एक होऊ चला!
जागवाया सदा अस्मितेला, एक होऊ चला आज सारे
शोषकांची गुलामी झुगारा, कोठडीची तोडा बंद दारे||
नम्रता ही मनी, देही ताठा, ठेवूनिया जगी वावरावे
दुष्ट अन्याय हा संपवाया, सत्य न्यायाशी हृदयी धरावे
ध्येय गाठावया अंगिकारू, धैर्य, विश्वास सातत्य सारे|
दोष देणे फुका हा कुणाशी, नसे नीती खऱ्या मानवाची
स्नेह राखू जरी अंतरात, परी करू खांडोळी नीचतेची
नांदुया बांधवाच्याप्रमाणे, हे सामर्थ्य मनी बाणवा रे|
धर्म, रुढी, प्रथा गैर ज्या ज्या, दूर सारा मना बोचणाऱ्या
उन्नतेला नेई सुजनांना, कवटाळूया अशा वंद्य साऱ्या
काळजाशी अशी काळीजे ही, जोडण्याशी सदा धडपडू रे|
जागविण्या समाजास येथे, झिजणे होते महामानवाचे
बलिदानामुळे या वीरांच्या, हे अस्तित्व रे बहुजनांचे
ऋण मानावयाशी तयांचे, विचाराशीच त्या आचरा रे|
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा