शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

विचार धन

 -- निसर्गात भरभर जे जे घडतं तेथे साधारण समप्रमाणात घडत असतं. या विश्वाला ना मन आहे, ना जाणीव, ना व्यक्तिमत्व. त्यामुळे तुम्हाला व्यक्तिशः खुश किंवा नाखूश करायला गोष्टी घडत नसतात. त्या आपल्या ओघाने घडत असतात. त्यात काही वेळा त्या सुखकारक तर काही वेळा दुःखकारक असतात एवढंच. आपल्याला त्यात चांगल्या किंवा वाईट कशाही वाटो आपल्या वाटण्यामुळे घटिताची वारंवारता बदलत नाही. हे पचणं खूप कठीण आहे.......

- द गॉड डिल्युजन


 योग्य शिक्षण आणि प्रगल्भ विचारांना प्रोत्साहन हे डॉकिन्सच्या मते धर्ममताला आणि अगदी बाल वयातच केल्या जाणाऱ्या धार्मिक ब्रेन वॉशिंगला नेस्तनाबूत करण्याचे दोन नामी उपाय आहेत.


- जादुई वास्तव


'धर्माविना विज्ञान पांगळे आहे आणि विज्ञानाविना धर्म आंधळा आइन्स्टाईनचे उद्धृत फार उत्साहाने अनेकवार ऐकवले जाते; पण आइन्स्टाईन हेही सांगितले होते की,


माझ्या धार्मिक निष्ठांसंबंधी तुम्ही जे काही ऐकलेत ते अर्थातच असत्य आहे, पद्धतशीरपणे पसरवण्यात आलेले असत्य. माझा देवावर विश्वास नाही आणि हे मी कधीही नाकारलेले नाही, उलट अतिशय स्पष्टपणे मी ते सांगत आलो आहे. धार्मिकता म्हणता येईल असे काही माझ्यात असलेच तर ते म्हणजे आपल्या विज्ञानाने उलगडून दाखवलेल्या विश्वाच्या रचनेबद्दलचे अमर्याद कौतुक.


आइन्स्टाईनच्या शब्दांत विसंगती वाटते? हे शब्द दोन्ही बाजूंनी वापरता येतील असे वाटतात? नाही. धर्म हा शब्द ज्या रूढार्थाने वापरला जातो त्यापेक्षा अगदी, संपूर्ण वेगळ्या अर्थाने आइन्स्टाईनला इथे तो अभिप्रेत आहे. पारलौकिकतेच्या संकल्पनांवर आधारित असलेला धर्म आणि आइन्स्टाईनचा धर्म यातला फरक मी विशद करत असताना वाचकांनी एक गोष्ट सतत लक्षात ठेवावी की. मी केवळ 'पारलौकिकतेच्या संकल्पनांवर आधारित असलेल्या ईश्वर कल्पनेलाच भ्रामक म्हणतो आहे.


-रिचार्ड डॉकिन्स


संसाधनांचा अभाव असणं म्हणजे पारिस्थितिकीचा ऱ्हास नाही...... मानवजातीसाठी उपलब्ध असणारी संसाधनं सतत वाढत आहेत आणि ती तशीच वाढत राहण्याची शक्यता आहे; म्हणूनच साधनस्रोतांच्या तुटवड्याच्या तर्कातून केली जाणारी जगाच्या भविष्याबद्दलची भाकितं अस्थानी ठरण्याची शक्यता आहे. याउलट पारिस्थितीकीय ऱ्हासाची भीती भक्कम पायावर उभी आहे. भविष्यात माणूस वेगवेगळ्या नव्या पदार्थांवर आणि ऊर्जास्रोतांवर नियंत्रण मिळवेलही. मात्र त्याच वेळी त्यानं वनस्पति-प्राण्यांची उरलीसुरली नैसर्गिक मूलस्थानं उद्ध्वस्त केलेली असतील. त्यातून इतर बहुसंख्य प्रजाती कायमच्या नष्ट होतील....


