कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

हे असं आहे तर...


सूर्य डोक्यावर चढल्याने देहछाया अस्तित्वहीन झाली होती. कोणत्याच सरळ रेषी वस्तू प्राण्यांना सावलीची सोबत उरली नव्हती. सावलीविना एकाकी असण्याचा तो क्षण होता. दुपारचे बारा वाजले होते. दुपारच्या सुरुवातीला मिलिंद कॉलेजातून येत होता. नजरेस पडला तर शिवांशीने विचारले.

"कुठे गेला होतास?"

मिलिंदनी मागे बोट दाखवून "कॉलेजात." असे इशाऱ्यानेच सांगत
"सायंकाळी घरी ये, आपण फिरायला जाऊ." म्हणत सायकल दामटतच त्याने घराची वाट धरली. नाष्ट्यानंतर चहा घेत असतानाच मिलिंदकडे शिवांश आला.
"आई शिवांशसाठी एक कप चहा ठेव ग! बस शिवांश!" मिलिंदने खुर्ची सरकवली.
"तुझे नोकरीसाठी प्रयत्न चाललेले दिसत आहेत. ती मिळवण्याच्या प्रयत्नात इतका गर्क झालास की, कॉलेजला सुट्टी आहे हे तू विसरूनच गेला." शिवांशनी मिलिंदच्या मानसिकतेला नेमके कथन केले.
"हो हल्ली मला भान विसरायला होत आहे, यार. आज कशाची सुट्टी आहे ते कॉलेजात गेल्यावरच कळले." हे ऐकून मिलिंदने त्या कथनाला पैकीच्या पैकी गुण दिले.

दोघेही फिरायला जाण्यासाठी निघाले. जाताना मिलिंद खाटेवर कण्हत असणाऱ्या वडिलांकडे जाऊन. 'दुपारची राख अंगाला लावली का' हे विचारताच मान हलवून बाबांनी होकार दर्शवला होता. तीन वर्षांपासून लकव्याने ग्रस्त असल्याने त्यांच्या उपचारार्थ रोज अंगाला राख लावायची असे मिलिंदच्या गुरू बाबा महाराजांनी सांगितले होते. तेच मिलिंद नियमाने पाळत होता.

मिलिंद घरातून बाहेर आला. दोघेही गेटच्या बाहेर निघून रस्त्याला लागले. बाहेर मंद गार वारा सुटला होता. रस्त्याच्या कडेने गर्द लाल पिवळ्या रंगाने डवरलेली विविध फुलांची हिरवी झाडे आपल्याच मस्तीत डुलत होती. फुलांच्या गर्दपणाचा गुरुर असावा तो! त्यामुळेच त्या झाडांचे सौंदर्य अप्रतिम भासत होते. काही अंतर कापल्यानंतर पलीकडे विशाल वटवृक्षाखाली बाजूच्या बे घरातील आपल्याच विश्वात रममाण असंणारी मुले वडाच्या पारंब्यांवर झुला खेळत होती. काही लहानगे आपली आई कामावरून परत येताना पाहून धावत तिच्याकडे पळत होती. हे सारे अमोलिक दृश्य बघत मिलिंद व शिवांश गप्पा करीत चालले होते.

पुढे काही अंतर चालता चिंचेच्या झाडाशेजारून एक भव्य प्रेत यात्रा स्मशानाकडे जाताना त्यांनी बघितली. समस्त गावातील लोक त्या यात्रेत सामील होते. ती लांबच लांब रांग बघून कुणी मोठीच व्यक्ती असणार असा केलेला कुणाचाच अंदाज चुकला नसता.
ती यात्रा बघून शिवांश म्हणाला.

"आज कोणा श्रीमंतांच्या जाण्याने पृथ्वी हलकी झाली म्हणायची? आजच्या सुट्टीच्याच दिवशी त्यांची इथून सुट्टी झाली बघ, तीही पित्रूमोक्षाच्याच दिवशी?"
मिलिंदनी प्रचंडराव मिरासदार हे नाव सांगितले. ते शहरातील एका मोठ्या फॅक्टरीचे मालक होते. ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले होते. हे ऐकून शिवांश जरा अधिक स्पष्ट होत बोलू लागला.
"वयाच्या बरेच आधी मरण आले यांना. हार्ट अटॅक म्हटले की घातकच असते. तरीही सुटले एकदाचे. मिलिंद, तूच सांग आता अशा या पावन पवित्र दिवसावर आलेल्या त्यांच्या या मृत्यूकडे श्रद्धावान लोक कोणत्या दृष्टीने व समजीने बघतील बरं?"

शिवांशचे कुतूहल जागे झाले. मनात काही न ठेवता मोकळेपणाने पण थेट बोलणे हाच त्याचा स्वभाव होता. मात्र हे बोलणे मिलिंदला तिरकस जाणवले. त्याचे इतकेही स्पष्ट बोलणे भावुक मिलिंदला रुचले नाही. त्याच्या या बोलण्यावर त्याने प्रश्न उभा केला.

"असं का बोलतोस आणि असली शंका कशापाई रे?"
शिवांश शांत बसणारी आसामी नव्हतीच मुळी. त्याच्या अशा बोलण्याचे प्रयोजन सांगणेच होते.

"अंत्ययात्रेत एवढी प्रचंड गर्दी आणि तीही गर्भश्रीमंत लोकांची. यावरून वाटलं किती कोणी मोठी हस्ती असणार! आणि आहे हे तू बोललासच. गरिबांच्या मेहनतीवर त्यांचा वाजवी हक्क न देऊन आपली श्रीमंती वाढविणाऱ्या कुणाही व्यक्तीची इजारदारी वृत्ती मला नेहमीच अन्यायी वाटत आली आहे. असो, तर आपल्या सभोवताली आपण बघतोच की साध्या पपईच्या बियांच्याऐवजी एखादा वाकडा कोंब आला की लोकांना गणपती दिसू लागतो. कुठे गरम पाण्याचे झरे दिसले की तो अलौकिक चमत्कार वाटू लागतो. कुणाला चालता-फिरता मृत्यू आला की, तिथे पुण्यमरण असल्याच वाटते. मग या पितृमोक्षाच्या दिवसावर त्यांना आलेल्या मृत्यूविषयी लोक नको तो युक्तिवाद करतील यात नवल ते काय? नवल न करतील तरच! म्हणतील किती पुण्यवान माणूस! पित्रूमोक्षाच्यादिवशी मरण आले! असे प्रसंग मी बरेचदा अनुभवले आहे. मग अशी माझी शंका चुकीची कशी म्हणतोस?"

जरा काळासाठी दोघांमध्येही शांततेने प्रवेश केला. शांततेला कंटाळा येताच मिलिंदनी आपल्या मानवीय प्रश्नांना पुढे केले.

"हो ते खर आहे. ते असो! पण श्रीमंतांच्याविषयी तुझी अशी दृष्टी का? हे कोण आहेत हे छान माहिती आहे तुला. ते प्रचंडराव मिरासदार असले म्हणून कुणी वाईट असतात का, शिवांश?"

मानवीय तत्वांपुढे शिवांश बहुदा हार जातो. तिथे त्याचे युक्तिवाद बळकट असले तरी नम्रतेला कुठे जपावे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.

"सगळेच काही असतात असे कुठे म्हटले मी? परंतु या श्रीमंतांच्या जमातीमध्ये पण हा मोठे स्वरूप घेऊन आडवा येतो त्याचे काय? ह्या जास्तपणाकडे बघून मी बोललो. आणि हे प्रचंडराव निघाल्यावर तर तू समजलासच की, मी काही चुकीचे बोललो नाही हे! त्यांच्याविषयी तर तुला माहीतच आहे त्यांच्या फॅक्टरीत काम करणारे कामगार यांच्या विषयी काय काय बोलायचे ते? त्यांची प्रतिमा मजदूर वर्गात हक्क देण्याप्रति डागाळलेली होती. आता एवढ्या गोळा केलेल्या संपत्तीपैकी काय घेऊन चाललेत रे ते? त्यांच्या उपरांत बरे म्हणून कोणी नाव तरी घेईल का? मला माहित आहे कुणाविषयी असं बोललेलं तुला आवडत नाही. आणि मजूर, कामगारांना नाडणारा विषय असला की बोलल्याविना मलाही राहवत नाही."

शिवांशचे हे सगळे बोलणे मनातून सहज मान्य केले असले तरी मिलिंदनी पण आडवा आणलाच. मिलिंदला शिवांशच्या अभिजनांप्रति असणाऱ्या वेगळ्याच रागाची कायम शंका येत राहते. म्हणून शिवांशचे कितीही तर्काधिष्टीत बोलणे असले तरी तो ग्रह बाळगून मिलिंद पण चा आधार घेऊन शिवांशला बोलते ठेवतो.

रुढीप्रिय माणसांची हीच तर मोठी अडचण आहे, मिलिंद. नव्या आणि न्यायाच्या गोष्टी त्यांना स्वीकार्य वाटतच नाही. कोणी बुजुर्ग व माननीय व्यक्तींनी बोललेलं त्याला अधिक विश्वासाचे वाटते. मग त्याविषयी शंका घेण्याच्या तसदीची त्याला गरज नसते. मग माझ्यासारख्या परिवर्तनशील विचाराच्या माणसाचं बोलणं त्याला कसं चालेल? तुझेही तसेच तर आहे. रागावू नको तुही रूढीवादी असल्याने माझ्या बोलण्याकडे गांभीर्याने बघावं असे तुलाही वाटत नाही. मग तुला भलेही ते सत्य असल्याची शंका का येईना!"

शिवांशनी मिलिंदच्या लंगड्या प्रश्नांना निकालात काढले. आता मिलिंदला विषय बदलल्याशिवाय गत्यंतर नव्हते.

"बरं ते जाऊ दे; पण आता प्रचंडराव गेले आहे. आता त्यांच्याविषयी आपण विपरीत कशाला बोलायचं? एक माणूस म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो व पुढच्या जन्मी त्यांना सद्गती लाभो एवढी प्रार्थना तर करू शकतो ना, की तीही नको?"

मिलिंदनी विषय बदलला खरा पण नकळत का होईना तो खोडसाडपणा करायला विसरला नाही. शिवांशच्या विचार तत्त्वांची मिलिंदला चांगलीच ओळख असतानाही त्याने त्याला कैचीत पकडायचा प्रयत्न केलाच.
शिवांशची रेल्वे रुळावरच होती. बटन दाबण्याचीच वेळ होती.

"बघ रुढीप्रियतेचा दाखला दिला आहेसच ना तू. शांती, सद्बुद्धी, मारणोपरांत? कशासाठी? काय उपयोग? जे होणार नाही ते व्हावं अशी अपेक्षा करणं मला तर खुळाचारच वाटतो." शिवांशनी आपल्या मनातले स्पष्ट बोल मिलिंदच्या कानावर टाकले.

एवढ्याने समाधान होईल तो मिलिंद कसला? न कळल्याच्या अविर्भावात तो म्हणाला.

"म्हणजे रे?"

"तू म्हणालास त्यांच्या आत्म्याला शांती मिळो! पुढच्या जन्मी सद्बुद्धी लाभो! पण मी ज्या आत्म्याविषयी साशंक आहे. आणि पुनर्जन्म व पूर्वजन्म याविषयी अनभिज्ञ, तेव्हा मी तशी प्रार्थना कशी काय करू शकतो? चल समज अशी प्रार्थना करावीच म्हटलं तर कोणाकोणाच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करायची? त्यांच्या देहाला जगणारे कितीतरी जिवाणू, विषाणू त्यांच्या मृत्यूमुळे मृत झाले असतील, मग त्यांच्या आत्म्यास काय झालं असेल? मग कुणाकुणाच्या आत्म्याच्या शांतीची अपेक्षा करायची?"

शिवांशचे खोल, साधारण डोक्याला जड जाईल असे तर्क जागे झाले. त्याचे ते तात्विक बोलणे मिलिंदच्या मनात कोण्या कोपऱ्यात जागा करत असले तरी त्याच्या भावनांना ते रुचत नसल्यामुळे त्याला त्याच्या प्रश्नांची ऐटबाजी कायम ठेवणे त्याला महत्वाचे वाटत होते.

"तू एवढा हट्टी का आहेस, शिवांश? सांगितले ते मुकाट्याने केले तर तुझे काय बिघडणार आहे? कोणत्याही गोष्टी आपल्या सुयोग्य तर्काने पटवून देणाऱ्या शिवांशला कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या नसल्या तरी समाधानासाठी कराव्या लागतात एवढेही का कळू नये!"

