मनातील भावनांना शब्दबद्ध करून वाट मोकळी करून देणे हा खरे तर कल्पनाविलासात
रमणाऱ्या आणि सुचलं ते मांडणाऱ्या कवींचा गुण. हल्ली कवितांचा मोठ्या प्रमाणात माय
मराठी वर भडीमार होत आहे. गल्लीबोळात कविता लिहिणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत
आहे. हे स्वागतार्ह असले तरी बोटावर मोजण्या इतकेच कवी आणि त्यांच्या कविता
आपल्याला लक्षात राहतात. कवी हा इतरांच्या तुलनेत सारखाच; परंतु प्रतिभेने मात्र निराळा असतो. जगाला मोहित करण्याचे सामर्थ्य त्याच्या
लेखणीतून झरायला लागतं. ही लेखणी विवेकवादी आणि वास्तववादाचा पुरस्कार करणारी असली
तर निश्चितच आजच्या वर्तमानाला नव तत्त्वज्ञान गवसण्याची आशा असते.
मनोज बोबडे पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरासारख्या आदिवासी बहुल
भागात वास्तव्यास असलेले एक प्रमुख कवी. शरीराने
अपंगत्व पत्करलं तरी मनाने सुदृढ असल्याची ताकद त्यांच्या कवितेत ठासून भरलेली
आहे. गोंडवाना प्रदेशाला समृद्ध करण्याचं अक्षरधन त्यांच्या सृजनात आहे. ‘वेध
अंबराचा’, ‘परिमळ’, ‘टिमटीमणाऱ्या चांदण्या’ व प्रातिनिधिक कवितासंग्रह ‘गुलमोहर’, ‘गोंडवानातील कविता’, ‘गावरानातील कविता’, ‘रानगर्भातील कविता’. ही त्यांची वेदनेला अर्थ देणारी काव्यसंपदा; परंतु कवी
अभिव्यक्त होतात ते त्यांच्या ‘व्हीलचेअर’ या जिंदगीचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या
कवितासंग्रहातून. हा कवितासंग्रह म्हणण्यापेक्षा कवीची पुरोगामी जीवनशैली म्हणणे
अधिक समर्पक होईल. कवीचं जीवन मुळातच चार
भिंतीच्या आत ‘व्हीलचेअर’वर रमलेलं आहे; परंतु जगण्याच्या कक्षा मात्र आभाळभर चांदणे
पेरणाऱ्या आहेत. त्यांची कविता वरवर किंवा कल्पनाविलासात रमणारी नाही, मनोरंजनासाठीही नाही कारण कवीला परिवर्तन हवे आहे. अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरेला फाटा देऊन
विवेकवाद आणि विज्ञानवादाचा त्यांचा डोळस विचार समाजातल्या शेवटच्या तळापर्यन्त
जायला हवा आहे. त्यासाठीच त्यांची कविता माणसाच्या अविचारी मेंदूवर शब्दांची
शस्त्रक्रिया करायला ‘व्हीलचेअर’द्वारे सज्ज आहे.
प्रख्यात विचारवंत प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे प्रस्तावनेत कवीविषयी मनोगत व्यक्त करतात. ‘मनोज बोबडे हा एक अतिशय संवेदनशील तरुण आहे. त्याची संवेदना सर्वसामान्य लोकांच्या वेदनेशी जोडलेली आहे. सर्वसामान्यांची वेदना एका मानवताविरोधी व्यवस्थेमुळे निर्माण झाली आहे. या व्यवस्थेला मानवतेचे अधिष्ठान मिळावे ही त्याची उत्कट अभिलाषा आहे आणि आपली ही अभिलाषा त्याने वारंवार परंतु संतुलितपणे या कवितासंग्रहातून व्यक्त केली आहे.’
संत तुकाराम म्हणजे कवीचा जिव्हाळ्याचा विषय. संत तुकोबांनी सुमारे चारशे
वर्षांपूर्वीच समाजाचं आजचं वास्तव अभंगाच्या गाथेतून मांडलं. श्रद्धा व
अंधश्रद्धा पटवून देताना विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन समाजासमोर ठेवला.
दलित समाजाला सामाजिक जाणीव आणि दिशा दिली म्हणूनच कवी ‘तुकारामास’ या कवितेत जणू
तुकोबांशी संवाद साधतात.
