मंगळवार, १७ जुलै, २०१२

पावसासवे! गीत एक गाईले मी पावसासवे
वाटते असेल ही नभाची आसवे
सौख्य जाहले असे की दुःख अंबरा
कळेच ना असे कसे मनास भासवे

शांत जाहली तरु ही हर्ष पावली
एकजीव जाहली सर्वत्र सावली
हासला हा आसमंत धुंदशा गुणे
लाजली जी द्वाड खुळी लाही कावली

आज लाभला जीवा नवाच गारवा
का न खगांचा दिसे नभात ‘कारवॉं’!
असतील पाखरे अधि घरास परतली
तरारल्या रानचा तो रंग हिरवा

सडक डांबरी चकाके न्हाउनी जळी
रंग लेउनी जणू देहास काजळी
आणि निवासे चिंब ही प्रसन्न जाहली
‘कोण ओती अमृताच्या वरून ओंजळी?’

भिजशी तिथे तू मी इथे तो रंग पाहिला
भाव खुळा तो जणू अभंग राहिला
अनमोल हे निमिष सखी कोण पळविते?
पूस पावसास जो अरंग राहिला

-मनोज बोबडे (‘परिमळ’ या संग्रहातून)
गुरुवार, २१ जून, २०१२

‘व्हीलचेअर’ चा हुंकारकवी मनोज बोबडे यांचा व्हीलचेअर हा ६३ कवितांचा सुंदर संच आहे. ‘वत्स-विनायक प्रकाशन’ पुणे, नागपूर द्वारा तो प्रकाशात आला आहे. प्रख्यात चित्रकार श्री अरुण मोरघडे ह्यांनी मुखपृष्ठ साकारले आहे. खगोलीय ऋतुचक्री रंगाकृतीद्वारे ‘व्हीलचेअर’च्या पार्श्वभूमीवरील गती, व्याप्ती व विशाल जीवनार्थ प्रकट करणारा भव्य चित्राविष्कार आहे. हे आविष्करण आतील काव्यात्म आशयाला पूरक ठरले आहे. सोबतच या काव्यसंग्रहातील ५७व्या ‘मी जळावानी’ या कवितेतील चार ओळी अंकित करून आयुष्यरूपी वाहत्या नदीच्या जीवनात डबक्याप्रमाणे कुठेच साचून न राहता वाहत राहून ग्रंथातीत नैसर्गिक काव्यानंद अनुभवण्याचा संदेश देण्यात आला आहे. एकंदरीत मुखपृष्ठ ही वाचक रसिकांची आतील कविता वाचण्याची जिज्ञासा तीव्रतेने जागृत करते.
मुखपृष्ठाप्रमाणे मलपृष्ठही खूप काही सांगून जाते. मलपृष्ठावरील कवी मनोज बोबडेंचे रंगीत छायाचित्र त्यांचे व्यक्तिमत्व प्रकट करते पण महत्वाचे म्हणजे महाकवी सुधाकर गायधनी व महान विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे ह्यांची व्हीलचेअर काव्यकलेबाबतची गौरवपर प्रशस्तीपत्रे आहेत. यामुळे वाचक रसिक हा कविता संग्रह वाचण्यास एकदम आतुर होतो आतील पान उघडताच माननीय आ.ह साळुंखे हयांच्या प्रस्तावनेतून आतील कावितांचे सामर्थ्य न कळत कळून येते. या पुस्तकाची बांधणी, छपाई, व मुद्रणमूल्य उच्चदर्ज्याचे आहे. या संग्रहातील कवितांचा आशय मर्मभेदी असून समाज व्यवस्थेला सुव्यवस्थित करण्याची परिवर्तनशील विधायक मानसिकता यातून प्रकट झाली आहे.
कवीराज मनोजने ६०व्या क्रमांकावर ‘व्हीलचेअर’ नावाची कविता दिली आहे. व तेच शीर्षक त्याने या कविता संग्रहाला बहाल केले आहे. तसेच अपंग असलेला हा मनोज ‘व्हीलचेअर’चा वापर करून नित्त्यानेच वाहत असतो. हेही आपण बघतोच शिवाय निर्भयतेची, निरामयतेची, निर्भ्रांततेची सुमने त्याला हातात बाळगता यावी म्हणून सुद्धा तो असा वावरतो.
इहवादी मानवीय वैज्ञानिक दृष्टीकोनातल्या विवेकरूपी धाग्यात कवीने सर्व कवितांची माळ गुंफलेली दिसते. जीवनातले सार-असार, खरे-खोटे, चुक- बरोबर, धर्म-अधर्म, जुने-नवे, सुंदर-असुंदर, श्रद्धा-अंधश्रद्धा, ज्ञान-विज्ञान, सुख-दुःख, चढ-उतार ही सर्व द्वंद्वे ओळखून योग्य ते निवडण्याचा विवेक इथे मांडण्यात आला आहे. विवेकाधिष्टीत स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा सत्तत्वांचा स्वीकार करण्याचे आवाहन येथील कवितांतून करण्यात आले आहे. यासाठी भगवान गौतम बुद्ध, महात्मा कबीर, संत नामदेव, महात्मा जोतिबा फुले, संत तुकाराम, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, डॉ. बाबासहेब आंबेडकर, गाडगेबाबा, या सर्व मानवतावादी विचारकांची इथे आराधना करण्यात आली आहे. या संग्रहातून कवीने आपला नेकांगी हुंकार अभिव्यक्त केला आहे. सृष्टीतल्या कणाकणातून व मनामनातून नवनवीन शिकण्याचा विचार कवीने मांडला आहे. ‘शिक्षक’ या कवितेतील पुढील ओळी बघा.
हे शिक्षक ब्रह्मांडातील, धरतीतील कणकण सारे
ते ज्ञान मिळविण्यासाठी, राहीन मी सजग सदा रे

