रामेश्वर कालच नागपूरवरून
गावाला परतला. दोन वर्षापासून करत आलेल्या कामाला कायमचा सलाम ठोकून तो घरी आला
होता. चार-सहा दिवसापूर्वी घरच्यांनी त्याला कळविले होते, की ‘एका नावाजलेल्या
कंपनीकडून तुला नोकरीचा 'कॉल' आला आहे.’ चार वर्षापासून ‘इंजिनियरिंगचे’ शिक्षण होऊन
अंशकालीन काम करीत असलेल्या रामेश्वरला 'कॉल' आल्याचे ऐकल्यापासून आनंदाला पारावार
उरला नव्हता. त्याला आता नोकरीचे वेध लागले होते. त्याला वाटत होते ‘हा कॉल येणे
म्हणजे, बाबा म्हणतात तशी आपल्या गुरुचीच कृपा असावी!’

शिववर्घन हा रामेश्वरचा जीवलग मित्र. तो या महाराजांच्या कृपेविषयी
रामेश्वरला एकदा म्हणाला होता, “रामेश्वर, तुमचे जेव्हा भले
होते तेव्हा या महाराजांची कृपा असते, असे तू म्हणतोस, मग मागे एकदा तुमच्या
शेतीच्या प्रकरणात दोन एकर शेती विकायला लागून तुझ्या भावाला बांध्याच्या झगडण्यात
दोन दिवसासाठी पोलिसांनी आत केले होते. तेव्हा तू या कृपेविषयी काही बोलला नाहीस
रे!”
म्हणून
रामेश्वर शिववर्धनच्या पुढयात महाराजांच्या कृपेची बातच करत नाही.
तर रामेश्वर या कृपेने एकंदरच उध्दरलाच!
उद्या मुलाखत
देण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात जायचं म्हणून चेहऱ्यावरील हास्य नी मनातील आनंद
यांचा संगम घडवून रामेश्वर जोमाने तयारीला लागला होता. रामेश्वर नोकरीला लागणार
होता, ती कंपनी त्याच्या गावावरून २० किमी अंतरावर जिल्हयाच्या ठिकाणीच होती.
एवढ्या गावानजीक नोकरी लागणं हीही महाराजांच्या कृपेची भर रामेश्वरला सुखकारक
वाटल्याशिवाय राहिली नाही. याही पलीकडे पुनः त्याला कृपा हवी होती, मुलाखत
यशस्वीपणे पार पडण्याची!
सकाळी घरची
मंडळी कामात दंग होती. इकडे रामेश्वरचं विश्व मुलाखतमय झालं होतं. म्हणून तो घरचा
निरोप घेऊन जिल्हयाच्या दिशेने निघाला होता.
एकदाची मुलाखत
संपली. रामेश्वर कार्यालयाबाहेर निघाला तेव्हा तो निराशेने झाकाळून गेला होता. याही
निराशेत त्याला मागचा प्रसंग आठवला.........“मागे शिववर्धन याच कंपनीत
मुलाखतीसाठी आला होता. तो एवढा हुशार, त्या क्षेत्रातील सर्व अभ्यास, बारकावे
माहित असणारा, मुलाखतीमध्ये सर्व प्रश्नांची चपखल उत्तरे देणारा, बाद ठरविण्यात आला. मुलाखतकारांपैकी दोन व्यक्ती त्याच्या अतिशय जवळच्या असूनही! मग या मुलाखतीमध्ये
मी त्यांच्या तीन प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकलो नाही.”
‘आता आपले काय होईल?’ या विचार तंद्रीतच तो गावाकडे आला.
दोन दिवस तो घराबाहेर पडला नाही, दोन दिवस खाण्यापिण्याविषयी उपोषण धरलेलं....सगळे
समजावून थक्क...........! तो दोन दिवसापर्यंत आपली ही अवस्था त्यागायला तयार
नव्ह्ता....पण वडिल नारायणपंतांवर या बाबीचा कसलाच परिणाम झाला नाही. कारण त्यांनी
यावरील उपचार आधीच करून ठेवला होता. रामेश्वर मुलाखतीत यशस्वी होऊ शकत नाही, याची त्यांना
खात्री होती. आता त्यांना हीही खात्री होती की, उद्या रामेश्वर पूर्णपणे ताळ्यावर
येईल!
तिसरा दिवस उजाडला. ‘पोस्टमन’ येऊन काहीतरी देऊन गेला.
