पश्चाताप?


सुमे, आकारे तुले पाहाले पावने आले, लवकर ये, झालं नाय का खेलनं-बिलनं?

सुमीच्या मायनं अशीच हाक मारली होती. जेव्हा तिला बघायला पाहुणे आले होते. सुमीनं नुकताच चवदाव्या वर्षातून पंधराव्यात प्रवेश केला होता. त्या देखण्या, मित् भाषी, शांत सुमीला लग्न म्हणजे ढोल, ताशे, सनईच्या तालावर नाचणे आणि लोकांच्या प्रचंड उपस्थितीत पंच पक्क्वन्नाचा सोहळा पार पडणे व नवऱ्यासोबत सासरी जाणे यापलीकडे दूरपर्यंत थांग पत्ता नव्हता. ती अल्लड किशोरवयीन पोर आई बाबांच्या म्हणण्यानुसार लग्न बेडीत अडकणार होती.
       पोरगं पाहाले बेस हाये, धा एकर वावराचा मालक हाये आन् लाथ मारल तेथं पानी काढायची त्याच्यामंदी धमकही हाये, आमच्या सुमीचा आन् पोराचा जोडा संभू पार्वती सारखा सोभून दिसते.
आई बाबांची पोराच्या पसंती विषयीची चर्चा सुमी चोरून ऐकत होती. आपले लग्न होणार या विचाराने सुमीच्या मनात आनंद संचारला होता. सुमी गोल गिरकी घेत बाहेर नाचत पळत सुटली.
       २४ मार्च १९८८ रोजी सुमीचे चार हात झाले. आता सुमी दिवाकरची अर्धांगीनी झाली होती. होतकरू, नव्या-नव्या युक्तीने पैसा कमविण्यास धडपडणारा दिवाकर आपले गाव सोडून सासरच्या शेजारील मोठ्या गावात राहण्यासाठी गेला. त्याची योजना होती. तेथे चित्रफीत, ध्वनीफीत याचे दुकान थाटण्याची! ती त्याने अमलात आणली. शेती करून, देहास कष्ट देऊन हाती काहीच लागत नाही. याचा दरेक वर्षी अनुभव घेतलेला दिवाकर प्रचंड हुंडा हाती आल्यावर शेती थोडीच करणार होता? त्याने शेती भावाच्या स्वाधीन करून यशस्वीरित्या दुकान थाटले. या चित्रफितीच्या, ध्वनीफितीच्या दुकानासवे सहाय्यक मिळकत व्हावी म्हणून छोटेखाणी हॉटेलही सूरु  केला.
दिवाकरची युक्ती प्रगतीचा हात धरून बांबूच्या झाडाच्या वाढीचं अनुसरण करत होती. ‘मागणी तसा पुरवठा’ करण्याची अक्कल आणि धंद्याला हाताळण्याची शक्कल दिवाकरच्या चागलीच मनी-मानसी भिनत होती. आर्थिक दृष्ट्या संपन्नता मिळवीत असलेला दिवकारचा संसार, सुखमय झाला होता. ह्या सुखी कुटुंबात सुमीने एका गोंडस मुलीस जन्म दिला. तिच्या जन्माने झालेला आनंद व्यक्त व्हावा म्हणून तिचे नाव हर्षाली ठेवण्यात आले. सर्व गावासाठी कोऱ्या पाटीवर धडा लिहून काढावा, तसं दिवाकरचं जग निर्माणकरून सुखी संपन्न झालेलं कुटूंब खूप मोठं उदाहरण ठरलं. अशी मोठ्या कौतुकानं लोकं चर्चा करतांना सुमी ऐकायची....!

......तुझ्या मायेनं तुला शिकवलं असतं तर माझी अशी अवस्था झाली नसती..... हे वाक्य कानी पडताच सुमीची ज्यावर नजर खिळली होती तो भिंतीवरील काळाकुट्ट डाग सारे काही गिळंकृत करणाऱ्या कृष्ण विवरात बदलल्याचा तिला भास झाला.

दिवाकरच्या तोंडून कसलाही शब्द बाहेर पडला तरी सुमीच्या अंगाचा थरकाप उडतो. आताही दिवाकर जर्जर होऊन खाटेला खिळला असतांना सुद्धा दिवाकरचे बोल ऐकून सुमी दचकलीच!