३७५/ सेपिअन्स


... माणूस एकीकडे देवाला सर्वज्ञ समजतो. सर्व शक्तिमान समजून त्याची पूजा करतो. दुसरीकडे स्वतःस सोयीस्कर अशी कृत्ये देवाच्या दृष्टीने करता येतात, असे समजून देवाच्या सर्वज्ञतेला कमी सुद्धा लेखतो. एकीकडे ईश्वर सर्वांचे रक्षण करतो असा ओरडून ओरडून प्रचार करतो, त्याचवेळी आपल्या शत्रूंचा नायनाट करून देवाने आपल्यालाच कसे वाचवले, याचे दाखलेही देतो.


-बर्ट्रान्ड रसेल


- लोकशाही प्रणालीचा उगम हा शासकीय यंत्रणा आणि स्वातंत्र्य यामध्ये मेळ घालण्याचे साधन म्हणून झाला. एक बाब नक्की, की संस्कृती म्हणून घ्यायला लायक असे काहीही अस्तित्वात यायचे असेल, तर त्यासाठी शासन यंत्रणा अस्तित्वात असणे गरजेचे असते. परंतु इतिहास वारंवार दाखवून देतो, की ज्या लोकांना इतर लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळतो, ते संधी सापडताच मिळालेल्या सत्तेचा निर्भपणे गैरवापर करतातच.


-बर्ट्रान्ड रसेल

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

पुस्तक परीक्षण

 


असुर:- एका पराभुताची गोष्ट 


रावण- समज आलेला असा कोण आहे ज्याला हे नाव माहीत नाही? भारतातील शेकडा ९९% -नाही शंभर टक्के म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये- इतक्या मेंदूवर हे नाव कोरलेलेआहे. लोकांच्या मनात कोणत्या स्वरूपाच्या रावणाने राज्य गाजवले हे वेगळे सांगायची गरज नाही. रावण म्हटले की फक्त आणि फक्त वाईटाचाच खजिना, रामाचा, सीतेचा वैरी वगैरे अशीच प्रतिमा रामायणाने भारतीय व्यवस्थेत बहुतेकांच्या मनीमानसी रुजवण्याचे काम केले आहे. एकीकडे विद्वान म्हणून वरवर गौरव करायचा आणि दुसरीकडे वाईटाच्या  उत्तुंग शिखरावर बसवण्यात कसलीच कसर ठेवायची नाही असे ठाणूनच रामायणाने रावणाला भारतीयांच्या पुढ्यात ठेवले आहे.


दहातोंडे, दहा बाजू असलेला राक्षस, व्यभिचारी, खुनी, अधर्मी असा रावण का रंगवला गेला असावा? आपण चित्रपट बघतो ना! त्यातील खलनायक जेवढा वाईट, दृष्ट, नीच तेवढाच नायक महान ठरतो, देवत्वाला पोचतो. या गणिताला धरूनच रावण ही प्रतिमा वाईटपणाने रंगविली गेली आहे. हे स्पष्ट आहे.

....रावणाविषयी वा अत्यंत दृष्टतेने रंगवलेली इतर असुर पात्रे याविषयी मला कायमच कुतूहल राहिले आहे. रावण हे त्यापैकी एक सर्वोच्च कुतुहलाचे पात्र. त्याच पात्राविषयी मला रावणाची एक वेगळी बाजू वाचायला, जाणून घ्यायला मिळाली.

आनंद नीलकंठन यांनी अतिशय अभ्यासपूर्वक, प्रचंड व्यासंग करून 'असुर:- एका परभुताची गोष्ट' या कादंबरी ग्रंथात रावणाबद्दल मानवीय स्तरावरचं अद्भुत सत्य वाचकांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथातून रावणाच्या जीवनातील विविध अंगाचा उलगडा होत जातो.

