सोमवार, २० एप्रिल, २०१५

गावसूक्त: गावाशी जुळलेल्यांचा श्वासच जणू!


‘गावसुक्त’ वाचला आणि त्यावर लिहायचंच असं मनाने घेतलं. वाचल्यादिवसापासून त्यातील वैशिष्ट्य मला तसे करण्यासाठी सतत उद्युक्त करत राहिले. ते सांगायचे झाले तर या संग्रहातील प्रत्येक कडवे हे दुसऱ्याशी कडीप्रमाणे जुडलेले आहे. एक कडवे वाचले की, ते विचार करायला बाध्य करतेच. मग दुसरे मला वाच म्हणून खुणावत राहते. वाचीत जातो तसतसे मन रोमांचित होत जाते. चिंतानाधीन होत जाते. आणि आपण आपल्याच गावाच्या दुनयेत विहार करायला लागतो. हीच या ‘गावसूक्ताची’ खासियत आहे. त्यातील ओळनओळ मनस्पर्शी झाली आहे. पहिल्यापासून तर शेवटच्या ओळीपर्यंत साचेबद्ध असणारा हा ग्रंथ बाहेरून जेवढा सुंदर आहे, त्याहून कितीतरी पटीने तो आतून काव्यसौंदर्याने नटला आहे. गावाचं अस्सल आणि विदारक चित्रण करणारा तसेच मनाला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारा हा संग्रह सर्वच बाबतीत वैविध्यपूर्ण आहे. ही झाली ‘गावसूक्ताच्या’ कवितेतील काव्याची उजवेपणा. रचनेच्याही आगळेपणाविषयी आवर्जून बोलावे अशीच ती आहे.
सर पावसाची येता
लागे धरेला चाहूल
आत धडपडे मुल.
ही अष्टाक्षरी नव्हे, चारोळी पण नव्हे, अभंगही नव्हे, हायकू तर नव्हेच नव्हे. मग हा प्रकार आहे तरी कोणता? असा सवाल सूज्ञ वाचकास पडतोच. तर याचे उत्तर या सर्वांच्या पल्याड असलेला स्वतंत्र रचना शैलीचा हा प्रकार आहे. जिचा आविष्कार केला आहे ‘गावसूक्त’चे निर्माते कवी किशोर कवठे यांनी. अष्टाक्षरीचा बाज घेऊन, अभंगाचा साज घेऊन, हायकूचा आभास घेऊन जन्म पावलेली ही रचनाशैलीतील कविता काळजाचा ठाव घेत रसिकाला मोहित करते. माझ्या तरी वाचनात आलेला हा नवाच प्रकार आहे. म्हणून या तंत्र निर्मितीचं श्रेय मी किशोर कवठे यांनाच देईन.
बीज मुसंडी मारून
देई प्रसव वेदना
काळ्या मातीतला राणा
असे म्हणत किशोर कवठे यांनी माती आणि स्त्री यांच्या प्रसववेदनेचे समानपातळीवर वर्णन केले आहे. शेती-माती व स्त्री यांचे नाते जिव्हाळ्याचे असल्याचे आपण सतत अनुभवत असतो. तो अनुभव मांडणारा कवी इथे प्रतिनिधी ठरला आहे.
बीज मातीत पेरून तिला फलनशील आणि सृजनशील ठेवत मुलं-बाळे, चिमणी-पाखरे यांच्या निर्वाहाची सोय करणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था मात्र कशी असते, याचे स्पष्ट चित्रण कवींनी पुढील ओळीत केले आहे.
पाखरांच्या पोटासाठी
सई, रायबा उपाशी
पाणी घोट-घोट प्राशी
ह्या कवणाचा आशय गावासंबंधीतांना उलगडून दाखवण्याची जरुरी नाही. तो ते वास्तव जगत, भोगत आलेला नसला तरी बघत नक्कीच आलेला असतो. गावसूक्तातील अशा रचना जेव्हा आपण वाचतो तेव्हा किशोर कवठे यांच्या प्रातिभ बळाची वाचकाला प्रकर्षाने जाणीव होते.
संत इहवाद सांगे
आम्हा बोचतो उरात
देव दाटले घरात
गावातील लोकांना (इथे पुस्तकाच्या अनुषंगाने) संतांच्या जीवन समृध्द करणाऱ्या इहवादी विचारांची गरज वाटत नाही. तर त्यांना अद्भूततेची, चमत्काराची आवश्यकता वाटत असल्यामुळे नुसत्याच देवतांची देवघरात दाटी झाली असल्याचं वास्तव त्यांनी अतिशय सहज आणि सुंदर शब्दात मांडले आहे.
