शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

ललित

कवी : एक बादशाह  

कवी काहीही बोलला तरी ते लालीत्याच्या, सौंदर्याच्या शिखरावर नेऊन ठेवतो. खोट्यातली खोटी आणि लहानातली लहान गोष्ट देखील सत्य ठरवून हिमालयाच्या उंचीची करण्याचं कसब कवीमध्ये बखुबी वास करते. त्याला सांगायचे आहे ते किती उदात्त आहे! हे त्याचे शब्द मोठ्या चलाखीने बयाँ करतात. आणि वाचकांच्या कोमल हृदयाचा ठाव घेतात. 

कवी खऱ्याला खोटं ठरवण्याचाही हटकून प्रयत्न करतात बरेचदा! त्याचं अनामिक तंद्रीत, कैफात नांदणं लौकिकापासून अंतर राखायला मजबूर करते. हीच अवस्था त्याला चमत्कृतीपूर्ण भावना उजागर करण्याचे अपार बळ देते. आणि मग ते शब्दांचे विहंग त्याचा अर्थ लावण्यात तल्लीन असलेल्या कोमल हृदयाला लुचायला भिरभिरत राहतात!


कवीला नेमके, हवे तेच सांगायचे असते, यासाठी ते घेतात कवितेचा आधार कारण कविता कोमल हृदयाचा ठाव घेते! 


कधी सूर्यालाही चंद्र म्हणून सांगायला मागेपुढे पाहत नसतो कवी. केवढी धिटाई असते ना त्याच्यात! 


शब्दांचा बादशाह असतो कवी. आपल्या अवाक्यातले सारे काही नियंत्रणात राखणारी, प्रजेला आदेशाबरहुकूम दिग्दर्शन करणारी शब्दार्थ जगतातली तीच बादशाहीयत कोमल हृदयाचा ठाव घेते!


म्हणून तो सांगेल ते सगळच गोड वाटते, विनयी, लीन, सश्रद्ध, संवेदनशील, कोमल हृदयाला. म्हणून वाचकाने कवींवर श्रध्दा ठेवू नये! 


कारण कवींच्या अधीन गेले की व्यवहार अपंग होत असतो!


-मनोज बोबडे 

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

विवेक

 विचारधन 

रुपकात्मक 


'म्हणे अध्यात्म हा एक ज्ञानमार्ग आहे, वृत्ती मार्ग नव्हे. ज्ञानमार्ग म्हणजे काय याचा थोडा खुलासा कराल का?.....एखाद्या विषयात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी आवश्यक असलेले मुद्दे म्हणजे त्या विषयाचं ज्ञान आणि ते जमवण्याचा मार्ग, तो ज्ञानमार्ग का? ज्ञानामुळे नम्रता न वाढता जर नुसता अहंकारच वाढत असेल तर ते ज्ञान नव्हेच! तो फक्त माहितीचा साठा. ज्ञान पचलं तर त्याची वृद्धी होते जर नाही पचलं तर त्याचा अहंकार होतो.'

संदर्भ- सुनिता देशपांडे (प्रिय जि.ए.)

- विज्ञान वैज्ञानिकांची किंवा प्रचलीत समजुतींची सत्ता मानत नाही. म्हणूनच विज्ञान नव्या विचारांचा गळा घोटत नाही.

- सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आवाज कधी बुद्धया तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलन शक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे म्हणजे विवेक.

- प्राण्यांना माणसाळवण्या पेक्षाही महत्त्वाचा होता शेतीचा शोध. मात्र या शोधापायी धर्मांमध्ये रक्तरंजित रूढींचा शिरकाव झाला व शतकानूशतके त्या रुढी सुरू राहिल्या.

- इतिहास पूर्व काळातील सर्वात शेवटची महत्त्वपूर्ण नवनिर्मिती म्हणजे लेखन कला.


-बर्ट्रान्ड रसेल 

आपल्याकडची ऊर्जा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याची भीती लोकाना का वाटते आहे ? जीवाश्म इंधनाचे उपलब्ध साठे संपले, तर येणाऱ्या भयावह संकटाचा इशारा का दिला जातो आहे? जगात ऊर्जेची कमतरता नाही हे स्पष्ट आहे. आपल्या गरजांप्रमाणे तिचं रूपांतर करून ती कशी उपयोगात आणायची याबाबतच्या ज्ञानाची फक्त कमतरता आहे.....