"पण मी हे सगळे का नाकारतो या विषयी सगळं माहीत असताना तू असा आग्रह का करतोस? हेच मला कळत नाही."

यावर तू माझा मित्र आहेस, म्हणून. हे मिलिंदचे बालिश अंगाचे उत्तर ऐकून शिवांश मनातच हसला. ते हसू चेहऱ्यावर उमटते का याचा शोध घेणाऱ्या मिलिंदला ते सापडलेच नाही.

मग शिवांश काही वेळ विचारात पडला. काहीच न बोलता तो शांत होता ते बघून मिलिंदनी त्याला हटकले.

"कुठे हरवलास शिवांश? तुला नाही म्हणायचे तर नको म्हणूस. पण असा अबोल नको राहुस!"

"तुला हे असं बोजड बोजड काही सांगतो तेव्हा मी चुकतोच खरं तर... तुझ्या सोबत असताना श्रद्धा आधारित गोष्टींच्या बद्दल तुझेच ऐकायला आणि करायला हवे."

(थोडे थांबून हसतच पुढे बोलू लागतो) "ठीक आहे तुला नाराज कशाला करावे? चल तर मग आत्मे असतीलच तर प्रचंडरावांच्या आत्म्याला तसेच त्यांच्या जीवाला आजवर जगविणाऱ्या सूक्ष्मजीव जंतूच्या आत्म्याला शांती लाभो आणि मिलिंदचे समाधान घडो!"

मिलिंदचे मन राखण्यासाठी शिवांश असे काहीसे बोलला, तोच...

"चला माझ्या समाधानासाठी तर माझ्या समाधनासाठी! आज एवढं बोललास उद्या जरा जास्त बोलशील!"

मिलिंदचे हे बोलणं ऐकून आता जरा शिवांशचा पाराच चढला.

"तुझ्यासारख्या धारणा असणाऱ्यांचं असंच असतं बघ. आणि हेच मला पटत नाही. कोणी प्रेमा वा आपुलकीखातर त्यांना काही करण्याची, बोलण्याची गरज पडली आणि तुमच्या मान्यता, धारणेला अनुकूल ठरली तर ती करणाऱ्याप्रति तुम्ही भलताच ग्रह बाळगून आपल्या धारणा दृढ करण्याचं काम करत असता, यार. मग यातील सत्य, वास्तव काय त्याचेशी काही सोयरसुतक नसते बघ अशांना. ती व्यक्ती कोणत्या प्रसंगी, कोणत्या कारणाने काय बोलतेय? याचे भान कोणत्या बधिरतेपायी विसरतात कळत नाही. तुही काही वेगळा आहेस का?"

कोणत्या गुरूचा, बाबाचा शिष्य असेल तो याहून वेगळे काय बोलू शकतो?

"तू कोणत्याही गोष्टीचा एवढा किस का पाडतोस, शिवांश?"

"बूंद बूंद से सागर बनता है मेरे यार। असल्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष 
केल्याने चुकीच्या गोष्टी रूढ होतात. पुढ त्या मोठे स्वरूप धारण करतात. आणि परंपरा म्हणून मान्यता पावतात; म्हणून त्या वेळीच निकालात काढलेल्या समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. मी या सर्व बाबी सूक्ष्मपणे अनुभवल्या आहेत. आणि अभ्यासल्याही आहेत. मी या गोष्टींकडे डोळसपणे का बघतो? हे तूला कदाचित नाही माहीत. मी आज तुला सगळं नीट सांगतो बघ, हा शिवांश असा का आहे ते!"

मिलिंदच्या मनातले सर्व भाव स्थिर झाले होते. कानाला सुईचाही आवाज ऐकू येईल एवढे बळ त्याने कानात जमा केले होते. रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांचा आवाज, पक्षांचा किलबिलाट, गुरांचे हंबरणे, कुत्र्याचे भुंकणे हे आता काही काही त्याला ऐकायला येत नव्हते. त्याचे कान शिवांशच्या शब्दांची आतुरतेने वाट बघत होते. ते अधीर झाले होते. आता तो आपल्या मान्यता, धारणा यांचा खून करणार की, त्यांना पोषक असे काही सांगणार? अशा शंका मिलिंदच्या मनात घारीसारख्या पंख पसरून उडत होत्या.

शिवांश अगदीच शांत होता. तो त्याच्या पायावर चढू पाहणाऱ्या किड्याला एकटक दृष्टीने न्याहाळत असताना मिलिंदनीच तो झटकला.

"माझ्या पणजोबांचे भाऊ मारोतराव एका साधूच्‍या नादी लागले होते. सगळ्या पारलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी साधू सांगतील ते सारे काही करत सुटले होते. रात्रीला स्मशानात अमावस्या-पौर्णिमेला मुक्काम करणे, त्या साधूच्या म्हणण्याप्रमाणे गावांमध्ये नग्न हिंडणे, अनैसर्गिक वागणे, कुणालाही भीती वाटावी असे भाव सतत चेहऱ्यावर बाळगणे अशा सर्व अघोरी प्रकारात ते रमायला लागले होते. आजोबांच्या या अशा वागण्याची चर्चा गावात बर्‍याच लोकांच्या कानावर गेली. मारोतराव आता जादूटोणा, टोटके करू लागले, याचा साक्षात्कार लोकांना झाला. त्यामुळे आमचे घर भीतीचे केंद्र बनले होते. त्यामुळे लोक आमच्यापासून फटकून वागायचे. फक्त ज्यांना जादूटोणा, बाहेरचे, भूत, भानामती यावर उपाय हवा असायचा; तेच लोक आजोबांकडे येत.

आजोबांनी आपले एक ठाणे बनवले होते. ज्यात भली मोठी काली मातेची मूर्ती आणि इतर गोष्टींसाठी लागणारे साहित्य जमवले होते. नदीचा घाट आणि ते देवीचे ठाणे एवढेच आजोबांचे विश्व होते. मी बालपणापासून या गोष्टी अगदी जवळून बघितल्या होत्या. त्यामुळे याबद्दल भीती कधी वाटली नाही; परंतु हे सगळे बघत मोठे होताना या सर्वांचे जवळून निरीक्षण मात्र करता आले. जसे या साऱ्यातील फोलपट लक्षात येत गेले, तसतशी यातील निरर्थकता समजत गेली. हा सगळा प्रकार धारणा, मान्यता, श्रद्धा आणि सातत्याने एकाच प्रकाराने नादी लावण्याचा आहे. तिथे कसल्या शंकांना, प्रश्नांना कसलेच स्थान नसते; पण कदाचित मी लहान असल्याने असेल आजोबा मला मोकळेपणाने सगळे सांगायचे. सोबत एक ताकीद देऊन ठेवायचे की, मी हे दुसर्‍या कुणाला सांगू नये!"

मिलिंद आपले सगळे चित्त शिवांशच्या बोलण्यावर एकाग्र करून ऐकत होता. इतर कोणतीच गोष्ट त्याला या क्षणी व्यत्यय म्हणून नको होती. कारण पहिल्यांदाच त्याला शिवांशच्या अशा नेहमीच तर्काने बोलणाऱ्या वृत्तीचे आज नेमके कारण कळणार होते. तो ऐकत होता. फक्त ऐकत होता.

शिवांश बोलायचं थांबला होता; पण हे बोलणं थांबणं मिलिंदला रुचलं नाही. त्यांने परत प्रश्न केला. शिवांश बोलू लागला.

मारुतरावांची देवाधर्मावर अगाध श्रद्धा होती. ते बालपणापासून धर्म अध्यात्म मार्गातच रममान असायचे. शिवांशच्या पणजोबांनी म्हणजे नानानीच त्यांना हा मार्ग दाखवला होता.

'जीवनाचे सार्थक करायचे असेल तर हाच मार्ग स्वीकारावा!'

असे त्यांचे मनस्वी म्हणणे होते. तेव्हापासून त्यांनी त्याच मार्गाचा अवलंब केला होता. गुरु चरणी लिन होत ते ईश्वराधीन झाले होते; पण एकदा नानाला भुताने झपाटले त्यामुळे घरची मंडळी प्रचंड घाबरली. घरच्या सगळ्यांचाच धीर खचला. त्यांच्या त्या तशा लक्षणांमुळे घरच्या वरिष्ठ व्यक्तीसारखे ते राहिलेच नव्हते. ते आपल्याच तंद्रीत मग्न असायचे. कोणाशी बोलायचे नाही, कुणाला जवळ येऊ द्यायचे नाही. डोळे विस्फारून एकटक एकाच जागेकडे बघत बसायचे. आणि क्षणातच बडबड करत कुठेही निघून जायचे. त्यांच्या या अवस्थेला बघून ज्येष्ठ मंडळी म्हणायची.

"याला बाहेरची बाधा झाली आहे. त्याच्या अंगात कोण्या दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे; तेव्हा तुम्ही ह्याला कुण्या वैद्यांकडे घेऊन जा! आणि त्याचे हे भूत काढून घ्या!''

तेव्हा गावातील छु-छा करणाऱ्या एक-दोन बुवाकडे दाखवण्यात आले. त्यांनी ती बाधा काढली खरी; पण काडीचाही उपयोग झाला नाही. पुढे यासाठी कोणी मोठी हस्ती हवी असल्याचे बोलले गेले. जे मोठे अघोरी पंथीय साधू असतील त्यांच्याबद्दल माहिती घेऊन मग त्यांना त्या अघोरी बुवाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांनी आठएक दिवस त्यांच्यावर काय टोणे-टोटके केले माहित नाही; पण यासाठी त्या साधूंनी नानांच्या घरचे वर्षभराचे अनाजाचे कोठार रिक्त केले. नाना बरे झाले; परंतु पुढे १० दिवसातच त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

मारोतरावांचे वडील नाना गेले. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळायला तेव्हा सर्व परिवारास पंचवीस वर्षे लागली. या सर्व रहाटगाडग्यात मारोतरावांचे वैद्य होण्यामागचे कारण होते त्यांच्या वडिलांचे अघोरी साधूकडे गेल्यानंतर अगदी आठच दिवसात बरे होणे. तेव्हा मारोतरावांना फारच मोठा चमत्कार वाटला. त्यामुळे स्वाभाविकच ते त्या साधूकडे आकर्षिल्या गेले. आणि त्यांच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर वर्षभरात ते त्या अघोरी साधूकडे चेला, शिष्य बनून जाऊ लागले. त्यांनी सांगितलेल्या करवून घेतलेल्या सर्व सर्व प्रकाराचे त्यांनी तंतोतंत पालन केले होते. आणि पुढे ते या आसपासच्या बारा, चौदा गाव परिसरातले मोठे वैदु झाले होते. लोक मग त्यांच्यापासून फटकुन वागायला लागले, घाबरु लागले त्यामुळे मारोतरावांशी मानाने वागू लागले. ते भीतीमुळेच होते, हे त्यांना उमगले होते. मारोतराव नानांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगामुळे असे अघोरी बनले; पण ती मूळची अत्यंत संवेदनशील आणि माणसात वावरणारी कौटुंबिक व्यक्ति, त्यामुळे इतकी वर्षे ते यात वावरले खरे पण त्यांच्या मनातून संसाराप्रतीचे प्रेम कधीच वजा झाले नाही. त्यांची माणसातली आसक्ती संपली नाही; म्हणून तर या सर्व बाबी निरर्थक, बेक्कार, अगदीच फालतू आणि निरुपयोगी आहे, असे जाणवल्यामुळेच ते या गोष्टींविषयी नेहमीच समजावीत आले आहे.

