हे असं आहे तर...

 सूर्य डोक्यावर चढल्याने देहछाया अस्तित्वहीन झाली होती. कोणत्याच सरळ रेषी वस्तू प्राण्यांना सावलीची सोबत उरली नव्हती. सावलीविना एकाकी असण्याचा तो क्षण होता. दुपारचे बारा वाजले होते. दुपारच्या सुरुवातीला मिलिंद कॉलेजातून येत होता. नजरेस पडला तर शिवांशीने विचारले.

"कुठे गेला होतास?"

मिलिंदनी मागे बोट दाखवून

"कॉलेजात." असे इशाऱ्यानेच सांगत
"सायंकाळी घरी ये, आपण फिरायला जाऊ." म्हणत सायकल दामटतच त्याने घराची वाट धरली. नाष्ट्यानंतर चहा घेत असतानाच मिलिंदकडे शिवांश आला.
"आई शिवांशसाठी एक कप चहा ठेव ग! बस शिवांश!" मिलिंदने खुर्ची सरकवली.
"तुझे नोकरीसाठी प्रयत्न चाललेले दिसत आहेत. ती मिळवण्याच्या प्रयत्नात इतका गर्क झालास ही कॉलेजला सुट्टी आहे हे तू विसरूनच गेला." शिवांशनी मिलिंदच्या मानसिकतेला नेमके कथन केले.
"हो हल्ली मला भान विसरायला होत आहे, यार. आज कशाची सुट्टी आहे ते कॉलेजात गेल्यावरच कळले." हे ऐकून मिलिंदने त्या कथनाला पैकीच्या पैकी गुण दिले.
    दोघेही फिरायला जाण्यासाठी निघाले. जाताना मिलिंद खाटेवर कण्हत असणाऱ्या वडिलांकडे जाऊन. 'दुपारची राख अंगाला लावली का' हे विचारताच मान हलवून बाबांनी होकार दर्शवला होता. तीन वर्षांपासून लकव्याने ग्रस्त असल्याने त्यांच्या उपचारार्थ रोज अंगाला राख लावायची असे मिलिंदच्या गुरू बाबा महाराजांनी सांगितले होते. तेच मिलिंद नियमाने पाळत होता.
मिलिंद घरातून बाहेर आला. दोघेही गेटच्या बाहेर निघून रस्त्याला लागले. बाहेर मंद गार वारा सुटला होता. रस्त्याच्या कडेने गर्द लाल पिवळ्या रंगाने डवरलेली विविध फुलांची हिरवी झाडे आपल्याच मस्तीत डुलत होती. फुलांच्या गर्दपणाचा गुरु असावा तो! त्यामुळेच त्या झाडांचे सौंदर्य अप्रतिम असे भासत होते. काही अंतर कापल्यानंतर पलीकडे विशाल वटवृक्षाखाली बाजूच्या बे घरातील आपल्याच विश्वात रममाण असंणारी मुले वडाच्या पारंब्यांवर झुला खेळत होती. काही लहानगे आपली आई कामावरून परत येताना पाहून धावत तिच्याकडे पळत होती. हे सारे अमोलिक दृश्य बघत मिलिंद व शिवांश गप्पा करीत चालले होते.
पुढे काही अंतर चालता चिंचेच्या झाडाशेजारून एक भव्य प्रेत यात्रा स्मशानाकडे जाताना त्यांनी बघितली. समस्त गावातील लोक त्या यात्रेत सामील होते. ती लांबच लांब रांग बघून कुणी मोठीच व्यक्ती असणार असा केलेला कुणाचाच अंदाज चुकला नसता.
ती यात्रा बघून शिवांश म्हणाला.
"आज कोणा श्रीमंतांच्या जाण्याने पृथ्वी हलकी झाली म्हणायची? आजच्या सुट्टीच्याच दिवशी त्यांची इथून सुट्टी झाली बघ, तीही पित्रूमोक्षाच्याच दिवशी?"
मिलिंदनी प्रचंडराव मिरासदार हे नाव सांगितले. ते शहरातील एका मोठ्या फॅक्टरीचे मालक होते. ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले होते. हे ऐकून शिवांश जरा अधिक स्पष्ट होत बोलू लागला.
