मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

आई आणि बाळ

लाडीक लाडीक बाळ हासती
हर्षित आई मनी खास ती
पाहून म्हणती राजा हा
गोड सानुला माझा हा!

रम्य खेळणे हाती घेणे
हलवून झुलवून फेकून देणे
मस्तीत रमती राजा हा
गोड सानुला माझा हा!

टकमक बघती नैन टीमुकले
फुरफुर करती ओठ चिमुकले
खेळ कैक करी राजा हा
गोड सानुला माझा हा

रंग सावळा सुंदर सुंदर
चोर भामटा बडा बिलंदर
जणू विदुषक राजा हा
गोड सानुला माझा हा


रडतची बघता गोड फुले
ओठांवरती हास्य झुले
फुलच होतो राजा हा
गोड सानुला माझा हा


मनोज बोबडे 

शनिवार, ७ जानेवारी, २०१२

माशी


रडू नको गीडू नको
बाई तू अशी
अग् तुझ्या नाकावर
बसली माशी

रडशील तर ती
चावेल तुला
थांब तशीच अग्
पकडू तिला

माशी मारायला मी
मुठ बांधली
बुक्की मारता ती माशी
उडून गेली

हाताची या बुक्की तुला
फार लागली
नाकातली अळी धाऊन
बाहेर आली

आणि अळी सर्रकन
ओढवली आत
दिसू नये म्हणून नाकी
ठेवला तू हात

झाली बघ बाळा अशी
माशीची या मात
अन् दिसू लागे तुझे
पांढरे ते दात

मनोज बोबडे  

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

पाऊलखुणा

माझ्या वेशितले ढग
जाम पळवितो वारा
तुझ्या गावात ग सखे
आज पावसाच्या धारा

गार पावसाच्या सरी
तुझ्या गावात पडती
गंध मातीतले वास
अश्रू आमचे ढाळती

सुक्या ढेकुळात जीव
आज कोंडून मरती
शिवारात गावकूस
तुझ्या जळात झुरती

तुझ्या वागण्याची रीत
शुभ पाउलाच्या खुणा
आज कळेल आम्हाला
जेव्हा पेटेल वणवा

आता रंग आभाळाचे
माझ्या नयनात दाटे
तुझ्या नसण्याचे नभ
माझ्या डोळ्यात ओथंबे

माझ्या संचितात रित्या
कोण कोरेल अक्षर
गाववेशीत शोधतो
ओल्या पावसाची सर्

किशोर कवठे 

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

चालतो वाट तो मी...

असा स्थिरतेने गडे राहतो मी
परी चालतो चालतो वाट तो मी

मला नाव सांगू नको तू उन्हाचे
गडे सावलीला पुरा जाणतो मी

तुम्ही देवतांना पूजा सर्वकाळी
सदा माणसांच्या तळी नांदतो मी

तसे पिळताना तुम्हा खंत नव्हती
इथे काळजाना सकळ सांधतो मी

मिळव तू परीने तुझ्या झेपते ते
सये कुवतीने शिधा रांधतो मी

पुरुष मी म्हणुनी कसा गर्व राखू
करी बळ तुझ्याही असे मानतो मी

कशाला कुणाशी फुका दोष द्यावा
परी शोषकांचा पिळीन कान तो मी

मनोज बोबडे 

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

तुझ्यामुळे


बाबा तुझ्यामुळे हे धन्य इमान झाले
तुझ्यामुळेच 'मानी' हे वर्तमान झाले

वर्जू कुणास आता हृदयी कुणास घेऊ
बालिश प्रश्न सारे माझे गुमान झाले

तरवार विवेकवादी तुझी अम्हा मिळाली
हाताळता तीयेशि पिळणे किमान झाले

मानव प्रेम आता परमोच्च मानतो मी
ते भेदभाव सारे कास्पटा  समान झाले

आम्हा थिटीच होती ती वितभर दुनिया
आता हे मालकीचे बघ आसमान झाले

मनोज बोबडे (व्हीलचेअर मधून)

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

पूजापाठ


पूजेच्या निमित्ते| बदाम खारका|
मागतो सारखा| पुजारी तो||

अनाजाने थैली| भरुनिया घट्ट|
दक्षिणाही लठ्ठ| हवी त्याला||

पुजेला सफल| करण्यास चट|
हवाच तो भट| वादे सदा||

प्राबल्य राखण्या| माहात्म्य सांगती|
स्थान ते ठेवती| आरक्षित||

दुःखी, भयग्रस्त| जनतेस भोळ्या|
सांगून कागाड्या| लुबाडती||

आपल्या विवेका| विचारावे सत्य|
किती अशा तथ्य| प्रकारात||

गाडगेबाबा ते| म्हणे या नादात|
फुका या फंदात| पडू नका||

मनोज बोबडे (‘व्हीलचेअर’मधून)