सूर्य जी ऊर्जा रोज फुकटात देतो, त्या ऊर्जेशी संगळ्या जीवाश्म इंधन साठ्यांमधून मिळणाऱ्या ऊर्जेची तुलना करता; या साठ्यांमधली ऊर्जा नगण्य आहे. सूर्याच्या ऊर्जेचा एक लहानसा अंश पृथ्वीवर पोहोचतो. सूर्याची संपूर्ण वर्षभराची ऊर्जा मोजली, तर ती *३७,६६,८०० एक्झाज्यूल इतकी भरते. (ज्यूल हे ऊर्जेचं मेट्रिक मोजमापातलं एकक आहे. एक ज्यूल म्हणजे एक छोटं सफरचंद एक मीटर उंच उचलण्यासाठी लागणारी ऊर्जा. एक एक्झाज्यूल म्हणजे एक बिलिअन ज्यूल्स होतात.)* जगातल्या सर्व वनस्पती मिळून प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे फक्त तीन हजार एक्झाज्यूल्स ऊर्जा बंदिस्त करतात. *सर्व मानवी कृती आणि उद्योगधंदे मिळून दरवर्षी पाचशे एक्झाज्यूल्स ऊर्जेचा उपयोग करतात. पृथ्वी सूर्याकडून तितकीच म्हणजे ५०० एक्झाज्यूल्स ऊर्जा फक्त ९० मिनटांमध्ये मिळवते.*ही केवळ सौरऊर्जा झाली. याच्या जोडीला आपल्या भोवताली अणुऊर्जा, गुरुत्वाकर्षण शक्ती यांसारखे इतर प्रचंड ऊर्जास्रोत आहेत. त्यांपैकी गुरुत्वाकर्षणातून निर्माण होणारी ऊर्जा चंद्राच्या पृथ्वीवर होणाऱ्या आकर्षणामुळे समुद्रावर येणाऱ्या भरतीओहोटीतून अगदी स्पष्ट होते.


(संदर्भ :- सेपिअन्स - ले. युवाल नोवा हरारी )

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

सावध करणारा लेख

रुपकात्मक 

प्रेरणादायी मराठी लेख 

प्रतिभा परावलंबी होऊ देऊ नये !

            भुतकाळातील तापदायक गोष्टींना विसरणे हे वर्तमानातील हर्षाला एक सुंदरसे सौख्यरूप प्रदान करत असते. त्यामुळेच वर्तमानाला एकाग्रतेने, धैर्याने, सतर्कतेने आणि प्रेमाने जगता येते. परंतु वर्तमान क्षणी जगता भुतकाळाचा आठव हा लाभलेल्या क्षणांचा पुरेपुर आस्वाद घेऊ देत नाही. सारी जागरूकता विस्कळीत करून टाकते आणि ‘एक ना धड भराभर चिंद्या’ असला प्रकार घडुन येतो. म्हणून त्या क्षणाशी निगडीत असलेल्याच गोष्टींचा विचार करून प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे लाभलेले क्षण प्रेमाने जगले पाहिजे! भुतकाळात घडलेल्या चुकांची चिकित्सा करत नव निर्मितीने घडत गेलं पाहिजे! कित्येकदा आपले अनुभव आपल्याला असली शिकवण देऊन जात असतात की त्या कष्टदायक गोष्टींनी आपण पार विचलीत झालेलो असतो पण त्या गोष्टी उपजल्या त्या कशा याचीही जाण आपल्याला ठेवायला हवी!.

