![]() |
प्रतीकात्मक |
वैचारीकतेचा
अभाव माणसाला गुलाम करतो!
अतिशय श्रध्दाळु, धार्मिक आणि देववादी लोकांचा या गोष्टींवर विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे. मीही कधी काळी हया स्तरात मोडणारा हया बाबींना तथ्यहीनच मानत होतो. एकूण बौध्दिक विचारसरणीचा डोळसपणे विचार करायला जाता ते सारं काहीसं कळून यायचं, पण वरील बाबींचा पगडा जास्त असल्यामुळे बुध्दी पांगळी ठरत होती. श्रध्दाळू माणसाच्या मष्तिष्कात पाप-पुन्य, पूर्नजन्म याचं प्राबल्य बलवान असेल तर त्याची छाती भय, संकोच, चिंता हया हिमालयरूपी नगाखाली दडपल्याशिवाय राहत नाही; तर मग कोणत्याही धार्मिक, देववादी श्रध्देच्या स्थानांविषयी सत्य सांगून त्या डगमगत असतील तर कोण श्रध्दाळू व्यक्ती ते पाप करू धजेल? कोणत्याही धार्मिक बाबींविषयी प्रत्येकाला सत्य काय आहे याची थोडी तरी जाणिव असतेच. बालपणापासूनचे संस्कार अमक्या-तमक्या धारणेचा प्रभाव, अवाजवी श्रध्दाभावना आणि स्वतःच्या धर्माचा, मान्यतेचा अहंगंड या आधारे तो समजुन येणाऱ्या सत्याला दूर सारत असतो. मुद्दामहुन, जाणुन-बुजुन! आपण ज्या मान्यतेचा स्विकार केला आहे. ती जर हीन प्रतिची ठरायला लागली तर सत्याच्याच दृष्टीत मोठा असणारा ‘मी’ दुखावल्या जाईल ही भीती असते.
माणूस हया आणि अशाच प्रकारच्या इतर कारणांनी वास्तवाला, खरेपणाला अंगीकारत नसतो. कोणी काय सांगतात ते अगदी डोळे मिटुन खरे मानण्याची सवय लागून गेलेली असते आणि त्या धर्म विषयक बाबी असतील तर विचारायलाच नको. अशाच प्रकारच्या स्वभावाचा अंध, भावूक माणसाचा, त्यांच्या मानसिकतेचा चलाख, स्वार्थी लोक आपलं श्रेष्ठत्व राखण्याचा प्रयत्न करणारे अगदी घेता येईल तेवढा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत असतात.
ईश्वरी संकल्पना सत्य मानल्या जाते. अगदी परम सत्य! परंतु धुर्त लोक या परम सत्य मानल्या गेलेल्या संकल्पनेचा लोकांमधे भीती पसरवून स्वतःचं श्रेष्ठत्व सिध्द करून गैर फायदा घेण्यासाठी उपयोग करीत असतात.- धर्माचंही तसंच, धर्म हा समाजाचं धारण करण्यासाठी असतो असं फक्त सांगण्यासाठी म्हणून सांगितल्या जाते. प्रत्यक्ष बघता धर्माचे कायदे, नियम हे मानवामानवात दुरावाच निर्माण करणारे असतात. मानवतावादी असं तत्वज्ञान सांगुन मानव्याला उच्च कोटीला पोहचविण्याचं कामही एकीकडे धर्म करीत असतो पण या तत्वज्ञानापेक्षा कर्मकांडीय धर्मच बहुतेकांना हवा असतो. पंथ, संप्रदाय, गुरू, शिष्य, तिर्थस्नान, मंदिर, पुजा, जप, तप, यज्ञ, आरत्या, मंत्र, तिर्थप्रसाद, अनुष्ठान, माळ, दूध, तूप, फुले, पाने, फळे, आणि अशा कित्येक बाबी आहेत की, ज्या ईश्वराला प्राप्त करण्यासाठीच निर्माण झालेल्या आहेत. असे धर्म सांगतो. कित्येक हजार वर्षापासून आजतागायत हया सर्व बाबींचा ईश्वराला आळविण्यासाठी, मिळविण्यासाठी उपयोग केला गेला.
तो ईश्वर मिळाला किती? तो आहे कसा? ईश्वर म्हणजे असते काय? हया प्रश्नाची समाधनकारक आणि अंतीम उत्तरं आजवर कुणीही देवू शकला नाही. फक्त शब्दांचे जंजाळ उभे करून अतर्क्य गोष्टींच्या उदाहरणाद्वारे भक्तांना गोंधळात टाकुन अडकवुन ठेवण्याचाच जास्त प्रयत्न होताना दिसतो. इथे प्रत्येकाचे ईश्वर हे वेगवेगळे असल्याचंच आपण बघतो. ते ईश्वराचा आधार घेवून चलाखी आणि डावबाजपणा करणारे आपल्यापरीने ईश्वराची व्याख्याच करून टाकतात. अशा प्रकारे ईश्वराचा जन्म होतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानुसार प्रत्येक ईश्वर शोधकास सापडलेला ईश्वर स्वतंत्रपणे निर्माण झालेला आहे. आणि त्यासोबतच त्याच्या जाती, त्याचे धर्म, पंथ, संप्रदाय, गुरू काय न काय निर्माण होत गेले.
