सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१३

मक्तेदारी

विश्वास जयावर केला भारी
त्याने केली हरामखोरी

सोपविले ज्याच्यावर जीवन
ते करते असली गद्दारी

साम, दाम, भेदावर मेले
लुटू लागले जनता सारी

शब्दाच्या खेळावर नुसते
सुंदरता करते बाजारी

धर्माच्या नावावर निव्वळ
भारतास केले आजारी

जिंकाविती साधारण कोणी
हीत रक्षति अपुले भारी

मानवतेचा लेश न पुरता
अशी कशी ही मक्तेदारी

-मनोज बोबडे

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

सांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्तर येतो”


जागतिकीकरणामुळे माणसाचे जीवन अत्यंत गतिशील झाले आहे. समाज सातत्याने बदलत असतो, हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. खोट्या प्रतिष्ठेची झालर भालावर बांधून, माणूस शाश्वत मूल्यांना मुठमाती देण्यात धन्यता मानतो. मानवी मनाचं उद्ध्वस्तीकरण प्रत्येकाच्या नजरेत सलत आहे. समाजाच्या स्तरिकरणाचा विचार केल्यास उच्च स्तराद्वारे निम्न स्तराचे शोषण होत आहे. उपेक्षितांच्या, वंचितांच्या जाणिवा चित्रकाराच्या कुंचल्याने लेणीरूप होतात तर कवीच्या शब्दाने महाकाव्य! ज्यांनी आयुष्याला तप्त तव्यावर शेकले असेल त्यांचा कलात्मक आविष्कार ‘आम आदमी’च्या संवेदनेचं प्रातिनिधिक रूप असत. उपरोक्त संदर्भात तादात्म साधेल असे समकालीन व्यवस्थाचित्र नाविन्यपूर्ण व समृध्द भाषाशैलीने कवी ‘किशोर मुगल’ यांनी ‘दिवस निरुत्तर येतो’ या कवितासंग्रहात अभिव्यक्त केले आहे.
   कवी ‘किशोर मुगल’ संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले एक ‘चंद्रपुरी गझलकार’आहेत. ’एकावन्न कविता माझ्याही’ हा त्यांचा पूर्वप्रकाशित कवितासंग्रह! ’मराठी माय बोली’ कवितेच्या कार्यक्रमाचे एक सभासद. अलिकडेच ९ व्या मराठा साहित्य संमेलनात[चंद्रपूर] संमेलनाध्यक्ष बाबा भांड, थोर विचारवंत डॉ. आ.ह.साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दिवस निरुत्तर येतो’ कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. कवीला भविष्यचित्र अस्पष्ट भासते, व्यवस्थेविषयक अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून, रसिकप्रिय कवी ज्ञानेश वाकुडकर प्रस्तावनेत म्हणतात, ’कविता संग्रहाचं नाव जरी ‘दिवस निरुत्तर येतो’ असं आहे तरी किशोर मुगल यांची कविता आशावाद जागवणारी आहे. प्रश्नातून उत्तर देणारीही आहे. आणि म्हणूनच ही कविता खोलवर झिरपणारी आहे. रुजणारी आहे’.
   सुरुवातीला आत्ममग्न वाटणारी कविता कालांतराने जनप्रबोधनाची कधी होते याचा वाचकाला थांगपत्ता लागत नाही.कवी जगाच्या कल्याणाची भाषा बोलतो. समाजात निसर्गदत्त समता नांदावी ह्याच उदात्त हेतूने निसर्गाला एक दान मागतो,
             अशी एक इच्छा माझी फळावी
             मला पाखरांची भाषा कळावी
             असे एक जाते दे रे निसर्गा
             जिथे भूक आम्ही अमुची दळावी
              (अशी एक इच्छा....पृष्ठ १५)
     