ते हे असे दुटप्पीपणे वागत होते. याला फक्त दहा वर्षे झाली होती. ही त्यांच्या स्तरावरची विवशता होती. पण विवशतेला बघून कोण्या चुकीच्या आणि घातक गोष्टीला कोणीही माफ करू शकणार नाही, हे कोण्याही संवेदनशील व्यक्तीला कळते; पण शिवांश आपल्याला नक्कीच समजू शकेल, असा विश्वास मारोतरावांच्या मनात स्पष्टपणे नांदत होता. आज नाही निदान मोठा झाल्यावर तरी नक्कीच समजु शकेल असे त्यांना सारखे सारखे वाटत होते.
मारोतराव या अघोरी प्रकारात रमत असल्याला 35 वर्षे होत आहेत. या दहा वर्षापासून ते लोकांना आणि स्वतःलाही फसवत जगत होते. असे हल्ली त्यांना वाटायला लागले होते. पूर्वीची पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे ते असली कामे करत आले; आणि नंतरची दहा वर्षे त्यांचे तर्कसंगत पद्धतीने जगणे, वागणे चालले होते; पण हे सगळे फक्त आणि फक्त त्यांच्या अंतरात, त्यांच्या डोक्यात होते. मारोतराव प्रत्यक्षात अनुभवलेल्या बाबींतून जन्मलेला बुद्धीवाद जोपासायला जावे तर आजवर लोकांना नादी लावून फसवल्यामुळे लोक आपली नाचक्की करतील असे त्यांना वाटत होते. हे शिवांशलाही चांगलेच ठाऊक होते.

ते पुढील दहा वर्षापासून कार्यकारणांच्या संगतीने का वावरताहेत? याचे कारणही त्यांचेच वडील होते. म्हणजे परत त्यांच्या वडिलांचे ते भूतच होते. खरे तर ते भूत हे दुसरे तिसरे काहीही नसून एका जिवंत व्यक्तीचे पछाडणे होते.

ती व्यक्ती होती, एक सुंदर, राजस, लोभस कोणात्याही हृदयधारी मनुष्यास आपल्या सौंदर्यसौष्ठवाने, वेड लावणारी चित्तहारी रुपवती. मारोतरावांचे वडील नाना म्हणजे गावातील सन्माननीय हस्ती. त्यांना आपल्या मानाचा विलक्षण मान होता. पण इथे निसर्गाची किमया वरचढ ठरली होती, असेच म्हणावे लागेल! पुरत्या अनावर झालेल्या भावना, मोह, आसकी, प्रेम आदींनी जखडून नाना त्या सुंदर ललनेच्या मोह पाशात आरपार गुंतत गेले.

दिवस जात राहिले, जात राहिले. वर्षेही उलटत गेली. ते त्या स्त्रीच्या सर्वस्वी अधीन झाले. घराकडे पूर्णपणे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागल्याने घरची पुरती हेळसांड होत होती. त्यामुळे मारोतरावांच्या आईची रोजची चिडचिड वाढली होती. तिच्याच अंगावर सगळा घरचा भार आल्याने तिची निराशा वाढत चालली होती. नाना सतत गुपचूप राहायचे. त्या स्त्रीने वडिलांवर खूप मोठे गारुड टाकले होते. ती नानांची भावनिक पातळीवर हवी तशी लूट करू लागली. नानांना त्यांचे प्रेम प्रकरण घरच्यांना सांगण्याची धमकी देऊ लागली. अशीच हळूहळू आपल्या गरजा पूर्ण करता करता तिच्या अपेक्षा भारंभार वाढू लागल्या होत्या. त्यामुळे तिने हळव्या मनाचा आधार धरत, नानांना या ना त्या कोंडीत पकडत त्यांचे आर्थिक दोहन करू लागली.

या गोष्टीचा नानांच्या मनावर फार खोल परिणाम झाला होता. हा धक्का ते पेलू शकले नाही. त्यामुळे त्यांचं मानसिक विश्वच उध्वस्त झालं होतं. डोक्यावर आकाश कोसळलं की, होणाऱ्या अवस्थेसारखी त्यांची दशा झाली होती. त्यांच्या मनातील विचारांची गती ताशी दशलक्ष किमी. झाल्याने एका विचाराचे दुसऱ्याशी तार जुळत नव्हते. वाऱ्याच्या घोंगावणार्‍या आवाजाप्रमाणे असणाऱ्या मनातील विचारांनी मेंदूला पार निष्क्रिय करून टाकले होते. परिणामी नानांची मानसिकता या जगापासून, संसारा, कुटुंबा, मित्रा, नातलगापासून तूटण्यात झाली. आणि मग पुढचे प्रकरण घडत गेले.

ती स्त्री कुणा श्रीमंतासोबत पळून गेल्याची बातमी साधूंकडे असताना नानांच्या कानावर आली. ती ऐकून नानांच्या आनंदाने अशी उसळी घेतली की तेथील कोणाच्याच नजरेपासून तिला लपता आले नाही. त्या उत्कर्षाचा परिणाम असा झाला की, नाना चारच दिवसात बरे झाले; पण काही दिवसातच त्यांना कळले होते की, तोवर गावात त्यांची प्रचंड नाचक्की झाली. आणि हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले होते.
कुटुंबातील हा सगळा इतिहास शिवांशनी नीट कथन करत असताना मिलिंद हे सारे त्याच्या मनाच्या, कानाच्या, डोक्याच्या एकाग्रतेने ऐकत होता. आता मिलिंदकडे शिवांशसाठी कसलेच प्रश्न शिल्लक राहिले नव्हते. त्याच्या सर्व शंकांचा विलय झाला होता. तो आता काही बोलणार नव्हता. त्याला आता फक्त शिवांशला ऐकत राहायचे होते.

शिवांश बोलतच होता. "हे बघ मिलिंद, या क्षेत्रातले हे प्रकार मी अगदी आणि अगदी जवळून बघितले, प्रत्यक्ष अनुभवलेल्या कृती केलेले त्यातल्या बऱ्याच बारीकसारीक बाबी जाणणाऱ्या माझ्या आजोबांकडून मी सतत ऐकत आलो त्यामुळेच सजग होत आलो. या सार्‍या गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करत आलो. त्यामुळे याबाबत मी माझ्या कुवतीप्रमाणे खात्रीशीरपणे बोलू शकत आहे. त्यामुळेच मी आज तुला हे सगळं छातीठोकपणे सांगू शकतो आहे. मिलिंद."

असा सगळा सविस्तरसा भूतकाळ सांगून शिवांश थांबला. आणि आपल्या जागेवरून उठून मिलिंदच्या समोर हेलपाटे मारु लागला. तरी मिलिंदला भानावर यायला बराच वेळ लागला. कारण तो शिवांशचे तर्कसंगत विचार ऐकण्यात, त्याचा बुद्धीवादी भूतकाळ समजून घेण्यात तो इतका निमग्न झाला होता की, त्याला वाटत होते शिवांशचे असे हे तर्कसंगत, विवेकी बोलणे कधीच संपू नये. पण ते कधी ना कधी संपणार होतेच.

आता दोघांच्यात स्मशान शांतता पसरली होती. घटकाभर कुणीच काही बोलायला तयार नव्हते. तेवढ्यात एक मुलगा धापा टाकत शिवांश आणि मिलिंदच्या पुढे येऊन उभा ठाकला. तो हापत हापत मिलिंदपुढे काहीतरी बोलू लागला. तेव्हा मिलिंदच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. मिलिंदचे सगळे त्राण संपले. त्याचे पाय लुळे पडले. त्याची निराधार वेलीसारखी अवस्था झाली होती. तो मटकन खालीच बसला. शिवांशनी मिलिंदला आधार देत सांभाळले. त्याचे डोके आपल्या छातीवर घेऊन खांद्यावर हात धरून घरी आणले.

घरचे वातावरण शोकमग्न होते. शेजारील लोक गोळा झाले होते. बाबांच्या बरं होण्यासाठी आपण जे काही उपाय करायला हवे होते. ते न करता बुवा, बाबा, महाराज वैद्य यांच्याकडे जात राहीलो. हे सारे न करता डॉक्टरांकडे उपचार सुरु ठेवले असते तर कदाचित बाबा हयात असते. हा विचार मिलिंदच्या मनाच्या आत सारखा टोचत होता....


-मनोज बोबडे

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०२४

शस्त्रक्रिया

प्रतीकात्मक इमेज 
अलीकडेच पाऊस पडून गेला होता. सारे रस्ते सारवल्यासारखे स्वच्छ, चकाकदार नी निर्मळ झाले होते. आसमंत सावळा होऊन हसत होता. नुकत्याच बाथरूममधून न्हाऊन बाहेर निघालेल्या स्त्रीच्या केसातुन पाणी निथळावे तसे झाडांच्या पानापानातून थेंब सांडत होते. अशा वातावरणात चकाकणार्‍या डांबरी रस्त्यावर एक मुलगा त्याच्या मैत्रीणीस निरोप देऊन डोळे पुसत जात होता.

हे दृश्य प्राजक्ता शेजारीच असलेल्या बंगलेवजा घराच्या खिडकीतून निशानेबाजाच्या नजरेने बघत होती. एकटक, स्थिर! तिच्या मनात चालत असलेलं द्वंद्व तिला त्या दृष्यातून प्रतीत होत होतं. तिचे विचार विश्व नकारात्मक भावनेने भरलेले होते. यामुळेच त्या दृश्याने तिच्या चेहऱ्यावर कमालीचे औदासीन्य पसरवले होते. चेहरा मलूल बनला होता. ही तिची अवस्था शेजारीच बसलेली सई बारकाईने न्याहाळत होती.

भिवया उंचावून सईने नजर फिरवली. ती पडली सरळ भिंतीवरील फोटोवर. जी प्राजक्ताचीच पेंटिंग होती. गर्द फुलांच्या कुंडी शेजारी व्हीलचेअरवर बसलेल्या प्राजक्ताची ऑइल पेंटिंग होती ती.

"वाव! किती मस्त चित्र आहे ग तुझं! कोणी काढलं? तो रेखाटलेला चेहऱ्यावरील जिवंतपणा, ती रंगसंगती, ती ब्रशची कलाकारी. क्या बात है!"

हे सारे ऐकून न ऐकल्याच्याच अविर्भावात प्राजक्ता होती.

"प्राजक्ताssss?" सई जवळजवळ ओरडलीच. तोच आवाज प्राजक्ताला बोलविता ठरला.

"हो छानच आहे, विप्लवनी काढले आहे."

"मी सांगते हा खूप मोठा आर्टिस्ट होणार, बघच तू!"

"हो तो गुण आहे त्याच्यात, मला माहिती आहे. आणि तसे इतरही बरेच गुण आहेत."

प्राजक्ताच्या चेहऱ्याची उदासी हेरलेल्या सईला तिचे हे बोलणे ऐकून 'कुछ तो गडबड है।' याची तिला खात्री झाली होती. म्हणून सई प्राजक्ता जवळ येऊन तिचा हात हाती घेत नम्रपणे विचारु लागली.

"काय झालं प्राजक्ता? विनम्रची प्रतिभा मला माहीत नसली तरी त्याचे आणि तुझे एकमेकावर खूप प्रेम आहे, हे मला चांगलेच ठाऊक आहे. याबद्दल तू तासनतास माझ्याशी बोलली आहेस. आजवर खूप प्रेमळ, समजदार, मोकळ्या मनाचा, प्राकृतिक स्वभावाचा अशा बिरुदांनी विप्लवचे गुण गाणारी प्राजक्ता अचानक अशी उपरोधिक का बरं बोलू लागली?"

सईला अनामिक भीती वाटत होती. प्राजक्ता आणि विप्लव एकाच अवस्थेचे. दोघेही विकलांग होते. या त्यांच्या समदुःखीपणापाईच ते दोघे परस्परांच्या जवळ आले होते. खूप भरभरून प्रेम करू लागले होते. विप्लवचा प्राजक्तावर खूप जास्त जीव होता. आणि प्राजक्ताचेही त्याच्यावर अपार प्रेम होते; पण या क्षणी प्राजक्ता फारच कष्टी दिसत होती. आताचे तिचे तुसडेपणाने बोलणे सईला विचार करायला लावत होते.

म्हणून सईचे तिला प्रश्न विचारणे सुरु होते. प्राजक्ताने ठरवले होते ती कोणत्याही परिस्थितीत, कधीच जीवनाच्या अंतापर्यंत विप्लवशी नाते तोडणार नव्हती. त्याच्यापासून कधीच प्राजक्ता दूर होणार नव्हती. तिनी यावर सईशी बरेचदा चर्चा देखील केलेली होती; पण आता तिला हे प्रेम जीवनभर चालेल की नाही याची शंका येऊ लागली.

का? याबाबत सईला काही की काहीच थांगपत्ता नव्हता. परवाच दुबईवरून आलेली सई न कळवता भेटायला येऊनही प्राजक्ताला याचे कसलेच आश्चर्य नव्हते. याचे कारण होते. या चारच दिवसांपूर्वी पहाटे पहाटे तिला पडलेले स्वप्न. तेव्हापासून प्राजक्ताचे मन विचलित झाले होते. तिच्या मनाच्या गोंधळाने तिला पुरते विचलित करून सोडले होते.