जंगलातील न्यूनतेत वाढलेलं बाळ कसकसल्या संकटाला, संघर्षाला तोंड देत लंकाधिपती बनलं त्याची रोमांचक, तेवढीच आकर्षक, विलक्षण मांडणी या ग्रंथात केली आहे. लंकाधिपती रावणाच्या जीवनातील प्रत्येक संघर्षमय प्रसंगाला रोमहर्षक पद्धतीने समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथाने रावणाविषयीचे रामायणाने दृढ केलेले समज बऱ्याच अंशी मोडीत काढले आहे. त्याचे थोडक्यात सार बघू!

कथासार:- ग्रंथाच्या सुरुवातीला युद्ध संपल्यानंतर रावण अर्धमेल्या अवस्थेत पडलेला असतो. तो नेस्तनाबूत झालेल्या लंकेस बघत आपल्या जीवनाच्या सुरुवातीविषयी विचार करत असतो. इथूनच कथेचा सूत्रधार म्हणून रावण वाचकांशी संवाद साधतो. इथे लेखकाने रावणाला महान ठरवण्याचा वा देवत्व देण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलेला नाही किंबहुना त्याच्या मानवीय गुणांना ठळकपणे दर्शविले आहे. रावणाला आजवर आपण वाचले, ऐकले आहे अयोध्येच्या, रामाच्या दृष्टीने! ज्यांनी रामायण लिहिले त्यांनी आपल्या अनुषंगाने, हवी असलेली रामाची प्रतिमा रंगवली. हव्या असलेल्या व्यवस्थेला पूरक ठरणारी अशी. परंतु इथे लेखकाने रावणाच्या, लंकेच्या बाजूने विचार केला आहे. त्याच दृष्टीने मांडणी केली आहे. त्यामुळेच रावणाची अस्सलता, विवशता वाचकांपुढे उभी राहते. त्याचे मानवी गुण प्रतीत होतात.

रावणाने संपूर्ण आर्यावर्त(रामायणाच्यानुसार) (खरा तो जंबुद्वीप) पालथा घालून असुर राज्य विरत्ववृत्तीने प्रस्थापित केल्याचे विस्तारपूर्वक रोमांचक, अद्भुत वर्णन वाचायला मिळते. लेखकानेइथे रावण आणि सीतेचे एका वेगळ्याच स्वरूपातले अनाकलनीय नाते पुढे आणण्याचे धाडस केले. या ग्रंथात सीतेला हरण करण्याचे कारण एका अकल्पनिय स्वरूपात पुढे येते.

रामायणात अशोक वनात ठेवलेल्या सितेला हात लावण्याचा विचार का येत नव्हता? याचा उलगडा रावण-सीतेच्या या नात्यातून वाचकास होतो. अशाप्रकारे वाचकाला हादरवणारं सत्य मांडण्याचं धारिष्ट्य लेखकाने इथे केले. भारतात आज घडीला उपलब्ध असणारे ३०० हून अधिक रामायणाचे संस्करण आहेत. यातून घडलेल्या विचारमंथनाचे सार लेखकाने वाचकांसमोर आणले आहे. या आधारावरूनही आपल्याला कळून चुकते, की भारतात पूर्वीपासून विविध विचार प्रवाह असलेली व्यवस्था होती. त्याच प्रभावातून विविध प्रकारची रामायणे लिहिली गेली. परंतु काही धूर्त प्रवृत्तीच्या वृत्तीने उजाघर होऊ दिली नाही. किंवा ती अनुल्लेखाने मारण्यात आली. असो !   

रावण खरेतर आपल्या तत्त्वाला जागणारा, संपूर्ण असुर वर्गाची काळजी वाहणारा, मानवीय गुणांची प्रखर अभिलाषा बाळगणारा होता. याची प्रचिती वाचकास वेळोवेळी येतेआणून देण्यात लेखक इथे सफल झाले आहेत.

