सोमवार, २७ एप्रिल, २०२६

अतर्क्य परामानसी गुंतलेला



अतर्क्य परामानसी गुंतलेला

कुठे राखतो न्याय तो बंधुतेला

तयांला गमे धर्म उन्माद नीती

सले साम्य त्याला, चळे गोड प्रिती

                               

जिथे संशयाला नसे निमिष थारा

तिथे ज्ञानवंता मिळे हा किनारा

सुचे प्रश्न ना, नच उभे तर्क राही

परीघापुढे ना फुले ज्ञान काही

 

मुखी गोड वाणी, कटू अंतराने

कुणा दुष्ट म्हणती किती आदराने

सदा सर्वदा ही अशी रीत ज्यांची

कशी योग्यता मी वदावी तयांची

 

मला भीड येथे नको मूढतेची

नको आस त्याही खुळ्या गूढतेची  

रहावे सप्रेमे सदा बंधुभावे

रूचे जे मनाशी असे गीत गावे


-मनोज बोबडे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अतर्क्य परामानसी गुंतलेला

अतर्क्य परामानसी गुंतलेला कुठे राखतो न्याय तो बंधुतेला तयांला गमे धर्म उन्माद नीती सले साम्य त्याला, चळे गोड प्रिती                         ...