कृपा!

रामेश्वर कालच नागपूरवरून गावाला परतला. दोन वर्षापासून करत आलेल्या कामाला कायमचा सलाम ठोकून तो घरी आला होता. चार-सहा दिवसापूर्वी घरच्यांनी त्याला कळविले होते, की ‘एका नावाजलेल्या कंपनीकडून तुला नोकरीचा 'कॉल' आला आहे.’ चार वर्षापासून ‘इंजिनियरिंगचे’ शिक्षण होऊन अंशकालीन काम करीत असलेल्या रामेश्वरला 'कॉल' आल्याचे ऐकल्यापासून आनंदाला पारावार उरला नव्हता. त्याला आता नोकरीचे वेध लागले होते. त्याला वाटत होते ‘हा कॉल येणे म्हणजे, बाबा म्हणतात तशी आपल्या गुरुचीच कृपा असावी!’ श्री शास्त्री महाराज हे रामेश्वरच्या कुटुंबियाचे गुरु. हे चलाख कुटूंब म्हणजे या शास्त्री महाराजांचे परम भक्त. यांच्या घरी कोणत्याही यशासाठी, भरभराटीसाठी कारणीभूत असते ती या महाराजांचीच कृपा! आताही 'कॉल' येणे ही त्या महाराजांचीच कृपा होती. शिववर्घन हा रामेश्वरचा जीवलग मित्र. तो या महाराजांच्या कृपेविषयी रामेश्वरला एकदा म्हणाला होता, “ रामेश्वर, तुमचे जेव्हा भले होते तेव्हा या महाराजांची कृपा असते, असे तू म्हणतोस, मग मागे एकदा तुमच्या शेतीच्या प्र...