''मी माझ्या मनाचे ऐकले असते तर कदाचित परिणाम वेगळे असते पण असो मी देखील मोहमायेने बांधलेला जीवच होतो. मीही तीव्र भावनांच्या जाळ्यातून मुक्त नव्हतो. मी रावणासारखा जगलो आणि रावणासारखाच मरेन! माझी राम बनण्याची इच्छा नव्हतीच कधी आणि संपूर्ण पुरुष वा कोणता ईश्वरही बनायचे नव्हते. माझ्या देशात आधीच देव आणि ईश्वराची कसली कमतरता नव्हती, इथे कमतरता होती ती माणसांची. अशा माणसांची की, जे खऱ्या अर्थाने केवळ माणूस असावे.''

रावणाच्या या कथनातून रावणपणाचं सार खऱ्या अर्थाने वाचकाला गवसते. 

मल्याळम लेखक आनंद निलकंठन लिखित या पुस्तकाचा हेमा लेले यांनी मराठीत अनुवाद केला आहे. ही कादंबरी आपल्याला असुर साम्राज्याची, संस्कृतीची, स्वभावाची नीट ओळख करून देते. इथे असुर स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचारही वाचावयास मिळतो जो आजच्या स्त्रियांसाठी उपयोगात येताना आपण बघतो.

रामायणाचा, रामाचा पगडा असलेल्या किंवा नसलेल्या वाचक प्रेमी माणसाने एकदातरी ही कादंबरी जरूर वाचायला हवी.


-मनोज बोबडे



सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

प्रतीकात्मक छायाचित्र 

'ती'ने 

 'नूर आनी' राखला 'शबाब' तिने

दाविला या काळजास रोब तिने 


सताड खोलुनी उभा मी दार होतो

सांगला जणू कटाक्षी लोभ तिने


आणि इथे इमलेच मी बांधीत गेलो

पण ढाळले संपूर्ण माळे खुब तिने


मी खुळी ती आस मांडली पुढे

पुसला न मजशी कधीही  जाब तिने 


विश्वात नवीन मोकळाच नांदलो

माझी ना राखली जराही आब तिने


-जा तुझ्या तू रेखिल्या वाटेवरी

मी एकटा जाईन माझ्या सोबतीने


-मनोज बोबडे


गुरुवार, ३१ जुलै, २०२५

प्रतीकात्मक 

 चांद पाहिला

चांद पाहिला ग बाई चांद पाहिला

त्या भाबड्या रुपावरी मी जीव वाहिला ll


ती चाल हळू मंद कशी मोहवी मना 

ठाव घेत मम जीवाचा येत पाहुणा 

स्वागतास मी तयाच्या छंद गाईला 

चांद पाहिला ग बाई चांद पाहिला ll


मनात कळेना हा कसा गंध वाहतो 

असाच का हो मधु प्रेम गंध राहतो 

याहो बागेतून विचारून जाईला 

चांद पाहिला ग बाई चांद पाहिला ll


आज वाटते नवे नवे हे चांदणे 

नवेपणात रंगले हे आज नांदणे 

येत कसा भाव मनातील घाईला 

चांद पाहिला ग बाई चांद पाहिला ll


 कळेना आज गात्र गात्र का वेडावले 

खास हेच त्या शशीने प्राण चोरले 

जीव गड्या आज हा माझा न राहिला 

चांद पाहिला ग बाई चांद पाहिला ll


-मनोज बोबडे

मंगळवार, २९ जुलै, २०२५

 

