आत्म्याचे माहात्म्य ?

प्रकृती न्याय बजावत चालली आहे. पाल भिंतीवर किड्यांच्या शोधात फिरत आहे. आत्ताच तिने किडा पकडलाय, तो एवढा मोठा आहे, की तिला अजूनपर्यंत खाता आलेला नाही. किड्याचा जीवही अजून कायम. सगळेच जगण्यासाठी धडपडतात. ती पाल किडा खाऊन जगू पाहतेय, किडा तिच्या तोंडातून सुटून जगू पाहतोय, आणि इकडे मानसीक मरगळ झटकून लिखाणाद्वारे जगण्याचा माझा प्रयत्न चाललाय. शेवटी भिंतीवरील किडा हरला, पाल जिकली. एकाचं अस्तित्व संपून दुसऱ्यात विलीन झालं.
या पालीच्या व किड्याच्या दृष्यास् बघून माझ्या मनात आत्म्यविषयीचे काही प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न प्रत्येक विवेकी मनाला विचार करायला लावणारे आहेत. वरील दृष्यामध्ये पालीनं किड्याला गिळलं मग त्या किड्याच्या आत्म्याच काय झालं? किड्याच्या देहाप्रमाणे त्याचा आत्माही त्या पालीच्या पोटात विलीन झाला आसवा का? की स्वर्गात वा नरकात गेला? की कुठे भूत बनून भटकू लागला? मान्यतेप्रमाणे परमात्म्याला प्राप्त तर झाला नसावा? धर्मग्रंध, रुढी, मान्यता तर म्हणते, आत्मा पुनर्जन्म घेतो. की तसा काही प्रकार आहे? हे आणि असे कित्त्येक तत्सम प्रश्न आत्म्या संदर्भात संभ्रम निर्माण करतात.
      हे प्रश्न खरेतर तटस्थ असतात त्यांना पडणारे आहेत. तेच खरे धर्मविषयक बाबींमध्ये चिकित्सा करण्याची, डोळसपणे, वैज्ञानिक दृष्टीने समजून घेण्याची योग्यता राखतात. पण अशा लोकांना नास्तिक ठरविले जाते, ही गोष्ट वेगळी.
श्रद्धा, भावना यामध्ये अडकलेल्या जीवांना गुरु, बाबा, महाराज, धर्मग्रंध आणि सभोवतालची परिस्थिति हे सारे संशयात्मा विनश्यति शिकवीत असतात आणि यांना आपल्या आत्म्याचा (स्वतःचा) विनाश व्हावा असे वाटत नसल्यामुळे त्यातच गुरफटून राहण्यात धन्यता मानतात कारण पाप-पुण्यच्या धारणा यांना खुळ्या तत्वापासून ढळू देत नाही. असत्यालाच सत्य मानण्याची यांना जी शिकवण दिली जाते, तिला कित्येक सुंदर प्रेममय कर्तव्याच्या, आदराच्या, भक्तीच्या, श्रद्धेच्या गोष्टींचा मुलामा लाऊन त्या या धार्मिकांपुढे धर्ममार्तन्डान्कडून प्रस्थापित केल्या जातात आणि हे भक्त अतिशय श्रद्धेने, मोठ्या भक्तीने ग्रहण करीत असतात. हे सारं तत्वज्ञान सतत मनात, मेंदूत जात असल्यामुळे दिवसेंदिवस घट्ट होत जाते, सत्य ठरत जाते. कोणत्याही गोष्टींचा त्याच अनुषंगाने विचार करण्याची सवय झालेली असल्यामुळे पुढच्या प्रवासात तोच पगडा हक्क गाजवत असतो. असो, ही धारणा जनमाणसात घट्टपणे रुजण्याचे माझ्यापरीने हे सांगितलेले कारण आहे.