कवी मनोज बोबडे यांच्या कवितेत विशिष्ट लय आहे. नाद, भाव, आशय आणि
अभिव्यक्तीच्या अंगाने प्रभावी तरलता आहे. जगण्यातील वास्तव पाहताना कवीचं मन
बहुदा अस्वस्थ होत असावं, आपण ज्या समाजात राहतो तो समाज एकीकडे चंद्रावरती वस्ती
करायला निघालाय, तर दुसरीकडे त्याच समाजाला
विज्ञान तंत्रज्ञानाची चाहूलही लागू नये याचे कवीला आश्चर्य वाटते. राम-रहीम, ईश्वर-अल्ला यात ‘सबका मालिक एक’ शोधण्यापेक्षा अस्तित्वहीन 33 कोटी देवाधिकांचे लोकांना आकर्षण आहे. एकीकडे भुकेल्या पोटाने हंबरडा
फोडणाऱ्यांकडे कुणी लक्ष देणार नाही; मात्र देवाच्या
नावाने प्रसाद चढवायला भक्तांची चेंगराचेंगरीतही अफाट गर्दी असते. अशावेळी कवीला
गाडगेबाबांचे तत्त्वज्ञान अधिक प्रिय वाटते. ‘पूजापाठ’ या अभंगात ते सांगतात.
प्रखर सामाजिक जाणीवेने कवीचे व्यक्तिमत्व भारलेले आहे. कवीला गुलामगिरी मुळीच
मान्य नाही शोषितांविरुद्ध लढा उभारण्याचं धाडस कवी शब्दास्त्राराने करतो आहे. सद्यस्थितीत माणसाला माणसाचीच खरी भीती आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊन माणुसकी हीन कृत्य करू
शकतो याचे परिणाम मात्र समाजाला भोगावे लागतात. जातीसाठी माती खाणारी मंडळी
फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने एकत्र यावी यासाठी कवी आवाहन करतो.
या हो जरा
माणसात या !
भेदभाव तो
त्यागुन या !
परंतु माणसाला फूले, शाहू, आंबेडकर, छ. शिवाजी महाराज, बुद्धाचे तत्त्वज्ञान, सावित्री, रमाई, अहिल्या, जिजाऊ खऱ्या अर्थाने कळलेच नाहीत. आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नही
होताना दिसत नाही. परिणामी सर्वसामान्यांच्या वाट्याला जिंदगीचे भकासपण पदरी पडते.
ही खंत कवी व्यक्त करतो.
मनोज बोबडे यांच्या कवितेत एक विलक्षण झेप आहे. त्यांच्या रचनेत प्रतिमा, प्रतिकांची यथायोग्य बांधणी आहे. त्यांच्या कवितेचे विषय हे पिचलेल्या
माणसांचे, कष्टकऱ्यांचे, अन्यायाविरुद्ध बंड पुकारणाऱ्यांचे आहे. कवीला मनोमन वाटतं, की माणसानं जागृत व्हावं, हक्कासाठी लढावं, प्रत्येक गोष्टींवर स्वतंत्र विवेकवादी व विज्ञाननिष्ठ विचार करावा म्हणजे
आपली कुठेही फसगत होणार नाही आणि स्वाभिमानाने आपल्याला माणूस म्हणून जगता येईल.
हे खरं तत्त्वज्ञान कवीला या संग्रहातून वाचकांपुढे ठेवायचे आहे. कवीला
महामानवांची मते पटतात. ते आदर्श वाटतात; परंतु कवी
स्वानुभवालाही तेवढेच महत्त्व देतो म्हणूनच कवी मनापासून अभिव्यक्त होतो.