        ‘कोणतीही गोष्ट आपल्याला लाभत नाही ती दुसऱ्यांनी आडकाठी आणली म्हणून’. हा विचार तसा संपुर्णपणे खरा आहे असं म्हणता येत नसलं तरी तो पुर्णपणे खोटा आहे असंही म्हणता येत नाही! आपल्यातली कमीपणा कायम राहावी, आपण कुठल्याही यशाने आनंदी होऊ नये, यासाठी दुसऱ्यांचे (म्हणजे स्वार्थी आणि दुसऱ्यांचं भलं न पहावलं जाणाऱ्यांचे) प्रयत्न चाललेले असतात, आपल्या विधायक कृतीनं ज्यांच्या हितसंबंधांना बाध येतो ते अशा कृतींना संपविण्यासाठी जिवापाड खपतात. हे काहीसं खरं असतं. याचं कारण असते ‘आपली आजवरची मक्तेदारी संपुष्टात येणार’, याची त्यांना वाटणारी भिती. कोणत्याही निर्मळ आनंदावर प्रत्येक मानव प्राण्याचा जन्मसिध्द हक्क असतो, मग तो आनंद ज्ञान क्षेत्रातला असो, कला क्षेत्रातला असो वा कोणत्याही आपल्याला प्रिय वाटणाऱ्या क्षेत्रातला असो! त्यात कोणाची मिरासदारी ही समताप्रिय माणसाला तरी आवडणारी बाब नक्कीच नाही, नसावी !

      सुधारकांच्या नुसार, ‘समतेचा अर्थ समान गुणवत्ता वा समान जीवनसमृध्दी असा न घेता, समान हक्क आणि समान संधी देणे’ अशा अर्थानेच घेतला पाहिजे! म्हणून अशाप्रकारची समता अंगिकारणाऱ्यांनी निकोप निर्मितीचा ध्यास सोडणं, मानव्याधिष्टीत बाबींप्रती उदासिन होणं हे टाळलं पाहिजे! ज्ञानाचे अंमलदार म्हणून स्वतःची जाहिरात करणाऱ्यांची कुटीलता समजुन घेतली पाहिजे! असे हे अंमलदार ज्यांचा तिरस्कार करतात त्यांचे कौतुक करू करू त्यांना संपविण्याचा प्रयत्न करतात.

        एकुन केसाने गळा कापण्याचाच प्रकार असतो हा! जे असल्या प्रकाराला समजून घेतात तेच आपल्या अस्सल आणि प्रामाणिक प्रतिभेला उजागर करण्याचा दमखम राखतात. जे असली सतर्कता बाळगत नाही ते त्यांच्या प्रयत्नांना सफल करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतात. म्हणून आपण आपल्या वेंधडेपणाकडे दुर्लक्ष करून राहणं हे स्वतःला कोण्या परिघात अडकवल्या सारखंच आहे. किंवा तो प्रतिभावंत पराधीन असल्यासारखा आहे.

           कुणी आपल्याला कमी लेखण्यासाठी काय डावपेच आखतात, कोणते छाक्केपंजे लढवतात यात लक्ष घालून आपण आपलं सुख, आनंद, कर्तव्य यांना दवडणं हे समजुतदारपणाचं लक्षण नव्हे! दुसऱ्यांच्या अशा वागण्याकडे लक्ष देऊन आपल्या मन, मेंदुना बाधीत करून आपल्या नवनिर्मितीच्या आनंदापासून निवृत्ती घेण्याने आपण आपल्यासोबत आपल्या समाजाचं, प्रेमीजनांचं, रसिकांचं एकंदरीत नुकसानच करत असतो.

        म्हणून जगण्याची कला जाणणाऱ्यांनी भुतकाळातील तापदायक गोष्टींना विसरणे आणि आपल्या यशस्वी वाटचालीत आडकाठी आणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे, हे पथ्य अगत्याने पाळले पाहिजे! पण याचा अर्थ असा नव्हे की, त्या आपल्याला कष्टदायी ठरणाऱ्या गोष्टी ज्या चुकांमुळे घडल्या त्या चुका परत परत आपल्या कडुन घडाव्या!...नाही. त्या चुका कोणत्या कारणांमुळे घडल्या याचा शोध घेतला पाहिजे आणि त्या चुका पुन्हा घडु नये असा वर्तमानात प्रयत्न करीत राहिलं पाहिजे, आणि आपल्या यशात अडंगा आणणाऱ्यांना आपल्याकडुन मदत व्हावी असे वागणे सोडले पाहिजे! समतेचा तिटकारा बाळगणाऱ्यांना समजदारांनी तरी आपल्या लेखी स्थान देऊ नये आणि आपला मानव्याधिष्टीत नव निर्मितीचा ध्यास कदापी सोडु नये!