तुमच्या या अवस्थेला माझ्या आईची शिकवण जबाबदार कशी? सुमी मोठ्या हिमतीने म्हणाली
.....डॉ. म्हणतात हा रोग शारेरिक संबंधातून होतो आणि तू माझी बायको आहेस मग ही बिमारी तुझ्यात होती तेव्हाच मला लागलीय ना? सुमीसह शेजारी बसलेल्या त्याच्या आई वडिलांनी दिवाकरचे हे बोलणे ऐकले.
सून म्हणून घरी आल्यापासूनच सुमीला पाण्यात पाहणाऱ्या दिवाकरच्या आई-वडिलास सुमीप्रतीचा तिरस्कार विकोपाला जाण्यासाठी दिवाकरचे हे आरोप पुनः कारणीभूत ठरले. पण या घडीला त्यांनी सुमीला ताडन करण्यापासून स्वतःला आवर घातला, कारण या दिवसात तिला मारून मटकुन परवडणारे नव्हते. दिवाकरची प्रकृती एक महिन्यापासून प्रचंड खालावलेली होती. तो पूर्णपणे खाटेच्या अधीन झाला होता. त्याची देखभाल सुमीशिवाय दुसरे कोणं करणार होते. दिवाकरच्या आई-वडिलास तर बिमार माणसास हात लावण्यासही किळस वाटायची. मग ती व्यक्ती मुलगाही का असेना....! दिवाकर हा महाभयंकर बिमारीने ग्रस्त होता. त्याला एड्स झाला होता.
सुमी या बिमारी पासून बरीच अनभिज्ञ होती. या बिमारीचे नाव, ही कशाने होते, हिचा उपचार होतो कि नाही??? काही काही माहिती नसणारी सुमी दिवाकरने केलेला आरोप मुकाट्याने मान्य करीत होती.... ही जर बिमारी सुमीकडून दिवाकरला मिळाली असती तर त्याच्या आधी सुमी बिमारीने पिडीत झाली असती. याचा कसलाही विचार न करता भाबडी सुमी मनोमन आईला कोसत होती.
      
‘आईनं आपल्याला कोणती शिकवण दिली नाही, म्हणून आपल्या वाट्याला हे भोगणं आलंय? आईनं न  दिलेल्या कोणत्या शिकवणीमुळे, आपल्या हातून कोणती चुक घडली ज्यामुळे यांच्या वाट्याला या प्राणांतिक वेदना आल्या, एवढे दुःख आले? डॉ. म्हणाले दोनेक महिन्यात ह्यांचा मृत्यू अटळ आहे. जावयानं मरणाच्या खाईत जावं एवढी चुक आईनं का केली असावी? आपल्याला ती शिकवण तिनी का दिली नसेल?
      
सुमीनं या विचाराने अस्वस्थ होण्याचे कारण होते तिला दिवाकरची अवस्था पाहवत नव्हती, हे! दिवाकर शरीराने क्षीण, दीन, हीन बनत, सडत मृत्यूच्या दिशेने वाटचाल करीत होता. त्याला मृत्यू येईल याचे सुमीला मुळीच दुःख नव्हते. त्याला होणाऱ्या प्रचंड यातनांमुळे ती कमालीची कष्टी होती. संपूर्ण वैवाहिक आयुष्यामध्ये कसलेच सुख न देणाऱ्या दिवाकरप्रती सुमीला सहानुभूती वाटत होती. तिचे मन त्याच्यासाठी अतिशय चिंतीत झाले होते. या वेदनेतून त्याची सुटका व्हावी. म्हणून त्याला मृत्यू यावा अशी ती देवाला प्रार्थना करीत होती....
       दिवाकर खाटेला खिळून दोन महिने होऊन गेले आता डॉक्टरच्या म्हणण्यानुसार दिवाकरचे एकच महिन्याचे आयुष्य शिल्लक राहिले होते.....

‘जिला आपण लग्न झाल्यापासून छळत आलो, धुतकारत आलो ती सुमी आपली किती जिवापाड काळजी घेतेय.... स्थिर नजरेने सुमीला घुरणाऱ्या डोळ्यातून अश्रू गळत असताना दिवाकरच्या डोक्यात ह्या विचाराने परवानगी न घेता अकस्मात प्रवेश केला.
      
.....माणूस हा कितीही संवेदनाहीन, मतलबी, वर्चस्ववादी, घमेंडी, असला तरी त्याचे मन बरेचदा कुणावर अन्याय करू नकोस, प्रेमाने वाग असे त्याला आवाहन करतच असते परंतु आपल्या प्रौढीसाठी, स्वार्थासाठी या आवाहनास तो सतत धुडकावून लावत असतो........ दिवाकर हा यापैकीच एक पण याक्षणी त्याच्या मनाने त्याला केलेल्या आवाहनास तो उडवून लावणार नव्हता, हे सुमीचे रोज-रोज त्याच्या प्रत्येक हालचालीसाठी झटणे पाहून तो अंतर्मुख होत होता, आता त्याची अवस्था, त्याची विवशता त्याला शहाणी करत होती.....