"वयाच्या बरेच आधी मरण आले यांना. हार्ट अटॅक म्हटले की घातकच असते. तरीही सुटले एकदाचे. मिलिंद, तूच सांग आता अशा या पावन पवित्र दिवसावर आलेल्या त्यांच्या या मृत्यूकडे श्रद्धावान लोक कोणत्या दृष्टीने व समजीने बघतील बरं?"
    शिवांशचे कुतूहल जागे झाले. मनात काही न ठेवता मोकळेपणाने पण थेट बोलणे हाच त्याचा स्वभाव होता. मात्र हे बोलणे मिलिंदला तिरकस जाणवले. त्याचे इतकेही स्पष्ट बोलणे भावुक मिलिंदला रुचले नाही. त्याच्या या बोलण्यावर मिलिंदनी प्रश्न उभा केला.
"असं का बोलतोस आणि असली शंका कशापाई रे?"
शिवांश शांत बसणारी आसामी नव्हतीच मुळी. त्याच्या अशा बोलण्याचे प्रयोजन सांगणेच होते.
    "अंत्ययात्रेत एवढी प्रचंड गर्दी आणि तीही गर्भश्रीमंत लोकांची. यावरून वाटलं किती कोणी मोठी हस्ती असणार! आणि आहे हे तू बोललासच. गरिबांच्या मेहनतीवर त्यांचा वाजवी हक्क न देऊन आपली श्रीमंती वाढविणाऱ्या कुणाही व्यक्तीची इजारदारी वृत्ती मला नेहमीच अन्यायी वाटत आली आहे. असो, तर आपल्या सभोवताली आपण बघतोच की साध्या पपईच्या बियांच्याऐवजी एखादा वाकडा कोंब आला की लोकांना गणपती दिसू लागतो. कुठे गरम पाण्याचे झरे दिसले की तो अलौकिक चमत्कार वाटू लागतो. कुणाला चालता-फिरता मृत्यू आला की, तिथे पुण्यमरण असल्याच वाटते. मग या पितृमोक्षाच्या दिवसावर त्यांना आलेल्या मृत्यूविषयी लोक नको तो युक्तिवाद करतील यात नवल ते काय? नवल न करतील तरच! म्हणतील किती पुण्यवान माणूस! पित्रूमोक्षाच्यादिवशी मरण आले! असे प्रसंग मी बरेचदा अनुभवले आहे. मग अशी माझी शंका चुकीची कशी म्हणतोस?"

    जरा काळासाठी दोघांमध्येही शांततेने प्रवेश केला. शांततेला कंटाळा येताच मिलिंदनी आपल्या मानवीय प्रश्नांना पुढे केले.
"हो ते खर आहे. ते असो! पण श्रीमंतांच्याविषयी तुझी अशी दृष्टी का? हे कोण आहेत हे छान माहिती आहे तुला. ते प्रचंडराव मिरासदार असले म्हणून कुणी वाईट असतात का, शिवांश?"
    मानवीय तत्वांपुढे शिवांश बहुदा हार जातो. तिथे त्याचे युक्तिवाद बळकट असले तरी नम्रतेला कुठे जपावे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.
    "सगळेच काही असतात असे कुठे म्हटले मी? परंतु या श्रीमंतांच्या जमातीमध्ये पण हा मोठे स्वरूप घेऊन आडवा येतो त्याचे काय? ह्या जास्तपणाकडे बघून मी बोललो. आणि हे प्रचंडराव निघाल्यावर तर तू समजलासच की, मी काही चुकीचे बोललो नाही हे! त्यांच्याविषयी तर तुला माहीतच आहे त्यांच्या फॅक्टरीत काम करणारे कामगार यांच्या विषयी काय काय बोलायचे ते? त्यांची प्रतिमा मजदूर वर्गात हक्क देण्याप्रति डागाळलेली होती. आता एवढ्या गोळा केलेल्या संपत्तीपैकी काय घेऊन चाललेत रे ते? त्यांच्या उपरांत बरे म्हणून कोणी नाव तरी घेईल का? मला माहित आहे कुणाविषयी असं बोललेलं तुला आवडत नाही. आणि मजूर, कामगारांना नाडणारा विषय असला की बोलल्याविना मलाही राहवत नाही."