कवी भावनाविवश आहे तरी बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व देणारा आहे. म्हणूनच
त्यांच्या कविता कधी वास्तवाच्या विस्तवातून, दऱ्याखोऱ्यातून, नैसर्गिक सौंदर्यातून, मानवी प्रेमातून
कस्तुरीच्या सुगंधासारखी दरवळत असते. ‘दे लढा!’ ‘जगण्याचे युग’ ‘प्रेमाचा प्रभाव’ ‘बातमी’ ‘प्रकृतीची करणी’ ‘बंद करा चिवचिवाट!’ ‘अतिवादी म्हणे’ ‘ही धरणी’ ‘विज्ञानाच्या नावे’ ‘अशी कशी ही मक्तेदारी’ इत्यादी कविता नाविन्यता व
वेगळेपणा जपणाऱ्या असून लक्षवेधी आहेत. शिवाय कवीने गझल, मुक्तछंद, अभंग, अष्टाक्षरी हे काव्यप्रकारही अतिशय सरसपणे हाताळलेले आहेत. कवी सुधाकर गायधनी
यांनी मागील पृष्ठावर कवीविषयी फारच बोलका व अस्सल अभिप्राय
दिला आहे, ते म्हणतात. ‘व्हीलचेअर मधील अनेक कविता रसिक वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. जीवनाच्या विविध
विषयांचे आशय बोबडेंच्या कवितेत एखाद्या जलाशयासारखे समृद्ध वाटतात. कधीकधी तर
एखाद्या ‘लँडस्केप’चाच आपण आनंद घेतोय, की काय अशीही प्रचिती येते. दैनंदिनीच्या अडथळ्यांना पुरून उरत सतत कवितेत
फुलत राहणारा हा कवी, मराठी काव्य विश्वात एक
आशेचे स्थान आहे.’
संग्रहाचे शीर्षक असलेल्या ‘व्हीलचेअर’ या कवितेत मात्र कवी आशावादाने जगण्याचा संकल्प मांडतो व विद्रोही पण स्वागतार्ह भूमिका घेतो......
प्रसिद्ध चित्रकार दिवं. अरुण मोरघडे यांचे अतिशय सुरेख मुखपृष्ठ प्रस्तुत
कवितासंग्रहाला लाभलं आहे. पुस्तकाची बांधणी व मांडणी ही वत्सविनायक प्रकाशन पुणे
यांनी फारच आकर्षक केलेली आहे. कवी मनोज बोबडे यांची कविता खरेतर अखिल मानव जातीचे, विश्व कल्याणाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. आदिवासीबहुल
गोंडवाना प्रदेशाला न्याय देणारी व समृद्ध करणारी आहे. बदलत्या काळाच्या ओघात
सामाजिक परिवर्तनाची नांदी आहे. विशेषतः मूठबंध करून जगणाऱ्यांसाठी पुरोगामी
जीवनशैलीचा टाहो फोडणारी आहे. कवी मनोज बोबडे यांची उत्तरोत्तर साहित्य निर्मिती
व्हावी, यासाठी एक रसिक म्हणून माझ्या लाख लाख शुभेच्छा !
-अविनाश पोईनकर
रा-बीबी, पो-नांदा, ता-कोरपना
जिल्हा-चंद्रपूर
-४४२९१७
प्रख्यात विचारवंत प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे प्रस्तावनेत कवीविषयी मनोगत व्यक्त करतात. ‘मनोज बोबडे हा एक अतिशय संवेदनशील तरुण आहे. त्याची संवेदना सर्वसामान्य लोकांच्या वेदनेशी जोडलेली आहे. सर्वसामान्यांची वेदना एका मानवताविरोधी व्यवस्थेमुळे निर्माण झाली आहे. या व्यवस्थेला मानवतेचे अधिष्ठान मिळावे ही त्याची उत्कट अभिलाषा आहे आणि आपली ही अभिलाषा त्याने वारंवार परंतु संतुलितपणे या कवितासंग्रहातून व्यक्त केली आहे.’
आज तुक्या तू
मला प्रिय भारी वाटतो रे
ठाव आणि तू
ठिकाणा अंतरीचा गाठतो रे
पूजेच्या
निमित्ते, बदाम खारका l
मागतो सारखा, पुजारी तो ll
....गाडगे बाबा ते, म्हणे या नादात l
फूका या फंदात, पडू नका ll
मी जळावाणी
नदीच्या वाहणारा
व्यर्थ का
डबक्या परी साचू इथे ?
तूच माझे गीत
माझे काव्य तुच
कोठल्या
ग्रंथास मी वाचू इथे ?
......आता ही व्हीलचेअर
त्याने जिंदगी
म्हणून स्वीकारली आहे
तो तिचा वापर
करणार आहे म्हणे
ती बहाल
करण्यास सहाय्य करणाऱ्या
त्या
सप्तकादीकांचे पितळ उघडे पाडण्यासाठी !
निर्भयतेची, निरामयतेची, निर्भान्ततेची
सुमने त्याला
हातात बाळगता यावी म्हणून !!!
(२०१२ मध्ये अविनाश पोईनकर यांनी केलेले परीक्षण परवा हाती आले म्हणून....)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा