पोस्ट्स

ऑक्टोबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विज्ञानाच्या नावे,

विज्ञानाचे नाव घेऊनी इथे चाले धडपड मोठीशी पहाड भव्य सिद्ध कराया झटे कुणी सागरगोटीशी वाऱ्यावरचा फक्त पुरावा कार्य नसे ना कारणही ते शब्दांच्या त्या केवळ राशी दिव्य गोडवा सोबत घेते वास्तवतेचे मानकरी ते तरी अनाकलनियच प्यारे व्यर्थ मानती सहज गमे ते स्वीकार करती अतर्क्य सारे अस्थिर मेंदूची रिती ही काळ लोटता विवेक ढळतो स्वार्थ पारायण व्यक्ति तेव्हा वैचारीकही तडजोड करतो तडजोडीने या सत्य संभ्रमे न्याय भल्याचा होई ऱ्हास चमत्कृतीच्या बाबी साऱ्या सत्यपणाचा देई भास सुद्न्य जणांनी म्हणून करावा विचार मानवजातीचा घात करावा दुष्ट अशा या अतर्क्य चलाख नीतीचा मनोज बोबडे 

पश्चाताप?

इमेज
“ सुमे, आकारे तुले पाहाले पावने आले, लवकर ये, झालं नाय का खेलनं-बिलनं? ” सुमीच्या मायनं अशीच हाक मारली होती. जेव्हा तिला बघायला पाहुणे आले होते. सुमीनं नुकताच चवदाव्या वर्षातून पंधराव्यात प्रवेश केला होता. त्या देखण्या, मित् भाषी, शांत सुमीला लग्न म्हणजे ढोल, ताशे, सनईच्या तालावर नाचणे आणि लोकांच्या प्रचंड उपस्थितीत पंच पक्क्वन्नाचा सोहळा पार पडणे व नवऱ्यासोबत सासरी जाणे यापलीकडे दूरपर्यंत थांग पत्ता नव्हता. ती अल्लड किशोरवयीन पोर आई बाबांच्या म्हणण्यानुसार लग्न बेडीत अडकणार होती.        “ पोरगं पाहाले बेस हाये, धा एकर वावराचा मालक हाये आन् लाथ मारल तेथं पानी काढायची त्याच्यामंदी धमकही हाये, आमच्या सुमीचा आन् पोराचा जोडा संभू पार्वती सारखा सोभून दिसते. ” आई बाबांची पोराच्या पसंती विषयीची चर्चा सुमी चोरून ऐकत होती. आपले लग्न होणार या विचाराने सुमीच्या मनात आनंद संचारला होता. सुमी गोल गिरकी घेत बाहेर नाचत पळत सुटली.        २४ मार्च १९८८ रोजी सुमीचे चार हात झाले. आता सुमी दिवाकरची अर्धांगीनी झाली होती. होतकरू, नव्या-नव्या युक्तीने पैसा कमविण्यास धडपडणारा दिवाकर आपले गाव सोडून

एक होऊ चला!

इमेज
जागवाया सदा अस्मितेला, एक होऊ चला आज सारे शोषकांची गुलामी झुगारा, कोठडीची तोडा बंद दारे|| नम्रता ही मनी, देही ताठा, ठेवूनिया जगी वावरावे दुष्ट अन्याय हा संपवाया, सत्य न्यायाशी हृदयी धरावे ध्येय गाठावया अंगिकारू, धैर्य, विश्वास सातत्य सारे| दोष देणे फुका हा कुणाशी, नसे नीती खऱ्या मानवाची स्नेह राखू जरी अंतरात, परी करू खांडोळी नीचतेची नांदुया बांधवाच्याप्रमाणे, हे सामर्थ्य मनी बाणवा रे| धर्म, रुढी, प्रथा गैर ज्या ज्या, दूर सारा मना बोचणाऱ्या उन्नतेला नेई सुजनांना, कवटाळूया अशा वंद्य साऱ्या काळजाशी अशी काळीजे ही, जोडण्याशी सदा धडपडू रे| जागविण्या समाजास येथे, झिजणे होते महामानवाचे बलिदानामुळे या वीरांच्या, हे अस्तित्व रे बहुजनांचे ऋण मानावयाशी तयांचे, विचाराशीच त्या आचरा रे|  मनोज बोबडे 