प्राजक्ताला असे स्वप्न का पडले? याआधी काय चालले होते तिच्या डोक्यात? खरेतर या महिन्याभरापासून चाललेल्या यांच्या शास्त्रक्रियेबद्दलच्या निर्णयाचाच हा परिणाम होता. विज्ञानाने आश्चर्यकारकरित्या प्रगती केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कारिक शस्त्रक्रियेने हे दोघेही चालायला लागतील अशी शेकडा नव्यान्नव टक्के डॉक्टरांकडून दोघांनाही ग्वाही मिळाली होती. त्यामुळेच या उभय जीवांनी उपचार करायचा असे ठरविले होते. सर्व प्रकारची माहिती घेऊन हे सर्व सोपस्कर करायचे असे आठ दिवसापूर्वीच ठरविण्यात आले. हल्ली यांचे मध्ये मध्ये डॉक्टरांकडे जाणे होते, ते याच कारणाने. तेव्हापासून आजवर त्यांच्या सगळ्या तपासण्या पूर्ण झाल्या होत्या. आता पुढील शनिवारी प्राजक्ताची आणि विप्लवचीही शस्त्रक्रिया होणार आहे. विप्लवची शस्त्रक्रिया मुंबईमधील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत होणार आहे आणि प्राजक्ताची नागपुरातील विशेष प्रवीण डॉक्टर शस्त्रक्रिया करणार असे यांना सांगण्यात आले.

प्रतीकात्मक इमेज

विप्लवनी सर्व तयारीनिशी चार दिवसांपूर्वीच मुंबई गाठली. आणि प्राजक्ता दोन दिवसांनी नागपूरला जाणार आहे; परंतु आत्ताच प्राजक्ताच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तिच्या कालच्या स्वप्नाने तिचे संपूर्ण होश उडवले. विप्लवचे ते तार्किक वागणे, बोलणे आणि शेजारील काकांचे जे प्राजक्ताचे ज्येष्ठ मित्र आहेत. त्यांनी वर्तवलेले विप्लवविषयीचे भविष्य या साऱ्याकडे बघता प्राजक्ता पुरती हताश झाली होती. या 24 तासांच्या काळातील एकाही क्षणाने तिच्या मना, मेंदूचा पिच्छा सोडला नव्हता.

प्राजक्ताच्या स्वप्नामुळे, त्या मित्र काकांनी वर्तविलेल्या भविष्यामुळे घेतलेल्या धास्तीने प्राजक्ता बरीच विचलित झालेली बघून सईही विचारात पडली. तिला यावर काय बोलावे कळत नव्हते. तरी या क्षणी शांत राहून चालणार नव्हते. सईनी प्राजक्ताला समजाविण्याचा असफल प्रयत्न केला.

"मला वाटते तू हे पाण्यातून दिसणाऱ्या काठीला बघावे तसे बघते आहेस. जी सरळ कधीच दिसत नाही. याचा अर्थ ती वाकडीच असते, असे नाही! काही घडण्याआधी कयास करणे बरे नसते, प्राजु. प्रकृती बिघडवत असते ते. सोड हे सगळं. सत्य ते स्वीकारण्याचे धाडस ठेव. उगाच कृत्रिम विचार करून तरसवू नकोस स्वतःला. असं किंवा तसं हा विचारच कशाला करायचा? परिस्थितीनुसार जे घडायचे, ते घडणारच आहे. तू अपंग आहे ही परिस्थिती तुला व्हीलचेअरचा पर्याय मिळवून गेलीच ना? तसेच इतर साऱ्या बाबींचे. उपचार नसले तरी पर्याय असतोच."

सईचा प्रयत्न सफल होईल अशी सध्याची प्राजक्ताची मनस्थितीच नव्हती

सईने विप्लवचे बोलणे ऐकले नाही ना! आणि तिचा ज्योतिषावर विश्वासही नाही. म्हणून ती असे बोलत आहे. आपल्याला काकांनी सांगितलेली सर्व भविष्ये खरी ठरली होती. त्यांच्या म्हणण्यावर आपला पूर्ण विश्वास होता. त्यातल्या त्यात आपल्याला ते पडलेले स्वप्न, हल्ली आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांना दुजोरा देणारे होते म्हणून आपल्याला चिंता वाटत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आणि त्या काकांच्या सुद्धा! तो बरा होईल, चालायला लागेल, फिरायला लागेल, सर्वसामान्यांप्रमाणे स्वतःचे स्वतः करू लागेल असे आपल्याला सारखे वाटत आहे.

त्या बरा झालेल्या विप्लवला प्राजक्तासारख्या परान्नपुष्ट व्यक्तीची आता गरज कशी असणार? एवढा हुशार, मोठा कलावंत होण्याची त्याच्यात क्षमता आहे. आतापर्यंत त्याच्या त्या अवस्थेमुळे त्याच्यावर मर्यादा होती. ती आता असणार नाही. तो मोठा व्हावा पण त्याने आपल्याला सोडू नये, त्याच्या सर्व सर्व यशात आपण सहभागी असावे असे तिला या दोन दिवसापूर्वीपर्यंत वाटायचे; पण हे सारे बघता तसे होईल असे या घडीला प्राजक्ताला वाटत नाही आहे.

"जे होत असते परिस्थितीनुसार, कृतीनुसार होत असते आणि जे होते ते मोकळ्या मनाने स्वीकारले पाहिजे!"

विप्लवच्या अशा सततच्या बोलण्याने प्राजक्ताच्या मनात हल्ली फार गोंधळ माजला आहे. या शस्त्रक्रिया व्हायच्या नसत्या तर असले विचार तिच्या मनात आलेच नसते. असे एकूण तिच्या हळव्या, कोवळ्या व अत्यंत भावुक मनाची अवस्था बघितल्यावर वाटल्यावाचून राहत नाही.

वारा सुसाट सुटला की, झाडांची पाने जोरात फडफडू लागतात. पिकली पाने जोमाने गळू लागतात. विचारांच्या वादळामुळे अशीच फडफड, सडसड प्राजक्ताच्या मनात चालली होती. आणि तिच्या कमजोर, अगदीच लुळ्या विचारांना हादरे बसत होते.

प्राजक्ताला आता कोणत्याच प्रकारे समजावून काही होणार नाही असे तिची अवस्था बघता सईला एव्हाना उमगले होते.

"प्राजक्ता तू फक्त ह्या शस्त्रक्रिया होईस्तोवर शांत राहावंस! ज्यावर काही नसतो त्यावर काळ हाच एक जालीम उपाय असतो. म्हणून आता फक्त वाट बघणे एवढेच तुझ्या हाती आहे." सईचं एवढंच समजावणीचं बोलणं बाकी होतं. ती ते बोलली.

सई शुक्रवारला परत जाणार होती. सोबत तिचा मुलगा सार्थकही होता. तो आता पाच वर्षाचा आहे. ते दोघेही मायलेक जाणार होते. येथे ते पंधरा दिवसांसाठी आले होते. अशोकला रजा मिळाली नव्हती. नंतर एक वर्षाने सगळी फॅमिली येणार होती.

"बरं जास्त विचार करू नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस! बाय, येते मी. आणि हो कोणतीही नकारात्मक घटना, दृष्य, विचार बघून, ऐकून त्या आपल्याशीच निगडित आहेत असा भ्रम पाळू नकोस! मला कळले तू ते बाहेरचे विरहाचे दृष्य बघून पुन्हा जास्तच कष्टी झाली होती. निगेटिव्ह थिंकिंग इज इंज्युरियस टू हेल्थ, डार्लिंग!" एवढे बोलून साईंनी निरोप घेतला.

या चारच दिवसात चेहऱ्यावरचा ओलावा सुकलेली प्राजक्ता वाळवंटाप्रमाणे भकास दिसत होती. विप्लव बरा झाल्यावर आपल्याला नेहमीसाठी सोडून जाईल, ही विलक्षण भीती प्राजक्ताच्या मनात फेविकलच्या मजबूत जोड सारखी चिकटून बसली होती. शस्त्रक्रिया होईपर्यंत तरी ती सुटणारी नव्हती. हे अगदीच स्पष्ट होते.

प्रतीकात्मक इमेज 

इकडे प्राजक्ताची शस्त्रक्रिया सुरू करण्याचा दिवस उजाडला. आणि तिकडे मुंबईत विप्लव ऑपरेशन झाल्यानंतर सुन्नपणातून बाहेर पडत होता. नागपुरात प्राजक्ताचे ऑपरेशन यशस्वीरीत्या आटोपले. ती पूर्णपूर्ण सचेत झाल्यावर तिला फोनवरून कळले होते की, विप्लवची शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली.

हे कळताच प्राजक्ता कमालीची खिन्न झाली. तिचा दुखावेग अनावर झाला. पण मनात पूर्वीची भीती, तो त्रागा, तो गोंधळ जसाच्या तसा नव्हता. या साऱ्याची जागा आता विप्लवप्रतीच्या गाढ सहानुभूतीने घेतली होती. तिच्या मनाला विप्लव बरा होणार नव्हता याचे अतोनात दुःख होते. प्राजक्ता पायाच्या अंगठ्याकडे एकटक बघत मनसोक्त रडत होती. तिचे आताचे अश्रू फारच खेदाचे होते. 'आपण किती किती विकृत पद्धतीने विचार केला होता?' याचा तिला पराकोटीचा संताप येत होता. मनात कुठेतरी पाश्चातापाचे भाव तीव्रपणे उमटले होते. त्यामुळेच ती विप्लवविषयीची उत्कटता मनातून व्यक्त करत होती. तिची त्या अवस्थेतली नजर दुसऱ्या पायावर सरकली, सरकली आणि तेव्हाच तिच्या मनाची चीत बाजू पटामध्ये बदलली. का? तर....त्या अंगठ्याच्या हालचाली बघून विप्लवच्या दुःखाच्या अपरिहार्यतेच्या विचाराचे पर्यावसान त्याक्षणी किंचित का होईना आनंदात नक्कीच झाले होते.

प्राजक्ताची शस्त्रक्रिया सफल झाली होती. याचा तिला हिमालय थिटा, दर्या सरोवर आणि आकाश ठेंगणे वाटावे एवढा आनंद झाला होता. ती आता बरं झाल्याची पूर्ण खात्री होण्यासाठी हालचालींची प्रात्यक्षिकं बाकी होती. ते आता पुढील काही दिवसात डॉक्टरांकडून पूर्ण झाल्यावरच कळणार होते; पण या क्षणी त्या अंगठ्याच्या हालचालीमुळे आपण आता नक्की पूर्णपणे बरे होऊ! हा फील प्राजक्ताच्या मनात प्रचंड उर्जावान झाला होता.

तिची बरी होण्याच्या दिशेने धडपड सुरू झाली होती. दिवस जात राहिले. प्राजक्ताची हालचाल पौर्णिमेच्या कौमुदीप्रमाणे गतीमान झाली होती. ती दवाखान्यातल्या खोलीमध्ये डॉक्टरांच्या, वाकरच्या, रॅम्पच्या सहाय्याने हळूहळू चालायला लागली. व्हारेलचेअर जाऊन हाती काठी आली. प्राजक्ताने जग जिंकलं. व्हाईलचेअर आलेल्या प्राजक्ताला चालायला लागल्यावरच दवाखान्यातून सुट्टी मिळाली.

आता ती नुसत्याच काठीचा आधार घेत चालू लागली. घराच्या प्रांगणात सारखी सारखी इकडून तिकडे तिकडून इकडे येरझारा मारू लागली. अचाट सामर्थ्य लावून चालण्याचा सराव करू लागली. आजवरच्या आयुष्यातील बाकी राहिलेले चालणे ती एकाच दमात पूर्ण करीत होती. की तिला झालेल्या अपरंपार आनंदाचा तो परिणाम होता, काय कोण जाणे!