प्रतिकात्मक इमेज 


प्रेमाचा वाटा


 जांभळे ही लागलीत ढगाच्या जगात

 दूरच्या देशाचा बघा असा हा प्रघात 


 नको राखू अचंबा तू मनाच्या मातीत

 दूरचे म्हणून गोड करू नको घात 


 प्रेममय जगी तेच हवे हवे वाटे

 भेदभावनेच्या जागी दिसतात काटे


 प्रेम हाच देव, गुरू प्रेम भक्तिभाव

 कशास तू घेतो परलोकासाठी धाव


 जिथे सर्व काळ असे प्रेमाची ददात 

 तिथे दिव्य ठरते ती नुसतीच जात


 ओलाव्याने मातीमध्ये अंकुरतो जीव

 तसलाच प्राणमय प्रेमाचा प्रभाव


 म्हणूनिच प्रेमाचा द्या पसाभर वाटा

 मग मला हवे तसे काळजाने लुटा!


-मनोज बोबडे

शनिवार, १९ जुलै, २०२५

 

प्रतीकात्मक छायाचित्र


स्वाभिमान !


तुझ्या लिबलिबलेल्या डोळ्यात

खोलवर दडलेलं माझं थरथरतं प्रतिबिंब .......

सारंच स्वत्व गमावलेल्या

स्वाभिमानाला ते पाहून

दुखापत का व्हावी !

तो असल्याची जाणिव नसतांनाही


प्रतिबिंबातुन दिसणारा पाहून वाटते

माझ्यासारख्याही निसत्व देहात

स्वाभिमान असतो तर .......


आता आंशिक उरल्याचा भास आहे

त्याचं सार्थक व्हायला पाहिजे !

तेव्हा फक्त एकच उरते

तुझी संमती !


एक मासोळी संपूर्ण तळयास दुषित करते

मी तीच मासोळी का व्हावं ?

ती होऊ देऊ नकोस !

तू जन्मा घातलंस

आई, आता तुच जाण्याची परवानगी दे !

तळं सुरक्षित राहींल !


-मनोज बोबडे

सोमवार, १४ जुलै, २०२५

दुसऱ्या हृदयाची प्रतीक्षा !


शोधात


माझ्या मनाशी संवाद साधणाऱ्या
पुन्हा एका मनाच्या शोधात आहे मी
आस्तिकता नास्तिकता
या दोहोंच्या पलिकडे घेऊन जाणारं मन
जिथ असेल निर्भयता, निश्चिंतपणा, धिरच-धिर
असेल माझं हरवलेलं
गवसुन पाऱ्याप्रमाणे
निसटत जाणारं निरागस बालपण
त्या बालपणाला सावरणारे हात
मायेनं जोपासणारे
ममतेनं गोंजारणारे

जिथं नसेल कसलाही पक्षपात
नसेल जन्म, नसेल मृत्यु...
असेल एक चैतन्यमय आविष्कार प्रेमाचा!
आणि, आणि माझ्या मीपणाला
हरवून लावणारा मुक्त आनंद
निर्मळ, निराकार!
नोक तुटल्या काट्यांनी जीवन विस्कटून टाकणाऱ्या
मनाची संगत नकोय मला
नकोय ते, ज्याला सिमेची झालर पसंत आहे.

मी त्या मनाच्या शोधात आहे,
जे मला मिळवून देईल माझं असलेलं साम्राज्य,
जे देईल मुक्तपणाचं असिम प्रेम
जे माझं होऊन राहिल नित्यासाठी,
  त्या मनाच्या शोधात आहे मी !

तुम्हा कुणाला गवसेल तर, सांगा मला...

माझा पत्ता...
निष्क्रिय देहाच्या छातीत
सळायला लागलेलं गाव आहे मनाचं,
तेच ते!