फुलांचे वाडे

इमेज
पाहुनिया फुल जणू पडे भूल जास्वंदी झाडाच्या कानाचे डुल हळदीचा सडा सूर्याच्या गावी दात फुलांचे मोगरा दावी चादर पानाची करून छान कमळ त्यावर कमवी मान गुलाब राजाचा दिवाणी ताठा निशिगंधाशी दिमाख मोठा जाई-जुई तर जुळ्या बहिणी एकीला बोलवा दुसरी उणी चमेलीचे मोठे गंधाळ गीत सदाफुलीची हजेरी नीत अबोलीचा वास अबोल सदा बायका तरीही तिच्यावर फिदा असे हे, तसे हे फुलांचे वाडे जगण्याचे देई साऱ्यास धडे -मनोज बोबडे

श्रद्धा

मिरासदारांचा| इथे दबदबा| त्यांचेपायी दबा| श्रद्धा म्हणे|| विसर्जीली आता| खुळी ती भावना| मनाशी चालना| स्वातंत्र्याची|| श्रद्धा हेकेखोर| हट्टीपणा थोर| अन् ती मुजोर| सर्वकाळ|| असत्यास सत्य| मानायास लावी| श्रद्धा ही लाघवी| संमोहक|| भाळून श्रद्धेला| धोंडा पायावर| पाडी इथे नर| स्वार्थापायी|| प्रचंड ती हानी| करते मनाची| श्रद्धा जनतेची| हितशत्रू|| कृती, कष्ट, योग| यामुळे घडून| येतसे जुळून| येणारे ते|| श्रद्धा नच कधी| प्राप्तव्य दे हाती| विश्वास सांगाती कर्मवीरा|| मनोज बोबडे 

नव्या वळणाची समस्या प्रधान कादंबरी ‘एन्काऊंटर’ आवृत्ती-३

इमेज
नुकतेच चंद्रपूर येथे दि. ११ जुलै २०११ ला ‘आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन पार पडले.’ त्याच संमेलनात डॉ. प्रा. कुमुद पावडे यांच्या हस्ते मा. अड. एकनाथराव साळवे लिखित ‘एन्काऊंटर’ या कादंबरीची तिसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. या तिसऱ्या आवृत्तीमध्ये लेखकाने अधिकची बारा प्रकरणे जोडून कायदा, संविधान आणि वंचितांचे उत्थान याबाबत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. विज्जू नामक माडिया आदिवासी मुलाच्या कुटुंबाची ही दीर्घ कथा विज्जुच्या निवेदनानेच वाचकांसमोर उलगडत जाते. आपल्या दुःखाचे नेमके कारण कोणते? याचा शोध घेण्याची प्रेरणा विज्जुला वडिलांकडूनच लाभलेली असते....कॉलेजात शिकत असताना तो याच शोधाच्या वाटेने जात असतो! परंतु याच्या अन्यायाचा विरोध करणाऱ्या, अपप्रवृत्तीला झीडकारणाऱ्या, शोषणाविरुध्द आवाज उठविणाऱ्या वृत्तीप्रती पोलीस यंत्रणा नक्षलवाद्यांचा हस्तक म्हणून शंका घेते. पुढे तर विज्जुच्या वडिलांना खरोखरच नक्षलवाद्यांचा हस्तक ठरवल्या जाते. पण ‘मी मरेन पण खोटे बोलणार नाही.’ असे निर्धारपूर्वक पोलिसांना सांगणारा विज्जूचा ‘बा’ मध्यमवयीन आदिवासी, प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात चिरडल्या जातो.