    शिवांशचे हे सगळे बोलणे मनातून सहज मान्य केले असले तरी मिलिंदनी पण आडवा आणलाच. मिलिंदला शिवांशच्या अभिजनांप्रति असणाऱ्या वेगळ्याच रागाची कायम शंका येत राहते. म्हणून शिवांशचे कितीही तर्काधिष्टीत बोलणे असले तरी तो ग्रह बाळगून मिलिंद पण चा आधार घेऊन शिवांशला बोलते ठेवतो.
    रुढीप्रिय माणसांची हीच तर मोठी अडचण आहे, मिलिंद. नव्या आणि न्यायाच्या गोष्टी त्यांना स्वीकार्य वाटतच नाही. कोणी बुजुर्ग व माननीय व्यक्तींनी बोललेलं त्याला अधिक विश्वासाचे वाटते. मग त्याविषयी शंका घेण्याच्या तसदीची त्याला गरज नसते. मग माझ्यासारख्या परिवर्तनशील विचाराच्या माणसाचं बोलणं त्याला कसं चालेल? तुझेही तसेच तर आहे. रागावू नको तुही रूढीवादी असल्याने माझ्या बोलण्याकडे गांभीर्याने बघावं असे तुलाही वाटत नाही. मग तुला भलेही ते सत्य असल्याची शंका का येईना!"
    शिवांशनी मिलिंदच्या लंगड्या प्रश्नांना निकालात काढले. आता मिलिंदला विषय बदलल्याशिवाय गत्यंतर नव्हते.
    "बरं ते जाऊ दे; पण आता प्रचंडराव गेले आहे. आता त्यांच्याविषयी आपण विपरीत कशाला बोलायचं? एक माणूस म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो व पुढच्या जन्मी त्यांना सद्गती लाभो एवढी प्रार्थना तर करू शकतो ना, की तीही नको?"
    मिलिंदनी विषय बदलला खरा पण नकळत का होईना तो खोडसाडपणा करायला विसरला नाही. शिवांशच्या विचार तत्त्वांची मिलिंदला चांगलीच ओळख असतानाही त्याने त्याला कैचीत पकडायचा प्रयत्न केलाच.
    शिवांशची रेल्वे रुळावरच होती. बटन दाबण्याचीच वेळ होती.
    "बघ रुढीप्रियतेचा दाखला दिला आहेसच ना तू. शांती, सद्बुद्धी, मारणोपरांत? कशासाठी? काय उपयोग? जे होणार नाही ते व्हावं अशी अपेक्षा करणं मला तर खुळाचारच वाटतो." शिवांशनी आपल्या मनातले स्पष्ट बोल मिलिंदच्या कानावर टाकले.
    एवढ्याने समाधान होईल तो मिलिंद कसला? न कळल्याच्या अविर्भावात तो म्हणाला.
    "म्हणजे रे?"
    "तू म्हणालास त्यांच्या आत्म्याला शांती मिळो! पुढच्या जन्मी सद्बुद्धी लाभो! पण मी ज्या आत्म्याविषयी साशंक आहे. आणि पुनर्जन्म व पूर्वजन्म याविषयी अनभिज्ञ, तेव्हा मी तशी प्रार्थना कशी काय करू शकतो? चल समज अशी प्रार्थना करावीच म्हटलं तर कोणाकोणाच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करायची? त्यांच्या देहाला जगणारे कितीतरी जिवाणू, विषाणू त्यांच्या मृत्यूमुळे मृत झाले असतील, मग त्यांच्या आत्म्यास काय झालं असेल? मग कुणाकुणाच्या आत्म्याच्या शांतीची अपेक्षा करायची?"
    शिवांशचे खोल, साधारण डोक्याला जड जाईल असे तर्क जागे झाले. त्याचे ते तात्विक बोलणे मिलिंदच्या मनात कोण्या कोपऱ्यात जागा करत असले तरी त्याच्या भावनांना ते रुचत नसल्यामुळे त्याला त्याच्या प्रश्नांची ऐटबाजी कायम ठेवणे त्याला महत्वाचे वाटत होते.
