गावसूक्त: गावाशी जुळलेल्यांचा श्वासच जणू!


‘गावसुक्त’ वाचला आणि त्यावर लिहायचंच असं मनाने घेतलं. वाचल्यादिवसापासून त्यातील वैशिष्ट्य मला तसे करण्यासाठी सतत उद्युक्त करत राहिले. ते सांगायचे झाले तर या संग्रहातील प्रत्येक कडवे हे दुसऱ्याशी कडीप्रमाणे जुडलेले आहे. एक कडवे वाचले की, ते विचार करायला बाध्य करतेच. मग दुसरे मला वाच म्हणून खुणावत राहते. वाचीत जातो तसतसे मन रोमांचित होत जाते. चिंतानाधीन होत जाते. आणि आपण आपल्याच गावाच्या दुनयेत विहार करायला लागतो. हीच या ‘गावसूक्ताची’ खासियत आहे. त्यातील ओळनओळ मनस्पर्शी झाली आहे. पहिल्यापासून तर शेवटच्या ओळीपर्यंत साचेबद्ध असणारा हा ग्रंथ बाहेरून जेवढा सुंदर आहे, त्याहून कितीतरी पटीने तो आतून काव्यसौंदर्याने नटला आहे. गावाचं अस्सल आणि विदारक चित्रण करणारा तसेच मनाला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारा हा संग्रह सर्वच बाबतीत वैविध्यपूर्ण आहे. ही झाली ‘गावसूक्ताच्या’ कवितेतील काव्याची उजवेपणा. रचनेच्याही आगळेपणाविषयी आवर्जून बोलावे अशीच ती आहे.
सर पावसाची येता
लागे धरेला चाहूल
आत धडपडे मुल.
ही अष्टाक्षरी नव्हे, चारोळी पण नव्हे, अभंगही नव्हे, हायकू तर नव्हेच नव्हे. मग हा प्रकार आहे तरी कोणता? असा सवाल सूज्ञ वाचकास पडतोच. तर याचे उत्तर या सर्वांच्या पल्याड असलेला स्वतंत्र रचना शैलीचा हा प्रकार आहे. जिचा आविष्कार केला आहे ‘गावसूक्त’चे निर्माते कवी किशोर कवठे यांनी. अष्टाक्षरीचा बाज घेऊन, अभंगाचा साज घेऊन, हायकूचा आभास घेऊन जन्म पावलेली ही रचनाशैलीतील कविता काळजाचा ठाव घेत रसिकाला मोहित करते. माझ्या तरी वाचनात आलेला हा नवाच प्रकार आहे. म्हणून या तंत्र निर्मितीचं श्रेय मी किशोर कवठे यांनाच देईन.
बीज मुसंडी मारून
देई प्रसव वेदना
काळ्या मातीतला राणा
असे म्हणत किशोर कवठे यांनी माती आणि स्त्री यांच्या प्रसववेदनेचे समानपातळीवर वर्णन केले आहे. शेती-माती व स्त्री यांचे नाते जिव्हाळ्याचे असल्याचे आपण सतत अनुभवत असतो. तो अनुभव मांडणारा कवी इथे प्रतिनिधी ठरला आहे.
बीज मातीत पेरून तिला फलनशील आणि सृजनशील ठेवत मुलं-बाळे, चिमणी-पाखरे यांच्या निर्वाहाची सोय करणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था मात्र कशी असते, याचे स्पष्ट चित्रण कवींनी पुढील ओळीत केले आहे.
पाखरांच्या पोटासाठी
सई, रायबा उपाशी
पाणी घोट-घोट प्राशी
ह्या कवणाचा आशय गावासंबंधीतांना उलगडून दाखवण्याची जरुरी नाही. तो ते वास्तव जगत, भोगत आलेला नसला तरी बघत नक्कीच आलेला असतो. गावसूक्तातील अशा रचना जेव्हा आपण वाचतो तेव्हा किशोर कवठे यांच्या प्रातिभ बळाची वाचकाला प्रकर्षाने जाणीव होते.
संत इहवाद सांगे
आम्हा बोचतो उरात
देव दाटले घरात
गावातील लोकांना (इथे पुस्तकाच्या अनुषंगाने) संतांच्या जीवन समृध्द करणाऱ्या इहवादी विचारांची गरज वाटत नाही. तर त्यांना अद्भूततेची, चमत्काराची आवश्यकता वाटत असल्यामुळे नुसत्याच देवतांची देवघरात दाटी झाली असल्याचं वास्तव त्यांनी अतिशय सहज आणि सुंदर शब्दात मांडले आहे.
अंधारल्या घरोघरी
सई, रायबा नांदती
पावसाला पांघरती.
गावातील जवळपास सर्वच घरांची ही दैना. सई-रायबा यांच्या प्रातिनिधिक उल्लेखाने समोर येते.