आपली चुक दिसू नये म्हणून आपण आपल्या बिमारीचे सगळे आरोप सुमीवर करत आलो. आपल्या संसारायुष्यात जेव्हा केव्हा आपण अडचणीत आलो तेव्हा तेव्हा आपण आपला सगळा राग, सगळा रोष सुमीवरच काढला..... का? का?.....ती एक साधी, भोळी, निरागस मनाची, नवऱ्याचा परमेश्वर म्हणून आदर करणारी होती म्हणून? की आपण तिच्यावर कितीही आत्याचार केला तरी ती प्रतिकार करणार नव्हती म्हणून?...
कारणे दोनही होती. आपण हिची ही कमजोरी पहिल्याच दिवशी हेरली होती. जेव्ही ती आपली बायको बनून आली होती. आणि आपण तिच्या मनात ‘नवरा म्हणजे अत्याचारी प्राणी’ अशीच प्रतिमा बनवत आलो. आताही आपली घमेंड एवढी पराकोटीची, की हे आपण मरणाच्या दारात उभे असूनही प्रामाणिकपणे आपल्या कर्माची-नाही अक्षम्य अशा दुष्कर्माची कबुली देऊ शकत नाही.
मरताक्षणी सुद्धा सुमीला अपार दुःखाच्या खाईत लोटून...तिलाही आता या जवळपासच्या काळात मरण येईल अशी व्यवस्था करून आपण न जाणता घडलेल्या आपल्या या दुष्कृत्यामुळे तिच्या वाटयला हे भोगणे बहाल करून चाललोय!
       आपण तेव्हा एवढे अय्याश का झालो? त्याक्षणी आपण त्या सुखाला एवढे का हपापलो? या सुखात रमणे ही काही आपली पहिलीच खेप नव्हती. त्याही पूर्वी हे सुख आपण बरेचदा भोगले आहे. जेव्हा-जेव्हा आपण मुंबईला गेलो तेव्हा-तेव्हा हा प्रकार अगत्याने घडलेलाच आहे....
आपण दुकानात अश्लील चित्रफीत बाळगल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या खटल्यासंदर्भात-चार वर्षे होत आहेत-दरवर्षी आपल्याला मुंबईला जावे लागणे, त्यासाठी दर खेपेस चार-सहा दिवस तेथे राहावे लागणे आणि यादरम्यान सुखाभिलासी मनास सारी अनुकुलता लाभणे....या साऱ्यांचा आपल्या लालसी मनाने नेहमीच आय्याशीला पूर्ण करण्यासाठी फायदा करून घेतला आहे.
       .....आपण हे सारे जेव्हा आपले जेष्ठ, घनिष्ठ मित्र नामदेवजींना सांगितले, तेव्हा त्यांनी दोन-चार कानशिलात लगावल्या होत्या....म्हणाले, ‘तू माझा मुलगा असतास तर तुला जीवनीशीच मारले असते!’
       ....पूर्वीपासून आपल्याला असं दाटणारं कुणीच नव्हतं का? नामदेवजी आपल्या चुकीच्या वागण्यावर नेहमीच आक्षेप घ्यायचे....पण...      
भाजून तयार झालेल्या मडक्यास परत आकार कसा देता येणार? आपल्या बाबतीतली ही मर्यादा संपलेली आहे....आता मरणाच्या दारात आपण तो विचार का करतोय?....सुमीची चिंता वाटते म्हणून?....पंधरा वर्षे आपण तिला सतत छेडत राहिलो तरी ती आपली सुश्रुषा करत आहे म्हणून?....की आपल्याला आपल्या चुकीची जाणीव झाली म्हणून?
       आयुष्यात कधी आपल्याला असले प्रश्न पडले नाही...आणि आता मात्र हे प्रश्न आपल्या शरीराचा कणनकण हालवून सोडताहे, असं का व्हावं?!
      
महिन्याभरापासून सतत हे विचार दिवकरचा मेंदू बधीर करत आले. आजही पहाटेचे चार वाजले तरी दिवाकर अस्वस्थ होता, रडत होता. याच अवस्थेत तो कधी झोपी गेला, त्याचे त्यालाच कळले नाही.
       आता ते त्याला कधीच कळणार नव्हते, हे विचारही त्याच्या मनात येणार नव्हते, तो चीरनिद्रेच्या स्वाधीन झाला होता.