    "तू एवढा हट्टी का आहेस, शिवांश? सांगितले ते मुकाट्याने केले तर तुझे काय बिघडणार आहे? कोणत्याही गोष्टी आपल्या सुयोग्य तर्काने पटवून देणाऱ्या शिवांशला कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या नसल्या तरी समाधानासाठी कराव्या लागतात एवढेही का कळू नये!"
    "पण मी हे सगळे का नाकारतो या विषयी सगळं माहीत असताना तू असा आग्रह का करतोस? हेच मला कळत नाही."
    यावर तू माझा मित्र आहेस, म्हणून. हे मिलिंदने बालिश अंगाचे उत्तर ऐकून शिवांश मनातच हसला. ते हसू चेहऱ्यावर उमटते का याचा शोध घेणाऱ्या मिलिंदला ते सापडलेच नाही.
    मग शिवांश काही वेळ विचारात पडला. काहीच न बोलता तो शांत होता ते बघून मिलिंदनी त्याला हटकले.
    "कुठे हरवलास शिवांश? तुला नाही म्हणायचे तर नको म्हणूस. पण असा अबोल नको राहुस!"
    "तुला हे असं बोजड बोजड काही सांगतो तेव्हा मी चुकतोच खरं तर... तुझ्या सोबत असताना श्रद्धा आधारित गोष्टींच्या बद्दल तुझेच ऐकायला आणि करायला हवे."
    (थोडे थांबून हसतच पुढे बोलू लागतो) "ठीक आहे तुला नाराज कशाला करावे? चल तर मग आत्मे असतीलच तर प्रचंडरावांच्या आत्म्याला तसेच त्यांच्या जीवाला आजवर जगविणाऱ्या सूक्ष्मजीव जंतूच्या आत्म्याला शांती लाभो आणि मिलिंदचे समाधान घडो!"
    मिलिंदचे मन राखण्यासाठी शिवांश असे काहीसे बोलला, तोच...
    "चला माझ्या समाधानासाठी तर माझ्या समाधनासाठी! आज एवढं बोललास उद्या जरा जास्त बोलशील!"
    मिलिंद हे बोलणं ऐकून आता जरा शिवांशचा पाराच चढला.
    "तुझ्यासारख्या धारणा असणाऱ्यांचं असंच असतं बघ. आणि हेच मला पटत नाही. कोणी प्रेमा वा आपुलकीखातर त्यांना काही करण्याची, बोलण्याची गरज पडली आणि तुमच्या मान्यता, धारणेला अनुकूल ठरली तर ती करणाऱ्याप्रति तुम्ही भलताच समज करून आपल्या धारणा दृढ करण्याचं काम करत असता, यार. मग यातील सत्य, वास्तव काय त्याचेशी काही सोयरसुतक नसते बघ अशांना. ती व्यक्ती कोणत्या प्रसंगी, कोणत्या कारणाने काय बोलतेय? याचे भान कोणत्या बधिरतेपायी विसरतात कळत नाही. तुही काही वेगळा आहेस का?"
    कोणत्या गुरूचा, बाबाचा शिष्य असेल तो याहून वेगळे काय बोलू शकतो?
    "तू कोणत्याही गोष्टीचा तेवढा किस का पाडतोस, शिवांश?"
    "बूंद बूंद से सागर बनता है मेरे यार। असल्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने चुकीच्या गोष्टी रूढ होतात. पुढ त्या मोठे स्वरूप धारण करतात. आणि परंपरा म्हणून मान्यता पावतात; म्हणून त्या वेळीच निकालात काढलेल्या समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. मी या सर्व बाबी सूक्ष्मपणे अनुभवल्या आहेत. आणि अभ्यासलाही आहेत. मी या गोष्टींकडे डोळसपणे का बघतो? हे तूला कदाचित नाही माहीत. मी आज तुला सगळं नीट सांगतो बघ, हा शिवांश असा का आहे ते!"