-मनोज बोबडे

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

अभंग.

 

रुपकात्मक 


आशयात खोल


आशयात खोल, चला रे डुंबूया l

 समजून घ्याया, सार सारे ll 


 अर्भकाचे हास्य, किती निरागस l 

 त्याचा मनी ध्यास, बाळगावा ll


 संसाराचा व्याप, अनुदिन ताप l

 सुगंधी आलाप, ऐकू कधी ll


 सावलीची माया, अगाध परंतु l

 उन्हाचाही हेतू, हीन कैसा? ll


 कळले का कोणा, जाता हरिद्वारी l

 प्रसंगाच्या उरी, काय आहे?ll


 असो दीन कोणी, जगताचा शाह l

 जगण्याचा मोह, सोडू नये ll


-मनोज बोबडे

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

कविता,

 


पुरे हाच एक धागा


तुझ्या काळजात जरा 

दे ना राहायास जागा 

तुला मला सांभाळाया 

पुरे हाच एक धागा


हाच धागा तुला मला 

हारावानी ओऊनिया 

नित ठेवेल साजणी 

जिव्हाळ्यात गोवूनिया 


जिव्हाळ्यात गोवूनिया 

जगूयात मनभर 

अन विटू एकमेका 

तेव्हा होऊयात दूर 


दूर होऊनी वाढेल

ओढ माझ्या प्रती पुन्हा

होऊ मोकळे प्रीतीचा

गडे करायास गुन्हा


-मनोज बोबडे

२७ जून २०२०

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

प्रबोधन

प्रतीकात्मक 

 

वैचारीकतेचा अभाव माणसाला गुलाम करतो!

        

