शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

पाऊलखुणा

माझ्या वेशितले ढग
जाम पळवितो वारा
तुझ्या गावात ग सखे
आज पावसाच्या धारा

गार पावसाच्या सरी
तुझ्या गावात पडती
गंध मातीतले वास
अश्रू आमचे ढाळती

सुक्या ढेकुळात जीव
आज कोंडून मरती
शिवारात गावकूस
तुझ्या जळात झुरती

तुझ्या वागण्याची रीत
शुभ पाउलाच्या खुणा
आज कळेल आम्हाला
जेव्हा पेटेल वणवा

आता रंग आभाळाचे
माझ्या नयनात दाटे
तुझ्या नसण्याचे नभ
माझ्या डोळ्यात ओथंबे

माझ्या संचितात रित्या
कोण कोरेल अक्षर
गाववेशीत शोधतो
ओल्या पावसाची सर्

किशोर कवठे 

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

चालतो वाट तो मी...

असा स्थिरतेने गडे राहतो मी
परी चालतो चालतो वाट तो मी

मला नाव सांगू नको तू उन्हाचे
गडे सावलीला पुरा जाणतो मी

तुम्ही देवतांना पूजा सर्वकाळी
सदा माणसांच्या तळी नांदतो मी

तसे पिळताना तुम्हा खंत नव्हती
इथे काळजाना सकळ सांधतो मी

मिळव तू परीने तुझ्या झेपते ते
सये कुवतीने शिधा रांधतो मी

पुरुष मी म्हणुनी कसा गर्व राखू
करी बळ तुझ्याही असे मानतो मी

कशाला कुणाशी फुका दोष द्यावा
परी शोषकांचा पिळीन कान तो मी

मनोज बोबडे 

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

तुझ्यामुळे


बाबा तुझ्यामुळे हे धन्य इमान झाले
तुझ्यामुळेच 'मानी' हे वर्तमान झाले

वर्जू कुणास आता हृदयी कुणास घेऊ
बालिश प्रश्न सारे माझे गुमान झाले

तरवार विवेकवादी तुझी अम्हा मिळाली
हाताळता तीयेशि पिळणे किमान झाले

मानव प्रेम आता परमोच्च मानतो मी
ते भेदभाव सारे कास्पटा  समान झाले

आम्हा थिटीच होती ती वितभर दुनिया
आता हे मालकीचे बघ आसमान झाले

मनोज बोबडे (व्हीलचेअर मधून)

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

पूजापाठ


पूजेच्या निमित्ते| बदाम खारका|
मागतो सारखा| पुजारी तो||

अनाजाने थैली| भरुनिया घट्ट|
दक्षिणाही लठ्ठ| हवी त्याला||

पुजेला सफल| करण्यास चट|
हवाच तो भट| वादे सदा||

प्राबल्य राखण्या| माहात्म्य सांगती|
स्थान ते ठेवती| आरक्षित||

दुःखी, भयग्रस्त| जनतेस भोळ्या|
सांगून कागाड्या| लुबाडती||

आपल्या विवेका| विचारावे सत्य|
किती अशा तथ्य| प्रकारात||

गाडगेबाबा ते| म्हणे या नादात|
फुका या फंदात| पडू नका||

मनोज बोबडे (‘व्हीलचेअर’मधून)

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

विचारधन २


धर्म

...धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का? देशाला संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय गाठण्यावर धर्माचा काही परिणाम होत नाही. आजकाल संपूर्ण स्वातंत्र्याचे उपासक असलेले सदगृहस्थ धर्माला बौद्धिक गुलामी म्हणतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, “ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे. मानव मात्र काहीच नाही, केवळ मातीची कठपुतळी आहे. असे मुलांना सतत सांगणे म्हणजे मुलांना कायम स्वरूपी कमकुवत बनविणे होय. त्यांची मानसिक शक्ती आणि त्यांचा आत्मविश्वासच कमकुवत बनविणे आहे.....

                                (शहीद भगत सिंह समग्र वाड्मय. पृ. २०७)


आत्म्याचे अमरत्व

...अमरात्वावर ज्यांचा विश्वास आहे असा एखादा माणूस जर तुम्हाला भेटला तर मग तुमची कोणतीच इच्छा अपुरी राहणार नाही. हे नक्की समजा, की तुम्ही त्याच्या सर्वच वस्तू घेऊ शकता-अगदी तुम्हाला वाटले तर तुम्ही जिवंतपणी त्याची कातडीही सोलून घेऊ शकता. आणि तो ती तुम्हाला देण्यास आनंदाने तयार होईल....

                                 (अप्टन सिंक्लेयर ४०३ सी. जी.)