    अजूनही ज्या घरापर्यंत शासकीय उजेड पोहचला नाही, अशा घरांनी केव्हाच अंधाराला आपलसं करून घेतलं आहे. आदिमांच्या घरात भूक आणि दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. आदिम स्वर छेडताना कवी म्हणतो,
              जिंदगानी केवढी बंदिस्त आहे
              श्वास सुद्धा घ्यावयाला शिस्त आहे
              सूर्य त्यांना भेटला अद्याप कोठे
              काजव्यावरतीच त्यांची भिस्त आहे...
                  (जिंदगानी केवढी...पृष्ठ ३१)      

ग्रामजीवनातील जगण्याचे संदर्भ कवीला सातत्याने खुणावतात. कालची हिरवीमाती आज अकृषक होत चालली आहे. जगाचा पोशिंदा हतबल झाल्याचे कुणाच्याही लक्षात कसे येत नाही? असा सवाल कवी ‘एका बैलाच्या डायरीतून’ या कवितेच्या माध्यमातून बैलाचे आत्मवृत्त किंबहुना शेतकऱ्याची अगतिकता विशद करतात. कवीला वास्तवतेची जाण आहे. भ्रष्टाचार प्रत्येकाच्या जगण्याचा विषय बनला आहे. भ्रष्टव्यवस्थेचे विदारक वास्तव कवी विद्रोही स्वरुपात पण, तितक्याच सयंतपणे ‘स्वातंत्र्याचा सूर्य’ या कवितेत मांडतात.......
             नदी नसली तरी पूल बांधून टाकू
             हाच आजच्या विकासाचा ठोकताळा
             शेतकरी मारतो मरू द्या हरकत नाही
             तुम्ही फक्त बिसलरी आसवे ढाळा...... (पृष्ठ ५२ )
    
    बोलीभाषा अभिव्यक्तीचे सकस माध्यम आहे.आपल्या परिसराचा अन्वयार्थ कवीला बोलीत सांधता येतो. ’शाब्बास रे बेटा’, ’मले हाक देजो’, ’झोलाझंडी’ या कवितेतील भाषा ग्रामीणजीवनमूल्याची उंची वाढवितात.वऱ्हाडी बोलीचे भाषासौष्ठव वाचकांच्या अंत:करणाला थेट भिडते आणि अंतर्मुख करते.
    कवीचे गझलेवर असलेल ‘कमांड’ प्रत्येक शेर सांगून जातो.विषयाची विविधता जशी गझलेच्या प्रत्येक शेरात असते,तशीच विविधता कवी किशोर मुगल यांच्या कवितेत आहे.कवीने,स्त्री प्रतिमांचा सर्वार्थाने केलेला सन्मान स्त्रीत्वाची उंची वाढवितात.       
    स्त्रीचे सौंदर्य,कारुण्य,प्रेम,अगतिकता,मनाला चिंतन करायला लावणारे विषय! कवी जेवढ्या नम्रतेने प्रेमावर बोलतो तेवढाच कठोर ‘स्त्रीभ्रूणहत्या’ विषयावर होतो.इथ   मानवी विकृतीविषयी भाष्य करून स्त्रीला सजग राहण्याचा सल्ला देताना म्हणतो ........
             सांज होता दार खिडक्या गच्च तू लावून घे
             हे शहर बदनाम माझे एवढे जाणून घे......
                      (सांज होता दार ..पृष्ठ ४९)
     
      कवी प्रेमात उद्ध्वस्त होण्याची भाषा बोलतो.अमृताची चव खऱ्या प्रेमात असते,हे कवीने जाणले आहे.म्हणून प्रेमाचे स्वरूप स्पष्ट करताना कवी म्हणतो,
             ही अमृताची चव खरी जाणावया
             ओठावरी ओठास ठेऊ ये प्रिये
             एका क्षणासाठी प्रीतीच्या कोवळ्या
             ही जिंदगी उधळून देऊ प्रिये... 
                (हा रेशमी अंधार .....पृष्ठ ३३)
     