    मिलिंदच्या मनातले सर्व भाव स्थिर झाले होते. त्याच्या कानाला सुईचाही आवाज ऐकू येईल एवढे बळ त्याने कानात जमा केले होते. रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांचा आवाज, पक्षांचा किलबिलाट, गुरांचे हंबरणे, कुत्र्याचे भुंकणे हे आता काही काही त्याला ऐकायला येत नव्हते. त्याचे कान शिवांशच्या शब्दांची आतुरतेने वाट बघत होते. ते अधीर झाले होते. आता तो आपल्या मान्यता, धारणा यांचा खून करणार की, त्यांना पोषक असे काही सांगणार? अशा शंका मिलिंदच्या मनात घारीसारख्या पंख पसरून उडत होत्या.
    शिवांश अगदीच शांत होता. तो त्याच्या पायावर चढू पाहणाऱ्या किड्याला एकटक दृष्टीने न्याहाळत असताना मिलिंदनीच तो झटकला.
    "माझ्या पणजोबांचे भाऊ मारोतराव एका साधूच्‍या नादी लागले होते. सगळ्या पारलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी साधू सांगतील ते सारे काही करत सुटले होते. रात्रीला स्मशानात अमावस्या-पौर्णिमेला मुक्काम करणे, त्या साधूच्या म्हणण्याप्रमाणे गावांमध्ये नग्न हिंडणे, अनैसर्गिक वागणे, कुणालाही भीती वाटावी असे भाव सतत चेहऱ्यावर बाळगणे अशा सर्व अघोरी प्रकारात ते रमायला लागले होते. आजोबांच्या या अशा वागण्याची चर्चा गावात बर्‍याच लोकांच्या कानावर गेली. मारोतराव आता जादूटोणा, टोटके करू लागले, याचा साक्षात्कार लोकांना झाला. त्यामुळे आमचे घर भीतीचे केंद्र बनले होते. लोक आमच्यापासून फटकून वागायचे. फक्त ज्यांना जादूटोणा, बाहेरचे, भूत, भानामती यावर उपाय हवा असायचा; तेच लोक आजोबांकडे येत.
    आजोबांनी आपले एक ठाणे बनवले होते. ज्यात भली मोठी काली मातेची मूर्ती आणि इतर गोष्टींसाठी लागणारे साहित्य जमवले होते. नदीचा घाट आणि ते देवीचे ठाणे एवढेच आजोबांचे विश्व होते. मी बालपणापासून या गोष्टी अगदी जवळून बघितल्या होत्या. त्यामुळे याबद्दल भीती कधी वाटली नाही; परंतु हे सगळे बघत मोठे होताना या सर्वांचे जवळून निरीक्षण मात्र करता आले. जसे या साऱ्यातील फोलपट लक्षात येत गेले, तसतशी यातील निरर्थकता समजत गेली. हा सगळा प्रकार धारणा, मान्यता, श्रद्धा आणि सातत्याने एकाच प्रकाराने नादी लावण्याचा आहे. तिथे कसल्या शंकांना, प्रश्नांना कसलेच स्थान नसते; पण कदाचित मी लहान असल्याने असेल आजोबा मला मोकळेपणाने सगळे सांगायचे. सोबत एक ताकीद देऊन ठेवायचे की, मी हे दुसर्‍या कुणाला सांगू नये!"
    मिलिंद आपले सगळे चित्त शिवांशच्या बोलण्यावर एकाग्र करून ऐकत होता. इतर कोणतीच गोष्ट त्याला या क्षणी व्यत्यय म्हणून नको होती. कारण पहिल्यांदाच त्याला शिवांशच्या अशा नेहमीच तर्काने बोलणाऱ्या वृत्तीचे आज नेमके कारण कळणार होते. तो ऐकत होता. फक्त ऐकत होता.
    शिवांश बोलायचं थांबला होता; पण हे बोलणं थांबणं मिलिंदला रुचलं नाही. त्यांने परत प्रश्न केला. शिवांश बोलू लागला.
    मारुतरावांची देवाधर्मावर अगाध श्रद्धा होती. ते बालपणापासून धर्म अध्यात्म मार्गातच रममान असायचे. शिवांशच्या पणजोबांनी म्हणजे नानानीच त्यांना हा मार्ग दाखवला होता.
    'जीवनाचे सार्थक करायचे असेल तर हाच मार्ग स्वीकारावा!'