महिन्याभरापासून प्राजक्ता रोज सकाळी बागेत फिरायला जाऊ लागली होती. दिवसामागून दिवस उलटत होते. वाळलेल्या खोडाला ओलाव्यामुळे पालवी फुटावी आणि तो वृक्ष कंचपणाने बहरून यावा तशी प्राजक्ता बहरुन आली होती. तिची हालचाल संथ गतीने आसमंत गाठत होती. टाकलेल्या कातीकडे सर्प पुन्हा ढुंकूनही बघत नाही. प्राजक्ताही आपल्या अपंग अवस्थेतून निवृत्त झाली होती. तिलाही आपली ती अपंग अवस्था आठवायची नव्हती.
प्रतीकात्मक इमेज 

एक दिवस बागेतून फिरून घरी परतायला सडक पार करत असताना अचानक एका कारनी प्राजक्ताच्या पुढ्यात ब्रेक मारला.

"डोळे आहेत की फुटले, सडक पार करताना डोळे उघडे ठेवायला काय होते तुम्हाला?"
चित्रपटातल्या अभिनेत्यासारख्याच सहजतेने संवाद फेकत कारचा मालक गाडीतुन बाहेर पडला.

प्राजक्ता धास्तावून सडकेवर कोसळली. तिला बघताच "सॉरी, सॉरी, मॅडम." म्हणत कार मालक प्राजक्ताला उठायला मदत करू लागला. त्याच्याशी नजर भिडताच प्राजक्ता विनयाने सावरली.

"नको नको मी सावरते स्वतःला." असे म्हणून ती स्वतःच उभी झाली. आणि तिने डोके वर करून विनम्रकडे बघितले. तेव्हा ती अशी काही लाजली की, त्या लाजण्याचा अर्थ बघणाऱ्याला सहज कळावा. त्याक्षणी तिच्या मनाच्या मोबाईलमध्ये सुगंधी संगीत वाजत होते.

इथे निसर्गनियम हावी झाला होता. माणूस सदैव आणि पराकोटीचा निस्वार्थी कधीच होऊ शकत नाही. जीवनात असा एखादा क्षण येतोच जेव्हा त्याला स्वार्थाचा विचार करावाच लागतो. आत्ताची प्राजक्ताची नेमकी तीच अवस्था होती. आता ती आकर्षणाला भाळली होती. तिच्या मनात हळुवार भावना पुनर्जीवित झाल्या होत्या. आता इथे फक्त विप्लवची जागा विनम्रनी घेतली होती.

"माफ करा, तुमच्या अवस्थेकडे माझे लक्षच नव्हते." स्वतःचा दोष कबूल करत विनम्र म्हणाला.

त्यानेच नम्रपणे प्राजक्ताला गाडीतून घराकडे पोचती केली. तो तिला घरी सोडून जाऊ लागला. त्याची कार रस्त्यावर विरघळत पर्यंत 


प्राजक्ता ती कडे किरणांच्या नजरेने बघत होती. आईच्या हाकेनेच तिला घरात जायचे सुचले. विनम्रची ती एकच नजर त्या क्षणापासून प्राजक्ताच्या मनावर अधिराज्य गाजवत होती.

प्राजक्ता जुने सारे सारे विसरून, नवे आरोग्य, नवे स्वातंत्र्य, नवे प्रेम, नव्या भावना, नवी आशा आता तिला सार्‍याच नव्यानव्याचाच ध्यास लागला होता. तिला तिच्या आरोग्यासह, स्वातंत्र्यासह तिच्या परीने नवं प्रेम गवसलं होतं. आता विनम्र हाच आपलं सर्वस्व असणार. असा पहिल्या भेटीपासूनच तिने मनाशी चंग बांधला होता. तिच्या ह्या नव्या सुखकर भावना आरोग्याला, शरीराला, आत्मविश्वासाला झळाळी, चकाकी देत होत्या. आता ती रोज नव्या तेजाने झळकत होती.
शरीराला, मनाला, भावनांना सारंच काही पोषक असं लाभत गेलं की ते पुन्हा पुन्हा पुष्ट होत जाते, हेच खरं.

प्राजक्ता रोज ज्या बागेत फिरायला जायची त्याच बागेत पंधरा दिवसांनी तिला सकाळी सकाळी चक्क विनम्रचे दर्शन झाले. त्याला असे अचानक बघून ती मोहरली. तिला वाटले हा भास असावा म्हणून दुर्लक्ष करून जाऊ लागली. ती थांबली, तो विनम्रचा "नमस्कार मॅडम" असा आवाज ऐकूनच. त्या आवाजाने तिच्या हृदयाचे ठोके गतिमान झाले होते. ती ते सावरण्याचा प्रयत्न करतच म्हणाली.

"आज इकडे कसे? याआधी कधी बघितले नाही, या बागेत तुम्हाला."

"कळत नाहीये, मला का या बागेची ओढ लागलीय ते? दोन दिवस झाले मी या बागेत येतोय; पण आजची रौनक काही औरच वाटते."

"का? आज असे काय झाले?" प्राजक्ताने विचारले.

"बागेत फुले मुबलक असतात; पण वातावरणाला संजीव करते ती सुगंधी फुलेच."

विनम्रचा रोख प्राजक्ताला कळला. ती शांत झाली. तिच्या गालावर चढलेली लाली नजरेत सहज भरणारी होती. विनम्रला तिची जमीन मशागतीने युक्त जाणवली. या भुईत त्याच्या प्रीतीची बाग फुलणार याची खातरजमा झाली होती. मग थेट त्यांने आपल्या प्रेमाचा प्रस्ताव प्राजक्तापुढे ठेवून दिला. प्राजक्ता अस्पष्ट दिसणारा होकाराचा पदर पसरूनच होती. त्याचे प्रस्तावाचे फुल तिच्या होकाराच्या पदरात अलगद जाऊन अडकले. आता रोज या बागेत आपल्या भेटी होतील! असे परस्परास आश्वासन देऊनच दोघेही माघारी फिरले.

प्राजक्ताला परत एकदा प्रेम झाले होते. तिच्या या प्रेमाच्या हिरव्या झाडावर आनंदाच्या विविध पाखरांनी बसायला सुरुवात केली. तिचे मन स्वतःला समजावीत होते. आता स्वतः इतरांप्रमाणे आपण चालू फिरू लागलो आहोत. आजवरच्या बेडवर आणि व्हीलचेअरवरच्या घालवलेल्या आयुष्यात घरूनच का असेना आपण शिकलो. डिग्री घेतली. आपल्याचसारखी देहगत असलेल्या म्हणजे -आताच्या भाषेत नाही तेव्हाच्या- अपंग असलेल्या प्रतिभावान चित्रकाराशी, कोमल हृदयाच्या कवीशी प्रेम केले होते. किती किती एकमेकाशी जुळले होतो आम्ही. मी खूप खूप भाऊक स्वभावाची आणि तो कमालीचा तत्त्वज्ञानी. प्रत्येक गोष्टींचा जरा त्रयस्थपणे विचार करणारा. आपल्याला कोणत्या गोष्टीचे आकर्षण वाटू लागले की तिच्याप्रती सजाण करत त्या सौंदर्याला काहीशी बाधा आणणारा; पण विप्लव त्याच्या या समजीमुळे आणि विलक्षण प्रतिभेमुळे आपल्याला हवासा वाटत राहिला. त्यामुळेच त्याच्यावर आपले अपार प्रेम होते; पण हे प्रेम आपण त्या अवस्थेत होतो म्हणून होते? की इतर कुणी चांगली व्यक्ती आपल्याला प्रेम करणार नव्हती, म्हणून होते? की ते आपल्या मनाची, देहाची गरज म्हणून होते?

आता आपल्याला याबद्दल काही, काहीच सांगता येणार नाही. ते तेव्हाचे दिवस होते. आणि आता ते मागे पडले आहेत. तो भूतकाळ आता आपल्याला मागेच ठेवायचा आहे. भलेही तेव्हा आपल्याला वाटले होते की विप्लव बरा झाला, तर आपल्याला सोडून जाईल; पण असे उलटे होईल अशी आपण कल्पनासुद्धा केली नव्हती. 

का? का? आपल्याला आपल्या दुबळेपणाची जाणीव नव्हती? का आपण विप्लववर हा दोषारोप करत राहिलो? त्या विचारांमुळे आपण किती दुखी होतो? त्या क्षणी आपल्या मनात किती पराकोटीचे स्वार्थ दाटून आले होते? आणि आता? आता तरी आपल्या मनातून तो स्वार्थी विचार कुठे संपला आहे? आता या एवढ्या काळात अपल्याला विप्लवची जरा देखील आठवण झाली का? आपण आपली अर्धी अधिक संवेदना गमावली हेच खरे!

आता विप्लव कुठे असेल? कसा असेल तो? त्याच्या मनाची अवस्था कशी असेल? नाही नाही तो प्रत्येक गोष्टीचा बारीक आणि तात्विक विचार करत असतो. त्याला याबद्दल काही काहीच वाटणार नाही. वाटले तरी तो या सगळ्यांचा सुक्ष्मत्तर विचार करून या घटनांचा मेळ समजून घेईल. ठरले ना आपले आपण आता भूतकाळ विसरायचा! तर विसरायचाच!

तर मग आपण आता परत प्रेमात पडलो. आपल्या त्या आणि या आयुष्यात प्रचंड तफावत आहे; म्हणून आता आपल्याला पुढे बघायचे, पुढे जगायचे आहे. तर मग आता पुढचाच विचार करायचा! विनम्र.... आता आपण विनम्रसाठीच जगायचं! आपल्यासाठी जगायचं!

प्राजक्ताने मोठ्या चतुराईने भूतकाळ आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात दडवण्याचा प्रयत्न केला.

पंधरा दिवसातच विनम्र व प्राजक्ता यांची काव्यमय प्रेम कथा तालुक्यातील प्रत्येक सान थोरांच्या मुखामुखावर रूढ झाली. त्यांच्या प्रेमाची कळी टपोर फुल बनून आसमंतात सुगंध पसरवीत होती. काळ सुसाट पळत होता. दिवस मास कधी उलटले आणि वर्ष कधी संपलं कळलंच नाही.

प्रतीकात्मक इमेज 

एकूण वर्षभराचा काळ लोटल्यानंतर प्राजक्ताची आणि सईची अचानक भेट झाली, ती नागपूरच्या प्रशस्त अशा बसस्थानकावर. तेव्हा प्राजक्ता विप्लव सोबत फिरायला गेली होती. तेव्हा अचानक सई व तिच्या कुटुंबास बघताच आवक झाली आणि सई प्राजक्ताला बघून तिकडे चकित! दोघींनी एकमेकींस क्षणभरच का होईना, आश्चर्याचा धक्का दिला होता! प्राजक्ता सारखी बघतच होती कारण तिच्या दृष्टीस अनाकलनीय दृश्य पडले होते. आणि सईला प्राजक्ताची अपेक्षित अवस्था नजरेस येत होती. पण ही आश्चर्य व्यक्त करण्याची वेळ नव्हतीच मुळी. अशोक ज्या व्हीलचेअरवर बसला होता, तिला ढकलत सई प्राजक्ताच्या दिशेने येत होती. आणि प्राजक्ता काठीचा आधार घेत विनम्रसोबत सईकडे. दोन महिन्यांपूर्वी अशोकचा रेल्वेतून उतरताना अपघात झाला होता. म्हणून सई आपल्या कुटुंबास घेऊन मायदेशी परत आली होती.

दोघींचीही गळा भेट झाली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून सारखे अश्रू गळत होते. काय बोलावं दोघींनाही काहीच सुचत नव्हते. वातावरण निशब्द झालं होतं. प्रदीर्घ श्वास घेत प्राजक्ता म्हणाली.

"हे सगळं काय झालं ग सई?"

"मी इथून गेल्यागेल्या महिन्याभरातच हा सगळा प्रसंग घडला. आता जवळपास वर्ष होत आहे अशोक असा व्हीलचेअरवर आहे. बघ जीवन हे असं असते प्राजु, आपण जे स्वप्न बघतो, जो विचार करतो, ज्या अपेक्षा करतो नेमकं तसं कधीच होत नसते. जगत असताना अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांना गृहीत धरूनच जगावे लागते. जे माझ्या जीवनात घडले, मी कुठे असे ठरवले होते? आणि तुला सुद्धा तू चालशील असे कुठे वाटले होते? जीवन हे एक विरोधाभासाचे गाठोडे आहे."

