पावसासवे!



 गीत एक गाईले मी पावसासवे
वाटते असेल ही नभाची आसवे
सौख्य जाहले असे की दुःख अंबरा
कळेच ना असे कसे मनास भासवे

शांत जाहली तरु ही हर्ष पावली
एकजीव जाहली सर्वत्र सावली
हासला हा आसमंत धुंदशा गुणे
लाजली जी द्वाड खुळी लाही कावली

आज लाभला जीवा नवाच गारवा
का न खगांचा दिसे नभात ‘कारवॉं’!
असतील पाखरे अधि घरास परतली
तरारल्या रानचा तो रंग हिरवा

सडक डांबरी चकाके न्हाउनी जळी
रंग लेउनी जणू देहास काजळी
आणि निवासे चिंब ही प्रसन्न जाहली
‘कोण ओती अमृताच्या वरून ओंजळी?’

भिजशी तिथे तू मी इथे तो रंग पाहिला
भाव खुळा तो जणू अभंग राहिला
अनमोल हे निमिष सखी कोण पळविते?
पूस पावसास जो अरंग राहिला

-मनोज बोबडे (‘परिमळ’ या संग्रहातून)




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऐक जरा साजणे...

प्रबोधन गीत

हे असं आहे तर...