सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

काही श्लोक


 

                 

                             किती काळ आराधना मीहि केली

   किती रे तुझी पायरी झीजवीली

    म्हणे भक्त ते तू असे विश्वव्यापी

    तुझा अंश मी पाहिला ना कदापी

                      

    किती काळ तो साहणे द्वेष त्यांचा

   किती शब्द प्रमाण मानू तयांचा

    इथे भ्रष्ट मानव्यता ज्यांनि केली

                 कसा मान राखू अशा देवतांचा               


   कुणा हीन मानू नको सुज्ञ बा रे

  इथे सर्व कच्चे जनांचे किनारे

   कुणी आगळे नी कुणी वेगळाले

  सदा माणसे शोधताती सहारे

 

    कुणी गुंतले गुंतले या ठिकाणी

    कुणी धन्य येथे कुणी त्या ठिकाणी

     मजा वाटते हीन म्हणता कुणाला

     रूचे साम्यता ही कुणाच्या मनाला

 

-मनोज बोबडे 

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

सहज


 कविता 

मन संवेदनशील असलं की त्याची जाणीव चांगली असते म्हणूनच ते मन कुठलेही काम व्यवस्थित पार पाडत असते. कविता करणे हेही तशाच मनाचं काम आहे. माणूस कविता करायला लागला, की सर्वसाधारणपणे तो वाया गेला असं बोललं जाते. तसं ते काव्यात्मक दृष्ट्या आणि व्यावहारिक दृष्ट्याही काही अंशी खरच बोलत असतात; कारण कविता करू लागलेले सर्वच माणसे कायमचेच कवी बनून जातात असं होत नाही.


 असा एखादाच उगवतो जो पुढे श्रेष्ठ आणि जेष्ठ कवी म्हणून मान्यता पावतो. ज्याच्या कविता खरोखर मनाचा ठाव घेतात. ज्याच्या कवितेत अस्सल काव्य सापडते, जी वाचली ऐकली की आपसूकच मनातून दाद निघते...'वाह!' काव्यात्मकतेला हाडाचे रसिक नीट ओळखतात. मनोहारी सौंदर्याला खरे रसिक डोक्यावर घेतात. 

 

बहुतेक लोक कविता करतात पण तो कवी म्हणून कायम टिकत नसतो कारण कविता एक सहज गोष्ट आहे आणि आपणही करू शकतो एवढंच दाखवण्यासाठी ते कविता लिहू लागतात पण फक्त दाद मिळवण्यासाठीच लिहिली जाते ती कविता असत नाही. नागपूरचे जेष्ठ कवी नीलकांत ढोले यांचा एक शेर आहे.


गुंफूनिया शब्द काही सिद्ध का होई गजल?

ती तुम्हाला काळजाचे रक्त ताजे मागते.


काळजाचं रक्त मागणारी ही कविता एवढी क्रूर आहे का? तिच्या भाषेत असेलही, तेव्हाच ती तशी अलिप्त राहून सुंदर बनली आहे.


केशवसुत कवितेला आकाशाची वीज म्हणतात. इतकी ती भयावह आहे. असं ते का म्हणाले असेल? कारण ती आहेच तशी... पण नव्या दमाच्या व समर्पणास तयार असणाऱ्या माणसांनी ह्या वाक्याला घाबरण्याचे कारण नाही. ते भय संत तुकाराम दूर सारतात.

खऱ्या कवीच्या हृदयाची अवस्था सांगताना ते म्हणतात


“अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरे ना”


....पण करिता सायास सगळेच गवसते फक्त तेवढे समर्पण हवे


पण हार न जाता आपण स्वतःचे मनोबल वाढवत असणें खूप गरजेचे आहे. हे फक्त कवितेच्याच नाही तर जीवनाच्या प्रत्येक बाबतीत आवश्यक आहे. 


आपण जेव्हा आंबे पाडायला जातो आणि ते पाडायला आपल्याला इतर कोणतेही साधन असत नाही तेव्हा आपण दगडांचा उपयोग करतो. त्यासाठी खूपसे दगड गोळा करतो, मारतो. पण त्या दगडांपैकी प्रत्येकच दगड आंबा पाडण्याच्या उपयोगी येत नाही. म्हणून आपण दगड मारणे सोडतो का? एखादाच योग्य दिशेने जाऊन त्या आंब्याला लागतो आणि त्याचं सार्थक होते. म्हणून काही असफल ठरलेल्या दगडांचे महत्व कमी होत नाही उलट त्यांनीच त्या दगडाला योग्य दिशा दिली असा त्याचा अर्थ होतो.


