प्रकृतीची करणी

कार्य येथे घडते ते कारणांच्यामुळे
वाढे झाड, घेत उन्ह, पाणी पीत मुळे
संयोगाने नवल ते उदयास येते
शब्दलयासवे गोड गाणे जन्म घेते
सृष्टी हीच सर्वार्थाने सकाळाशी छान
प्रकृतीची करणी ती असते महान||


सफलता लाभते ती नियोजनातून
कधी यश धावुनी ये नेणीवेमधून
जीवनाचे सुख सारे धडपडीमध्ये
विश्वासाने कृती करा रसना ती वदे
कधि नच वास्तवाचे विसरावे भान
प्रकृतीची करणी ती असते महान||


'कोण देते?' खरे तर सवाल हा खुळा
अन्याहून संवेदेने जगतो आंधळा
रीत हीच चालताना क्रमते ही वाट
क्षमतेच्या बळावर जगण्याचा थाट
अगनीचे धूर हेच ठरे अनुमान
प्रकृतीची करणी ती असते महान||


अद्भूत घडे त्यास म्हणे चमत्कार
अंधपणामुळे दिव्य ठरे हा प्रकार
फाटला तो पडदा की उघडे झापड
उंदीरच निघे तिथे खोदता पहाड
डोळसाला प्रयोग हे प्रत्यक्ष प्रमाण
प्रकृतीची करणी ती असते महान||


मनोज बोबडे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रबोधन गीत

ऐक जरा साजणे...

हे असं आहे तर...