कारण कळले की भीती उरत नाही....


      ‘जिथे भयं आहे, तिथे लय आहे.’ हे तर मराठीतल्या म्हणीप्रमाणे वाक्य तयार झालेय. काही का असेना पण सत्य आहे, हे महत्वाचं. भयामुळे माणसाचे अपरिमित् नुकसान होत असते, मग ते कोणत्याही प्रकारचे का असेना, ते होत असते हा प्रत्येक जीवाचा परखड असा अनुभव असतो. हे कोणतीही प्रामाणिक व्यक्ती नाकबूल करणार नाही. भीती ही कोणत्याही स्वरुपाची असू शकते. ‘अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वा झाल्यामुळे वाटणारी परीक्षेची भीती.’ अवांतर संपत्ती घरी बाळगल्यामुळे चोरांची वाटणारी काल्पनिक भीती.’ दोरीला साप समजल्यामुळे वाटणारे भ्रमात्मक भय.’ ‘अंधाराचे भय वाटणे.’ ‘ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवल्याने भुताचे भय वाटणे.’ इ. प्रकारचे भय माणसाला नुकसानदायकच ठरत असते. या भयाने होणारा विनाश आपल्याला प्रत्यक्ष् जाणवत नसला तरी अप्रत्यक्षपणे आपला प्रभाव गाजवीतच असतो. हृदयाच्या नसांना कमजोर करत कोणत्याही बाबींवरील उपचारासाठी राबणाऱ्या विचारांना लुळे करण्याचे सगळे श्रेय ही भीतीच घेऊन जात असते. म्हणूनच तिच्या परिणामाची कल्पना असणाऱ्यांनी तीविषयी तारतम्य बाळगलेले कधीही चांगले. भीती वाटणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ती वाटली असता तिचा आपल्यावरील अंमल दृढ होऊ देऊन तिच्या अधीन होणे हे बरे नव्हे! माणसाला जेव्हा भीती वाटत असते तेव्हा त्यानं तटस्थ राहण्याची तयारी ठेवली पाहिजे जेणेकरून वाटणाऱ्या भीतीच्या कारणांचा शोध लावण्याचे बळ त्याला प्राप्त होईल! त्यानं जर त्या कारणांचा शोध न लावता त्याप्रती अनभिज्ञ राहिला तर ती त्याचा तर घात करेलच, तसेच तिच्याशी संबध येणाऱ्या अन्य मंडळीचाही नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शक्यतोवर भीतीला न भीता तिच्या तळापर्यंत जाऊन छडा लावणे हेच शहाणपणाचे, असे मला वाटते.
      आपण जरा भूताच्याच भीती विषयी बघुया! भारतात तसेच जगातही भूताची प्रचंड भीती बाडगणारे लोक राहतात. परंतु भूत म्हणजे भ्रम असल्याचे जगातील सर्वच तटस्थ शास्त्रज्ञांचे मत आहे. तरीही या भ्रमाची भीती बडगताना लोक दिसतातच. हा सर्व प्रभाव असतो आपल्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांचा, सभोवतालील परिस्थितीचा, आणि मित्र मंडळीतील चर्चेचा, कारण प्रत्यक्ष शोध घेतल्यानंतर कळते की, शेकडा नव्याण्णवांनी भूत बघितेलेच नसते. आणि जो कुणी एखादा भूत बघणारा असतो तो ऐकाणारांची मने उत्तेजित होईस्तोवर त्या प्रसंगाला तिखट-मिठाच्या फोडणीने खमंग करत असतो. मग भूताला आपल्या लेखी काही किंमत नसणाराही असले किस्से ऐकून ते सत्य असल्याचे मानू लागतो. त्यालाही रात्री कुठे जाणण्याचा प्रसंग येतो. आणि भुते ही रात्रीच दिसतात ही मान्यताही असते. सोबत असते ती भिण्यास प्रवृत्त करणारी भयंकर अंधारी रात्र. तसेच मित्रांनी ते सांगितलेले किस्से अश्या वेळी आठवणं. या इत्यादी बाबींमुळे भूतांमध्ये तथ्य असल्याचे जाणवायला लागते. म्हणून प्रत्यक्ष भूत न बघाणरेही आहे म्हणणाऱ्यांची बाजू घेतांना दिसतात. कारण 'हिप्नोटीझम' या प्रकाराचा मनावर अंमल असतो. असो!
      भीतीचे कारण कळले की भीती उरत नाही ही जाण देणारा मी अनुभवलेला एक प्रसंग सांगतो....तो आहे भूताविषयीचाच...एकदा वणीवरून राजूराला परतताना रात्र झालेली. आम्ही ‘ओमनी’ या गाडीतून सहा-सात जण असू, येत होतो. त्या वेळी रात्रीचे दोन वाजले होते. म्हणून मध्ये पडणाऱ्या भालर या गावी मुक्कामाच्या इराद्याने निघालो. भालर दोन-चार कि.मी. असेल, त्या आधी मी दोन-चारशे मीटर अंतरावरून एक भूत बघितलं. ती होती एका छोट्याशा पुलाजवळ पांढऱ्या साडीत हसत उभी असलेली एक ‘हडळ’, आपल्याकडे तिला बोलीत ‘लावडीन’ असे म्हणतात.    
     भूताविषयीची श्रद्धा माझ्या मनातून केव्हाचीच हद्दपार झालेली असतानाही प्रथमतः ते बघून मी प्रचंड घाबरलो, पण लगेच भूत नसते ही समज जेव्हा जागली तेव्हा मी ठरवले, बघुया ही हडळ काय असते ती! म्हणून मी सोबत असणाऱ्या कुणालाच त्याविषयी सांगितले नाही. मी एकटक तिच्याकडे बघत राहिलो. जस्-जसे आम्ही जवळ जाऊ लागलो तस-तसे त्या हडळीचे सत्य स्वरूप पुढे येत होते. ती पांढऱ्या साडीतील हडळ कणाकणाने एका पांढऱ्या सिमेंटच्या खांबात परिवर्तीत होत जात होती. माझा भ्रम फिटला होता. भूताचं अस्तित्व संपलं होतं. मला भीतीचे कारण कळले होते. मी निर्धास्त झालो होतो. तेव्हा मला दूरदर्शन वरील एका जाहिरातीचा संदेश कळला होता की, ‘डर के आगे जीत है!’

मनोज बोबडे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रबोधन गीत

ऐक जरा साजणे...

हे असं आहे तर...