शस्त्रक्रिया

अलीकडेच पाऊस पडून गेला होता. सारे रस्ते सारवल्यासारखे स्वच्छ, चकाकदार नी निर्मळ झाले होते. आसमंत सावळा होऊन हसत होता. नुकत्याच बाथरूममधून न्हाऊन बाहेर निघालेल्या स्त्रीच्या केसातुन पाणी निथळावे तसे झाडांच्या पानापानातून थेंब सांडत होते. अशा वातावरणात चकाकणार्‍या डांबरी रस्त्यावर एक मुलगा त्याच्या मैत्रीणीस निरोप देऊन डोळे पुसत जात होता.

हे दृश्य प्राजक्ता शेजारीच असलेल्या बंगलेवजा घराच्या खिडकीतून निशानेबाजाच्या नजरेने बघत होती. एकटक, स्थिर! तिच्या मनात चालत असलेलं द्वंद्व तिला त्या दृष्यातून प्रतीत होत होतं. तिचे विचार विश्व नकारात्मक भावनेने भरलेले होते. यामुळेच त्या दृश्याने तिच्या चेहऱ्यावर कमालीचे औदासीन्य पसरवले होते. चेहरा मलूल बनला होता. ही तिची अवस्था शेजारीच बसलेली सई बारकाईने न्याहाळत होती.

भिवया उंचावून सईने नजर फिरवली. ती पडली सरळ भिंतीवरील फोटोवर. जी प्राजक्ताचीच पेंटिंग होती. गर्द फुलांच्या कुंडी शेजारी व्हीलचेअरवर बसलेल्या प्राजक्ताची ऑइल पेंटिंग होती ती.

"वाव! किती मस्त चित्र आहे ग तुझं! कोणी काढलं? तो रेखाटलेला चेहऱ्यावरील जिवंतपणा, ती रंगसंगती, ती ब्रशची कलाकारी. क्या बात है!"

हे सारे ऐकून न ऐकल्याच्याच अविर्भावात प्राजक्ता होती.

"प्राजक्ताssss?" सई जवळजवळ ओरडलीच. तोच आवाज प्राजक्ताला बोलविता ठरला.

"हो छानच आहे, विप्लवनी काढले आहे."

"मी सांगते हा खूप मोठा आर्टिस्ट होणार, बघच तू!"

"हो तो गुण आहे त्याच्यात, मला माहिती आहे. आणि तसे इतरही बरेच गुण आहेत."

प्राजक्ताच्या चेहऱ्याची उदासी हेरलेल्या सईला तिचे हे बोलणे ऐकून 'कुछ तो गडबड है।' याची तिला खात्री झाली होती. म्हणून सई प्राजक्ता जवळ येऊन तिचा हात हाती घेत नम्रपणे विचारु लागली.

"काय झालं प्राजक्ता? विनम्रची प्रतिभा मला माहीत नसली तरी त्याचे आणि तुझे एकमेकावर खूप प्रेम आहे, हे मला चांगलेच ठाऊक आहे. याबद्दल तू तासनतास माझ्याशी बोलली आहेस. आजवर खूप प्रेमळ, समजदार, मोकळ्या मनाचा, प्राकृतिक स्वभावाचा अशा बिरुदांनी विप्लवचे गुण गाणारी प्राजक्ता अचानक अशी उपरोधिक का बरं बोलू लागली?"

सईला अनामिक भीती वाटत होती. प्राजक्ता आणि विप्लव एकाच अवस्थेचे. दोघेही विकलांग होते. या त्यांच्या समदुःखीपणापाईच ते दोघे परस्परांच्या जवळ आले होते. खूप भरभरून प्रेम करू लागले होते. विप्लवचा प्राजक्तावर खूप जास्त जीव होता. आणि प्राजक्ताचेही त्याच्यावर अपार प्रेम होते; पण या क्षणी प्राजक्ता फारच कष्टी दिसत होती. आताचे तिचे तुसडेपणाने बोलणे सईला विचार करायला लावत होते.

म्हणून सईचे तिला प्रश्न विचारणे सुरु होते. प्राजक्ताने ठरवले होते ती कोणत्याही परिस्थितीत, कधीच जीवनाच्या अंतापर्यंत विप्लवशी नाते तोडणार नव्हती. त्याच्यापासून कधीच प्राजक्ता दूर होणार नव्हती. तिनी यावर सईशी बरेचदा चर्चा देखील केलेली होती; पण आता तिला हे प्रेम जीवनभर चालेल की नाही याची शंका येऊ लागली.
का? का याबाबत सईला काही की काहीच थांगपत्ता नव्हता. परवाच दुबईवरून आलेली सई न कळवता भेटायला येऊनही प्राजक्ताला याचे कसलेच आश्चर्य नव्हते. याचे कारण होते. या चारच दिवसांपूर्वी पहाटे पहाटे तिला पडलेले स्वप्न. तेव्हापासून प्राजक्ताचे मन विचलित झाले होते. तिच्या मनाच्या गोंधळाने तिला पुरते विचलित करून सोडले होते.