अंधारल्या घरोघरी
सई, रायबा नांदती
पावसाला पांघरती.
गावातील जवळपास सर्वच घरांची ही दैना. सई-रायबा यांच्या प्रातिनिधिक उल्लेखाने समोर येते.
शेतकरी कितीही नाडला गेला तरी त्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ देते ती शेतीची सृजनशक्तीच....म्हणून तो म्हणतो.
पडू मातीवर आम्ही
झेलू प्रकृतीचा गुन्हा
उभे राहू पुनःपुन्हा
पुढील ओळीत आलेलं गावाचं वर्णन म्हणा, व्याख्या म्हणा की गावाचं अस्तित्व. अस्सल मांडणी आहे, वाचकाला गावाची खरी उंची या ओळी सांगत आहेत.
गाव पृथ्वीचे स्वगत
गाव सूर्याचे स्वरूप
गाव आकाश मंडप
प्रत्येक कडव्यागणिक किशोर कवठे यांची कविता काळजात शिरत जाते. साखरेची गोडी कितीतरी काळ जिभेवर रेंगाळत राहते अगदी तशीच ही कविता मनात रुंजी घालत राहते. ह्या ‘गावसूक्तातून वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य किशोर कवठे यांनी प्रत्ययास आणून दिले आहे.
किशोर कवठे यांनी या खंडकाव्य ग्रंथास ‘गावसूक्त’ हे शीर्षक दिले आहे. ते शब्दशः असले तरी साजेसे आणि चपखल असेच आहे. कारण सुक्त म्हणजे मंत्र, श्लोक, ऋचा तत्संबंधी आशयाने श्रीमंती पावलेला संस्कृतभाषी शब्द. ह्याच मंत्र, श्लोक आदिच्या स्वरूपाने सिध्द झालेल्या रचनाशैलीतून किशोर कवठे यांनी हा गाव अभिव्यक्त केला आहे.
शेती माती जातकुळी
तुकाराम येशुदास
गाव अल्लाचा सुवास
अशा विविधतेने नटलेले हे आहे खरे गावाचे सौंदर्य. हे अनुभवायचं असेल तर आपल्याला हा ग्रंथ वाचावा लागेल. हा ग्रंथ वाचताना डॉ. किशोर सानपांची प्रस्तावना अवश्य वाचावी. ती किशोर कवठे उलगडायला आणि त्यांचे गाव कळायला आपल्याला मदत करते. आपण सर्वच गावाशी नाड जुळलेली माणसे आहोत. आणि गावातील सुख-दुख, व्यथा वेदना, नाडल्या जाणं, भरडल्या जाणं, कष्ट, मेहनत, बेजार होणं, भांडवलशाहीमुळे गावाची दैना होणं अंती हताश होऊन मरणाधीन होणं तसेच सृजन काळ जवळ आला की, साऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मनगटाच्या भरवशावर परत नव्या उमेदीने जगण्यास उभे होणं. आणि अवघ्या जगाला सृजनाचा धडा देणं.....हेच तर गावाचं वैशिष्ट्य आहे. आणि हेच वैशिष्ट्य ह्या ग्रंथात अधोरेखित झाले आहे. हा ग्रंथ नागपूरच्या नामांकित ‘संवेदना प्रकाशनाने’ उजेडात आणला असून मुखपृष्ठ कवी तथा चित्रकार प्रमोदकुमार अणेराव यांनी साकारले आहे. मातीशी घट्ट नाते असणारे सुप्रसिध्द कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी ‘गावसुक्त’ च्या संदर्भात ‘गावसुक्त ही खरे तर आधुनिक ग्रामगीताच आहे.’ अशी शुभेच्छांच्या मार्फत कौतुकाची उत्स्फूर्त थाप दिली आहे. ती रास्त आणि ग्रंथाला पूर्णतः देणारी आहे. ह्या ग्रंथाचा सर्वांगीण विचार केला तर ते मराठी साहित्यविश्वात नक्कीच आपला स्वतंत्र ठसा उमटवेल याची मला मनापासून खात्री आहे.