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

विचारधन २


धर्म

...धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का? देशाला संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय गाठण्यावर धर्माचा काही परिणाम होत नाही. आजकाल संपूर्ण स्वातंत्र्याचे उपासक असलेले सदगृहस्थ धर्माला बौद्धिक गुलामी म्हणतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे. मानव मात्र काहीच नाही, केवळ मातीची कठपुतळी आहे. असे मुलांना सतत सांगणे म्हणजे मुलांना कायम स्वरूपी कमकुवत बनविणे होय. त्यांची मानसिक शक्ती आणि त्यांचा आत्मविश्वासच कमकुवत बनविणे आहे.....

                                (शहीद भगत सिंह समग्र वाड्मय. पृ. २०७)


आत्म्याचे अमरत्व

...अमरात्वावर ज्यांचा विश्वास आहे असा एखादा माणूस जर तुम्हाला भेटला तर मग तुमची कोणतीच इच्छा अपुरी राहणार नाही. हे नक्की समजा, की तुम्ही त्याच्या सर्वच वस्तू घेऊ शकता-अगदी तुम्हाला वाटले तर तुम्ही जिवंतपणी त्याची कातडीही सोलून घेऊ शकता. आणि तो ती तुम्हाला देण्यास आनंदाने तयार होईल....

                                 (अप्टन सिंक्लेयर ४०३ सी. जी.)

ईश्वर

...परमेश्वराने हे दुःखाने भरलेले जग का निर्माण केले? केवळ तमाशा बघण्यासाठी? असे असेल तर मग तो क्रूर सम्राट निरोपेक्षाही भयंकर जुलमी आहे. हा काय त्याचा चमत्कार असावा? पण असल्या चमत्कारी ईश्वराची गरज काय आहे?.....स्वार्थी लोकांनी, भांडवलदारांनी धर्माला नेहमीच स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वापरून घेतले आहे. इतिहास याला साक्ष आहे. ‘धीर धरा!’ आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा! असे सांगणाऱ्या तत्वज्ञानाने ज्या यातना दिल्या आहेत, ते सर्वच जण जाणतात.
      लोक म्हणतात, की परमेश्वराचे अस्तित्वच जर नाकारले तर काय होईल? जगात पापे वाढतील, अंधाधुंदी माजेल परंतु अराज्यवादी म्हणतात, की त्यावेळी माणूस स्वतःच एवढा उत्तुंग झालेला असेल, की स्वर्गाची लालूच व नरकाचे भय न दाखवताही तो दुष्कृत्यापासून दूर राहिल. आणि प्रामाणिकपणाने कार्य करेल! तो एकदा स्वतंत्र झाला, तर त्याचे जीवन फारच उन्नत होईल....

                             (शहीद भागत सिंह समग्र वाड्मय. पृ. २४४-२५६)

मिथके

...सत्ये दोन प्रकारची असतात, अशी माझी भूमिका आहे. एक सत्य विज्ञान, इतिहास वगैरेंच्या कसोटीवर घासून पाहायचे असते, त्याची तार्किक चिकित्सा करायची असते. याउलट एक सत्य तर्काच्या कसोटीवर पाहायचे असते. त्याला भावना आणि श्रद्धा यांचे अधिष्ठान असते. केवळ वैज्ञानिक सत्य माणसाच्या सर्व गरजा भागवू शकत नाही. माणूस केवळ तर्कावर जगणारा प्राणी नाही. त्याला काही वेगळ्या गोष्टींचीही आवश्यकता असते. आणि ती पूर्ण करण्याचे काम चांगली मिथके करतात....
      मिथके ही शोषण, अन्याय, अद्न्यान इ. गोष्टींचा प्रसार करीत असतील, तर ती नाकारलीच पाहिजेत. परंतु ज्या मिथकांना अशा प्रकारचा डाग लागलेला नसतो, जी उत्कट भावनात्मक आनंद देतात, मानवी मनाला उन्नत करतात ती मिथके नाकारण्याचे कारण नाही....

                          (सर्वोत्तम भूमिपुत्र: आक्षेप ले. डॉ. आ. ह. साळुंखे)









घेतलेली फारकत

  मोगर्‍याचा वास अंगोअंगी संचारला मोगर्‍याचा वास सोडला मी जेव्हा सार्‍या फुलांचा हव्यास  मुबलक सुखा घरी नुसताच वीट  दुःख सागरात भेटे आनंदाचे...