    ‘शेरातील विरोधाभास वृत्ती गझलेचा आत्मा असतो’असे गझलसम्राट स्व.सुरेश भट्ट म्हणतात.खरे तर शेर गझलेचा अवयव आहे.अवयव जितके सुदृढ तितके शरीर उपक्रमशील. कवी किशोर मुगल यांना गझलेची भाषा उमगली आहे.शेरातील विरोधाभास त्यांच्या एका रचनेत सत्कृतदर्शनी जाणवतो.
            आरसा कसा होता तो
            काय त्याचा वारसा
            ठेच त्याची लागुनी
            दगडासही गेला तडा.......
            (गंधवेड्या मोगऱ्याचा....पृष्ठ ९०)
    
    कवी अंधश्रद्धेवर असूड उगारतो.कवीची जगण्याविषयी कुठलीही तक्रार नाही.सकारात्मकवृत्तीने व्यवस्थेशी दोन हात करता येतात यावर कवीचा विश्वास आहे.’आई’ प्रत्येकाच्या जीवनाला समृध्द करणारी स्त्री! अव्यक्त भावनांचे मुक्त विद्यापीठ म्हणजे आई.तिची महती अलवारपणे सांगताना कवी म्हणतो,
           आभाळाचा कागद
           सागराची शाई
           लिहून सरली
           तरी उरलीच आई|.....(पृष्ठ..१२८)
    
   कवी किशोर मुगल, सर्वव्याप्त अनुभवांना कवितेच्या माध्यमातून मानवतेच्या एका सुरात बांधण्याचा प्रयत्न करतात.समाजात समता,न्याय,प्रेम,बंधुता नांदावी व प्रत्येकास सम्यकदृष्टी प्राप्त व्हावी असा निर्व्याज दृष्टीकोन त्यांनी मनी बाणला आहे.संबंध कवितेला एक दिशा आहे,कळायला सोपी पण अंतर्मुख करणारी आहे. ‘दिवस निरुत्तर येतो’ काव्यसंग्रहाला ‘माधव लोखंडे’ यांचे आकर्षक व समर्पक मुखपृष्ठ लाभले आहे.एकूण ७९ कवितांनी आविष्कृत काव्यसंग्रह नवकवितेचे परिघ ओलांडेल यात शंका नाही.अस्सल अनुभवातून आलेली कविता वाचकांना आपलीशी करून सतत प्रेरणादाई ठरेल अशीच अभिव्यक्ती आहे.कवी किशोर मुगल यांच्या काव्यप्रवासास मन:पूर्वक शुभेच्छा! 

-किशोर कवठे              बामणवाडा,राजुरा जि.चंद्रपूर 
.....................................................................................................................

कवी-किशोर मुगल                          
काव्यसंग्रह-दिवस निरुत्तर येतो 
प्रकाशक-जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,चंद्रपूर 
पृष्ठ.१२८  मूल्य.१२०         
                                                  

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

कर्म

तो गेला पाठीवर पंप घेऊन
शेतातील धान्य-कडधान्यांवरील
किड्यांचा-अड्यांचा
नायनाट करण्यासाठी...
म्हणूनच त्याच्या स्वतःच्या
उदरभरणासमवेत
जगताचंही भरण-पोषण होत असते

...त्याच्याच बळावर आपल्या
उदराचा आकार वाढवून
पाप-पुण्यविषयक प्रवचन देणारे
अहिंसक(?) धर्मज्ञ
यांना कोणत्या पापयोनीची
जागा दाखवतील?

...त्याचं हे धर्म कार्य म्हणून
घोषणा करतील तर मग
स्वतःच्या दुटप्पी वागण्या-बोलण्याची
सजा म्हणून
कोणते नरकस्थान सांगतील? 

-मनोज बोबडे

  प्रतीकात्मक छायाचित्र  आत्ता जरा इथून पुढे आत्ता जरा इथून पुढे झोकात चालू!  वरिष्ठांच्याही योग्य त्या धाकात चालू!  धाऊ पडू, पुन्हा उठू, रड...