कवीच्या विवेकी मानव्याबाबतचे काही काव्यांश नमुन्या दाखल सांगता येतील.
सुंदर हे किती| जगणे मरणे|
प्रेम देणेघेणे| अनुदिन|| (सुंदर हे किती)
           
सनातन्यांची नको झुंड ती
तुका, नामदेव, कबीर माझे.....  
अक्षर माझे शब्द राहतील
जरी वागणे फकीर माझे...(जरी वागणे)

‘प्रेम हाच देव गुरु| प्रेम भक्ती भाव
कशास तू घेतो| परलोकासाठी धाव!...’(प्रेमाचा प्रभाव)

‘विज्ञान विवेकासंगे
माणूस म्हणोनी घडलो...(ऱ्हास)

‘उदंड झाले साहस माझे, उदंड झाले बाहू
अन्यायाची सक्ती आता ती मी कशाला साहू!...(बंद करा चिवचिवाट)

अशा विधायक विज्ञानवादी वृत्तीने भारलेला हा कवी नभांगणी भरारतांना दिसतो.’जाऊ दे नभात त्या’ या सुंदर कवितेत कवी म्हणतो...
‘मी असा आहे परंतु बांधल्यापरी इथे
रोप मोकळ्या मनाचे लावू दे नभात त्या!    

कवी शेतकर्यालाही लढायला सांगत आहे...
...हक्क मागाया उठ, निट वागाया उठ
होय पोशिंदा खरा तू, जगाया उठ!....(दे लढा!)

देशभावना व्यक्त करताना ‘आवाहन’ कवितेत कवी म्हणतो....
‘बंधू भावना उरी धरू       
देशास ह्या उज्ज्वल करू...’

‘सगळेच मनाचे साथी’ या कवितेत कवी उद्गारतो...
‘भरभरून देऊ प्रीती
करू दुनिया मानवतेची....’

पण असे करताना ‘पडतील लाख काटे’ असा इशाराही कवी देतो. बोचणारे काटे, अडथडे येणारच पण ते ओलांडत ‘मी चालणार आहे’ असा दृढविश्वसाही कवी व्यक्त करतो.
एकंदरीत कवीने ‘व्हीलचेअर’ मधून स्वातंत्र्य-समताधिष्ठित मानवतेचा जागर करीत बहुसंख्य सर्वसामान्यांनाही जग सुंदर वं रमणीय करण्याचा कल्याणकारी विचार मांडलेला आहे. ‘कवीचा हा टाहो, घरोघरी जाओ!’
मनोजच्या काव्यप्रवासास हार्दिक शुभेच्छा!


ना. गो. थुटे
वरोरा (२०१२)

शुक्रवार, १८ मे, २०१२

कुठवर राखावे भोळेपण?देव-देवतांच्या आधारेफलज्योतीष्याचे बळ सारे|
दुकान थाटून बसले कोणीस्वतःस श्रेष्ठत्तम जाणोनी|
गुलाम होईल ऐशा ज्ञानाजनतेमध्ये पसरविताना|
लाज मुळी मानसी न काहीफक्त हित अपुलेच पाही|   

किती आजवर केले भाकीतवेळ ती येता बसले झाकीत|
भाकीत खोटे ठरते जेव्हाकरी सारवा-सारव तेव्हा|
भीती कशाला जनी पसरवीस्वतःस का ते असे घसरवी|
खोटे-नाटे सांगून येथेघरी तुंबडी भरून नेते|
मुर्ख जाणोनी जनतेला कादेत चालले सदाच धोका|