- मनोज बोबडे                                                                                                                                                                                            
------------------------------------------------------------------------------------
गावसूक्त (कवितासंग्रह, खंडकाव्य)
कवी-किशोर कवठे
मो.-८९७५६५२०९४
संवेदना प्रकाशन, नागपूर
मुखपृष्ठ-प्रमोदकुमार अणेराव
र- ८०/- रु. फक्त. 

शुक्रवार, १३ मार्च, २०१५

कॉम्रेड पानसरे

पानसरे तुम्ही। असे काय केले।
जिवानीशी गेले। संपुनिया।।

जगावया येथे। करुनिया तर्क।
व्हावया सतर्क। शिकविले।।

सर्वहारा वर्ग। आपला तू केला।
संदेशही दिला। जगण्याचा।।

जाती-धर्मातली। तेढ संपवाया।
झिजला तू राया।आजीवन।।

कोण तो शिवाजी। कसा नि कोणाचा।
सांगून तू वाचा। फोडलीस।।

अठरापगड़। जाती-जमातीचा।
असा शिवाजीचा। इतिहास।।

अशा ज्ञानामुळे। जात्यांधाचे हित।
आल्याने गोत्यात। भांबावले।।

आणि तू गोविंदा। दीनांच्या कारणे।
केली आंदोलने। कितीतरी।।

भांडवलदार। हेही तुझ्यावर।
वाकड़ी नजर। ठेवलेले।।

ह्या ह्या वृत्तिनेच। प्रकार आखुन।
तुझे सुज्ञ प्राण। हिरावले।।

सत्य, न्याय, सख्य। ह्यासाठी घातली।
हयात सगळी। पानसरे।।

परि नाही चिंता। एका बिजातून।
हजारो उगुन। बीजे येती।।

-मनोज स. बोबडे

बुधवार, २२ जानेवारी, २०१४

लक्षण विजय वीरांचे

नकोच धरणे इर्षा, मत्सर
पाहता यश इतरांचे
स्वतःस जिंकीत जाणे
हे लक्षण विजय वीरांचे ||

जिद् मुंगीची अंगी बाणून
गरुड नजर ती स्वतःस मानून
क्रमून कणकण अंतर खडतर
झिजवून काया सदा खरेतर
ध्येय गाठणे तयांचे ||

नसे कुणाशी तुलना आणिक
झपाटणे हे त्यांचे 'टानिक'
हवे मना ते धरण्यासाठी
मात स्वतःवर करण्यासाठी
धडपडणे ते करांचे ||

सदोदित ते मनास बोले
'तुझियासाठी अशक्य कुठले?
कर कर कर कर सुरुवात ती
जमेल तुजला हवी बात ती'
मंत्र-जाप हे शूरांचे ||