जीवनाचे सार सांगून सई चालली होती. प्राजक्ता अंतर्मुख होत सईकडे एकटक बघत राहिली.
प्रतीकात्मक इमेज 

विप्लवची सहा सहा महिन्यांनी दोनदा शस्त्रक्रिया झाल्यावर दोन वर्षानंतरची ही सारी हकीकत प्रतीकने विप्लवपुढे कथन केली. ती ऐकून त्याच्या चेहऱ्यावर कळवट स्मित उमटले आणि आयुष्य हे काळ, परिस्थिती, स्वभाव, स्वार्थ इत्यादीनुसार बदलत असते, याची त्याला पुन्हा दृढतेने जाणीव झाली.

-मनोज बोबडे

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०११

पश्चाताप?


सुमे, आकारे तुले पाहाले पावने आले, लवकर ये, झालं नाय का खेलनं-बिलनं?

सुमीच्या मायनं अशीच हाक मारली होती. जेव्हा तिला बघायला पाहुणे आले होते. सुमीनं नुकताच चवदाव्या वर्षातून पंधराव्यात प्रवेश केला होता. त्या देखण्या, मित् भाषी, शांत सुमीला लग्न म्हणजे ढोल, ताशे, सनईच्या तालावर नाचणे आणि लोकांच्या प्रचंड उपस्थितीत पंच पक्क्वन्नाचा सोहळा पार पडणे व नवऱ्यासोबत सासरी जाणे यापलीकडे दूरपर्यंत थांग पत्ता नव्हता. ती अल्लड किशोरवयीन पोर आई बाबांच्या म्हणण्यानुसार लग्न बेडीत अडकणार होती.
       पोरगं पाहाले बेस हाये, धा एकर वावराचा मालक हाये आन् लाथ मारल तेथं पानी काढायची त्याच्यामंदी धमकही हाये, आमच्या सुमीचा आन् पोराचा जोडा संभू पार्वती सारखा सोभून दिसते.
आई बाबांची पोराच्या पसंती विषयीची चर्चा सुमी चोरून ऐकत होती. आपले लग्न होणार या विचाराने सुमीच्या मनात आनंद संचारला होता. सुमी गोल गिरकी घेत बाहेर नाचत पळत सुटली.
       २४ मार्च १९८८ रोजी सुमीचे चार हात झाले. आता सुमी दिवाकरची अर्धांगीनी झाली होती. होतकरू, नव्या-नव्या युक्तीने पैसा कमविण्यास धडपडणारा दिवाकर आपले गाव सोडून सासरच्या शेजारील मोठ्या गावात राहण्यासाठी गेला. त्याची योजना होती. तेथे चित्रफीत, ध्वनीफीत याचे दुकान थाटण्याची! ती त्याने अमलात आणली. शेती करून, देहास कष्ट देऊन हाती काहीच लागत नाही. याचा दरेक वर्षी अनुभव घेतलेला दिवाकर प्रचंड हुंडा हाती आल्यावर शेती थोडीच करणार होता? त्याने शेती भावाच्या स्वाधीन करून यशस्वीरित्या दुकान थाटले. या चित्रफितीच्या, ध्वनीफितीच्या दुकानासवे सहाय्यक मिळकत व्हावी म्हणून छोटेखाणी हॉटेलही सूरु  केला.
दिवाकरची युक्ती प्रगतीचा हात धरून बांबूच्या झाडाच्या वाढीचं अनुसरण करत होती. ‘मागणी तसा पुरवठा’ करण्याची अक्कल आणि धंद्याला हाताळण्याची शक्कल दिवाकरच्या चागलीच मनी-मानसी भिनत होती. आर्थिक दृष्ट्या संपन्नता मिळवीत असलेला दिवकारचा संसार, सुखमय झाला होता. ह्या सुखी कुटुंबात सुमीने एका गोंडस मुलीस जन्म दिला. तिच्या जन्माने झालेला आनंद व्यक्त व्हावा म्हणून तिचे नाव हर्षाली ठेवण्यात आले. सर्व गावासाठी कोऱ्या पाटीवर धडा लिहून काढावा, तसं दिवाकरचं जग निर्माणकरून सुखी संपन्न झालेलं कुटूंब खूप मोठं उदाहरण ठरलं. अशी मोठ्या कौतुकानं लोकं चर्चा करतांना सुमी ऐकायची....!

......तुझ्या मायेनं तुला शिकवलं असतं तर माझी अशी अवस्था झाली नसती..... हे वाक्य कानी पडताच सुमीची ज्यावर नजर खिळली होती तो भिंतीवरील काळाकुट्ट डाग सारे काही गिळंकृत करणाऱ्या कृष्ण विवरात बदलल्याचा तिला भास झाला.

दिवाकरच्या तोंडून कसलाही शब्द बाहेर पडला तरी सुमीच्या अंगाचा थरकाप उडतो. आताही दिवाकर जर्जर होऊन खाटेला खिळला असतांना सुद्धा दिवाकरचे बोल ऐकून सुमी दचकलीच!

तुमच्या या अवस्थेला माझ्या आईची शिकवण जबाबदार कशी? सुमी मोठ्या हिमतीने म्हणाली
.....डॉ. म्हणतात हा रोग शारेरिक संबंधातून होतो आणि तू माझी बायको आहेस मग ही बिमारी तुझ्यात होती तेव्हाच मला लागलीय ना? सुमीसह शेजारी बसलेल्या त्याच्या आई वडिलांनी दिवाकरचे हे बोलणे ऐकले.
सून म्हणून घरी आल्यापासूनच सुमीला पाण्यात पाहणाऱ्या दिवाकरच्या आई-वडिलास सुमीप्रतीचा तिरस्कार विकोपाला जाण्यासाठी दिवाकरचे हे आरोप पुनः कारणीभूत ठरले. पण या घडीला त्यांनी सुमीला ताडन करण्यापासून स्वतःला आवर घातला, कारण या दिवसात तिला मारून मटकुन परवडणारे नव्हते. दिवाकरची प्रकृती एक महिन्यापासून प्रचंड खालावलेली होती. तो पूर्णपणे खाटेच्या अधीन झाला होता. त्याची देखभाल सुमीशिवाय दुसरे कोणं करणार होते. दिवाकरच्या आई-वडिलास तर बिमार माणसास हात लावण्यासही किळस वाटायची. मग ती व्यक्ती मुलगाही का असेना....! दिवाकर हा महाभयंकर बिमारीने ग्रस्त होता. त्याला एड्स झाला होता.
सुमी या बिमारी पासून बरीच अनभिज्ञ होती. या बिमारीचे नाव, ही कशाने होते, हिचा उपचार होतो कि नाही??? काही काही माहिती नसणारी सुमी दिवाकरने केलेला आरोप मुकाट्याने मान्य करीत होती.... ही जर बिमारी सुमीकडून दिवाकरला मिळाली असती तर त्याच्या आधी सुमी बिमारीने पिडीत झाली असती. याचा कसलाही विचार न करता भाबडी सुमी मनोमन आईला कोसत होती.
      
‘आईनं आपल्याला कोणती शिकवण दिली नाही, म्हणून आपल्या वाट्याला हे भोगणं आलंय? आईनं न  दिलेल्या कोणत्या शिकवणीमुळे, आपल्या हातून कोणती चुक घडली ज्यामुळे यांच्या वाट्याला या प्राणांतिक वेदना आल्या, एवढे दुःख आले? डॉ. म्हणाले दोनेक महिन्यात ह्यांचा मृत्यू अटळ आहे. जावयानं मरणाच्या खाईत जावं एवढी चुक आईनं का केली असावी? आपल्याला ती शिकवण तिनी का दिली नसेल?
      
सुमीनं या विचाराने अस्वस्थ होण्याचे कारण होते तिला दिवाकरची अवस्था पाहवत नव्हती, हे! दिवाकर शरीराने क्षीण, दीन, हीन बनत, सडत मृत्यूच्या दिशेने वाटचाल करीत होता. त्याला मृत्यू येईल याचे सुमीला मुळीच दुःख नव्हते. त्याला होणाऱ्या प्रचंड यातनांमुळे ती कमालीची कष्टी होती. संपूर्ण वैवाहिक आयुष्यामध्ये कसलेच सुख न देणाऱ्या दिवाकरप्रती सुमीला सहानुभूती वाटत होती. तिचे मन त्याच्यासाठी अतिशय चिंतीत झाले होते. या वेदनेतून त्याची सुटका व्हावी. म्हणून त्याला मृत्यू यावा अशी ती देवाला प्रार्थना करीत होती....
       दिवाकर खाटेला खिळून दोन महिने होऊन गेले आता डॉक्टरच्या म्हणण्यानुसार दिवाकरचे एकच महिन्याचे आयुष्य शिल्लक राहिले होते.....

‘जिला आपण लग्न झाल्यापासून छळत आलो, धुतकारत आलो ती सुमी आपली किती जिवापाड काळजी घेतेय.... स्थिर नजरेने सुमीला घुरणाऱ्या डोळ्यातून अश्रू गळत असताना दिवाकरच्या डोक्यात ह्या विचाराने परवानगी न घेता अकस्मात प्रवेश केला.
      
.....माणूस हा कितीही संवेदनाहीन, मतलबी, वर्चस्ववादी, घमेंडी, असला तरी त्याचे मन बरेचदा कुणावर अन्याय करू नकोस, प्रेमाने वाग असे त्याला आवाहन करतच असते परंतु आपल्या प्रौढीसाठी, स्वार्थासाठी या आवाहनास तो सतत धुडकावून लावत असतो........ दिवाकर हा यापैकीच एक पण याक्षणी त्याच्या मनाने त्याला केलेल्या आवाहनास तो उडवून लावणार नव्हता, हे सुमीचे रोज-रोज त्याच्या प्रत्येक हालचालीसाठी झटणे पाहून तो अंतर्मुख होत होता, आता त्याची अवस्था, त्याची विवशता त्याला शहाणी करत होती.....

आपली चुक दिसू नये म्हणून आपण आपल्या बिमारीचे सगळे आरोप सुमीवर करत आलो. आपल्या संसारायुष्यात जेव्हा केव्हा आपण अडचणीत आलो तेव्हा तेव्हा आपण आपला सगळा राग, सगळा रोष सुमीवरच काढला..... का? का?.....ती एक साधी, भोळी, निरागस मनाची, नवऱ्याचा परमेश्वर म्हणून आदर करणारी होती म्हणून? की आपण तिच्यावर कितीही आत्याचार केला तरी ती प्रतिकार करणार नव्हती म्हणून?...
कारणे दोनही होती. आपण हिची ही कमजोरी पहिल्याच दिवशी हेरली होती. जेव्ही ती आपली बायको बनून आली होती. आणि आपण तिच्या मनात ‘नवरा म्हणजे अत्याचारी प्राणी’ अशीच प्रतिमा बनवत आलो. आताही आपली घमेंड एवढी पराकोटीची, की हे आपण मरणाच्या दारात उभे असूनही प्रामाणिकपणे आपल्या कर्माची-नाही अक्षम्य अशा दुष्कर्माची कबुली देऊ शकत नाही.
मरताक्षणी सुद्धा सुमीला अपार दुःखाच्या खाईत लोटून...तिलाही आता या जवळपासच्या काळात मरण येईल अशी व्यवस्था करून आपण न जाणता घडलेल्या आपल्या या दुष्कृत्यामुळे तिच्या वाटयला हे भोगणे बहाल करून चाललोय!
       आपण तेव्हा एवढे अय्याश का झालो? त्याक्षणी आपण त्या सुखाला एवढे का हपापलो? या सुखात रमणे ही काही आपली पहिलीच खेप नव्हती. त्याही पूर्वी हे सुख आपण बरेचदा भोगले आहे. जेव्हा-जेव्हा आपण मुंबईला गेलो तेव्हा-तेव्हा हा प्रकार अगत्याने घडलेलाच आहे....
आपण दुकानात अश्लील चित्रफीत बाळगल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या खटल्यासंदर्भात-चार वर्षे होत आहेत-दरवर्षी आपल्याला मुंबईला जावे लागणे, त्यासाठी दर खेपेस चार-सहा दिवस तेथे राहावे लागणे आणि यादरम्यान सुखाभिलासी मनास सारी अनुकुलता लाभणे....या साऱ्यांचा आपल्या लालसी मनाने नेहमीच आय्याशीला पूर्ण करण्यासाठी फायदा करून घेतला आहे.
       .....आपण हे सारे जेव्हा आपले जेष्ठ, घनिष्ठ मित्र नामदेवजींना सांगितले, तेव्हा त्यांनी दोन-चार कानशिलात लगावल्या होत्या....म्हणाले, ‘तू माझा मुलगा असतास तर तुला जीवनीशीच मारले असते!’
       ....पूर्वीपासून आपल्याला असं दाटणारं कुणीच नव्हतं का? नामदेवजी आपल्या चुकीच्या वागण्यावर नेहमीच आक्षेप घ्यायचे....पण...      
भाजून तयार झालेल्या मडक्यास परत आकार कसा देता येणार? आपल्या बाबतीतली ही मर्यादा संपलेली आहे....आता मरणाच्या दारात आपण तो विचार का करतोय?....सुमीची चिंता वाटते म्हणून?....पंधरा वर्षे आपण तिला सतत छेडत राहिलो तरी ती आपली सुश्रुषा करत आहे म्हणून?....की आपल्याला आपल्या चुकीची जाणीव झाली म्हणून?
       आयुष्यात कधी आपल्याला असले प्रश्न पडले नाही...आणि आता मात्र हे प्रश्न आपल्या शरीराचा कणनकण हालवून सोडताहे, असं का व्हावं?!
      