तर आपली जेवढी ताकद आहे तेवढं आपण करायचं, शेवटी वेळ आणि रसिक सांगतीलच आपण काय करतो ते, पुढे  कुठवर करायचं ते ! तसेही आपल्यालाच आपली ताकद कळते. अशी एक वेळ येते, तेव्हा अलगद बाजूला सरायचं! तोवर लगे रहो! 


कारण जीवनात कविता नसेल, सौंदर्य नसेल तर जगण्यात मजा नाही. म्हणून जमते तोवर कविता करा! मस्त कविता करा! शेवटी चांगली असेल ती कायम टिकून राहील! हे फक्त कवीसाठीच नाही तर तुमच्या आवडीची जे जे क्षेत्रे असतिल त्यासाठी अशीच तयारी ठेवा, टिकून राहण्याची!


-मनोज बोबडे

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

आता आता कोठे!

 

आता आता कोठे मना

वाटे पडावे बाहेर !

आणि धुंडाळून यावे

सारे आकाशाचे घर !

 

आम्रमंजरी प्रमाणे

जरा मोहरून यावे

मृगाचिया मातीपरी

पार गंधाळुन जावे !

 

तुझे नाजुक ते दिस

आता विसरून थोडे

व्हावे वाऱ्याच्या संगती

दिलखुलास मोकळे !

 

हसू फुटल्या रानात

वृक्ष लतांच्या संगती

हिर्वळुनिया सांगावी

पानापानासवे नाती !

 

निळा सागर अथांग

डोळा भरून पहावा

आणि टिमटिमणारा

वर तारकांचा थवा !

 

आता आता वाटताहे

 शुभ्र चांदण्यात न्हावे

  सृष्टि लावण्याचे मोल

  गात्रा-गात्रांना कळावे !


-मनोज बोबडे 


मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

विचारधन

 'धर्माविना विज्ञान पांगळे आहे आणि विज्ञानाविना धर्म आंधळा आइन्स्टाईनचे उद्धृत फार उत्साहाने अनेकवार ऐकवले जाते; पण आइन्स्टाईनने हेही सांगितले होतेच की,


माझ्या धार्मिक निष्ठांसंबंधी तुम्ही जे काही ऐकलेत ते अर्थातच असत्य आहे, पद्धतशीरपणे पसरवण्यात आलेले असत्य. माझा देवावर विश्वास नाही आणि हे मी कधीही नाकारलेले नाही, उलट अतिशय स्पष्टपणे मी ते सांगत आलो आहे. धार्मिकता म्हणता येईल असे काही माझ्यात असलेच तर ते म्हणजे आपल्या विज्ञानाने उलगडून दाखवलेल्या विश्वाच्या रचनेबद्दलचे अमर्याद कौतुक.


आइन्स्टाईनच्या शब्दांत विसंगती वाटते? हे शब्द दोन्ही बाजूंनी वापरता येतील असे वाटतात? नाही. धर्म हा शब्द ज्या रूढार्थाने वापरला जातो त्यापेक्षा अगदी, संपूर्ण वेगळ्या अर्थाने आइन्स्टाईनला इथे तो अभिप्रेत आहे. पारलौकिकतेच्या संकल्पनांवर आधारित असलेला धर्म आणि आइन्स्टाईनचा धर्म यातला फरक मी विशद करत असताना वाचकांनी एक गोष्ट सतत लक्षात ठेवावी की. मी केवळ 'पारलौकिकतेच्या संकल्पनांवर आधारित असलेल्या ईश्वर कल्पनेलाच भ्रामक म्हणतो आहे.


...आइन्स्टाईनच्या धर्माची जातकुळी स्पष्ट व्हावी म्हणून आणखी काही उद्धृते पुढे देत आहे.