    असे त्यांचे मनस्वी म्हणणे होते. तेव्हापासून त्यांनी त्याच मार्गाचा अवलंब केला होता. गुरु चरणी लिन होत ते ईश्वराधीन झाले होते; पण एकदा नानाला भुताने झपाटले त्यामुळे घरची मंडळी प्रचंड घाबरली. घरच्या सगळ्यांचाच धीर खचला. त्यांच्या त्या तशा लक्षणांमुळे घरच्या वरिष्ठ व्यक्तीसारखे ते राहिलेच नव्हते. ते आपल्याच तंद्रीत मग्न असायचे. कोणाशी बोलायचे नाही, कुणाला जवळ येऊ द्यायचे नाही. डोळे विस्फारून एकटक एकाच जागेकडे बघत बसायचे. आणि क्षणातच बडबड करत कुठेही निघून जायचे. त्यांच्या या अवस्थेला बघून ज्येष्ठ मंडळी म्हणायची.
    "याला बाहेरची बाधा झाली आहे. त्याच्या अंगात कोण्या दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे; तेव्हा तुम्ही ह्याला कुण्या वैद्यांकडे घेऊन जा! आणि त्याचे हे भूत काढून घ्या!''
    तेव्हा गावातील छु-छा करणाऱ्या एक-दोन बुवाकडे दाखवण्यात आले. त्यांनी ती बाधा काढली खरी; पण काडीचाही उपयोग झाला नाही. पुढे यासाठी कोणी मोठी हस्ती हवी असल्याचे बोलले गेले. जे मोठे अघोरी पंथीय साधू असतील त्यांच्याबद्दल माहिती घेऊन मग त्यांना त्या अघोरी बुवाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांनी आठएक दिवस त्यांच्यावर काय टोणे-टोटके केले माहित नाही; पण यासाठी त्या साधूंनी नानांच्या घरचे वर्षभराचे अनाजाचे कोठार रिक्त केले. नाना बरे झाले; परंतु पुढे १० दिवसातच त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
    मारोतरावांचे वडील नाना गेले. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळायला तेव्हा सर्व परिवारास पंचवीस वर्षे लागली. या सर्व रहाटगाडग्यात मारोतरावांचे वैद्य होण्यामागचे कारण होते त्यांच्या वडिलांचे अघोरी साधूकडे गेल्यानंतर अगदी आठच दिवसात बरे होणे. तेव्हा मारोतरावांना फारच मोठा चमत्कार वाटला. त्यामुळे स्वाभाविकच ते त्या साधूकडे आकर्षिल्या गेले. आणि त्यांच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर वर्षभरात ते त्या अघोरी साधूकडे चेला, शिष्य बनून जाऊ लागले. त्यांनी सांगितलेल्या करवून घेतलेल्या सर्व सर्व प्रकाराचे त्यांनी तंतोतंत पालन केले होते. आणि पुढे ते या आसपासच्या बारा, चौदा गाव परिसरातले मोठे वैदु झाले होते. लोक मग त्यांच्यापासून फटकुन वागायला लागले, घाबरु लागले त्यामुळे मारोतरावांशी मानाने वागू लागले. ते भीतीमुळेच होते, हे त्यांना उमगले होते. मारोतराव नानांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगामुळे असे अघोरी बनले; पण ते मूळचे अत्यंत संवेदनशील आणि माणसात वावरणारे कौटुंबिक माणूस, त्यामुळे इतकी वर्षे ते यात वावरले खरे पण त्यांच्या मनातून संसाराप्रतीचे प्रेम कधीच वजा झाले नाही. त्यांची माणसातली आसक्ती संपली नाही; म्हणून तर ते शिवांशला या सर्व बाबी निरर्थक, बेक्कार, अगदीच फालतू आणि निरुपयोगी आहे, असे जाणवल्यामुळेच ते या गोष्टींविषयी नेहमीच समजावीत आले आहे.