महिन्याभरापासून सतत हे विचार दिवकरचा मेंदू बधीर करत आले. आजही पहाटेचे चार वाजले तरी दिवाकर अस्वस्थ होता, रडत होता. याच अवस्थेत तो कधी झोपी गेला, त्याचे त्यालाच कळले नाही.
       आता ते त्याला कधीच कळणार नव्हते, हे विचारही त्याच्या मनात येणार नव्हते, तो चीरनिद्रेच्या स्वाधीन झाला होता.

डॉक्टरांनी ‘रिपोर्ट’ हातात दिला तेव्हा सुमीला तिच्या आयुष्याची मर्यादा कळून चुकली होती....या बाबीचा तिच्यावर यत्किंचीतही असर झाला नाही....हा धक्का तिनी पंधरा दिवसापूर्वीच दिवाकरच्या मृत्युनंतर आठ दिवसांनीच सहन केला होता.
नामदेवजींनी दिवाकरची सगळी लक्षणे, सगळे प्रताप सुमीला सांगितले. ते ऐकताना तिच्या पायाखालची वाळू, डोक्यावरचे आकाश, सभोवतालच्या दिशा सारं-सारं गळून पडत होतं. ती दगड बनली होती.

....आपण जेव्हा दिवाकरशी लग्न केलं तेव्हाच आपलं आयुष्य हे आपलं राहिलं नव्हतं. लग्नाच्या क्षणापासून आजवर आपण एक क्षण तरी खरोखर जगलो का? आपले आयुष्य हे काही निमिषान्साठी सुद्धा जीवन होऊ शकले नाही. कळीतून फुल बनू पाहताच आपण खुळल्या गेलो. तेव्हापासून आपण निर्माल्यवतच जगत आहोत.....आता संपूही तर सडलेल्या निर्माल्य अवस्थेतच! ही अवस्था येईतोवर आपण हे सारे सहन केले, ते फक्त आपल्या आई-बाबांसाठी, आपल्या कुटुंबासाठी!

स्त्रीची हीच तर खरी महानता आहे. आपल्या अब्रूसाठी, आपल्या माणसांची पत जपण्यासाठी ती आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यास सदाच तत्पर असते!
......दिवाकर मरताना सुद्धा आपल्याशी एवढ्या क्रुरतेने वागला. स्वतःच्या दोषाचे खापर त्याने आपल्या आईवर फोडले.....दिवाकर गेला. आपण त्याच्या जाचातून, त्रासातून मुक्त झालो, आता आपण सुखी होऊ असे म्हणायला कुठलीच जागा नाही.....काळाच्या काही अंतरावरच दिवाकरनी आपल्यासाठी मृत्यूची व्यवस्था करून ठेवली आहे.
आपल्या सासरच्या मंडळींनी आपल्याला मुलीसह बाहेर काढून दिले. पंधरा दिवसापासून आपण वेदनेची प्रचंड अशी सल घेऊन माहेरी आई-बाबंच्याकडे राहतो आहोत. परवा ‘ह्याही अवस्थेत दुसर्याला त्रास देत तुला कसे जगावे वाटते?’ आपल्या माहेरच्याच मंडळीतील व्यक्तीच्या तोंडून हे वाक्य कानी पडले, तेव्हापासून आपली ही तीव्रत्तेने सलणारी जखम भळभळून वाहू लागली आहे. मृत्यु हाच आता आपला जीवलग उरलाय!

आपल्या आयुष्याचे सर्वस्व अर्पण करताना प्रेमाशिवाय कसलेच स्वार्थ न् बाळगणारी सुमी, मृत्यूला आपला जीवलग मानत होती. सासरकडील मंडळींनी तर कधीच तिची गय केली नाही पण आपली असणारी माहेरची माणसे सुद्धा सुमीला तिरस्काराच्या खाईत लोटत असतील तर तिला मृत्यूशी सख्य जुळण्यात अस्वाभाविक काहीच नाही. सासरून बाहेर काढल्यामुळे शेवटचा आधार म्हणून ती माहेरी आली होती पण इकडेही कोण होता तिचा? काय आले तिच्या वाट्याला?......तिचा होता फक्त मृत्यू- या विकराल बिमारीच्या, वेदनेच्या, आपले-परकेपणाच्या, सुख-दुःखाच्या रगाड्यातून निवृत्त करणारा! मुक्त करणारा!!

मनोज बोबडे 



                              




बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

कृपा!


रामेश्वर कालच नागपूरवरून गावाला परतला. दोन वर्षापासून करत आलेल्या कामाला कायमचा सलाम ठोकून तो घरी आला होता. चार-सहा दिवसापूर्वी घरच्यांनी त्याला कळविले होते, की ‘एका नावाजलेल्या कंपनीकडून तुला नोकरीचा 'कॉल' आला आहे.’ चार वर्षापासून ‘इंजिनियरिंगचे’ शिक्षण होऊन अंशकालीन काम करीत असलेल्या रामेश्वरला 'कॉल' आल्याचे ऐकल्यापासून आनंदाला पारावार उरला नव्हता. त्याला आता नोकरीचे वेध लागले होते. त्याला वाटत होते ‘हा कॉल येणे म्हणजे, बाबा म्हणतात तशी आपल्या गुरुचीच कृपा असावी!’
       श्री शास्त्री महाराज हे रामेश्वरच्या कुटुंबियाचे गुरु. हे चलाख कुटूंब म्हणजे या शास्त्री महाराजांचे परम भक्त. यांच्या घरी कोणत्याही यशासाठी, भरभराटीसाठी कारणीभूत असते ती या महाराजांचीच कृपा! आताही 'कॉल' येणे ही त्या महाराजांचीच कृपा होती.
       शिववर्घन हा रामेश्वरचा जीवलग मित्र. तो या महाराजांच्या कृपेविषयी रामेश्वरला एकदा म्हणाला होता, रामेश्वर, तुमचे जेव्हा भले होते तेव्हा या महाराजांची कृपा असते, असे तू म्हणतोस, मग मागे एकदा तुमच्या शेतीच्या प्रकरणात दोन एकर शेती विकायला लागून तुझ्या भावाला बांध्याच्या झगडण्यात दोन दिवसासाठी पोलिसांनी आत केले होते. तेव्हा तू या कृपेविषयी काही बोलला नाहीस रे!
       म्हणून रामेश्वर शिववर्धनच्या पुढयात महाराजांच्या कृपेची बातच करत नाही.
तर रामेश्वर या कृपेने एकंदरच उध्दरलाच!
       उद्या मुलाखत देण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात जायचं म्हणून चेहऱ्यावरील हास्य नी मनातील आनंद यांचा संगम घडवून रामेश्वर जोमाने तयारीला लागला होता. रामेश्वर नोकरीला लागणार होता, ती कंपनी त्याच्या गावावरून २० किमी अंतरावर जिल्हयाच्या ठिकाणीच होती. एवढ्या गावानजीक नोकरी लागणं हीही महाराजांच्या कृपेची भर रामेश्वरला सुखकारक वाटल्याशिवाय राहिली नाही. याही पलीकडे पुनः त्याला कृपा हवी होती, मुलाखत यशस्वीपणे पार पडण्याची!
       सकाळी घरची मंडळी कामात दंग होती. इकडे रामेश्वरचं विश्व मुलाखतमय झालं होतं. म्हणून तो घरचा निरोप घेऊन जिल्हयाच्या दिशेने निघाला होता.
       एकदाची मुलाखत संपली. रामेश्वर कार्यालयाबाहेर निघाला तेव्हा तो निराशेने झाकाळून गेला होता. याही निराशेत त्याला मागचा प्रसंग आठवला.........मागे शिववर्धन याच कंपनीत मुलाखतीसाठी आला होता. तो एवढा हुशार, त्या क्षेत्रातील सर्व अभ्यास, बारकावे माहित असणारा, मुलाखतीमध्ये सर्व प्रश्नांची चपखल उत्तरे देणारा, बाद ठरविण्यात आला. मुलाखतकारांपैकी दोन व्यक्ती त्याच्या अतिशय जवळच्या असूनही! मग या मुलाखतीमध्ये मी त्यांच्या तीन प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकलो नाही.
‘आता आपले काय होईल?’ या विचार तंद्रीतच तो गावाकडे आला. दोन दिवस तो घराबाहेर पडला नाही, दोन दिवस खाण्यापिण्याविषयी उपोषण धरलेलं....सगळे समजावून थक्क...........! तो दोन दिवसापर्यंत आपली ही अवस्था त्यागायला तयार नव्ह्ता....पण वडिल नारायणपंतांवर या बाबीचा कसलाच परिणाम झाला नाही. कारण त्यांनी यावरील उपचार आधीच करून ठेवला होता. रामेश्वर मुलाखतीत यशस्वी होऊ शकत नाही, याची त्यांना खात्री होती. आता त्यांना हीही खात्री होती की, उद्या रामेश्वर पूर्णपणे ताळ्यावर येईल!
तिसरा दिवस उजाडला. ‘पोस्टमन’ येऊन काहीतरी देऊन गेला. तेव्हा रामेश्वरच्या चेहऱ्यातून मोगऱ्याची फुले उन्मळून पडतांना सर्वांना दिसली....रामेश्वर आनंदातिशयाने घरभर नाचला....नाचून संपताच हे झालंच कसं? या त्याच्याच प्रश्नानं त्यालाच घेराव टाकला. तो हा विचार करून-करून पांगून गेला होता. वडिलांनी त्याची हीही अवस्था जाणून त्याला नीट समजावून सांगितलं....तेव्हा रामेश्वर म्हणाला....‘तरीच!!’
       साला, शिववर्धन नेहमी म्हणत असतो, कृपे-बिपेची गरज असते कुणाला? ज्याच्यात कर्तृत्व नसते अशांनाच ना!’’ त्याचं खरंच म्हणाव!
       कारण आपण कित्येक परीक्षा ह्या तगाद्यानच उतीर्ण झालोय...आणि श्रेय महाराजाच्या कृपेला देत आलो!