-मनोज बोबडे

शनिवार, ५ जुलै, २०२५

वर्षा ऋतू पर हिन्दी बालकविता

 

प्रतीकात्मक इमेज


वर्षा ऋतू


वर्षा ऋतू आया है

बारीश ने गीत गाया है

नभ के आंगण मे देखो

काली काली छाया है


चल राजू चल पिंटू चल

भिगते है पानी मे चल

बोट बनाते कागज की

और रेती के बंगले चल


चल बारीश से बात करे

दिनभर सारी रात करे

इस  झुलसाती गर्मी पर 

पानी का आघात करे


इस वर्षा के आने से

धरती के भिग जाने से

जंगल बन जाते है हरे

पानी को आजमाने से


-मनोज बोबडे


शनिवार, २८ जून, २०२५

 

प्रतीकात्मक छायाचित्र 

आत्ता जरा इथून पुढे


आत्ता जरा इथून पुढे झोकात चालू!

 वरिष्ठांच्याही योग्य त्या धाकात चालू!


 धाऊ पडू, पुन्हा उठू, रडू, हसू, गाऊ

 शंभरात, हजारात नाही लाखात चालू!


 जुनं ते सोनं म्हणू द्या म्हणतील त्यांना

 अस्सलता स्वीकारत व्यर्थ टाकत कात चालू!


 इथे आहे सगळेच, हाही चालू, तोही चालू 

 कोणाची नीती तर, कोणाची औकात चालू!


 कित्येक जण निवडतात स्वार्थपूर्तीचेच रान

 आपण तर मानवतेच्या, न्यायाच्या पिकात चालू!


-मनोज बोबडे (११ जाने २०१०)


बुधवार, २५ जून, २०२५

पाच लघुत्तर कथा

 छायाचित्र : सावंतवाडी पॅलेस 

   १) १० सेकंद

हा रस्त्याने जाताना तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहत स्मित करत मनात सुखावत होता. जगातले सर्वांग सुंदर, कोमलकांत दृश्य बघून तिचेही मन कमालीचे संतोष पावले. ती अलौकिक प्रेम कहानी अवघ्या १० सेकंदातच समाप्त झाली, चारच पावलावर 'इतका वेळ का लागला ग?' हा तिच्या नवऱ्याचा प्रश्न दोघांच्याही कानात शिरला तेव्हा! 

२) प्रेम आंधळे असते

राधेचे कृष्णावर प्रेम होते, कृष्णाचे राधेवर. ह्या अद्वितीय प्रेमावर देशातल्या ८०% हून अधिक जनतेने प्रेम केले. प्रेम आंधळे असते, हे खरेच आहे. कारण पुराणेच म्हणतात, 'राधा कृष्णाची मामी होय.' हे ऐकले की भक्तांच्या कपाळावर अगणित आठ्या पडतात. 
३) युद्ध 

बंदुकी, गोळ्या, बारूद, ड्रोन, मिसाईल आदी अस्त्र, शस्त्र, क्षेपणास्त्रांचा वापर करत युद्ध छेडून जीवित हानी केली जाते. हे इतर दुश्मन देशासोबत घडत असते. पण देशांतर्गत आपल्याच माणसांसोबत जातीच्या, अस्पृश्यतेच्या, गरिबीच्या आधारावर शब्दांची अदृश्य शस्त्रे, अस्त्रे, क्षेपणास्त्रे वापरली जात त्यांच्या जगण्याची अपरिमित हानी केली जाते, तेव्हा हे कुणालाच दिसत नसते. 
४) सनातन सत्य?

हिचा फोन आला तेव्हा त्याला कळले की, त्याचं 'तिचं' प्रेम होतं. आणि हे 'तिच्याच' कडून कळलं होतं! लग्न झालेल्या तिचाच विचार हिच्या रोमरोमी अधिकार गाजवत असतो हिला कळल्यापासून. खरे तर ह्याला जागेवरून स्वतः इंचभरही हलता येत नाही.' आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनात इतर कोणी नसावाच असा जालीम विचार असणं हेच स्त्री मनाचे सनातन सत्य आहे.' याची हिनी तसल्याच पुरुषी मानसिकतेला जाणीव करून दिली. 
५) आत-बाहेर 

हॉलमध्ये आता कुणालाच झोपायला जागा नाही म्हणून आतून कुणीही दरवाजा उघडायला तयार नाही. उलट बाहेरच्या आत येऊ पाहणाऱ्या पाहुण्यांना आतले शिव्या देत, त्यांची संभावना करतात. बाहेरचे आत मधील पाहुण्यांना. केशव कसा बसा आत शिरतो. बाहेर असताना आतल्या पाहुण्यांना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या केशवचे वागणे १८० अंश कोणात बदललेले असते. ह्यालाच विचार परिवर्तन म्हणतात का? 