    ते हे असे दुटप्पीपणे वागत होते. याला फक्त दहा वर्षे झाली होती. ही त्यांच्या स्तरावरची विवशता होती. पण विवशतेला बघून कोण्या चुकीच्या आणि घातक गोष्टीला कोणीही माफ करू शकणार नाही, हे कोण्याही संवेदनशील व्यक्तीला कळते; पण शिवांश आपल्याला नक्कीच समजू शकेल, असा विश्वास मारोतरावांच्या मनात स्पष्टपणे नांदत होता. आज नाही निदान मोठा झाल्यावर तरी शिवांश नक्कीच समजु शकेल असे त्यांना सारखे सारखे वाटत होते.
    मारोतराव या अघोरी प्रकारात रमत असल्याला 35 वर्षे होत आहेत. या दहा वर्षापासून ते लोकांना आणि स्वतःलाही फसवत जगत होते. असे हल्ली त्यांना वाटायला लागले होते. पूर्वीची पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे ते असली कामे करत आले; आणि नंतरची दहा वर्षे त्यांचे तर्कसंगत पद्धतीने जगणे, वागणे चालले होते; पण हे सगळे फक्त आणि फक्त त्यांच्या अंतरात, त्यांच्या डोक्यात होते. मारोतराव प्रत्यक्षात अनुभवलेल्या बाबींतून जन्मलेला बुद्धीवाद जोपासायला जावे तर आजवर लोकांना नादी लावून फसवल्यामुळे लोक आपली नाचक्की करतील असे त्यांना वाटत होते. हे शिवांशलाही चांगलेच ठाऊक होते.
    ते पुढील दहा वर्षापासून कार्यकारणांच्या संगतीने का वावरताहेत? याचे कारणही त्यांचेच वडील होते. म्हणजे परत त्यांच्या वडिलांचे ते भूतच होते. खरे तर ते भूत हे दुसरे तिसरे काहीही नसून एका जिवंत व्यक्तीचे पछाडणे होते.
    ती व्यक्ती होती, एक सुंदर, राजस, लोभस कोणात्याही हृदयधारी मनुष्यास आपल्या सौंदर्यसौष्ठवाने, वेड लावणारी चित्तहारी रुपवती. मारोतरावांचे वडील नाना म्हणजे गावातील सन्माननीय हस्ती. त्यांना आपल्या मानाचा विलक्षण मान होता. पण इथे निसर्गाची किमया वरचढ ठरली होती, असेच म्हणावे लागेल! पुरत्या अनावर झालेल्या भावना, मोह, आसकी, प्रेम आदींनी जखडून नाना त्या सुंदर ललनेच्या मोह पाशात पूर्णतः गुंतत गेले.
    दिवस जात राहिले, जात राहिले. वर्षेही उलटत गेली. ते त्या स्त्रीच्या सर्वस्वी अधीन झाले. घराकडे पूर्णपणे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागल्याने घरची पुरती हेळसांड होत होती. त्यामुळे मारोतरावांच्या आईची रोजची चिडचिड वाढली होती. तिच्याच अंगावर सगळा घरचा भार आल्याने तिची निराशा वाढत चालली होती. नाना सतत गुपचूप राहायचे. त्या स्त्रीने वडिलांवर खूप मोठे गारुड टाकले होते. ती नानांची भावनिक पातळीवर हवी तशी लूट करू लागली. नानांना त्यांचे प्रेम प्रकरण घरच्यांना सांगण्याची धमकी देऊ लागली. अशीच हळूहळू आपल्या गरजा पूर्ण करता करता तिच्या अपेक्षा भारंभार वाढू लागल्या होत्या. त्यामुळे तिने हळव्या मनाचा आधार धरत, नानांना या ना त्या कोंडीत पकडत त्यांचे आर्थिक दोहन करत चालली होती. या गोष्टीचा नानांच्या मनावर फार खोल परिणाम झाला होता. हा धक्का ते पेलू शकले नाही. त्यामुळे त्यांचं मानसिक विश्वच उध्वस्त झालं होतं. डोक्यावर आकाश कोसळलं की, होणाऱ्या अवस्थेसारखी त्यांची दशा झाली होती. त्यांच्या मनातील विचारांची गती ताशी दशलक्ष किमी. झाल्याने एका विचाराचे दुसऱ्याशी तार जुळत नव्हते. वाऱ्याच्या घोंगावणार्‍या आवाजाप्रमाणे असणाऱ्या मनातील विचारांनी मेंदूला पार निष्क्रिय करून टाकले होते. परिणामी नानांची मानसिकता या जगापासून, संसारा, कुटुंबा, मित्रा, नातलगापासून तूटण्यात झाली. आणि मग पुढचे प्रकरण घडत गेले.
