फुलांचे वाडेपाहुनिया फुल
जणू पडे भूल
जास्वंदी झाडाच्या
कानाचे डुल

हळदीचा सडा
सूर्याच्या गावी
दात फुलांचे
मोगरा दावी

चादर पानाची
करून छान
कमळ त्यावर
कमवी मान

गुलाब राजाचा
दिवाणी ताठा
निशिगंधाशी
दिमाख मोठा

जाई-जुई तर
जुळ्या बहिणी
एकीला बोलवा
दुसरी उणी

चमेलीचे मोठे
गंधाळ गीत
सदाफुलीची
हजेरी नीत

अबोलीचा वास
अबोल सदा
बायका तरीही
तिच्यावर फिदा

असे हे, तसे हे
फुलांचे वाडे
जगण्याचे देई
साऱ्यास धडे

-मनोज बोबडे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऐक जरा साजणे...

तुझ्यामुळे

सांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्तर येतो”