सुज्ञ येथली जनता होतासुख-दुःखाच्या करती बाता|
त्या आधारे बसते घोकीतश्रद्धा अपुली असते राखीत|
शब्दमय जंजाळाचे तेजनतेवरती जाळे टाकते|
निराश इथली भोळी जनताशरण जातसे हा हा म्हणता|
अज्ञानाची हीच परिणतीअशी घडविते सदा अवनती|

व्हा व्हा जनहो जागे आतानको राहणे मागे आता|
कुठवर राखावे भोळेपणस्वत्व आपुले इथे गमावून|
अस्मितेची कास धरा रेबाणेदार हे जीणे करा रे|
कशास पोथी हवी खुळी तीजी देते जीवनाला गळती|
आणिक त्यांचा कशास मक्ताशोषित जाईल तुमच्या रक्ता|

सोडा त्यागा खुळेपणाशीसप्रेमाने जगा जीवाशी|
स्थान अंध जर विश्वासालाखरे निमंत्रण ते ऱ्हासाला|
हाती येत असे कर्माचे फळनसे कोणते दैवाचे बळ|
मर्यादेने सदाच वागाविवेक राखा अखंड जागा|
नको नको ती व्यर्थ गुलामीमानवतेला द्या ना सलामी|

कास धरा या विज्ञानाचीआणिक सुंदर शिव ज्ञानाची|
नको कोणती निर्मम आशाडावबाज जी सुंदर भाषा|
या जपण्याशी समता प्रेमळविषमतेचा सारून तो मळ|
नीच कुणाशी जाणू नका रेदूर करा जी बात फुका रे|
वैभव मग इथले ते सारेया सगळे जण लुटावया रे|

-मनोज बोबडे (व्हीलचेअरया कवितासंग्रहा मधून)

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

हीच खरी नीती ....


मती-नीती-गती-वित्त गेले विद्येविना
दिला मंत्र ज्योतीबाने मतलबाविना

तयासाठी कुणाच्याही मुखी नाही गाणी
जयामुळे झाला हरजीव स्वाभिमानी

भेदाभेद प्रस्थापित करी त्याचा मान
ठेवी, करी मेंदूतील ज्ञानाचे पतन

ज्योतीबास राष्ट्रद्रोही म्हणतात ‘भिडे’
असे वळवळ करी ‘मनोहर?’ किडे

त्यांचे इथे शब्द ज्यांनी प्रमाण मानिले
मेंदू-मने सारे त्यांचे रसातळी गेले

अशा गुरुजना काय मान-पान द्यावा?
आदरास त्यांच्या एक पुरे ती खडावा 

नीती अशी भ्रष्ट, बडेजाव श्रेष्ठतेचा 
म्हणे 'द्रोही' त्यांना, सत्य ज्ञान सांगे वेचा!

अशा नरा माराव्यात पैजारा अनेक 
अरे गड्या हीच खरी नीती आहे नेक! 

-मनोज बोबडे (डिसेम्बर२००७)

¼आज ११ एप्रिल क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्या निमित्य विनम्र अभिवादन! त्या निमित्यानेच ही एक कविता½

बुधवार, २१ मार्च, २०१२

किंमत,


कुसुमास भाव मोठा
गंधास ना कहाणी
पद्यच श्रेष्ठ जेथे
काव्यास कोण मानी?

कृत्रिमता कशी ही
नांदावयास पाहे
टरफले हासती अन्
गाभा झुरून राहे

प्रतिभा उणी कशी ही
वाहे वेड्याप्रमाणे
कीर्तीस हपापल्यांचे
असती कैक बहाणे

-मनोज बोबडे ('परिमळ' या कविता संगहातून)

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

ग्रंथ आणि तत्वज्ञान


बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.
.....एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.

आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.


पु. ल. देशपांडे (’एक शुन्य मीया पुस्तकातुन)


या देशाचा पूर्वीचा इतिहास ध्यानात घेतला म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्ष ब्राम्हणवर्ग व बुद्ध धर्म यांचा वाद चालू होता. या वादात जे वांगमय निर्माण झाले धाकर्मक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे. देशातील सत्ताकेंद्रावर आपली हुकुमत चालावी म्हणूनच ‘’गीता’’ या ग्रंथाचा जन्म झाला.

वेदातील थोडाफार अनुवाद गीता ग्रंथात करण्यात आला आहे. परंतु वेडात तरी असे कोणते ज्ञान साठविले आहे ? खरे पाहिले तर वेद दोनच आहेत. एक ऋग्वेद आणि दुसरा अथर्ववेद. मी कितीतरी वेळा वेद वाचले आहेत. त्यात समाजाच्या मानवाच्या उन्नतीसाठी व नितीम्त्तेस पोषक असे काहीही सांगितलेले नाही.

अथर्ववेदात बायको प्रेम करत नसली तर काय करावे ? दुसऱ्याची बायको कशी वश करावी ? द्र्व्यहरण कसे करावे? हे सांगितले असून जारणमारण आदी गोष्टींचाही समावेश आहे. वास्तविक वेदांसारख्या ग्रंथात या विषयांची काय जरुरी होती ?