    ती स्त्री कुणा श्रीमंतासोबत पळून गेल्याची बातमी साधूंकडे असताना नानांच्या कानावर आली. ती ऐकून नानांच्या आनंदाने अशी उसळी घेतली की तेथील कोणाच्याच नजरेपासून तिला लपता आले नाही. त्या उत्कर्षाचा परिणाम असा झाला की, नाना चारच दिवसात बरे झाले; पण काही दिवसातच त्यांना कळले होते की, तोवर गावात त्यांची प्रचंड नाचक्की झाली. आणि हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले होते.
    कुटुंबातील हा सगळा इतिहास शिवांशनी नीट कथन करत असताना मिलिंद हे सारे त्याच्या मनाच्या, कानाच्या, डोक्याच्या एकाग्रतेने ऐकत होता. आता मिलिंदकडे शिवांशसाठी कसलेच प्रश्न शिल्लक राहिले नव्हते. त्याच्या सर्व शंकांचा विलय झाला होता. तो आता काही बोलणार नव्हता. त्याला आता फक्त शिवांशला ऐकत राहायचे होते.
    शिवांश बोलतच होता. "हे बघ मिलिंद, या क्षेत्रातले हे प्रकार मी अगदी आणि अगदी जवळून बघितले, प्रत्यक्ष अनुभवलेल्या कृती केलेले त्यातल्या बऱ्याच बारीकसारीक बाबी जाणणाऱ्या माझ्या आजोबांकडून मी सतत ऐकत आलो त्यामुळेच सजग होत आलो. या सार्‍या गोष्टींचे बारकाईने आकलन करत आलो. त्यामुळे याबाबत मी माझ्या कुवतीप्रमाणे खात्रीशीरपणे बोलू शकत आहे. त्यामुळेच मी आज तुला हे सगळं छातीठोकपणे सांगू शकतो आहे. मिलिंद."
    असा सगळा सविस्तरसा भूतकाळ सांगून शिवांश थांबला. आणि आपल्या जागेवरून उठून मिलिंदच्या समोर हेलपाटे मारु लागला. तरी मिलिंदला भानावर यायला बराच वेळ लागला. कारण तो शिवांशचे तर्कसंगत विचार ऐकण्यात, त्याचा बुद्धीवादी भूतकाळ समजून घेण्यात तो इतका निमग्न झाला होता की, त्याला वाटत होते शिवांशचे असे हे तर्कसंगत, विवेकी बोलणे कधीच संपू नये. पण ते कधी ना कधी संपणार होतेच.
    आता दोघांच्यात स्मशान शांतता पसरली होती. घटकाभर कुणीच काही बोलायला तयार नव्हते. तेवढ्यात एक मुलगा धापा टाकत शिवांश आणि मिलिंदच्या पुढे येऊन उभा ठाकला. तो हापत हापत मिलिंदपुढे काहीतरी बोलू लागला. तेव्हा मिलिंदच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. मिलिंदचे सगळे त्राण संपले. त्याचे पाय लुळे पडले. त्याची निराधार वेलीसारखी अवस्था झाली होती. तो मटकन खालीच बसला. शिवांशनी मिलिंदला आधार देत सांभाळले. त्याचे डोके आपल्या छातीवर घेऊन खांद्यावर हात धरून घरी आणले.
    घरचे वातावरण शोकमग्न होते. शेजारील लोक गोळा झाले होते. बाबांच्या बरं होण्यासाठी आपण जे काही उपाय करायला हवे होते. ते न करता बुवा, बाबा, महाराज वैद्य यांच्याकडे जात राहीलो. हे सारे न करता डॉक्टरांकडे उपचार सुरु ठेवले असते तर कदाचित बाबा हयात असते. हा विचार मिलिंदच्या मनाच्या आत सारखा टोचत होता....

-मनोज बोबडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रबोधन गीत

शस्त्रक्रिया