बुधवार, २५ जून, २०२५

पाच लघुत्तर कथा

 छायाचित्र : सावंतवाडी पॅलेस 

   १) १० सेकंद

हा रस्त्याने जाताना तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहत स्मित करत मनात सुखावत होता. जगातले सर्वांग सुंदर, कोमलकांत दृश्य बघून तिचेही मन कमालीचे संतोष पावले. ती अलौकिक प्रेम कहानी अवघ्या १० सेकंदातच समाप्त झाली, चारच पावलावर 'इतका वेळ का लागला ग?' हा तिच्या नवऱ्याचा प्रश्न दोघांच्याही कानात शिरला तेव्हा! 

२) प्रेम आंधळे असते

राधेचे कृष्णावर प्रेम होते, कृष्णाचे राधेवर. ह्या अद्वितीय प्रेमावर देशातल्या ८०% हून अधिक जनतेने प्रेम केले. प्रेम आंधळे असते, हे खरेच आहे. कारण पुराणेच म्हणतात, 'राधा कृष्णाची मामी होय.' हे ऐकले की भक्तांच्या कपाळावर अगणित आठ्या पडतात. 
३) युद्ध 

बंदुकी, गोळ्या, बारूद, ड्रोन, मिसाईल आदी अस्त्र, शस्त्र, क्षेपणास्त्रांचा वापर करत युद्ध छेडून जीवित हानी केली जाते. हे इतर दुश्मन देशासोबत घडत असते. पण देशांतर्गत आपल्याच माणसांसोबत जातीच्या, अस्पृश्यतेच्या, गरिबीच्या आधारावर शब्दांची अदृश्य शस्त्रे, अस्त्रे, क्षेपणास्त्रे वापरली जात त्यांच्या जगण्याची अपरिमित हानी केली जाते, तेव्हा हे कुणालाच दिसत नसते. 
४) सनातन सत्य?

हिचा फोन आला तेव्हा त्याला कळले की, त्याचं 'तिचं' प्रेम होतं. आणि हे 'तिच्याच' कडून कळलं होतं! लग्न झालेल्या तिचाच विचार हिच्या रोमरोमी अधिकार गाजवत असतो हिला कळल्यापासून. खरे तर ह्याला जागेवरून स्वतः इंचभरही हलता येत नाही.' आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनात इतर कोणी नसावाच असा जालीम विचार असणं हेच स्त्री मनाचे सनातन सत्य आहे.' याची हिनी तसल्याच पुरुषी मानसिकतेला जाणीव करून दिली. 
५) आत-बाहेर 

हॉलमध्ये आता कुणालाच झोपायला जागा नाही म्हणून आतून कुणीही दरवाजा उघडायला तयार नाही. उलट बाहेरच्या आत येऊ पाहणाऱ्या पाहुण्यांना आतले शिव्या देत, त्यांची संभावना करतात. बाहेरचे आत मधील पाहुण्यांना. केशव कसा बसा आत शिरतो. बाहेर असताना आतल्या पाहुण्यांना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या केशवचे वागणे १८० अंश कोणात बदललेले असते. ह्यालाच विचार परिवर्तन म्हणतात का? 


-मनोज बोबडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रबोधन

प्रतीकात्मक    वैचारीकतेचा अभाव माणसाला गुलाम करतो!                   अतिशय श्रध्दाळु, धार्मिक आणि देववादी लोकांचा या गोष्टींवर विश्वास बस...