त्याग भोगीच बरवा


ह्या जगात सारंच आहे, नाही असं काहीच नाही. तरी माणूस साऱ्याच गोष्टींचा अंगीकार करून जगू शकत नाही. त्याला जेवढ्या गोष्टींची गरज आहे तेवढ्याच अंगीकारून तो आनंदाने नांदू शकतो. आणि शक्याशक्यतेच्या दृष्टीने बघता हाच न्याय आहे. फक्त दोनच गोष्टींनी साकारलेलं हे जग ...यात कोणत्या एकाशी सलगी केली की दुसऱ्याशी विलग व्हावेच लागते.
      तसे दोन्हीन्च्यामध्ये राहून स्वर्णमध्य साधत माणूस आपले जगणे सुकर करू शकतो. परंतु त्यात दुटप्पीपणाचा आरोप भाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपल्या बुद्धीच्या, मनाच्या, विचाराच्या अनुरूप असणाऱ्या गोष्टींचा स्वीकार न्यायाचा ठरतो.
      निक्या सत्वामध्ये मोडणाऱ्या, स्वतःला स्वास्थ्यकारक ठरणाऱ्या, मनाची घुसमट न करणाऱ्या बाकी फोलपट, अप्रिय वजा केल्या जाणाऱ्या बाबी अनुकरणीय ठरायला हव्यात! मानवतेला उजागर करणाऱ्या नीतीमूल्यांचे समर्थन करणे केव्हाही सत्कार्यच ठरू शकते, कोण्या सीमित व्यवस्थेला, वर्तुळप्रीय भावनेला, स्वश्रेष्ट-परदुष्टपणाच्या विचाराला थारा देणाऱ्या मानसिकतेला ‘विकृती’ हीच संज्ञा योग्य म्हणायला हवी.
      जीव हा कोणताच अकर्मी असू शकत अनाही. त्याला गरज आणि आवड असल्याने त्याच्यामध्ये भोगाची लालसा ही जन्मताच भेट रूपानं लाभलेली असते. म्हणून प्रत्येक जण येथे उपभोग घेण्यासाठी धडपडत असतो. मग तो त्यागीपाणाचा आव आणून का असेना-धडपडणे हे असतेच! परंतु भोगाची अतिशयोक्ती माणसाला माणूसपणापासून दूर लोटत असते. आणि तो मर्यादेतील जीवनाचा सुंदर आस्वाद गमावून बसतो! भोगीवृत्तीमुळे तो रोगी झाल्याचे प्रत्ययास येते.
      जीवनाचा भोग, आस्वाद, आनंद घेणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्यच आहे, त्याचा तो हक्क आहे. फक्त हे घेताना त्याला ताळतंत्र जपता यावं, ही अट आहे. अन्यथा वहावणेच आहे. भोक्तेपणात द्रष्टेपणा असणाऱ्याकडे जीवन जगण्याची कला आहे असे म्हणता येते. त्याच्याकडे आनंद आहे, हर्ष आहे, सुख आहे, आशा आहे, उमेद आहे, प्रेम आहे, ललक आहे एकंदरीत त्याच्याकडे सौंदर्य आहे.
      संत तुकोबारायांच्या ह्या अभंग ओळी तसल्याच सुंदरपणाची जाणीव करून देतात...

            भोग द्यावे देवा| त्याग भोगीच बरवा||
            वन्चकाशी दोष| तुका म्हणे मिथ्या सोस||
     
म्हणून त्याग आणि भोग हे दोनही परस्परांशी घट्ट नाते सांगणारे आहे. त्याग कोण करू शकतो? जो भोग घेत असतो तो! आणि त्याग केला की त्याची भोगाची लालसा बळावते! त्याग आणि भोग यांची अतिशयता बरी नाही यावर भाष्य करणारी ही चारोळी वास्तविकता मांडणारी आहे....

            भोगाशिवाय त्याग नाही
            त्यागाशिवाय भोग नाही
            दोहोतही टोकाने वागण्याइतका
            जगात अन्य रोग नाही....


मनोज बोबडे




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रबोधन गीत

ऐक जरा साजणे...

हे असं आहे तर...