'धर्माविना विज्ञान पांगळे आहे आणि विज्ञानाविना धर्म आंधळा आइन्स्टाईनचे उद्धृत फार उत्साहाने अनेकवार ऐकवले जाते; पण आइन्स्टाईनने हेही सांगितले होतेच की,
माझ्या धार्मिक निष्ठांसंबंधी तुम्ही जे काही ऐकलेत ते अर्थातच असत्य आहे, पद्धतशीरपणे पसरवण्यात आलेले असत्य. माझा देवावर विश्वास नाही आणि हे मी कधीही नाकारलेले नाही, उलट अतिशय स्पष्टपणे मी ते सांगत आलो आहे. धार्मिकता म्हणता येईल असे काही माझ्यात असलेच तर ते म्हणजे आपल्या विज्ञानाने उलगडून दाखवलेल्या विश्वाच्या रचनेबद्दलचे अमर्याद कौतुक.
आइन्स्टाईनच्या शब्दांत विसंगती वाटते? हे शब्द दोन्ही बाजूंनी वापरता येतील असे वाटतात? नाही. धर्म हा शब्द ज्या रूढार्थाने वापरला जातो त्यापेक्षा अगदी, संपूर्ण वेगळ्या अर्थाने आइन्स्टाईनला इथे तो अभिप्रेत आहे. पारलौकिकतेच्या संकल्पनांवर आधारित असलेला धर्म आणि आइन्स्टाईनचा धर्म यातला फरक मी विशद करत असताना वाचकांनी एक गोष्ट सतत लक्षात ठेवावी की. मी केवळ 'पारलौकिकतेच्या संकल्पनांवर आधारित असलेल्या ईश्वर कल्पनेलाच भ्रामक म्हणतो आहे.
...आइन्स्टाईनच्या धर्माची जातकुळी स्पष्ट व्हावी म्हणून आणखी काही उद्धृते पुढे देत आहे.
'मी एक अतिशय खोलवर अश्रद्ध असलेला धार्मिक माणूस आहे. माझा धर्म एका नव्या स्वरूपाचा धर्म आहे. मी निसर्गावर कधीही काही ध्येय, हेतू असल्याचे प्रत्यारोपण केलेले नाही, त्याला मानवी किंवा दैवी असे कोणतेही गुण चिकटवण्याचा प्रयत्न केलेला नाही. निसर्गात मी केवळ एक भव्य रचना पाहतो - आपली त्या संदर्भातली समज खूपच मर्यादित आहे आणि याचमुळे निसर्गाबद्दल विचार करणारा कोणताही माणूस एका विशाल भावनेने भारून जातो. ही एक अस्सल धार्मिक भावना आहे, जिचा गूढवादाशी काहीही संबंध नाही. एखाद्या विवक्षित देवावर श्रद्धा ही कल्पनाच मला परकी वाटते आणि भोळसटपणाचीही.'
-रिचार्ड डॉकिन्स (-द गॉड डिल्युजन चा मराठी अनुवाद)
.........अज्ञेयवाद हा काही पंथ नाही, ती एक विचारांची पद्धती आहे, जिचा सारांश सांगण्यासाठी एकाच तत्त्वाचा दृढतेने अंगीकार करूनच ती मांडावी लागेल... सकारात्मक रीतीने असे म्हणता येईल : बौद्धिक प्रश्नांबाबत शक्य तेवढी विवेकाची कास धरून पुढे जात राहावे, इतर कशाचाही विचार त्यात नसावा. बौद्धिक क्षेत्रात ज्या गोष्टी दर्शवून देता येणार नाहीत किंवा दर्शवण्यासारख्या नाहीत, त्यांबाबत तात्पर्य काढण्याचे सोंग आणू नये. मी अज्ञेयवादी प्रणालीवर विश्वास ठेवतो . म्हणजेच असे मानतो की, जो मनुष्य पूर्णतः शुद्ध सत्य मानू इच्छितो त्याला भविष्यात आपले काय होईल, याचा विचारही न करता विश्वाकडे निर्भयपणे पाहता आले पाहिजे.
-हक्सले
ज्या पूर्वग्रहांच्या जोखडाखाली अनेक निःसत्त्व मने दबून, आकसून गेली आहेत, त्या पूर्वग्रहांची भीती मनातून दूर भिरकावून दे! बुद्धिप्रामाण्याची बैठक दृढ होईल याची काळजी घे आणि मग प्रत्येक मत, प्रत्येक माहितीची सत्यता याच एका पीठासनासमोर ताडून पाहा! प्रत्येक प्रश्न निर्भयवृत्तीने विचार- अगदी ईश्वरी अस्तित्वाच्या सत्यतेलाही आव्हान देण्याची तयारी ठेव, कारण जर ईश्वर असेलच तर त्याला अंधविश्वासातून आलेल्या भयाकुल श्रद्धेपेक्षा बुद्धिप्रामाण्यातून मिळालेली वंदना अधिक प्रिय वाटेल.
-जेफर्सन