समाजातील भीती, दुःख, दैनंदिन गरजा या गोष्टींचा ईश्वर अधिक सामान्य जन यांच्यामध्ये दलाली करणाऱ्यांना चांगलाच लाभ घेता येतो आहे. आणि हयाच आधारे सर्वसाधारण जनतेला ते आपल्याशी जोडून त्याच्या डोक्यात बधीरतेची लस टोचत राहतात. इथे नको त्या कथा, नको ते चमत्कार, पारलौकिकतेच्या आधारे कोण्या एका वर्गाचं श्रेष्ठत्व, गुरूची महती, ईश्वराचं खोटं-खोटं गूणगाण अशा प्रकारच्या बाबी गुरू, बाबा बापू, मॉं, श्री, हे प्रवचनामार्फत, किर्तनामार्फत समाजामध्ये पसरवीत असतात. वारंवार ते रटुन रटुन सत्य असल्याचे सांगितले जाते. अशाच प्रकारे ते लोकांच्या डोक्यात फिट्ट होत असते, खरं ठरत असते.
इथे मी एक माझा खुद्द अनुभव सांगतो. समजदार, शिकलेला आणि कलाकार माणूस एक तुकडोजी महाराजाच्या जीवनातील त्याच्या दृष्टीने सत्य असलेली, की असावी अशा अट्टाहासाने सांगितलेली ही घटना, त्याने आपल्या आजीकडून ऐकून मला सांगून गेला, की महाभारतातील अमरत्व प्राप्त झालेला अश्वत्थामा तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष बघितला. अमरनाथच्या अंधाऱ्या गुहेमध्ये एकांतात तुकडोजी महाराजांना त्या अमर अश्वत्थाम्याचे दर्शन झाले. असा प्रत्यक्ष तुकडोजींनी त्याच्या आजीला हा सारा प्रसंग कथन करून सांगितला आणि ही गोष्ट सांगणारा माझा तो एक खुद्द उच्चभ्रू समाजातला मित्र आहे- केवढी मोठी थाप? थोडीशी कोणाची श्रध्दाळू वृत्ती दिसली की, असे अवैज्ञानिक आणि चमत्कृतीपूर्ण कथन केले म्हणजे सहजच आपले श्रेष्ठत्व सिध्द होत असते. असा त्यांचा खासा समज असतो. वैदिक(हिंदू) धर्मिय धार्मिकतेमध्ये वर्णवाद हे वैदिक(हिंदू) धर्माचे प्रमुख अंग आहे. आणि श्रेष्ठ वर्णाची अंमलदारी त्या धार्मिकतेमुळेच टिकून राहते. ही वर्ण श्रेष्ठता टिकून रहावी असे ज्यांना वाटते ते बहूजनांच्या डोक्यातून धार्मिकतेला कणभरही कमी होऊ देत नाहीत. कसल्याही प्रकारे ती कायम रहावी किंबहूना वाढीस लागावी यासाठी ते कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करायला तयार असतात. माझ्याही काहीशा (त्याला जाणवलेल्या) श्रध्दाळूपणाचा फायदा घेऊन त्याने हा प्रसंग माझ्यापुढे कथन केला.
परंतु पुढे जेंव्हा मी त्याला विचारले की तुकडोजी महाराज हे लेखक होते, कवी होते त्यांचे आज खुप मोठे साहित्य उपलब्ध आहे. तेंव्हा त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला हा ऐतिहासिक प्रसंग आपल्या साहित्यात का सामिल केला नाही? त्यांनी आपल्या जीवनातील खुपसे प्रसंग लिहून ठेवलेले आहेत. मग हाच का गाळला?
माझे हे प्रश्न ऐकून त्याचा चेहरा पडला. त्याला कळून चूकले होते, की आपला हा प्रयत्न फसला आहे. त्याने चर्चेचा विषय बदलून घेतला. तेंव्हा कळलं की यांचे हे डाव समजुन येण्यासाठी खुप मोठी सतर्कता, वाचन आणि मानसशास्त्रीय जाणिव हवी असते. खरे तर वैचारीकतेच्या अभावी खरी गुलामी येते हे मला तेव्हा कळले! कळले की, चळवळीच्या विचारांची समाजाला केवढी गरज आहे. समाजाला अशा सुधारक आणि परिवर्तनवादी चळवळी अप्रिय असतात, पण औषध कोणाला प्रिय असते?
-मनोज
स. बोबडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा