नव्या वळणाची समस्या प्रधान कादंबरी ‘एन्काऊंटर’ आवृत्ती-३



नुकतेच चंद्रपूर येथे दि. ११ जुलै २०११ ला ‘आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन पार पडले.’ त्याच संमेलनात डॉ. प्रा. कुमुद पावडे यांच्या हस्ते मा. अड. एकनाथराव साळवे लिखित ‘एन्काऊंटर’ या कादंबरीची तिसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. या तिसऱ्या आवृत्तीमध्ये लेखकाने अधिकची बारा प्रकरणे जोडून कायदा, संविधान आणि वंचितांचे उत्थान याबाबत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत.
विज्जू नामक माडिया आदिवासी मुलाच्या कुटुंबाची ही दीर्घ कथा विज्जुच्या निवेदनानेच वाचकांसमोर उलगडत जाते. आपल्या दुःखाचे नेमके कारण कोणते? याचा शोध घेण्याची प्रेरणा विज्जुला वडिलांकडूनच लाभलेली असते....कॉलेजात शिकत असताना तो याच शोधाच्या वाटेने जात असतो! परंतु याच्या अन्यायाचा विरोध करणाऱ्या, अपप्रवृत्तीला झीडकारणाऱ्या, शोषणाविरुध्द आवाज उठविणाऱ्या वृत्तीप्रती पोलीस यंत्रणा नक्षलवाद्यांचा हस्तक म्हणून शंका घेते. पुढे तर विज्जुच्या वडिलांना खरोखरच नक्षलवाद्यांचा हस्तक ठरवल्या जाते. पण ‘मी मरेन पण खोटे बोलणार नाही.’ असे निर्धारपूर्वक पोलिसांना सांगणारा विज्जूचा ‘बा’ मध्यमवयीन आदिवासी, प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात चिरडल्या जातो. त्याची खोटी ‘एन्काऊंटर’ दाखवून पोलीस त्याचा खून करतात. रक्षणकर्त्या पोलिसाच्या या क्रूर कारवाईचा पंचनामा कोण करणार? या घटनेने विज्जुच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळतो.
यामुळे पूर्णपणे हादरलेला विज्जू या सर्व व्यवस्थेच्या, यंत्रणेच्या, परिस्थितीच्या आकलनाचा मार्ग शोधतो. तेव्हा पुढे-पुढे त्याला अनेक गोष्टी स्पष्ट होत जातात.
भामरागड तालुक्यातल्या आदिवासींचा मोठा आक्रोश..... संविधान आणि कायदेकानुची थोडी माहिती असणाऱ्या मृतकाच्या मुलाने म्हणजे विज्जुने आपल्या ‘बा’ चे मरण महाभारत सांगताना आदिवासी शोषण व दमनचक्राची कथा प्रस्तुत केलेली आहे. आदिवासी क्षेत्रात नक्षलवादी चळवळीने मुळ धरले. नक्षलबंदोबस्तात साऱ्याच आदिवासींना नक्षलवादी समजून पोलीस बेदरकार वागत असतील तर आदिवासींनी काय करावे? हा प्रश्न विचाराणार्यांचे हे केवळ अरण्यरुदन नाही, त्यांचा वांझोटा विद्रोह नाही. इथे आदिवासींच्या मुळ सांस्कृतिक मानवी मूल्यांना लेखकाने स्पर्श केलेला आहे. त्याच्या व्याकुळ आईचे व बलदंड भावाचे चित्रण हृदयस्पर्शी आहे पण त्यांची तरुण बहिण आपला बचाव व्हावा म्हणून आणि आपल्या कुटुंबियांवर पुनः नवे संकट ओढवू नये म्हणून वनाची वाट धरते. हिंसा, अहिंसा, सनदशीर मार्ग आणि आदिवासींचे उघड कायदेशीर ‘शोषण’ या सर्व प्रकारांना लेखकाने अहिंसक कत्तलखाण्याची उपमा दिलेली आहे. देशाच्या केंद्रीय शहरांच्या विकासासाठी स्थानिकाच्या पायाभूत संसाधनाची लुट होत असेल तर आदिवासींनी कोठे जावे, कसे जगावे? हा प्रश्न सनदशीर मार्गाने सोडवितांना आदिवासींच्या सनदशीर प्रयत्नांना सरकार जो प्रतिसाद देते तो प्रतिसाद खरे तर कोर्ट कायदा पोलीस आणि तुरांगाच्या सभ्य वागण्यावर प्रकाश टाकणारा आहे.
      एका व्यापक प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा लेखकाचा प्रयत्न सांप्रत मराठी वाड्मयाला नवे वळण देणारा आहे. आज काव्यक्षेत्र फारच तेजाळत आहे. आदिवासी कवींनीही यात आघाडी घेतलेली आहे. स्व. कवी भुजंग मेश्राम लिहितात....

निरागस झाडं कधीच करीत नाहीत दर्शनी विरोध
मृत्यू मुठीत घेऊनच ती येतात जन्माला
ती जगतात कटाई नंतरही हजारो वर्षे....
बहुधा बुद्ध अथवा गालिब सारखीच!

‘निरागस झाडांच्या या मूक आक्रोशाला कादंबरीतून अभिव्यक्त करतांना लेखकानी कादंबरी आतिशय मर्मस्पर्शी केलेली आहे. ती केवळ कादंबरी नसून एक सवाल आहे. समस्त पिडीत आदिवासींच्या वतीने विचारलेला.....!
वास्तव घटनेवर आधारित ही कादंबरी वाचत असताना एक-एक घटना घडत जाते तेव्हा मन विद्रोही बनत जाते. निर्दोषीतांवर अत्यंत निर्घुण अत्याचार होताना मानवतेची गळचेपी करणारी ही यंत्रणा उखडून टाकावी, असे वाटल्यावाचून राहत नाही. ती वाचताना वाटणे हेच या कादंबरीचे खरे यश आहे.
आदिवासींच्या वास्तव जीवनाची ओळख करून घेण्यासाठी तरी ‘एनकाऊंटर’ ही कादंबरी सर्व संवेदनशील वाचकांनी वाचावी, अशी जाहीर विनंती करावीशी वाटते!
‘‘‘एन्काऊंटर’ या दीर्घ कथेची समिक्षा मराठी समीक्षक निश्चितच करतील....’’ मा. रावसाहेब कसबे याच कादंबरीच्या प्रस्तावनेत असा विश्वास व्यक्त करतात. तो निश्चितच खरा ठरणारा आहे.


-मनोज बोबडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हे असं आहे तर...

प्रबोधन गीत

शस्त्रक्रिया