तेव्हा रामेश्वरच्या चेहऱ्यातून मोगऱ्याची फुले उन्मळून पडतांना सर्वांना दिसली....रामेश्वर
आनंदातिशयाने घरभर नाचला....नाचून संपताच “हे झालंच कसं?” या त्याच्याच प्रश्नानं
त्यालाच घेराव टाकला. तो हा विचार करून-करून पांगून गेला होता. वडिलांनी त्याची
हीही अवस्था जाणून त्याला नीट समजावून सांगितलं....तेव्हा रामेश्वर म्हणाला....‘तरीच!!’
साला, शिववर्धन
नेहमी म्हणत असतो, कृपे-बिपेची गरज असते कुणाला? ज्याच्यात कर्तृत्व नसते अशांनाच
ना!’’ त्याचं खरंच म्हणाव!
कारण आपण
कित्येक परीक्षा ह्या तगाद्यानच उतीर्ण झालोय...आणि श्रेय महाराजाच्या कृपेला देत
आलो!
चार-आठ-पंधरा
दिवस-महिना-वर्ष उलटलं. रामेश्वर मोठ्या उत्साहाने आपली नोकरी करीत होता. खाजगी
कंपनीत अभियंता होणं म्हणजे ‘लठ्ठ पगाराने घट्ट होणं’ होतं. महिन्याला पाच
हजारापलीकडे हातात रक्कम न बघणाऱ्या रामेश्वरास मासिक वेतन पंचवीस ते तीस हजार
मिळत होते. वेतनाच्या बाबतीत पाच-सहा पटीने तो सुजला होता. आता त्याला आकाश ठेंगणं
होतं. तो भल्या थोरल्या आनंदाचा वाटेकरी झाला होता. त्याच्या जीवनाचा प्रचंड
सतावणारा प्रश्न सुटला होता.
एखाद्या
शेतकऱ्याने झाडाची सारी आंबे तोडून हाटी न्यावे, अख्खा दिवस हाट करून एकही आंबा न
खपावा, आणि अंती निराश होऊन परतीस निघावे, तोच अकस्मात दलालाने पुढे ठाकून
दाम-दुपटीने सर्व आंबे खरेदी करावे...तेव्हा जसा आनंद त्या शेतकऱ्यास होईल! तस्सा
रामेश्वराला झाला होता.
आता रामेश्वर
भविष्याची स्वप्ने रंगवू लागला. “आता आपल्याला मनासारखी बायको भेटेल.’’ असा त्याचा विश्वास
जागला होता. ‘धाकटी सरू आणि मी दोघेही आता एकाच मंडपात लग्न उरकू...बाबांचा आजवरचा
दुसरा मोठा ताणही दूर होईल!’’
सरूच्या
लग्नाचा विषय निघाला, की चलाखांच्या घरी ताणच उफाळून येतो. दोन वर्षापासून सरुसाठी
स्थळ चालून येत आहे. वीसेक स्थळे झाले असतील चलाखांनी कोणत्याच स्थळाला स्वीकृती
दिली नाही.

रामेश्वरनी सरूच्या या पाहणीविषयी सांगितले तेव्हा शिववर्धन असा
बोलला होता.
रामेश्वर म्हणाला, “सरुसाठी वीसेक मुलं बघून
गेले असतील, सगळ्यांनीच तीला पसंत केली पण पोरगा आमच्या अपेक्षेप्रमाणे मिळत
नाहीये. पसंत करतात पण हुंड्याशिवाय होकारच देत नाही. आम्हाला हुंडा न मागणारा
मुलगा हवा आहे.’’
शिववर्धन म्हणाला, “अरे मस्त, म्हणजे तुम्ही
हुंड्याच्या विरोधात? ही तर मोठ्याच आश्चर्याची, अविश्वसनीय नि आनंदाची गोष्ट
म्हणावी लागेल! व्वा! छान आहे. म्हणजे तुम्ही हुंडा देणे-घेणे या पद्धतीचा विरोध
करणार? मला नवल वाटतेय यार, चलाख ही भूमिका घेत आहे म्हणजे?’’
“तू समजला नाहीस शिववर्धन,
तसे नाही ते. आम्ही हुंडा देणार नाही, पण घेऊ. कारण आमच्या कडे पैसा नाहीत.” रामेश्वर
म्हणाला.
शिववर्धन:
“वा रे चलाखांची
चलाखी! स्वतःचं भरतांना थोडीशीही लाज नाही? आणि रे, किती हुंडा घेणार आहेस तू?”
“किती म्हणजे? १५ लाख रुपये घेईन, कारण माझ्या आजवरच्या संगोपणाला, आजवरच्या घरच्या बाकीच्या गरजांना, माझ्या शिक्षणाला अशा बऱ्याच बाबींना लागलाय तेवढा खर्च!” रामेश्वर म्हणाला
“किती म्हणजे? १५ लाख रुपये घेईन, कारण माझ्या आजवरच्या संगोपणाला, आजवरच्या घरच्या बाकीच्या गरजांना, माझ्या शिक्षणाला अशा बऱ्याच बाबींना लागलाय तेवढा खर्च!” रामेश्वर म्हणाला
“...आणि सरुसाठी पाच पैसेही देणार नाही? या अशाच अमानवीय, अन्यायी आणि असंवेदनशील वृत्ती
बाळगणाऱ्याच्या पदरीच मान, मरातब, पैसा, अडका सारे पडत असते. म्हणूनच न्यायाने,
सत्याने लढणारा खस्ता खात असतो. या खस्ता खाण्यातून येणारी निराशा त्याला आपल्या
मार्गावर दृढ राहू देत नाही पण सहनशीलता, धैर्य आणि विश्वास या संपत्तीच्या बळावर
तो न्यालाला जागत असतो..... काय हे मी तुला सांगतोय? रामेश्वर तू एक लक्षात घे, हे
सारे तुला आज जरी सुखकर वाटत असले तरी उद्या व्यक्तिश: तुझ्या मनाला समाधान
देणारे नक्कीच ठरणार नाही. मला नाही आवडला तुमचा हा प्रकार. तुमची ही वृत्ती,
विकृतीच वाटते मला....चल येतो मी! ....
कार्यालयात रामेश्वरनी खणखणणारा दूरध्वनी कानाला
लावताच, त्याच्या चाहर्यावर नाराजीने ताबा घेतला. तो ऐकू लागला, ती सरूच्या
पाहणीतून फुललेल्या प्रेमप्रकरणाची यशस्वी झालेली कहाणी होती.
पंधरा दिवसापूर्वी सरुला पाहून गेलेला मुलगा हा
तीस हजार रुपये मासिक वेतन कमावणाऱ्या हुद्यावर असणारा, सरुला पसंत करून गेला. त्या
आठ दिवसाच्या अवधीत चलाखांनी होकार किंवा नकार कळवू असे मुलास आश्वासन देऊनही तो
कळवला नाही.....दूरवरून मुलास जेव्हा कळाले, ‘मुलगा हुंड्याची मागणी करतोय म्हणून
ते मुलगी देणार नाही.’ तेव्हा मुलगा संतापला. त्याने थेट सरुला गाठले. विचारले, “मी एक अनिष्ठ चालीरीतीचा विरोध करणाऱ्या
मानवतावादी चळवळीचा कृतीशील कार्यकर्ता आहे. आणि माझी बाणेदारी मी प्रामाणिकपणे
जपतो. चळवळीचे विचार मी मनापासून स्वीकारले आहे. म्हणूनच मी हुंडा या व्यापारजन्य
रूढीचा कट्टर विरोधक आहे. करिता ‘मी बिलकुल हुंडा घेणार नाही. आणि लग्न कर्मकांडरहित
नव पद्धत्तीने व्हावे!’ या दोन अटी मी पाहणीला येण्याआधीच मध्यास्थांपुढे मांडल्या
होत्या. मग मी हुंडा मागितल्याचा खोटा आरोप कशासाठी करण्यात येतोय? मी पसंत नव्हतो
तर प्रामाणिकपणे सांगायला हवे होते. अशा धूर्तपणाने माझा अपमान करून हे आपली कोणती
चलाखी दाखवत आहेत.”
मुलाचे हे सर्व भाष्य ऐकून सरुचे मन आर-पार
बदलून गेले. तिनी वडिल नारायणपंत यांच्याकडून जे ऐकले होते, ते सारे चुकीचे होते.
हे आता सरुला कळून चुकले. तिनी अंदाज बांधला. ‘आजपर्यंत पाहायला आलेल्या कितीतरी
मुलांनी पसंती दर्शवूनही बाबांनी नुसत्या एक दोन लाखाच्या हुंड्यापायी स्थळ
नाकारले. काय कारण असावे एवढी स्थळे नाकारण्या मागचे?’