प्राजक्ताला असे स्वप्न का पडले? याआधी काय चालले होते तिच्या डोक्यात? खरेतर या महिन्याभरापासून चाललेल्या यांच्या शास्त्रक्रियेबद्दलच्या निर्णयाचाच हा परिणाम होता. विज्ञानाने आश्चर्यकारकरित्या प्रगती केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कारिक शस्त्रक्रियेने हे दोघेही चालायला लागतील अशी शेकडा नव्यान्नव टक्के डॉक्टरांकडून दोघांनाही ग्वाही मिळाली होती. त्यामुळेच या उभय जीवांनी उपचार करायचा असे ठरविले होते. सर्व प्रकारची माहिती घेऊन हे सर्व सोपस्कर करायचे असे आठ दिवसापूर्वीच ठरविण्यात आले. हल्ली यांचे मध्ये मध्ये डॉक्टरांकडे जाणे होते, ते याच कारणाने. तेव्हापासून आजवर त्यांच्या सगळ्या तपासण्या पूर्ण झाल्या होत्या. आता पुढील शनिवारी प्राजक्ताची आणि विप्लवचीही शस्त्रक्रिया होणार आहे. विप्लवची शस्त्रक्रिया मुंबईमधील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत होणार आहे आणि प्राजक्ताची नागपुरातील विशेष प्रवीण डॉक्टर शस्त्रक्रिया करणार असे यांना सांगण्यात आले.

विप्लवनी सर्व तयारीनिशी चार दिवसांपूर्वीच मुंबई गाठली. आणि प्राजक्ता दोन दिवसांनी नागपूरला जाणार आहे; परंतु आत्ताच प्राजक्ताच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तिच्या कालच्या स्वप्नाने तिचे संपूर्ण होश उडवले. विप्लवचे ते तार्किक वागणे, बोलणे आणि शेजारील काकांचे जे प्राजक्ताचे ज्येष्ठ मित्र आहेत. त्यांनी वर्तवलेले विप्लवविषयीचे भविष्य या साऱ्याकडे बघता प्राजक्ता पुरती हताश झाली होती. या 24 तासांच्या काळातील एकाही क्षणाने तिच्या मना, मेंदूचा पिच्छा सोडला नव्हता.

प्राजक्ताच्या स्वप्नामुळे, त्या मित्र काकांनी वर्तविलेल्या भविष्यामुळे घेतलेल्या धास्तीने प्राजक्ता बरीच विचलित झालेली बघून सईही विचारात पडली. तिला यावर काय बोलावे कळत नव्हते. तरी या क्षणी शांत राहून चालणार नव्हते. सईनी प्राजक्ताला समजाविण्याचा असफल प्रयत्न केला.

"मला वाटते तू हे पाण्यातून दिसणाऱ्या काठीला बघावे तसे बघते आहेस. जी सरळ कधीच दिसत नाही. याचा अर्थ ती वाकडीच असते, असे नाही! काही घडण्याआधी कयास करणे बरे नसते, प्राजु. प्रकृती बिघडवत असते ते. सोड हे सगळं. सत्य ते स्वीकारण्याचे धाडस ठेव. उगाच कृत्रिम विचार करून तरसवू नकोस स्वतःला. असं किंवा तसं हा विचारच कशाला करायचा? परिस्थितीनुसार जे घडायचे, ते घडणारच आहे. तू अपंग आहे ही परिस्थिती तुला व्हीलचेअरचा पर्याय मिळवून गेलीच ना? तसेच साऱ्या बाबींचे. उपचार नसले तरी पर्याय असतोच."

सईचा प्रयत्न सफल होईल अशी सध्याची प्राजक्ताची मनस्थितीच नव्हती

सईने विप्लवचे बोलणे ऐकले नाही ना आणि तिचा ज्योतिषावर विश्वासही नाही. म्हणून ती असे बोलत आहे. आपल्याला काकांनी सांगितलेली सर्व भविष्ये खरी ठरली होती. त्यांच्या म्हणण्यावर आपला पूर्ण विश्वास होता. त्यातल्या त्यात आपल्याला ते पडलेले स्वप्न, हल्ली आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांना दुजोरा देणारे होते म्हणून आपल्याला चिंता वाटत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आणि त्या काकांच्या सुद्धा! तो बरा होईल, चालायला लागेल, फिरायला लागेल, सर्वसामान्यांप्रमाणे स्वतःचे स्वतः करू लागेल असे आपल्याला सारखे वाटत आहे.