-मनोज बोबडे

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१३

मक्तेदारी

विश्वास जयावर केला भारी
त्याने केली हरामखोरी

सोपविले ज्याच्यावर जीवन
ते करते असली गद्दारी

साम, दाम, भेदावर मेले
लुटू लागले जनता सारी

शब्दाच्या खेळावर नुसते
सुंदरता करते बाजारी

धर्माच्या नावावर निव्वळ
भारतास केले आजारी

जिंकाविती साधारण कोणी
हीत रक्षति अपुले भारी

मानवतेचा लेश न पुरता
अशी कशी ही मक्तेदारी

-मनोज बोबडे

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

सांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्तर येतो”जागतिकीकरणामुळे माणसाचे जीवन अत्यंत गतिशील झाले आहे.समाज सातत्याने बदलत असतो, हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. खोट्या प्रतिष्ठेची झालर भालावर बांधून, माणूस शाश्वत मूल्यांना मुठमाती देण्यात धन्यता मानतो. मानवी मनाचं उद्ध्वस्तीकरण प्रत्येकाच्या नजरेत सलत आहे. समाजाच्या स्तरिकरणाचा विचार केल्यास उच्च स्तराद्वारे निम्न स्तराचे शोषण होत आहे. उपेक्षितांच्या, वंचितांच्या जाणिवा चित्रकाराच्या कुंचल्याने लेणीरूप होतात तर कवीच्या शब्दाने महाकाव्य! ज्यांनी आयुष्याला तप्त तव्यावर शेकले असेल त्यांचा कलात्मक आविष्कार ‘आम आदमी’च्या संवेदनेचं प्रातिनिधिक रूप असत. उपरोक्त संदर्भात तादात्म साधेल असे समकालीन व्यवस्थाचित्र नाविन्यपूर्ण व समृध्द भाषाशैलीने कवी ‘किशोर मुगल’ यांनी ‘दिवस निरुत्तर येतो’ या कवितासंग्रहात अभिव्यक्त केले आहे.
   कवी ‘किशोर मुगल’ संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले एक ‘चंद्रपुरी गझलकार’आहेत. ’एकावन्न कविता माझ्याही’ हा त्यांचा पूर्वप्रकाशित कवितासंग्रह! ’मराठी माय बोली’ कवितेच्या कार्यक्रमाचे एक सभासद. अलिकडेच ९ व्या मराठा साहित्य संमेलनात[चंद्रपूर] संमेलनाध्यक्ष बाबा भांड, थोर विचारवंत डॉ. आ.ह.साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दिवस निरुत्तर येतो’ कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. कवीला भविष्यचित्र अस्पष्ट भासते, व्यवस्थेविषयक अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून, रसिकप्रिय कवी ज्ञानेश वाकुडकर प्रस्तावनेत म्हणतात, ’कविता संग्रहाचं नाव जरी ‘दिवस निरुत्तर येतो’ असं आहे तरी किशोर मुगल यांची कविता आशावाद जागवणारी आहे. प्रश्नातून उत्तर देणारीही आहे. आणि म्हणूनच ही कविता खोलवर झिरपणारी आहे. रुजणारी आहे’.
   सुरुवातीला आत्ममग्न वाटणारी कविता कालांतराने जनप्रबोधनाची कधी होते याचा वाचकाला थांगपत्ता लागत नाही.कवी जगाच्या कल्याणाची भाषा बोलतो. समाजात निसर्गदत्त समता नांदावी ह्याच उदात्त हेतूने निसर्गाला एक दान मागतो,
             अशी एक इच्छा माझी फळावी
             मला पाखरांची भाषा कळावी
           ....असे एक जाते दे रे निसर्गा
            जिथे भूक आम्ही अमुची दळावी(अशी एक इच्छा....पृष्ठ १५)
     
    अजूनही ज्या घरापर्यंत शासकीय उजेड पोहचला नाही, अशा घरांनी केव्हाच अंधाराला आपलसं करून घेतलं आहे. आदिमांच्या घरात भूक आणि दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. आदिम स्वर छेडताना कवी म्हणतो,
               जिंदगानी केवढी बंदिस्त आहे
              श्वास सुद्धा घ्यावयाला शिस्त आहे
             ..सूर्य त्यांना भेटला अद्याप कोठे
     काजव्यावरतीच त्यांची भिस्त आहे...(जिंदगानी केवढी...पृष्ठ ३१)      

ग्रामजीवनातील जगण्याचे संदर्भ कवीला सातत्याने खुणावतात. कालची हिरवीमाती आज अकृषक होत चालली आहे. जगाचा पोशिंदा हतबल झाल्याचे कुणाच्याही लक्षात कसे येत नाही? असा सवाल कवी ‘एका बैलाच्या डायरीतून’ या कवितेच्या माध्यमातून बैलाचे आत्मवृत्त किंबहुना शेतकऱ्याची अगतिकता विशद करतात. कवीला वास्तवतेची जाण आहे. भ्रष्टाचार प्रत्येकाच्या जगण्याचा विषय बनला आहे. भ्रष्टव्यवस्थेचे विदारक वास्तव कवी विद्रोही स्वरुपात पण, तितक्याच सयंतपणे ‘स्वातंत्र्याचा सूर्य’ या कवितेत मांडतात.......
             नदी नसली तरी पूल बांधून टाकू
             हाच आजच्या विकासाचा ठोकताळा
             शेतकरी मारतो मरू द्या हरकत नाही
             तुम्ही फक्त बिसलरी आसवे ढाळा...... (पृष्ठ ५२ )
    