        अतिशय श्रध्दाळु, धार्मिक आणि देववादी लोकांचा या गोष्टींवर विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे. मीही कधी काळी हया स्तरात मोडणारा हया बाबींना तथ्यहीनच मानत होतो. एकूण बौध्दिक विचारसरणीचा डोळसपणे विचार करायला जाता ते सारं काहीसं कळून यायचं, पण वरील बाबींचा पगडा जास्त असल्यामुळे बुध्दी पांगळी ठरत होती. श्रध्दाळू माणसाच्या मष्तिष्कात पाप-पुन्य, पूर्नजन्म याचं प्राबल्य बलवान असेल तर त्याची छाती भय, संकोच, चिंता हया हिमालयरूपी नगाखाली दडपल्याशिवाय राहत नाही; तर मग कोणत्याही धार्मिक, देववादी श्रध्देच्या स्थानांविषयी सत्य सांगून त्या डगमगत असतील तर कोण श्रध्दाळू व्यक्ती ते पाप करू धजेल? कोणत्याही धार्मिक बाबींविषयी प्रत्येकाला सत्य काय आहे याची थोडी तरी जाणिव असतेच. बालपणापासूनचे संस्कार अमक्या-तमक्या धारणेचा प्रभाव, अवाजवी श्रध्दाभावना आणि स्वतःच्या धर्माचा, मान्यतेचा अहंगंड या आधारे तो समजुन येणाऱ्या सत्याला दूर सारत असतो. मुद्दामहुन, जाणुन-बुजुन! आपण ज्या मान्यतेचा स्विकार केला आहे. ती जर हीन प्रतिची ठरायला लागली तर सत्याच्याच दृष्टीत मोठा असणारा ‘मी’ दुखावल्या जाईल ही भीती असते.
         माणूस हया आणि अशाच प्रकारच्या इतर कारणांनी वास्तवाला, खरेपणाला अंगीकारत नसतो. कोणी काय सांगतात ते अगदी डोळे मिटुन खरे मानण्याची सवय लागून गेलेली असते आणि त्या धर्म विषयक बाबी असतील तर विचारायलाच नको. अशाच प्रकारच्या स्वभावाचा अंध, भावूक माणसाचा, त्यांच्या मानसिकतेचा चलाख, स्वार्थी लोक आपलं श्रेष्ठत्व राखण्याचा प्रयत्न करणारे अगदी घेता येईल तेवढा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत असतात.
        ईश्वरी संकल्पना सत्य मानल्या जाते. अगदी परम सत्य! परंतु धुर्त लोक या परम सत्य मानल्या गेलेल्या संकल्पनेचा लोकांमधे भीती पसरवून स्वतःचं श्रेष्ठत्व सिध्द करून गैर फायदा घेण्यासाठी उपयोग करीत असतात.- धर्माचंही तसंच, धर्म हा समाजाचं धारण करण्यासाठी असतो असं फक्त सांगण्यासाठी म्हणून सांगितल्या जाते. प्रत्यक्ष बघता धर्माचे कायदे, नियम हे मानवामानवात दुरावाच निर्माण करणारे असतात. मानवतावादी असं तत्वज्ञान सांगुन मानव्याला उच्च कोटीला पोहचविण्याचं कामही एकीकडे धर्म करीत असतो पण या तत्वज्ञानापेक्षा कर्मकांडीय धर्मच बहुतेकांना हवा असतो. पंथ, संप्रदाय, गुरू, शिष्य, तिर्थस्नान, मंदिर, पुजा, जप, तप, यज्ञ, आरत्या, मंत्र, तिर्थप्रसाद, अनुष्ठान, माळ, दूध, तूप, फुले, पाने, फळे, आणि अशा कित्येक बाबी आहेत की, ज्या ईश्वराला प्राप्त करण्यासाठीच निर्माण झालेल्या आहेत. असे धर्म सांगतो. कित्येक हजार वर्षापासून आजतागायत हया सर्व बाबींचा ईश्वराला आळविण्यासाठी, मिळविण्यासाठी उपयोग केला गेला.
        तो ईश्वर मिळाला किती? तो आहे कसा? ईश्वर म्हणजे असते काय? हया प्रश्नाची समाधनकारक आणि अंतीम उत्तरं आजवर कुणीही देवू शकला नाही. फक्त शब्दांचे जंजाळ उभे करून अतर्क्य गोष्टींच्या उदाहरणाद्वारे भक्तांना गोंधळात टाकुन अडकवुन ठेवण्याचाच जास्त प्रयत्न होताना दिसतो. इथे प्रत्येकाचे ईश्वर हे वेगवेगळे असल्याचंच आपण बघतो. ते ईश्वराचा आधार घेवून चलाखी आणि डावबाजपणा करणारे आपल्यापरीने ईश्वराची व्याख्याच करून टाकतात. अशा प्रकारे ईश्वराचा जन्म होतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानुसार प्रत्येक ईश्वर शोधकास सापडलेला ईश्वर स्वतंत्रपणे निर्माण झालेला आहे. आणि त्यासोबतच त्याच्या जाती, त्याचे धर्म, पंथ, संप्रदाय, गुरू काय न काय निर्माण होत गेले.
        समाजातील भीती, दुःख, दैनंदिन गरजा या गोष्टींचा ईश्वर अधिक सामान्य जन यांच्यामध्ये दलाली करणाऱ्यांना चांगलाच लाभ घेता येतो आहे. आणि हयाच आधारे सर्वसाधारण जनतेला ते आपल्याशी जोडून त्याच्या डोक्यात बधीरतेची लस टोचत राहतात. इथे नको त्या कथा, नको ते चमत्कार, पारलौकिकतेच्या आधारे कोण्या एका वर्गाचं श्रेष्ठत्व, गुरूची महती, ईश्वराचं खोटं-खोटं गूणगाण अशा प्रकारच्या बाबी गुरू, बाबा बापू, मॉं, श्री, हे प्रवचनामार्फत, किर्तनामार्फत समाजामध्ये पसरवीत असतात. वारंवार ते रटुन रटुन सत्य असल्याचे सांगितले जाते. अशाच प्रकारे ते लोकांच्या डोक्यात फिट्ट होत असते, खरं ठरत असते.
        इथे मी एक माझा खुद्द अनुभव सांगतो. समजदार, शिकलेला आणि कलाकार माणूस एक तुकडोजी महाराजाच्या जीवनातील त्याच्या दृष्टीने सत्य असलेली, की असावी अशा अट्टाहासाने सांगितलेली ही घटना, त्याने आपल्या आजीकडून ऐकून मला सांगून गेला, की महाभारतातील अमरत्व प्राप्त झालेला अश्वत्थामा तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष बघितला. अमरनाथच्या अंधाऱ्या गुहेमध्ये एकांतात तुकडोजी महाराजांना त्या अमर अश्वत्थाम्याचे दर्शन झाले. असा प्रत्यक्ष तुकडोजींनी त्याच्या आजीला हा सारा प्रसंग कथन करून सांगितला आणि ही गोष्ट सांगणारा माझा तो एक खुद्द उच्चभ्रू समाजातला मित्र आहे- केवढी मोठी थाप? थोडीशी कोणाची श्रध्दाळू वृत्ती दिसली की, असे अवैज्ञानिक आणि चमत्कृतीपूर्ण कथन केले म्हणजे सहजच आपले श्रेष्ठत्व सिध्द होत असते. असा त्यांचा खासा समज असतो. वैदिक(हिंदू) धर्मिय धार्मिकतेमध्ये वर्णवाद हे वैदिक(हिंदू) धर्माचे प्रमुख अंग आहे. आणि श्रेष्ठ वर्णाची अंमलदारी त्या धार्मिकतेमुळेच टिकून राहते. ही वर्ण श्रेष्ठता टिकून रहावी असे ज्यांना वाटते ते बहूजनांच्या डोक्यातून धार्मिकतेला कणभरही कमी होऊ देत नाहीत. कसल्याही प्रकारे ती कायम रहावी किंबहूना वाढीस लागावी यासाठी ते कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करायला तयार असतात. माझ्याही काहीशा (त्याला जाणवलेल्या) श्रध्दाळूपणाचा फायदा घेऊन त्याने हा प्रसंग माझ्यापुढे कथन केला.
        परंतु पुढे जेंव्हा मी त्याला विचारले की तुकडोजी महाराज हे लेखक होते, कवी होते त्यांचे आज खुप मोठे साहित्य उपलब्ध आहे. तेंव्हा त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला हा ऐतिहासिक प्रसंग आपल्या साहित्यात का सामिल केला नाही? त्यांनी आपल्या जीवनातील खुपसे प्रसंग लिहून ठेवलेले आहेत. मग हाच का गाळला?
        माझे हे प्रश्न ऐकून त्याचा चेहरा पडला. त्याला कळून चूकले होते, की आपला हा प्रयत्न फसला आहे. त्याने चर्चेचा विषय बदलून घेतला. तेंव्हा कळलं की यांचे हे डाव समजुन येण्यासाठी खुप मोठी सतर्कता, वाचन आणि मानसशास्त्रीय जाणिव हवी असते. खरे तर वैचारीकतेच्या अभावी खरी गुलामी येते हे मला तेव्हा कळले! कळले की, चळवळीच्या विचारांची समाजाला केवढी गरज आहे. समाजाला अशा सुधारक आणि परिवर्तनवादी चळवळी अप्रिय असतात, पण औषध कोणाला प्रिय असते?

