गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

पुस्तक परीक्षण

 


असुर:- एका पराभुताची गोष्ट 


रावण- समज आलेला असा कोण आहे ज्याला हे नाव माहीत नाही? भारतातील शेकडा ९९% -नाही शंभर टक्के म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये- इतक्या मेंदूवर हे नाव कोरलेलेआहे. लोकांच्या मनात कोणत्या स्वरूपाच्या रावणाने राज्य गाजवले हे वेगळे सांगायची गरज नाही. रावण म्हटले की फक्त आणि फक्त वाईटाचाच खजिना, रामाचा, सीतेचा वैरी वगैरे अशीच प्रतिमा रामायणाने भारतीय व्यवस्थेत बहुतेकांच्या मनीमानसी रुजवण्याचे काम केले आहे. एकीकडे विद्वान म्हणून वरवर गौरव करायचा आणि दुसरीकडे वाईटाच्या  उत्तुंग शिखरावर बसवण्यात कसलीच कसर ठेवायची नाही असे ठाणूनच रामायणाने रावणाला भारतीयांच्या पुढ्यात ठेवले आहे.


दहातोंडे, दहा बाजू असलेला राक्षस, व्यभिचारी, खुनी, अधर्मी असा रावण का रंगवला गेला असावा? आपण चित्रपट बघतो ना! त्यातील खलनायक जेवढा वाईट, दृष्ट, नीच तेवढाच नायक महान ठरतो, देवत्वाला पोचतो. या गणिताला धरूनच रावण ही प्रतिमा वाईटपणाने रंगविली गेली आहे. हे स्पष्ट आहे.

....रावणाविषयी वा अत्यंत दृष्टतेने रंगवलेली इतर असुर पात्रे याविषयी मला कायमच कुतूहल राहिले आहे. रावण हे त्यापैकी एक सर्वोच्च कुतुहलाचे पात्र. त्याच पात्राविषयी मला रावणाची एक वेगळी बाजू वाचायला, जाणून घ्यायला मिळाली.

आनंद नीलकंठन यांनी अतिशय अभ्यासपूर्वक, प्रचंड व्यासंग करून 'असुर:- एका परभुताची गोष्ट' या कादंबरी ग्रंथात रावणाबद्दल मानवीय स्तरावरचं अद्भुत सत्य वाचकांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथातून रावणाच्या जीवनातील विविध अंगाचा उलगडा होत जातो.

जंगलातील न्यूनतेत वाढलेलं बाळ कसकसल्या संकटाला, संघर्षाला तोंड देत लंकाधिपती बनलं त्याची रोमांचक, तेवढीच आकर्षक, विलक्षण मांडणी या ग्रंथात केली आहे. लंकाधिपती रावणाच्या जीवनातील प्रत्येक संघर्षमय प्रसंगाला रोमहर्षक पद्धतीने समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथाने रावणाविषयीचे रामायणाने दृढ केलेले समज बऱ्याच अंशी मोडीत काढले आहे. त्याचे थोडक्यात सार बघू!

कथासार:- ग्रंथाच्या सुरुवातीला युद्ध संपल्यानंतर रावण अर्धमेल्या अवस्थेत पडलेला असतो. तो नेस्तनाबूत झालेल्या लंकेस बघत आपल्या जीवनाच्या सुरुवातीविषयी विचार करत असतो. इथूनच कथेचा सूत्रधार म्हणून रावण वाचकांशी संवाद साधतो. इथे लेखकाने रावणाला महान ठरवण्याचा वा देवत्व देण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलेला नाही किंबहुना त्याच्या मानवीय गुणांना ठळकपणे दर्शविले आहे. रावणाला आजवर आपण वाचले, ऐकले आहे अयोध्येच्या, रामाच्या दृष्टीने! ज्यांनी रामायण लिहिले त्यांनी आपल्या अनुषंगाने, हवी असलेली रामाची प्रतिमा रंगवली. हव्या असलेल्या व्यवस्थेला पूरक ठरणारी अशी. परंतु इथे लेखकाने रावणाच्या, लंकेच्या बाजूने विचार केला आहे. त्याच दृष्टीने मांडणी केली आहे. त्यामुळेच रावणाची अस्सलता, विवशता वाचकांपुढे उभी राहते. त्याचे मानवी गुण प्रतीत होतात.