त्या बरा झालेल्या विप्लवला प्राजक्तासारख्या परान्नपुष्ट व्यक्तीची आता गरज कशी असणार? एवढा हुशार, मोठा कलावंत होण्याची त्याच्यात क्षमता आहे. आतापर्यंत त्याच्या त्या अवस्थेमुळे त्याच्यावर मर्यादा होती. ती आता असणार नाही. तो मोठा व्हावा पण त्याने आपल्याला सोडू नये, त्याच्या सर्व सर्व यशात आपण सहभागी असावे असे तिला या दोन दिवसापूर्वीपर्यंत वाटायचे; पण हे सारे बघता तसे होईल असे या घडीला प्राजक्ताला वाटत नाही आहे.

"जे होत असते परिस्थितीनुसार, कृतीनुसार होत असते आणि जे होते ते मोकळ्या मनाने स्वीकारले पाहिजे!"

विप्लवच्या अशा सततच्या बोलण्याने प्राजक्ताच्या मनात हल्ली फार गोंधळ माजला आहे. या शस्त्रक्रिया व्हायच्या नसत्या तर असले विचार तिच्या मनात आलेच नसते. असे एकूण तिच्या हळव्या, कोवळ्या व अत्यंत भावुक मनाची अवस्था बघितल्यावर वाटल्यावाचून राहत नाही.

वारा सुसाट सुटला की, झाडांची पाने जोरात फडफडू लागतात. पिकली पाने जोमाने गळू लागतात. विचारांच्या वादळामुळे अशीच फडफड, सडसड प्राजक्ताच्या मनात चालली होती. आणि तिच्या कमजोर, अगदीच लुळ्या विचारांना हादरे बसत होते.

प्राजक्ताला आता कोणत्याच प्रकारे समजावून काही होणार नाही असे तिची अवस्था बघता सईला एव्हाना उमगले होते.

"प्राजक्ता तू फक्त ह्या शस्त्रक्रिया होईस्तोवर शांत राहावंस! ज्यावर काही नसतो त्यावर काळ हाच एक जालीम उपाय असतो. म्हणून आता फक्त वाट बघणे एवढेच तुझ्या हाती आहे." सईचं एवढंच समजावणीचं बोलणं बाकी होतं. ती ते बोलली.

सई शुक्रवारला परत जाणार होती. सोबत तिचा मुलगा सार्थकही होता. तो आता पाच वर्षाचा आहे. ते दोघेही मायलेक जाणार होते. येथे ते पंधरा दिवसांसाठी आले होते. अशोकला रजा मिळाली नव्हती. नंतर एक वर्षाने सगळी फॅमिली येणार होती.

"बरं जास्त विचार करू नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस! बाय, येते मी. आणि हो कोणतीही नकारात्मक घटना, दृष्य, विचार बघून, ऐकून त्या आपल्याशीच निगडित आहेत असा भ्रम पाडू नकोस! मला कळले तू ते बाहेरचे विरहाचे दृष्य बघून पुन्हा जास्तच कष्टी झाली होती. निगेटिव्ह थिंकिंग इज इंज्युरियस टू हेल्थ, डार्लिंग!" एवढे बोलून साईंनी निरोप घेतला.

या चारच दिवसात चेहऱ्यावरचा ओलावा सुकलेली प्राजक्ता वाळवंटाप्रमाणे भकास दिसत होती. विप्लव बरा झाल्यावर आपल्याला नेहमीसाठी सोडून जाईल, ही विलक्षण भीती प्राजक्ताच्या मनात फेविकलच्या मजबूत जोड सारखी चिकटून बसली होती. शस्त्रक्रिया होईपर्यंत तरी ती सुटणारी नव्हती. हे अगदीच स्पष्ट होते.

इकडे प्राजक्ताची शस्त्रक्रिया सुरू करण्याचा दिवस उजाडला. आणि तिकडे मुंबईत विप्लव ऑपरेशन झाल्यानंतर सुन्नपणातून बाहेर पडत होता. नागपुरात प्राजक्ताचे ऑपरेशन यशस्वीरीत्या आटोपले. ती पूर्णपूर्ण सचेत झाल्यावर तिला फोनवरून कळले होते की, विप्लवची शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली.