-मनोज बोबडे

गुरुवार, १९ जून, २०२५

प्रतीकात्मक छायाचित्र 







नजरेत तुझ्या 

तुझ्या कायेतून। 
चंदनाचा वास। 
येताना उल्हास। 
मनात या ।। 

नजरेत तुझ्या। 
ओलीचिंब माया। 
बंधनाची रया। 
फुलापरी।। 

पिलासाठी जशी। 
झुरतसे घार। 
तुझी ही नजर। 
माझ्यासाठी।। 

-मनोज

मंगळवार, १७ जून, २०२५

प्रतीकात्मक छायाचित्र 

 

तू अशी गोड हसतेस – कविता

हसू

– मनोज बोबडे
तू अशी गोड हसतेस आणि माझ्या मनाच्या रुक्ष खोडाला जीवनाची कोवळी, मनभावन पालवी फुटू लागते. फुलते निर्भ्रांत होऊन, बहरते जगण्याच्या उत्कट सदिच्छेने लगडतात त्याला फळे रक्तातील रोमांच वाढविणाऱ्या जीवनदायी रसायनाची... फळातील बीजे पेरत जातात उल्हास, उमेद, उत्साह वगैरे तेव्हा तयार होत असतात रोमारोमात पर्यावरणीय व्यवस्थेचे संदर्भ.. सर्वत्र जीवन उगण्यासाठी! मग तूच सांग, तुझ्या हसण्याचे झाड एवढे असरदार असेल तर तू मनःपूर्वकपणे खळखळून हसायला नको का?

शुक्रवार, १३ जून, २०२५

लग्नाचा सुवर्णं उत्सव

 
२३ मे १९७५ रोजी झालेल्या लग्नाला २३ मे २०२५ रोजी ५० पूर्ण झाले.आई-बाबांच्या या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता.
२३ मे १९७५ रोजी झालेल्या लग्नाला २३ मे २०२५ रोजी ५० पूर्ण झाले.आई-बाबांच्या या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता. 















 
बाप बापावानी असे 
माय असे मायेवानी 
हीनी गायिली तयाची 
त्याने हिची सदा गाणी 

असे असो तसे असो 
वेडे वाकडे असू दे 
जिथे तृप्तीचे गाठोळे 
दृष्ट त्याकडे असू दे 

हाच प्रण धरुनीया 
रुजूवात प्रवासाची
सज्ज चालाया जाहले 
वाट कटू संसाराची

वरिष्ठांनी बांधल्या या 
गाठी ऋणानुबंधाच्या 
नाते आत्याच्या मुलाशी 
जुळे मुलीशी मामाच्या 

दबावात का असेना 
नाते चालले प्रदीर्घ 
सालं इतके लोटले 
पुढे साताचाही वर्ग 

अशा संगतीने आज 
किती डहाळ्या फुलल्या 
मुलं बाळ नातवंडे 
कळ्या बहरास आल्या 

आज कळ्या, फुले जमा 
झाली सुगंध पेरण्या 
पन्नासाव्या सालाचा या 
स्वर्ण सोहळा करण्या

-मनोज बोबडे 

विचार धन

  -- निसर्गात भरभर जे जे घडतं तेथे साधारण समप्रमाणात घडत असतं. या विश्वाला ना मन आहे, ना जाणीव, ना व्यक्तिमत्व. त्यामुळे तुम्हाला व्यक्तिशः ...