सरूच्या मनात द्वंद्व सुरु झाले. तिला
नारायणपंतांचे यामागील राजकारण हळूहळू उलगडत असल्याचे जाणवत होते. “आपले वडिल हे तसे कट्टर
परंपरावादी. त्यांना मुलगा म्हणजे वंशाचा दिवा वाटतो आणि मुलगी म्हणजे विझलेली वातही
वाटत नाही. हे मी नेहमीच अनुभवत आलेले आहे.” ‘आपला रामेश्वर बराच शिकलाय, याला जर नोकरी लागली तर
याच्यासाठी लाखोंचा हुंडा घेऊ या!’ हे बाबांचे बोलणे मी वर्षभरापासून ऐकत आले आहे.
मुलामध्ये नि मुलीमध्ये सर्वच बाबतीत फारकत ठेऊन वागणारे बाबा, मुलासाठी लाखोंचा
हुंडा घेतांना माझ्यासाठी न देता लग्न केले तर समाजात नाक राहणार नाही. म्हणून मला
एखाद्या गरीब मुलास देऊन माझं सौख्य धुळीस मिळविणार, माझ्या संसाराला झोपडीतला
संसार करून ठेवेल. अशी शंका येत आहे.”
सरूच्या मनातील या विचार द्वंद्वानी तिला एक वेगळाच
निर्णय घेण्यास बाध्य केले....सरुने मुलाची कमजोरी हेरली आणि नारायणपंतांची चलाखी
पण!
आता तिनी या प्रकरणास योजनाबद्ध पद्धतीने
प्रेमाच्या पटरीवर न्यायचे ठरविले. तिनी मुलाच्या पुढयात एक उभा प्रश्न रोवला. “तुम्ही माझ्याशी अजूनही लग्न करण्यास तयार आहे
का?”
अपमानास लगेच विसरणाऱ्या मुलाचे नकार देण्याचे
धेर्य झाले नाही. त्याला सरू प्रचंड आवडणे हेच त्यामागे कारण होते.
सरूची योजना यशस्वी झाली “आपल्यालाही बाबांसारखे धूर्त राजकारण करता येते वाटते?”
गुपित माहित असलेल्या मित्रांनी मिस्किल हसत
भिवया उंचावून मूक शेंरा मारावा तसा हा विचार सरूच्या मनात डोकावून गेला. तिने तो
लगेच झटकला.

अपेक्षेची उत्कटता कशी कारगर ठरते, ती सरूच्या
या वागण्यावरून कळावं!
सरुनी मुलाचा निर्णय येण्याआधीच नारायणपंतांना
चिठ्ठी लिहून ठेवली......
तीर्थरूप बाबास
“मी तुमच्या विरोधात जाऊन
लग्न करते आहे. यासाठी बाबा मला माफ करा! मी माझ्या निर्णयात माझे सुख बघते आहे.
मला अपयश तर येणार नाही, आलेच तर ती जबाबदारी पूर्णतः माझी असेल! .... विश्वास ठेवा,
मी तुमचीच मुलगी आहे बाबा!
तुमचीच
सरू
सरूचा विश्वास खरा ठरला. मुलाने होकार
कळवून लग्न न्यायालयीन प्रक्रियेनुसार पार पाडले......इकडे सरुची चिठ्ठी बघून
नारायणपंतांना संताप अनावर झाला. “विश्वास ठेवा, मी तुमचीच
मुलगी आहे बाबा” चिठ्ठीतील ही शेवटची ओळ वाचताच नारायणपंतांच्या डोळ्यांनी
मुलीप्रतीच्या विश्वासाचा गर्भ धारण केला. सरूच्या चिठ्ठीतील त्या वाक्याने
नारायणपंताना बिनधास्त केले होते. या बिनधास्तपणात डोक्यावरील खूप मोठे ओझे
उतरल्याचे नि मुलामुळे घरात श्रीमंती नांदेल याचे अपरंपार समाधान नारायणपंताच्या
वाट्याला आले. मनाचा कोपरा काहीसा दुखावला असला तरी त्यापुढे त्यांच्यासाठी हा आनंद
मोठा होता.
या प्रकारामुळे आपल्या कुटुंबाची समाजात
बरीच कमीपणा होईल. म्हणून रामेश्वर सरुला शिव्या देत सुटला......पण ते रामेश्वरचे
दाखवायचे दात होते. सरुसाठी घरून कसलाच पैसा गेला नाही, याचे रामेश्वरला अंतरात
खूप सुख वाटत होते!
याही खेपेला रामेश्वरला शास्त्री
महाराजांची कृपा आठविल्याशिवाय राहिली नाही.
मनोज बोबडे