ईश्वर

...परमेश्वराने हे दुःखाने भरलेले जग का निर्माण केले? केवळ तमाशा बघण्यासाठी? असे असेल तर मग तो क्रूर सम्राट निरोपेक्षाही भयंकर जुलमी आहे. हा काय त्याचा चमत्कार असावा? पण असल्या चमत्कारी ईश्वराची गरज काय आहे?.....स्वार्थी लोकांनी, भांडवलदारांनी धर्माला नेहमीच स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वापरून घेतले आहे. इतिहास याला साक्ष आहे. ‘धीर धरा!’ आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा! असे सांगणाऱ्या तत्वज्ञानाने ज्या यातना दिल्या आहेत, ते सर्वच जण जाणतात.
      लोक म्हणतात, की परमेश्वराचे अस्तित्वच जर नाकारले तर काय होईल? जगात पापे वाढतील, अंधाधुंदी माजेल परंतु अराज्यवादी म्हणतात, की त्यावेळी माणूस स्वतःच एवढा उत्तुंग झालेला असेल, की स्वर्गाची लालूच व नरकाचे भय न दाखवताही तो दुष्कृत्यापासून दूर राहिल. आणि प्रामाणिकपणाने कार्य करेल! तो एकदा स्वतंत्र झाला, तर त्याचे जीवन फारच उन्नत होईल....

                             (शहीद भागत सिंह समग्र वाड्मय. पृ. २४४-२५६)

मिथके

...सत्ये दोन प्रकारची असतात, अशी माझी भूमिका आहे. एक सत्य विज्ञान, इतिहास वगैरेंच्या कसोटीवर घासून पाहायचे असते, त्याची तार्किक चिकित्सा करायची असते. याउलट एक सत्य तर्काच्या कसोटीवर पाहायचे असते. त्याला भावना आणि श्रद्धा यांचे अधिष्ठान असते. केवळ वैज्ञानिक सत्य माणसाच्या सर्व गरजा भागवू शकत नाही. माणूस केवळ तर्कावर जगणारा प्राणी नाही. त्याला काही वेगळ्या गोष्टींचीही आवश्यकता असते. आणि ती पूर्ण करण्याचे काम चांगली मिथके करतात....
      मिथके ही शोषण, अन्याय, अद्न्यान इ. गोष्टींचा प्रसार करीत असतील, तर ती नाकारलीच पाहिजेत. परंतु ज्या मिथकांना अशा प्रकारचा डाग लागलेला नसतो, जी उत्कट भावनात्मक आनंद देतात, मानवी मनाला उन्नत करतात ती मिथके नाकारण्याचे कारण नाही....

                          (सर्वोत्तम भूमिपुत्र: आक्षेप ले. डॉ. आ. ह. साळुंखे)









शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

बिनसायसे घडे न काही


नवल नको रे मना बाळगू
सृष्टी ही चालते कशी?
जीवित सार उरात पुरे
घेऊन निपजली उमलायाशी

चालक नच आणिक कोणता
खुद्द चराचर फुलफळणारे
मातीमधले निरासवे बीज
अंकुरण्याशी धडपडणारे

बिनसायासे घडे न काही
कार्य कारणासवे जागती
जयास काही हवे हासण्या
स्वार्थ न्याये अन्यास मागती

कोण कोठला देव येतसे
गरज जाणोनी देण्या भौतिक?
सुखे नांदतो इथेच नर तो
मिळवील जो कष्टाने मौतिक

इथे प्रेमाने भरभरला तो
मानवतेची चाळ जयाला
वागणे सिमाहीन असेल ज्याचे
सृष्टी ही नच दे स्थान तयाला


मनोज बोबडे (‘परिमळ’ मधून) 

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

विजय



मातेच्या टेकून ताठ शीर चरणाशी
निघे वीर जय संपादन करण्याशी

ते लक्ष्य एकले उरात घेऊन जाता
रांगडा धुमाकूळ रणात माजला होता

त्या समर वीराने दश शकले पाडून
हद्दी फडकीला निशाण तो गाडून

जय-अभिमाने फुगून आली छाती
अन् प्रिय आईची मस्तकी लावली माती

त्या वीर कृतीने विजयी झाला देश
जनतेत अन् सुटले ईश पूजण्या आदेश

प्रारब्ध कुणी, कुणी म्हणती सुकृत याशी
नच वावच इथल्या मिळतो सत्कार्माशी!

मनोज बोबडे (‘परिमळ’ या कवितासंग्रहातून)

अतर्क्य परामानसी गुंतलेला

अतर्क्य परामानसी गुंतलेला कुठे राखतो न्याय तो बंधुतेला तयांला गमे धर्म उन्माद नीती सले साम्य त्याला, चळे गोड प्रिती                         ...