रावणाने संपूर्ण आर्यावर्त(रामायणाच्यानुसार) (खरा तो जंबुद्वीप) पालथा घालून असुर राज्य विरत्ववृत्तीने प्रस्थापित केल्याचे विस्तारपूर्वक रोमांचक, अद्भुत वर्णन वाचायला मिळते. लेखकानेइथे रावण आणि सीतेचे एका वेगळ्याच स्वरूपातले अनाकलनीय नाते पुढे आणण्याचे धाडस केले. या ग्रंथात सीतेला हरण करण्याचे कारण एका अकल्पनिय स्वरूपात पुढे येते.

रामायणात अशोक वनात ठेवलेल्या सितेला हात लावण्याचा विचार का येत नव्हता? याचा उलगडा रावण-सीतेच्या या नात्यातून वाचकास होतो. अशाप्रकारे वाचकाला हादरवणारं सत्य मांडण्याचं धारिष्ट्य लेखकाने इथे केले. भारतात आज घडीला उपलब्ध असणारे ३०० हून अधिक रामायणाचे संस्करण आहेत. यातून घडलेल्या विचारमंथनाचे सार लेखकाने वाचकांसमोर आणले आहे. या आधारावरूनही आपल्याला कळून चुकते, की भारतात पूर्वीपासून विविध विचार प्रवाह असलेली व्यवस्था होती. त्याच प्रभावातून विविध प्रकारची रामायणे लिहिली गेली. परंतु काही धूर्त प्रवृत्तीच्या वृत्तीने उजाघर होऊ दिली नाही. किंवा ती अनुल्लेखाने मारण्यात आली. असो !   

रावण खरेतर आपल्या तत्त्वाला जागणारा, संपूर्ण असुर वर्गाची काळजी वाहणारा, मानवीय गुणांची प्रखर अभिलाषा बाळगणारा होता. याची प्रचिती वाचकास वेळोवेळी येतेआणून देण्यात लेखक इथे सफल झाले आहेत.

''मी माझ्या मनाचे ऐकले असते तर कदाचित परिणाम वेगळे असते पण असो मी देखील मोहमायेने बांधलेला जीवच होतो. मीही तीव्र भावनांच्या जाळ्यातून मुक्त नव्हतो. मी रावणासारखा जगलो आणि रावणासारखाच मरेन! माझी राम बनण्याची इच्छा नव्हतीच कधी आणि संपूर्ण पुरुष वा कोणता ईश्वरही बनायचे नव्हते. माझ्या देशात आधीच देव आणि ईश्वराची कसली कमतरता नव्हती, इथे कमतरता होती ती माणसांची. अशा माणसांची की, जे खऱ्या अर्थाने केवळ माणूस असावे.''

रावणाच्या या कथनातून रावणपणाचं सार खऱ्या अर्थाने वाचकाला गवसते. 

मल्याळम लेखक आनंद निलकंठन लिखित या पुस्तकाचा हेमा लेले यांनी मराठीत अनुवाद केला आहे. ही कादंबरी आपल्याला असुर साम्राज्याची, संस्कृतीची, स्वभावाची नीट ओळख करून देते. इथे असुर स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचारही वाचावयास मिळतो जो आजच्या स्त्रियांसाठी उपयोगात येताना आपण बघतो.

रामायणाचा, रामाचा पगडा असलेल्या किंवा नसलेल्या वाचक प्रेमी माणसाने एकदातरी ही कादंबरी जरूर वाचायला हवी.


-मनोज बोबडे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घेतलेली फारकत

  मोगर्‍याचा वास अंगोअंगी संचारला मोगर्‍याचा वास सोडला मी जेव्हा सार्‍या फुलांचा हव्यास  मुबलक सुखा घरी नुसताच वीट  दुःख सागरात भेटे आनंदाचे...