    बोलीभाषा अभिव्यक्तीचे सकस माध्यम आहे.आपल्या परिसराचा अन्वयार्थ कवीला बोलीत सांधता येतो. ’शाब्बास रे बेटा’, ’मले हाक देजो’, ’झोलाझंडी’ या कवितेतील भाषा ग्रामीणजीवनमूल्याची उंची वाढवितात.वऱ्हाडी बोलीचे भाषासौष्ठव वाचकांच्या अंत:करणाला थेट भिडते आणि अंतर्मुख करते.
    कवीचे गझलेवर असलेल ‘कमांड’ प्रत्येक शेर सांगून जातो.विषयाची विविधता जशी गझलेच्या प्रत्येक शेरात असते,तशीच विविधता कवी किशोर मुगल यांच्या कवितेत आहे.कवीने,स्त्री प्रतिमांचा सर्वार्थाने केलेला सन्मान स्त्रीत्वाची उंची वाढवितात.       
    स्त्रीचे सौंदर्य,कारुण्य,प्रेम,अगतिकता,मनाला चिंतन करायला लावणारे विषय! कवी जेवढ्या नम्रतेने प्रेमावर बोलतो तेवढाच कठोर ‘स्त्रीभ्रूणहत्या’ विषयावर होतो.इथ   मानवी विकृतीविषयी भाष्य करून स्त्रीला सजग राहण्याचा सल्ला देताना म्हणतो ........
             सांज होता दार खिडक्या गच्च तू लावून घे
             हे शहर बदनाम माझे एवढे जाणून घे......(सांज होता दार ..पृष्ठ ४९)
     
      कवी प्रेमात उद्ध्वस्त होण्याची भाषा बोलतो.अमृताची चव खऱ्या प्रेमात असते,हे कवीने जाणले आहे.म्हणून प्रेमाचे स्वरूप स्पष्ट करताना कवी म्हणतो,
             ही अमृताची चव खरी जाणावया
             ओठावरी ओठास ठेऊ ये प्रिये
             एका क्षणासाठी प्रीतीच्या कोवळ्या
             ही जिंदगी उधळून देऊ   प्रिये...(हा रेशमी अंधार .....पृष्ठ ३३)
     
    ‘शेरातील विरोधाभास वृत्ती गझलेचा आत्मा असतो’असे गझलसम्राट स्व.सुरेश भट्ट म्हणतात.खरे तर शेर गझलेचा अवयव आहे.अवयव जितके सुदृढ तितके शरीर उपक्रमशील. कवी किशोर मुगल यांना गझलेची भाषा उमगली आहे.शेरातील विरोधाभास त्यांच्या एका रचनेत सत्कृतदर्शनी जाणवतो.
            आरसा कसा होता तो
            काय त्याचा वारसा
            ठेच त्याची लागुनी
            दगडासही गेला तडा........ (गंधवेड्या मोगऱ्याचा.....पृष्ठ ९०)
    
    कवी अंधश्रद्धेवर असूड उगारतो.कवीची जगण्याविषयी कुठलीही तक्रार नाही.सकारात्मकवृत्तीने व्यवस्थेशी दोन हात करता येतात यावर कवीचा विश्वास आहे.’आई’ प्रत्येकाच्या जीवनाला समृध्द करणारी स्त्री! अव्यक्त भावनांचे मुक्त विद्यापीठ म्हणजे आई.तिची महती अलवारपणे सांगताना कवी म्हणतो,
           आभाळाचा कागद
           सागराची शाई
           लिहून सरली
           तरी उरलीच आई|.....(पृष्ठ..१२८)
    
   कवी किशोर मुगल, सर्वव्याप्त अनुभवांना कवितेच्या माध्यमातून मानवतेच्या एका सुरात बांधण्याचा प्रयत्न करतात.समाजात समता,न्याय,प्रेम,बंधुता नांदावी व प्रत्येकास सम्यकदृष्टी प्राप्त व्हावी असा निर्व्याज दृष्टीकोन त्यांनी मनी बाणला आहे.संबंध कवितेला एक दिशा आहे,कळायला सोपी पण अंतर्मुख करणारी आहे. ‘दिवस निरुत्तर येतो’ काव्यसंग्रहाला ‘माधव लोखंडे’ यांचे आकर्षक व समर्पक मुखपृष्ठ लाभले आहे.एकूण ७९ कवितांनी आविष्कृत काव्यसंग्रह नवकवितेचे परिघ ओलांडेल यात शंका नाही.अस्सल अनुभवातून आलेली कविता वाचकांना आपलीशी करून सतत प्रेरणादाई ठरेल अशीच अभिव्यक्ती आहे.कवी किशोर मुगल यांच्या काव्यप्रवासास मन:पूर्वक शुभेच्छा! 

-किशोर कवठे              बामणवाडा,राजुरा जि.चंद्रपूर 
.....................................................................................................................

कवी-किशोर मुगल                          
काव्यसंग्रह-दिवस निरुत्तर येतो 
प्रकाशक-जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,चंद्रपूर 
पृष्ठ.१२८  मूल्य.१२०