यातील पुरुषसूक्तात ब्राम्ह्नांपासून शूद्रांपर्यंत कोणी कसे वागावे हे दिले आहे. बुद्धाचा याबाबतच कटाक्ष होता व त्याच दृष्टीने त्याने चातुर्वर्ण्याबद्दल टीका केली आहे.क्षत्रियाने मारणे हे त्यांचे कर्तव्य आहे अस सांगितलं आहे. एकाने दुसऱ्याला मारणे हे जरुरीही असू शकेल.पण कर्तव्य ठरणार नाही. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात १८ व ३९ श्लोकांत वेदांताचा आधार घेऊन आत्मा अविनाशी आहे , देह जरेने किंवा अन्य कारणाने नाहीसा होणारच असे विवरण केलेले आढळेल परंतु विचार करा की, ‘’एखाद्य खुनी खटल्यात वकिलाने जज्जास असे सांगितले की ,”साहेब आत्मा अविनाशी आहे तेव्हां खुनाबद्दल आरोपीस का शिक्षा करता ?’’ तर हे वकिलाचे म्हणणे कसे दिसेल ?

परंतु जोपर्यंत तुम्ही हे ग्रंथ प्रमाण म्हणून मानाल तोपर्यंत जगात तुमचा उद्धार होणार नाही. या पुस्तकांतून शूद्रांची निंदा अवहेलना करण्यात आली आहे. यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल,ते कायमचे दलित राहतील अशी योजना करण्यात आली आहे.ती पुस्तके जर तुम्ही आम्हास धर्मग्रंथ म्हणून प्रमाणभूत माण अशी सक्ती करीत असाल तर ते मी कधीही मान्य करणार नाही.हे माझे एक जीवनकार्य आहे. खालच्या लोकांना निःसंतान करण्याचा , त्यांना कायमचे पायदळी तुडवण्याचा व त्यांना रसातळाला नेण्याकरिता पद्धतशीर प्रयत्न करणारा असा एखादा विशिष्ट वर्ग (ब्राम्हण) जगातील इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. 


डॉ.बाबासाहेब आंबेडकर(‘वेद आणि गीता’या विषयावरील भाषणाचा अंश)

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

साधेपणामुळे


साधेपणामुळे सारा घात झाला, घात झाला
कधीतरी नाही गड्या माझा दिनरात झाला

हाही सांगे तोही सांगे कर असे, कर तसे
प्रेम-विश्वासाच्या बळे मला लागलेले पिसे

करू जाता सांगितले दुसरा ये सांगण्यास
दोन्ही रिती करावया बाधा येई वागण्यास

मग सारे नियोजन कोलमडूनिया पडे
तेव्हा यशतेचे माझ्या निघतसे धिंडवडे

म्हणुनीच सांगणे हे ‘साधेपण सोड मन्या
शिस्त सदा राख ऐकू-नको परक्याचे कुण्या!

ऐकताना जाण ठेव सत्य, न्याय, बंधुतेची
अन सांगणाऱ्या इसमाच्या प्रामाणिकतेची’

-मनोज बोबडे 

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

आई आणि बाळ

लाडीक लाडीक बाळ हासती
हर्षित आई मनी खास ती
पाहून म्हणती राजा हा
गोड सानुला माझा हा!

रम्य खेळणे हाती घेणे
हलवून झुलवून फेकून देणे
मस्तीत रमती राजा हा
गोड सानुला माझा हा!

टकमक बघती नैन टीमुकले
फुरफुर करती ओठ चिमुकले
खेळ कैक करी राजा हा
गोड सानुला माझा हा

रंग सावळा सुंदर सुंदर
चोर भामटा बडा बिलंदर
जणू विदुषक राजा हा
गोड सानुला माझा हा


रडतची बघता गोड फुले
ओठांवरती हास्य झुले
फुलच होतो राजा हा
गोड सानुला माझा हा


मनोज बोबडे 

शनिवार, ७ जानेवारी, २०१२

माशी


रडू नको गीडू नको
बाई तू अशी
अग् तुझ्या नाकावर
बसली माशी

रडशील तर ती
चावेल तुला
थांब तशीच अग्
पकडू तिला

माशी मारायला मी
मुठ बांधली
बुक्की मारता ती माशी
उडून गेली

हाताची या बुक्की तुला
फार लागली
नाकातली अळी धाऊन
बाहेर आली

आणि अळी सर्रकन
ओढवली आत
दिसू नये म्हणून नाकी
ठेवला तू हात

झाली बघ बाळा अशी
माशीची या मात
अन् दिसू लागे तुझे
पांढरे ते दात

मनोज बोबडे