-मनोज स. बोबडे
 
 
                                   

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

काही श्लोक


 

                 

                             किती काळ आराधना मीहि केली

   किती रे तुझी पायरी झीजवीली

    म्हणे भक्त ते तू असे विश्वव्यापी

    तुझा अंश मी पाहिला ना कदापी

                      

    किती काळ तो साहणे द्वेष त्यांचा

   किती शब्द प्रमाण मानू तयांचा

    इथे भ्रष्ट मानव्यता ज्यांनि केली

                 कसा मान राखू अशा देवतांचा               


   कुणा हीन मानू नको सुज्ञ बा रे

  इथे सर्व कच्चे जनांचे किनारे

   कुणी आगळे नी कुणी वेगळाले

  सदा माणसे शोधताती सहारे

 

    कुणी गुंतले गुंतले या ठिकाणी

    कुणी धन्य येथे कुणी त्या ठिकाणी

     मजा वाटते हीन म्हणता कुणाला

     रूचे साम्यता ही कुणाच्या मनाला

 

-मनोज बोबडे 

ललित

कवी : एक बादशाह    कवी काहीही बोलला तरी ते लालीत्याच्या, सौंदर्याच्या शिखरावर नेऊन ठेवतो. खोट्यातली खोटी आणि लहानातली लहान गोष्ट देखील सत्य ...