हे कळताच प्राजक्ता कमालीची खिन्न झाली. तिचा दुखावेग अनावर झाला. पण तिच्या मनात पूर्वीची भीती, तो त्रागा, तो गोंधळ जसाच्या तसा नव्हता. या साऱ्याची जागा आता विप्लवप्रतीच्या गाढ सहानुभूतीने घेतली होती. तिच्या मनाला विप्लव बरा होणार नव्हता याचे अतोनात दुःख होते. प्राजक्ता पायाच्या अंगठ्याकडे एकटक बघत मनसोक्त रडत होती. तिचे आताचे अश्रू फारच खेदाचे होते. 'आपण किती किती विकृत पद्धतीने विचार केला होता?' याचा तिला पराकोटीचा संताप येत होता. मनात कुठेतरी पाश्चातापाचे भाव तीव्रपणे उमटले होते. त्यामुळेच ती विप्लवविषयीची उत्कटता मनातून व्यक्त करत होती. तिची त्या अवस्थेतली नजर दुसऱ्या पायावर सरकली, सरकली आणि तेव्हाच तिच्या मनाची चीत बाजू पटामध्ये बदलली. का? तर....त्या अंगठ्याच्या हालचाली बघून विप्लवच्या दुःखाच्या अपरिहार्यतेच्या विचाराचे पर्यावसान त्याक्षणी किंचित का होईना आनंदात नक्कीच झाले होते.

प्राजक्ताची शस्त्रक्रिया सफल झाली होती. याचा तिला हिमालय थिटा, दर्या सरोवर आणि आकाश ठेंगणे वाटावे एवढा आनंद झाला होता. ती आता बरं झाल्याची पूर्ण खात्री होण्यासाठी हालचालींची प्रात्यक्षिक बाकी होती. ते आता पुढील काही दिवसात डॉक्टरांकडून पूर्ण झाल्यावरच कळणार होते; पण या क्षणी त्या अंगठ्याच्या हालचालीमुळे आपण आता नक्की पूर्णपणे बरे होऊ! हा फील प्राजक्ताच्या मनात प्रचंड ताकदीने उर्जावान झाला होता.

तिची बरी होण्याच्या दिशेने धडपड सुरू झाली होती. दिवस जात राहिले. प्राजक्ताची हालचाल पौर्णिमेच्या कौमुदीप्रमाणे गतीमान झाली होती. ती दवाखान्यातल्या खोलीमध्ये डॉक्टरांच्या, वाकरच्या, रॅम्पच्या सहाय्याने हळूहळू चालायला लागली. व्हारेलचेअर जाऊन हाती काठी आली. प्राजक्ताने जग जिंकलं. व्हाईलचेअर आलेल्या प्राजक्ताला चालायला लागल्यावरच दवाखान्यातून सुटी मिळाली.

आता ती नुसत्याच काठीचा आधार घेत चालू लागली. घराच्या प्रांगणात सारखी सारखी इकडून तिकडे तिकडून इकडे येरझारा मारू लागली. अचाट सामर्थ्य लावून चालण्याचा सराव करू लागली. आजवरच्या आयुष्यातील बाकी राहिलेले चालणे ती एकाच दमात पूर्ण करीत होती. की तिला झालेल्या अपरंपार आनंदाचा तो परिणाम होता, काय कोण जाणे!

महिन्याभरापासून प्राजक्ता रोज सकाळी बागेत फिरायला जाऊ लागली होती. दिवसामागून दिवस उलटत होते. वाळलेल्या खोडाला ओलाव्यामुळे पालवी फुटावी आणि तो वृक्ष कंचपणाने बहरून यावा तशी प्राजक्ता बहरुन आली होती. तिची हालचाल संथ गतीने आसमंत गाठत होती. टाकलेल्या कातीकडे सर्प पुन्हा ढुंकूनही बघत नाही. प्राजक्ताही आपल्या अपंग अवस्थेतून निवृत्त झाली होती. तिलाही आपली ती अपंग अवस्था आठवायची नव्हती.

एक दिवस बागेतून फिरून घरी परतायला सडक पार करत असताना अचानक एका कारनी प्राजक्ताच्या पुढ्यात ब्रेक मारला.

"डोळे आहेत की फुटले, सडक पार करताना डोळे उघडे ठेवायला काय होते तुम्हाला?"
चित्रपटातल्या अभिनेत्यासारख्याच सहजतेने संवाद फेकत कारचा मालक गाडीतुन बाहेर पडला.

