जागतिकीकरणामुळे माणसाचे जीवन अत्यंत गतिशील झाले आहे.समाज सातत्याने बदलत असतो, हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. खोट्या प्रतिष्ठेची झालर भालावर बांधून, माणूस शाश्वत मूल्यांना मुठमाती देण्यात धन्यता मानतो. मानवी मनाचं उद्ध्वस्तीकरण प्रत्येकाच्या नजरेत सलत आहे. समाजाच्या स्तरिकरणाचा विचार केल्यास उच्च स्तराद्वारे निम्न स्तराचे शोषण होत आहे. उपेक्षितांच्या, वंचितांच्या जाणिवा चित्रकाराच्या कुंचल्याने लेणीरूप होतात तर कवीच्या शब्दाने महाकाव्य! ज्यांनी आयुष्याला तप्त तव्यावर शेकले असेल त्यांचा कलात्मक आविष्कार ‘आम आदमी’च्या संवेदनेचं प्रातिनिधिक रूप असत. उपरोक्त संदर्भात तादात्म साधेल असे समकालीन व्यवस्थाचित्र नाविन्यपूर्ण व समृध्द भाषाशैलीने कवी ‘किशोर मुगल’ यांनी ‘दिवस निरुत्तर येतो’ या कवितासंग्रहात अभिव्यक्त केले आहे. कवी ‘किशोर मुगल’ संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले एक ‘चंद्रपुरी गझलकार’आहेत. ’एकावन्न कविता माझ्याही’ हा त्यांचा पूर्वप्रकाशित कवितासंग्रह! ’मराठी माय बोली’ कवितेच्या कार्यक्रमाचे एक सभासद. अलिकडेच ९ व्या मराठा साहित्य संमेलनात[चंद्रपूर] संमेलनाध्यक्...