सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

सावध करणारा लेख

रुपकात्मक 

प्रेरणादायी मराठी लेख 

प्रतिभा परावलंबी होऊ देऊ नये !

            भुतकाळातील तापदायक गोष्टींना विसरणे हे वर्तमानातील हर्षाला एक सुंदरसे सौख्यरूप प्रदान करत असते. त्यामुळेच वर्तमानाला एकाग्रतेने, धैर्याने, सतर्कतेने आणि प्रेमाने जगता येते. परंतु वर्तमान क्षणी जगता भुतकाळाचा आठव हा लाभलेल्या क्षणांचा पुरेपुर आस्वाद घेऊ देत नाही. सारी जागरूकता विस्कळीत करून टाकते आणि ‘एक ना धड भराभर चिंद्या’ असला प्रकार घडुन येतो. म्हणून त्या क्षणाशी निगडीत असलेल्याच गोष्टींचा विचार करून प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे लाभलेले क्षण प्रेमाने जगले पाहिजे! भुतकाळात घडलेल्या चुकांची चिकित्सा करत नव निर्मितीने घडत गेलं पाहिजे! कित्येकदा आपले अनुभव आपल्याला असली शिकवण देऊन जात असतात की त्या कष्टदायक गोष्टींनी आपण पार विचलीत झालेलो असतो पण त्या गोष्टी उपजल्या त्या कशा याचीही जाण आपल्याला ठेवायला हवी!.

        ‘कोणतीही गोष्ट आपल्याला लाभत नाही ती दुसऱ्यांनी आडकाठी आणली म्हणून’. हा विचार तसा संपुर्णपणे खरा आहे असं म्हणता येत नसलं तरी तो पुर्णपणे खोटा आहे असंही म्हणता येत नाही! आपल्यातली कमीपणा कायम राहावी, आपण कुठल्याही यशाने आनंदी होऊ नये, यासाठी दुसऱ्यांचे (म्हणजे स्वार्थी आणि दुसऱ्यांचं भलं न पहावलं जाणाऱ्यांचे) प्रयत्न चाललेले असतात, आपल्या विधायक कृतीनं ज्यांच्या हितसंबंधांना बाध येतो ते अशा कृतींना संपविण्यासाठी जिवापाड खपतात. हे काहीसं खरं असतं. याचं कारण असते ‘आपली आजवरची मक्तेदारी संपुष्टात येणार’, याची त्यांना वाटणारी भिती. कोणत्याही निर्मळ आनंदावर प्रत्येक मानव प्राण्याचा जन्मसिध्द हक्क असतो, मग तो आनंद ज्ञान क्षेत्रातला असो, कला क्षेत्रातला असो वा कोणत्याही आपल्याला प्रिय वाटणाऱ्या क्षेत्रातला असो! त्यात कोणाची मिरासदारी ही समताप्रिय माणसाला तरी आवडणारी बाब नक्कीच नाही, नसावी !

      सुधारकांच्या नुसार, ‘समतेचा अर्थ समान गुणवत्ता वा समान जीवनसमृध्दी असा न घेता, समान हक्क आणि समान संधी देणे’ अशा अर्थानेच घेतला पाहिजे! म्हणून अशाप्रकारची समता अंगिकारणाऱ्यांनी निकोप निर्मितीचा ध्यास सोडणं, मानव्याधिष्टीत बाबींप्रती उदासिन होणं हे टाळलं पाहिजे! ज्ञानाचे अंमलदार म्हणून स्वतःची जाहिरात करणाऱ्यांची कुटीलता समजुन घेतली पाहिजे! असे हे अंमलदार ज्यांचा तिरस्कार करतात त्यांचे कौतुक करू करू त्यांना संपविण्याचा प्रयत्न करतात.

        एकुन केसाने गळा कापण्याचाच प्रकार असतो हा! जे असल्या प्रकाराला समजून घेतात तेच आपल्या अस्सल आणि प्रामाणिक प्रतिभेला उजागर करण्याचा दमखम राखतात. जे असली सतर्कता बाळगत नाही ते त्यांच्या प्रयत्नांना सफल करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतात. म्हणून आपण आपल्या वेंधडेपणाकडे दुर्लक्ष करून राहणं हे स्वतःला कोण्या परिघात अडकवल्या सारखंच आहे. किंवा तो प्रतिभावंत पराधीन असल्यासारखा आहे.

           कुणी आपल्याला कमी लेखण्यासाठी काय डावपेच आखतात, कोणते छाक्केपंजे लढवतात यात लक्ष घालून आपण आपलं सुख, आनंद, कर्तव्य यांना दवडणं हे समजुतदारपणाचं लक्षण नव्हे! दुसऱ्यांच्या अशा वागण्याकडे लक्ष देऊन आपल्या मन, मेंदुना बाधीत करून आपल्या नवनिर्मितीच्या आनंदापासून निवृत्ती घेण्याने आपण आपल्यासोबत आपल्या समाजाचं, प्रेमीजनांचं, रसिकांचं एकंदरीत नुकसानच करत असतो.

        म्हणून जगण्याची कला जाणणाऱ्यांनी भुतकाळातील तापदायक गोष्टींना विसरणे आणि आपल्या यशस्वी वाटचालीत आडकाठी आणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे, हे पथ्य अगत्याने पाळले पाहिजे! पण याचा अर्थ असा नव्हे की, त्या आपल्याला कष्टदायी ठरणाऱ्या गोष्टी ज्या चुकांमुळे घडल्या त्या चुका परत परत आपल्या कडुन घडाव्या!...नाही. त्या चुका कोणत्या कारणांमुळे घडल्या याचा शोध घेतला पाहिजे आणि त्या चुका पुन्हा घडु नये असा वर्तमानात प्रयत्न करीत राहिलं पाहिजे, आणि आपल्या यशात अडंगा आणणाऱ्यांना आपल्याकडुन मदत व्हावी असे वागणे सोडले पाहिजे! समतेचा तिटकारा बाळगणाऱ्यांना समजदारांनी तरी आपल्या लेखी स्थान देऊ नये आणि आपला मानव्याधिष्टीत नव निर्मितीचा ध्यास कदापी सोडु नये!


-मनोज बोबडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सावध करणारा लेख

रुपकात्मक  प्रेरणादायी मराठी लेख  प्रतिभा परावलंबी होऊ देऊ नये !                भुतकाळातील तापदायक गोष्टींना विसरणे हे वर्तमानातील हर...