शेतकरी कितीही नाडला गेला तरी त्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ देते ती शेतीची सृजनशक्तीच....म्हणून तो म्हणतो.
पडू मातीवर आम्ही
झेलू प्रकृतीचा गुन्हा
उभे राहू पुनःपुन्हा
पुढील ओळीत आलेलं गावाचं वर्णन म्हणा, व्याख्या म्हणा की गावाचं अस्तित्व. अस्सल मांडणी आहे, वाचकाला गावाची खरी उंची या ओळी सांगत आहेत.
गाव पृथ्वीचे स्वगत
गाव सूर्याचे स्वरूप
गाव आकाश मंडप
प्रत्येक कडव्यागणिक किशोर कवठे यांची कविता काळजात शिरत जाते. साखरेची गोडी कितीतरी काळ जिभेवर रेंगाळत राहते अगदी तशीच ही कविता मनात रुंजी घालत राहते. ह्या ‘गावसूक्तातून वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य किशोर कवठे यांनी प्रत्ययास आणून दिले आहे.
किशोर कवठे यांनी या खंडकाव्य ग्रंथास ‘गावसूक्त’ हे शीर्षक दिले आहे. ते शब्दशः असले तरी साजेसे आणि चपखल असेच आहे. कारण सुक्त म्हणजे मंत्र, श्लोक, ऋचा तत्संबंधी आशयाने श्रीमंती पावलेला संस्कृतभाषी शब्द. ह्याच मंत्र, श्लोक आदिच्या स्वरूपाने सिध्द झालेल्या रचनाशैलीतून किशोर कवठे यांनी हा गाव अभिव्यक्त केला आहे.
शेती माती जातकुळी
तुकाराम येशुदास
गाव अल्लाचा सुवास
अशा विविधतेने नटलेले हे आहे खरे गावाचे सौंदर्य. हे अनुभवायचं असेल तर आपल्याला हा ग्रंथ वाचावा लागेल. हा ग्रंथ वाचताना डॉ. किशोर सानपांची प्रस्तावना अवश्य वाचावी. ती किशोर कवठे उलगडायला आणि त्यांचे गाव कळायला आपल्याला मदत करते. आपण सर्वच गावाशी नाड जुळलेली माणसे आहोत. आणि गावातील सुख-दुख, व्यथा वेदना, नाडल्या जाणं, भरडल्या जाणं, कष्ट, मेहनत, बेजार होणं, भांडवलशाहीमुळे गावाची दैना होणं अंती हताश होऊन मरणाधीन होणं तसेच सृजन काळ जवळ आला की, साऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मनगटाच्या भरवशावर परत नव्या उमेदीने जगण्यास उभे होणं. आणि अवघ्या जगाला सृजनाचा धडा देणं.....हेच तर गावाचं वैशिष्ट्य आहे. आणि हेच वैशिष्ट्य ह्या ग्रंथात अधोरेखित झाले आहे. हा ग्रंथ नागपूरच्या नामांकित ‘संवेदना प्रकाशनाने’ उजेडात आणला असून मुखपृष्ठ कवी तथा चित्रकार प्रमोदकुमार अणेराव यांनी साकारले आहे. मातीशी घट्ट नाते असणारे सुप्रसिध्द कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी ‘गावसुक्त’ च्या संदर्भात ‘गावसुक्त ही खरे तर आधुनिक ग्रामगीताच आहे.’ अशी शुभेच्छांच्या मार्फत कौतुकाची उत्स्फूर्त थाप दिली आहे. ती रास्त आणि ग्रंथाला पूर्णतः देणारी आहे. ह्या ग्रंथाचा सर्वांगीण विचार केला तर ते मराठी साहित्यविश्वात नक्कीच आपला स्वतंत्र ठसा उमटवेल याची मला मनापासून खात्री आहे.

- मनोज बोबडे                                                                                                                                                                                            
------------------------------------------------------------------------------------
गावसूक्त (कवितासंग्रह, खंडकाव्य)
कवी-किशोर कवठे
मो.-८९७५६५२०९४
संवेदना प्रकाशन, नागपूर
मुखपृष्ठ-प्रमोदकुमार अणेराव
र- ८०/- रु. फक्त. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हे असं आहे तर...

प्रबोधन गीत

शस्त्रक्रिया