      आत्म्याविषयी पुढचा विचार करतो म्हटलं तर, कित्येक शंका डोक वर काढतात की, आत्मा हा सर्व सजीवांमध्ये असतो, सुक्ष्मातिसूक्ष्म जीवापासून तर महादेहधारी जीवांपर्यंत. मग प्रश्न पडतो, एक की अनेक? साधारणतः एक असतो, असा समज आहे. आपण मानव शरीराचाच विचार करायला गेलो तर काय पुढे येते बघू!
मानवाच्या शरीरात एक आत्मा असतो. कोणत्या अवयवात? छाती, पोट, मेंदू, हात, पाय कुठे असतो? छातीत म्हणावं तर शिरच्छेद केला तरी माणूस मरतो. मेंदूत म्हणाव तर हृदयावर आघात केला तरी माणूस मरतो. मग असे असता शरीरात कोणत्या एकाच अवयवात आत्मा असतो असे कसे म्हणायचे?
      मग तो सर्व शरीरभरच असल्याची ग्वाही द्यावी लागते. आता तोही विचार करू जाता काय हाती लागते. आत्मा सर्व शरीरभर आसतो, संवेदना जाणवते ती त्वचेमुळे आणि त्वचेच्या आतही जखम झाली तरी ती जाणवते. म्हणजे ही जी जाणीव आहे, ती आत्म्यामुळे होते. म्हणजे शरीराच्या सर्व कणाकणाला चैतन्य देणारी जी शक्ती आहे तो आत्मा. म्हणून आत्मा शरीरात एकच असतो हे सिद्ध होते(?)............. आता तो आत्मा शरीरात एकच असतो ही सिद्ध झालेली गोष्ट सुद्धा पुढील प्रश्नांनी निराधार असल्याचे कळते. मानवाचं, प्राण्याचंही रक्त लाल असते, आणि ते रक्त लाल ठेवणारे सुक्ष्म असे जीवाणू त्या रक्तात असतात. ते संख्येने करोडो, अरबो असतात. पहिले आपण पाहिले, की सर्व सूक्ष्मातीसूक्ष्म सजीवांमध्ये आत्मा असतो. मग शरीरात एकच आत्मा आहे असे असताना  शरीरातील सूक्ष्म जीवाणूच्या अरबो, खरबो आत्म्याविषयी कोणताच युक्तिवाद केला जात नाही. आणि मानवाच्या मृत्यूनंतर त्याच्या रक्तातील त्या सूक्ष्म जीवांच्या आत्म्याचं काय होत असावं? याचंही उत्तर समोर येत नाही. ते सूक्ष्मजीव महादेहधारी जीवांच्या पोषणासाठी निर्माण झालेले असतात. असं जर म्हटल्या जात असेल तर प्रत्येक जीवाचा आत्मा हा स्वतंत्र असतो असे म्हणण्यास जागा राहत नाही.
      या आणि अशा प्रश्नांनी ज्यांना गोंधळात टाकले त्यांनी एकात्मवाद हा सिद्धांत स्वीकारला असावा! त्याही सिद्धान्ताचा बारकाईने विचार केला, तरी शंका ही राहतेच. एकत्मवाद म्हणजे सर्व जीवांचा एकच आत्मा. मग एखादा जीव जन्म वा मृत्यु पावतो तेव्हा त्याचा आत्म्याशी संबंध असतो की नसतो? या प्रश्नाचे काय करायचे? सर्वांचा एकच असणाऱ्या आत्म्याशी संबध असतो म्हटलं तर अत्रूप्त आत्मे मृत्योपरांत भूत बनतात, अशी जी धारणा समाजात रूढ आहे. तिचे काय? मला आत्म्याविषयीच्या ज्या प्रश्नांनी, शंकांनी गोंधळात टाकले तेच मी इथे मांडले आहे. आज सगळीकडेच आत्म्याचे महात्म्य सांगितले जात आसताना ठोस किंवा समाधानकारक उत्तर समोर येतांना दिसत नाही. आणि जे नाहीच, ते येईल तरी कसे? हा प्रश्न आता नित्त्य माझी सोबत करीत आहे.

मनोज बोबडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऐक जरा साजणे...

प्रबोधन गीत

हे असं आहे तर...