डॉक्टरांनी ‘रिपोर्ट’ हातात दिला तेव्हा सुमीला तिच्या आयुष्याची मर्यादा कळून चुकली होती....या बाबीचा तिच्यावर यत्किंचीतही असर झाला नाही....हा धक्का तिनी पंधरा दिवसापूर्वीच दिवाकरच्या मृत्युनंतर आठ दिवसांनीच सहन केला होता.
नामदेवजींनी दिवाकरची सगळी लक्षणे, सगळे प्रताप सुमीला सांगितले. ते ऐकताना तिच्या पायाखालची वाळू, डोक्यावरचे आकाश, सभोवतालच्या दिशा सारं-सारं गळून पडत होतं. ती दगड बनली होती.

....आपण जेव्हा दिवाकरशी लग्न केलं तेव्हाच आपलं आयुष्य हे आपलं राहिलं नव्हतं. लग्नाच्या क्षणापासून आजवर आपण एक क्षण तरी खरोखर जगलो का? आपले आयुष्य हे काही निमिषान्साठी सुद्धा जीवन होऊ शकले नाही. कळीतून फुल बनू पाहताच आपण खुळल्या गेलो. तेव्हापासून आपण निर्माल्यवतच जगत आहोत.....आता संपूही तर सडलेल्या निर्माल्य अवस्थेतच! ही अवस्था येईतोवर आपण हे सारे सहन केले, ते फक्त आपल्या आई-बाबांसाठी, आपल्या कुटुंबासाठी!

स्त्रीची हीच तर खरी महानता आहे. आपल्या अब्रूसाठी, आपल्या माणसांची पत जपण्यासाठी ती आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यास सदाच तत्पर असते!
......दिवाकर मरताना सुद्धा आपल्याशी एवढ्या क्रुरतेने वागला. स्वतःच्या दोषाचे खापर त्याने आपल्या आईवर फोडले.....दिवाकर गेला. आपण त्याच्या जाचातून, त्रासातून मुक्त झालो, आता आपण सुखी होऊ असे म्हणायला कुठलीच जागा नाही.....काळाच्या काही अंतरावरच दिवाकरनी आपल्यासाठी मृत्यूची व्यवस्था करून ठेवली आहे.
आपल्या सासरच्या मंडळींनी आपल्याला मुलीसह बाहेर काढून दिले. पंधरा दिवसापासून आपण वेदनेची प्रचंड अशी सल घेऊन माहेरी आई-बाबंच्याकडे राहतो आहोत. परवा ‘ह्याही अवस्थेत दुसर्याला त्रास देत तुला कसे जगावे वाटते?’ आपल्या माहेरच्याच मंडळीतील व्यक्तीच्या तोंडून हे वाक्य कानी पडले, तेव्हापासून आपली ही तीव्रत्तेने सलणारी जखम भळभळून वाहू लागली आहे. मृत्यु हाच आता आपला जीवलग उरलाय!

आपल्या आयुष्याचे सर्वस्व अर्पण करताना प्रेमाशिवाय कसलेच स्वार्थ न् बाळगणारी सुमी, मृत्यूला आपला जीवलग मानत होती. सासरकडील मंडळींनी तर कधीच तिची गय केली नाही पण आपली असणारी माहेरची माणसे सुद्धा सुमीला तिरस्काराच्या खाईत लोटत असतील तर तिला मृत्यूशी सख्य जुळण्यात अस्वाभाविक काहीच नाही. सासरून बाहेर काढल्यामुळे शेवटचा आधार म्हणून ती माहेरी आली होती पण इकडेही कोण होता तिचा? काय आले तिच्या वाट्याला?......तिचा होता फक्त मृत्यू- या विकराल बिमारीच्या, वेदनेच्या, आपले-परकेपणाच्या, सुख-दुःखाच्या रगाड्यातून निवृत्त करणारा! मुक्त करणारा!!

मनोज बोबडे 



                              




टिप्पण्या

  1. वास्तववादी चित्रण, हे सर्व अवतालभवतालच्या प्रत्यक्ष सापेक्ष निरीक्षणातूनच साध्य होऊ शकते.,सर्वांनी बोध घेऊन अनयकर्ण करण्यासारखा विषयलेखन

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हे असं आहे तर...

प्रबोधन गीत

शस्त्रक्रिया