'मी एक अतिशय खोलवर अश्रद्ध असलेला धार्मिक माणूस आहे. माझा धर्म एका नव्या स्वरूपाचा धर्म आहे. मी निसर्गावर कधीही काही ध्येय, हेतू असल्याचे प्रत्यारोपण केलेले नाही, त्याला मानवी किंवा दैवी असे कोणतेही गुण चिकटवण्याचा प्रयत्न केलेला नाही. निसर्गात मी केवळ एक भव्य रचना पाहतो - आपली त्या संदर्भातली समज खूपच मर्यादित आहे आणि याचमुळे निसर्गाबद्दल विचार करणारा कोणताही माणूस एका विशाल भावनेने भारून जातो. ही एक अस्सल धार्मिक भावना आहे, जिचा गूढवादाशी काहीही संबंध नाही. एखाद्या विवक्षित देवावर श्रद्धा ही कल्पनाच मला परकी वाटते आणि भोळसटपणाचीही.'


-रिचार्ड डॉकिन्स (-द गॉड डिल्युजन चा मराठी अनुवाद)


.........अज्ञेयवाद हा काही पंथ नाही, ती एक विचारांची पद्धती आहे, जिचा सारांश सांगण्यासाठी एकाच तत्त्वाचा दृढतेने अंगीकार करूनच ती मांडावी लागेल... सकारात्मक रीतीने असे म्हणता येईल : बौद्धिक प्रश्नांबाबत शक्य तेवढी विवेकाची कास धरून पुढे जात राहावे, इतर कशाचाही विचार त्यात नसावा. बौद्धिक क्षेत्रात ज्या गोष्टी दर्शवून देता येणार नाहीत किंवा दर्शवण्यासारख्या नाहीत, त्यांबाबत तात्पर्य काढण्याचे सोंग आणू नये. मी अज्ञेयवादी प्रणालीवर विश्वास ठेवतो . म्हणजेच असे मानतो की, जो मनुष्य पूर्णतः शुद्ध सत्य मानू इच्छितो त्याला भविष्यात आपले काय होईल, याचा विचारही न करता विश्वाकडे निर्भयपणे पाहता आले पाहिजे.


-हक्सले



ज्या पूर्वग्रहांच्या जोखडाखाली अनेक निःसत्त्व मने दबून, आकसून गेली आहेत, त्या पूर्वग्रहांची भीती मनातून दूर भिरकावून दे! बुद्धिप्रामाण्याची बैठक दृढ होईल याची काळजी घे आणि मग प्रत्येक मत, प्रत्येक माहितीची सत्यता याच एका पीठासनासमोर ताडून पाहा! प्रत्येक प्रश्न निर्भयवृत्तीने विचार- अगदी ईश्वरी अस्तित्वाच्या सत्यतेलाही आव्हान देण्याची तयारी ठेव, कारण जर ईश्वर असेलच तर त्याला अंधविश्वासातून आलेल्या भयाकुल श्रद्धेपेक्षा बुद्धिप्रामाण्यातून मिळालेली वंदना अधिक प्रिय वाटेल.


-जेफर्सन

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

गझल



अक्षर माझे शब्द राहतील 

                                                          

अन्य कुणीही न पीर माझे 

गालिब, एलिया, बशीर माझे 


सनातन्यांची नको झुंड ती 

तुका नामदेव कबीर माझे 


वसंत सखये कुठून आणू 

इथे सोबती शिशिर माझे 


गरीब काया गरीब मेंदू 

हृदय चांगले अमीर माझे 


जरी गुलाबी सर्व भावना 

जीवन सगळे अबीर माझे 


केलीस तुही सोय आपली 

डोळ्यात हक्काचे नीर माझे 


अक्षर माझे शब्द राहतील 

जरी वागणे फकीर माझे


-मनोज बोबडे


 

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

गझल

 


जवळीक  


अशीच जवळीक नांदो ही जगताची माझी 

कधी न तूटावी नाती मानवतेची माझी 


आयुष्याला कितीक पुन्हा मी कवटाळू 

सैल जराशी व्हावी मिठी त्याची माझी


उन्हामुळेच असा इथे घाबरलो विरलो 

सलगी कधी ना जमली ही छायेची माझी 


खरेच का तुज कळली नाही प्रीत मनाची 

मग ती भाषा कसली तव नयनाची माझी 


अंतरातुनी किती ईशाला आळवले मी 

कधीच प्रीती जुळली ना देवाची माझी


सखे सोडला नाद खुळा मी परमेशाचा 

गट्टी होते आहे नास्तिकतेची माझी


-मनोज बोबडे


ललित

कवी : एक बादशाह    कवी काहीही बोलला तरी ते लालीत्याच्या, सौंदर्याच्या शिखरावर नेऊन ठेवतो. खोट्यातली खोटी आणि लहानातली लहान गोष्ट देखील सत्य ...