍याचा वास सोडला मी जेव्हा सार्‍या फुलांचा हव्यास  मुबलक सुखा घरी नुसताच वीट  दुःख सागरात भेटे आनंदाचे...