रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

सर्वांग सुंदर भावना…

प्रतीकात्मक 

प्रेम.. 

आजवर उत्क्रांत होत आलेल्या मानव इतिहासात प्रेम ह्या विषयावर सर्वाधिक चर्चा, चिंतन घडले आहे. घडत आहे. घडत राहणार. इतर काही प्रश्नांपैकी ह्या प्रश्नाचे देखील नेमके असे उत्तर अजून कोणालाही गवसलेले नाही. प्रेमाच्या व्याख्येचे आकर्षक वैशिष्ट्य असे, की तिला नेमकेपणाने कुणालाच करता आलेली नाही. येणार पण नाही. 

प्रेमाचेच दुसरे रूप असते कविता. त्या भावनेच्याच प्रभावाला भाळून तिचा जन्म होत असतो. म्हणून तिला वा त्याला(प्रेमाला व कवितेला) आकारात नाही बसवता येत. ते साचेबद्ध झाले, कि त्यांचे लावण्य हरवते. ती ओढ, ती आर्तता, ते अनमोल गुरुत्वाकर्षण लोप पावून जाते. जगात एका माणसाच्या हाताचे ठसे दुसऱ्याच्या हाताशी मिळत नाही तोवर हे कशाच प्रकारे शक्य नाही. आणि ते नाही म्हणूनच त्याचं सौंदर्य अबाधित आहे.  

'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.' ही जी माणसाचे वेगळेपण अधोरेखित करणारी म्हण आहे, तिच्यात प्रचंड असे वास्तव सामावलेले आहे. हे काही फक्त प्रेम ह्या भावनेविषयीच नाही; तर व्यक्तीगणिक बदलणाऱ्या व्याख्येप्रमाणेच मानवांच्या इतर भावनांचे पण आहे. ते असो; आपला विषय प्रेम या भावनेचा आहे.

प्रत्येकाची निकड भिन्न असते. त्यांचे प्रेमाविषयीचे स्वरूप निराळे असते. प्रेम हे कुणासाठी काळजी असते, कुणी आपलेपणाला प्रेम मानतो, कोणी कोणाला अमलात ठेवणे यालाच प्रेम समजू लागतो. कोणावर जीव न्योच्छावर करणे यात अगाध प्रेम दडले असल्याची कुणाची श्रद्धा असते, कुणाला कुणी आहे तसा स्वीकार करून प्रेम करत संतोष पावणे यातच जीवन सौंदर्य आहे असे वाटते. इथे हरेक जीवाला त्या त्यानुसार प्रेमाला जगताना लाभणारा प्रमोद तेवढीच मजा देत असतो. आणि उपरांत स्वीकारानुसार कडू-गोड परिणामांची प्राप्ती सुद्धा करून देतो.

यावरून प्रेमाची अनुभूती शब्दांनी साचेबद्ध करता येत नाही, हे स्पष्ट होते. प्रेम मनस्वीपणे अनुभवणे आणि आनंदाच्या सागरात डुबकी मारणे, हेच आपल्या हातात असते. मग शेवटी त्यातून मिळणारे जे काही आहे, ती स्वतःची प्राप्ती म्हणून, फळ म्हणून जबाबदारी पूर्वक स्वीकारण्यासाठी तयार असणे तेवढे आपल्या हाती असते.

'प्रेमा तुझा रंग कसा? रंग कसा? रंग कसा रं?'.... या गाण्यातून विचारलेल्या प्रश्नाचं सटीक उत्तर देण्याचं कोण धाडस करू शकेल? ज्याला स्वातंत्र्याची, जीवनाच्या तथ्याची जाण आहे तो तर नक्कीच नाही करणार. मी कट्टर धार्मिक वा टोकाच्या विचारसरणीस आचरणाऱ्या विषयी नाही बोलत.  त्यांच्या बायस्ड, पूर्वग्रहित मनोवस्थेमुळे ती अपेक्षाही चुकीची वाटते. त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठीची जबाबदारी त्यांच्याच प्रकारच्या लोकांकडे ठेवू! त्यांच्याकडे ८४ कोटी जन्म आहेत वा अख्खी दुनिया त्यांना आपल्या मुठीत ठेवायची आहे. अशांविषयी आपण पामरांनी न बोललेलेच बरे.

पण आपण तर एकाच जन्माचे पाईक! याच जन्मातल्या सुखा, आनंदाचा विचार करणारे! फळ पिकलं की आपोआपच गळून पडते. ते आत्ताच का पडलं? ते पिकलंच का? त्याने वाळत पर्यंत झाडालाच राहिला पाहिजे होतं. हा निरर्थक काथ्याकूट जीवनाच्या सहजतेपासून लांब घेऊन जातो. आणि एका निर्व्याज आनंदाला मुकण्या पलीकडे आपण काहीच हासिल करू शकत नाही........जीवनाच्या सहजतेला स्वीकारलं की सत्याला अंगीकारण्याची आपल्या अंतरंगास निसर्गात:च सवय लागून जाते. ...तर चला सहजता आत्मसात करूया !!! सर्वांवर प्रेम करूया....अगदी स्वतःवरही !!! 


-मनोज बोबडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घेतलेली फारकत

  मोगर्‍याचा वास अंगोअंगी संचारला मोगर्‍याचा वास सोडला मी जेव्हा सार्‍या फुलांचा हव्यास  मुबलक सुखा घरी नुसताच वीट  दुःख सागरात भेटे आनंदाचे...