       चार-आठ-पंधरा दिवस-महिना-वर्ष उलटलं. रामेश्वर मोठ्या उत्साहाने आपली नोकरी करीत होता. खाजगी कंपनीत अभियंता होणं म्हणजे ‘लठ्ठ पगाराने घट्ट होणं’ होतं. महिन्याला पाच हजारापलीकडे हातात रक्कम न बघणाऱ्या रामेश्वरास मासिक वेतन पंचवीस ते तीस हजार मिळत होते. वेतनाच्या बाबतीत पाच-सहा पटीने तो सुजला होता. आता त्याला आकाश ठेंगणं होतं. तो भल्या थोरल्या आनंदाचा वाटेकरी झाला होता. त्याच्या जीवनाचा प्रचंड सतावणारा प्रश्न सुटला होता.
       एखाद्या शेतकऱ्याने झाडाची सारी आंबे तोडून हाटी न्यावे, अख्खा दिवस हाट करून एकही आंबा न खपावा, आणि अंती निराश होऊन परतीस निघावे, तोच अकस्मात दलालाने पुढे ठाकून दाम-दुपटीने सर्व आंबे खरेदी करावे...तेव्हा जसा आनंद त्या शेतकऱ्यास होईल! तस्सा रामेश्वराला झाला होता.
       आता रामेश्वर भविष्याची स्वप्ने रंगवू लागला. आता आपल्याला मनासारखी बायको भेटेल.’’ असा त्याचा विश्वास जागला होता. ‘धाकटी सरू आणि मी दोघेही आता एकाच मंडपात लग्न उरकू...बाबांचा आजवरचा दुसरा मोठा ताणही दूर होईल!’’
       सरूच्या लग्नाचा विषय निघाला, की चलाखांच्या घरी ताणच उफाळून येतो. दोन वर्षापासून सरुसाठी स्थळ चालून येत आहे. वीसेक स्थळे झाले असतील चलाखांनी कोणत्याच स्थळाला स्वीकृती दिली नाही.               
      आपल्या हिंदू धर्मात जसे हिंदुधर्म स्वीकारण्याच्या सर्व वाटा बंद आहेत...सोडून जाण्यास अनेक सबबी! तसेच तुम्ही चलाख जरी हिंदू असले तरी...या व्यवस्थेचा आहे तसा आदर्श थोडेच घेणार? कारण ओठातल्या नि पोटातल्या शब्दांचा मेळ चलाखांच्या घरी बसतोच कुठे? कोणत्याही रीतीने का असेना, आपले गोदाम भरण्याचे कसब तुम्हा चलाखांकडे मुबलकच आहेत रे! ‘करणी आणि कथणीला’ समयानुरूप हाताळण्याचे तंत्र तुम्ही मोठ्या चलाखीने अवगत केले आहे.’’ शिववर्धन असं स्पष्ट आणि परखड नेहमीच बोलत असतो. म्हणून रामेश्वरला शिववर्धनच्या सत्य बोलणे आणि तसेच आचरण करणे. यावागण्याविषयी नेहमीच आदर वाटत आलेला असतो. पण त्याला चलाखांचे संस्कार आणि स्वार्थ हे अजिबात सोडावेसे वाटत नाही.
       रामेश्वरनी सरूच्या या पाहणीविषयी सांगितले तेव्हा शिववर्धन असा बोलला होता.
       रामेश्वर म्हणाला,सरुसाठी वीसेक मुलं बघून गेले असतील, सगळ्यांनीच तीला पसंत केली पण पोरगा आमच्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाहीये. पसंत करतात पण हुंड्याशिवाय होकारच देत नाही. आम्हाला हुंडा न मागणारा मुलगा हवा आहे.’’
       शिववर्धन म्हणाला, अरे मस्त, म्हणजे तुम्ही हुंड्याच्या विरोधात? ही तर मोठ्याच आश्चर्याची, अविश्वसनीय नि आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल! व्वा! छान आहे. म्हणजे तुम्ही हुंडा देणे-घेणे या पद्धतीचा विरोध करणार? मला नवल वाटतेय यार, चलाख ही भूमिका घेत आहे म्हणजे?’’
       तू समजला नाहीस शिववर्धन, तसे नाही ते. आम्ही हुंडा देणार नाही, पण घेऊ. कारण आमच्या कडे पैसा नाहीत. रामेश्वर म्हणाला.
     शिववर्धन: वा रे चलाखांची चलाखी! स्वतःचं भरतांना थोडीशीही लाज नाही? आणि रे, किती हुंडा घेणार आहेस तू?
       “किती म्हणजे? १५ लाख रुपये घेईन, कारण माझ्या आजवरच्या संगोपणाला, आजवरच्या घरच्या बाकीच्या गरजांना, माझ्या शिक्षणाला अशा बऱ्याच बाबींना लागलाय तेवढा खर्च! रामेश्वर म्हणाला
...आणि सरुसाठी पाच पैसेही देणार नाही? या अशाच अमानवीय, अन्यायी आणि असंवेदनशील वृत्ती बाळगणाऱ्याच्या पदरीच मान, मरातब, पैसा, अडका सारे पडत असते. म्हणूनच न्यायाने, सत्याने लढणारा खस्ता खात असतो. या खस्ता खाण्यातून येणारी निराशा त्याला आपल्या मार्गावर दृढ राहू देत नाही पण सहनशीलता, धैर्य आणि विश्वास या संपत्तीच्या बळावर तो न्यालाला जागत असतो..... काय हे मी तुला सांगतोय? रामेश्वर तू एक लक्षात घे, हे सारे तुला आज जरी सुखकर वाटत असले तरी उद्या व्यक्तिश: तुझ्या मनाला समाधान देणारे नक्कीच ठरणार नाही. मला नाही आवडला तुमचा हा प्रकार. तुमची ही वृत्ती, विकृतीच वाटते मला....चल येतो मी! ....
कार्यालयात रामेश्वरनी खणखणणारा दूरध्वनी कानाला लावताच, त्याच्या चाहर्यावर नाराजीने ताबा घेतला. तो ऐकू लागला, ती सरूच्या पाहणीतून फुललेल्या प्रेमप्रकरणाची यशस्वी झालेली कहाणी होती.
पंधरा दिवसापूर्वी सरुला पाहून गेलेला मुलगा हा तीस हजार रुपये मासिक वेतन कमावणाऱ्या हुद्यावर असणारा, सरुला पसंत करून गेला. त्या आठ दिवसाच्या अवधीत चलाखांनी होकार किंवा नकार कळवू असे मुलास आश्वासन देऊनही तो कळवला नाही.....दूरवरून मुलास जेव्हा कळाले, ‘मुलगा हुंड्याची मागणी करतोय म्हणून ते मुलगी देणार नाही.’ तेव्हा मुलगा संतापला. त्याने थेट सरुला गाठले. विचारले, मी एक अनिष्ठ चालीरीतीचा विरोध करणाऱ्या मानवतावादी चळवळीचा कृतीशील कार्यकर्ता आहे. आणि माझी बाणेदारी मी प्रामाणिकपणे जपतो. चळवळीचे विचार मी मनापासून स्वीकारले आहे. म्हणूनच मी हुंडा या व्यापारजन्य रूढीचा कट्टर विरोधक आहे. करिता ‘मी बिलकुल हुंडा घेणार नाही. आणि लग्न कर्मकांडरहित नव पद्धत्तीने व्हावे!’ या दोन अटी मी पाहणीला येण्याआधीच मध्यास्थांपुढे मांडल्या होत्या. मग मी हुंडा मागितल्याचा खोटा आरोप कशासाठी करण्यात येतोय? मी पसंत नव्हतो तर प्रामाणिकपणे सांगायला हवे होते. अशा धूर्तपणाने माझा अपमान करून हे आपली कोणती चलाखी दाखवत आहेत.
मुलाचे हे सर्व भाष्य ऐकून सरुचे मन आर-पार बदलून गेले. तिनी वडिल नारायणपंत यांच्याकडून जे ऐकले होते, ते सारे चुकीचे होते. हे आता सरुला कळून चुकले. तिनी अंदाज बांधला. ‘आजपर्यंत पाहायला आलेल्या कितीतरी मुलांनी पसंती दर्शवूनही बाबांनी नुसत्या एक दोन लाखाच्या हुंड्यापायी स्थळ नाकारले. काय कारण असावे एवढी स्थळे नाकारण्या मागचे?’
सरूच्या मनात द्वंद्व सुरु झाले. तिला नारायणपंतांचे यामागील राजकारण हळूहळू उलगडत असल्याचे जाणवत होते. आपले वडिल हे तसे कट्टर परंपरावादी. त्यांना मुलगा म्हणजे वंशाचा दिवा वाटतो आणि मुलगी म्हणजे विझलेली वातही वाटत नाही. हे मी नेहमीच अनुभवत आलेले आहे. ‘आपला रामेश्वर बराच शिकलाय, याला जर नोकरी लागली तर याच्यासाठी लाखोंचा हुंडा घेऊ या!’ हे बाबांचे बोलणे मी वर्षभरापासून ऐकत आले आहे. मुलामध्ये नि मुलीमध्ये सर्वच बाबतीत फारकत ठेऊन वागणारे बाबा, मुलासाठी लाखोंचा हुंडा घेतांना माझ्यासाठी न देता लग्न केले तर समाजात नाक राहणार नाही. म्हणून मला एखाद्या गरीब मुलास देऊन माझं सौख्य धुळीस मिळविणार, माझ्या संसाराला झोपडीतला संसार करून ठेवेल. अशी शंका येत आहे.
सरूच्या मनातील या विचार द्वंद्वानी तिला एक वेगळाच निर्णय घेण्यास बाध्य केले....सरुने मुलाची कमजोरी हेरली आणि नारायणपंतांची चलाखी पण!
आता तिनी या प्रकरणास योजनाबद्ध पद्धतीने प्रेमाच्या पटरीवर न्यायचे ठरविले. तिनी मुलाच्या पुढयात एक उभा प्रश्न रोवला. तुम्ही माझ्याशी अजूनही लग्न करण्यास तयार आहे का?
अपमानास लगेच विसरणाऱ्या मुलाचे नकार देण्याचे धेर्य झाले नाही. त्याला सरू प्रचंड आवडणे हेच त्यामागे कारण होते.
सरूची योजना यशस्वी झाली आपल्यालाही बाबांसारखे धूर्त राजकारण करता येते वाटते?
गुपित माहित असलेल्या मित्रांनी मिस्किल हसत भिवया उंचावून मूक शेंरा मारावा तसा हा विचार सरूच्या मनात डोकावून गेला. तिने तो लगेच झटकला.
सरुने मुलाला सुचविले माझ्या घरच्यांकडून आपल्या लग्नास संमती मिळणे हे अशक्यपणात मोडणारे आहे. लग्न करायचे झाले तर आपल्याला नोंदणी विवाहच करावा लागेल अन्यथा पळून जाणे हाच दुसरा मार्ग होऊ शकतो. मुलगा म्हणाला माझ्या घरच्यांनाही आता इथून हे संबंध नकोय पण मला तू हवी आहेस. तर मी त्यांना याविषयी आग्रह करेन! नोंदणी विवाहाच्या निर्णयाविषयी मी दोनेक दिवसात कळवतो!
अपेक्षेची उत्कटता कशी कारगर ठरते, ती सरूच्या या वागण्यावरून कळावं!
सरुनी मुलाचा निर्णय येण्याआधीच नारायणपंतांना चिठ्ठी लिहून ठेवली......
तीर्थरूप बाबास
मी तुमच्या विरोधात जाऊन लग्न करते आहे. यासाठी बाबा मला माफ करा! मी माझ्या निर्णयात माझे सुख बघते आहे. मला अपयश तर येणार नाही, आलेच तर ती जबाबदारी पूर्णतः माझी असेल! .... विश्वास ठेवा, मी तुमचीच मुलगी आहे बाबा!
                                       
                                                  तुमचीच
                                                             सरू 
                           

       सरूचा विश्वास खरा ठरला. मुलाने होकार कळवून लग्न न्यायालयीन प्रक्रियेनुसार पार पाडले......इकडे सरुची चिठ्ठी बघून नारायणपंतांना संताप अनावर झाला. विश्वास ठेवा, मी तुमचीच मुलगी आहे बाबा चिठ्ठीतील ही शेवटची ओळ वाचताच नारायणपंतांच्या डोळ्यांनी मुलीप्रतीच्या विश्वासाचा गर्भ धारण केला. सरूच्या चिठ्ठीतील त्या वाक्याने नारायणपंताना बिनधास्त केले होते. या बिनधास्तपणात डोक्यावरील खूप मोठे ओझे उतरल्याचे नि मुलामुळे घरात श्रीमंती नांदेल याचे अपरंपार समाधान नारायणपंताच्या वाट्याला आले. मनाचा कोपरा काहीसा दुखावला असला तरी त्यापुढे त्यांच्यासाठी हा आनंद मोठा होता.

       या प्रकारामुळे आपल्या कुटुंबाची समाजात बरीच कमीपणा होईल. म्हणून रामेश्वर सरुला शिव्या देत सुटला......पण ते रामेश्वरचे दाखवायचे दात होते. सरुसाठी घरून कसलाच पैसा गेला नाही, याचे रामेश्वरला अंतरात खूप सुख वाटत होते!
       याही खेपेला रामेश्वरला शास्त्री महाराजांची कृपा आठविल्याशिवाय राहिली नाही.  

मनोज बोबडे   









अतर्क्य परामानसी गुंतलेला

अतर्क्य परामानसी गुंतलेला कुठे राखतो न्याय तो बंधुतेला तयांला गमे धर्म उन्माद नीती सले साम्य त्याला, चळे गोड प्रिती                         ...