प्राजक्ता धास्तावून सडकेवर कोसळली. तिला बघताच "सॉरी, सॉरी, मॅडम." म्हणत कार मालक प्राजक्ताला उठायला मदत करू लागला. त्याच्याशी नजर भिडताच प्राजक्ता विनयाने सावरली.

"नको नको मी सावरते स्वतःला." असे म्हणून ती स्वतःच उभी झाली. आणि तिने डोके वर करून विनम्रकडे बघितले. तेव्हा ती अशी काही लाजली की, त्या लाजण्याचा अर्थ बघणाऱ्याला सहज कळावा. त्याक्षणी तिच्या मनाच्या मोबाईलमध्ये सुगंधी संगीत वाजत होते.

इथे निसर्गनियम हावी झाला होता. माणूस सदैव आणि पराकोटीचा निस्वार्थी कधीच होऊ शकत नाही. जीवनात असा एखादा क्षण येतोच जेव्हा त्याला स्वार्थाचा विचार करावाच लागतो. आत्ताची प्राजक्ताची नेमकी तीच अवस्था होती. आता ती आकर्षणाला भाळली होती. तिच्या मनात हळुवार भावना पुनर्जीवित झाल्या होत्या. आता इथे फक्त विप्लवची जागा विनम्रनी घेतली होती.

"माफ करा, तुमच्या अवस्थेकडे माझे लक्षच नव्हते." स्वतःचा दोष कबूल करत विनम्र म्हणाला.

त्यानेच नम्रपणे प्राजक्ताला गाडीतून घराकडे पोचती केली. तो तिला घरी सोडून जाऊ लागला. त्याची कार रस्त्यावर विरघळत पर्यंत प्राजक्ता ती कडे किरणांच्या नजरेने बघत होती. आईच्या हाकेनेच तिला घरात जायचे सुचले. विनम्रची ती एकच नजर त्या क्षणापासून प्राजक्ताच्या मनावर अधिराज्य गाजवत होती.

प्राजक्ता आता जुने सारे सारे विसरून, नवे आरोग्य, नवे स्वातंत्र्य, नवे प्रेम, नव्या भावना, नवी आशा आता तिला सार्‍याच नव्यानव्याचाच ध्यास लागला होता. तिला तिच्या आरोग्यासह, स्वातंत्र्यासह तिच्या परीने नवं प्रेम गवसलं होतं. आता विनम्र हाच आपलं सर्वस्व असणार. असा पहिल्या भेटीपासूनच तिने मनाशी चंग बांधला होता. तिच्या ह्या नव्या सुखकर भावना आरोग्याला, शरीराला, आत्मविश्वासाला झळाळी, चकाकी देत होत्या. आता ती रोज नव्या तेजाने झळकत होती.
शरीराला, मनाला, भावनांना सारंच काही पोषक असं लाभत गेलं की ते पुन्हा पुन्हा पुष्ट होत जाते, हेच खरं.

प्राजक्ता रोज ज्या बागेत फिरायला जायची त्याच बागेत पंधरा दिवसांनी तिला सकाळी सकाळी चक्क विनम्रचे दर्शन झाले. त्याला असे अचानक बघून ती मोहरली. तिला वाटले हा भास असावा म्हणून दुर्लक्ष करून जाऊ लागली. ती थांबली, तो विनम्रचा "नमस्कार मॅडम" असा आवाज ऐकूनच. त्या आवाजाने तिच्या हृदयाचे ठोके गतिमान झाले होते. ती ते सावरण्याचा प्रयत्न करतच म्हणाली.

"आज इकडे कसे? याआधी कधी बघितले नाही, या बागेत तुम्हाला."

"कळत नाहीये, मला का या बागेची ओढ लागलीय ते? दोन दिवस झाले मी या बागेत येतोय; पण आजची रौनक काही औरच वाटते."

"का? आज असे काय झाले?" प्राजक्ताने विचारले.

"बागेत फुले मुबलक असतात; पण वातावरणाला संजीव करते ती सुगंधी फुलेच."

विनम्रचा रोख प्राजक्ताला कळला. ती शांत झाली. तिच्या गालावर चढलेली लाली नजरेत सहज भरणारी होती. विनम्रला तिची जमीन मशागतीने युक्त जाणवली. या भुईत त्याच्या प्रीतीची बाग फुलणार याची खातरजमा झाली होती. मग थेट त्यांने आपल्या प्रेमाचा प्रस्ताव प्राजक्तापुढे ठेवून दिला. प्राजक्ता अस्पष्ट दिसणारा होकाराचा पदर पसुरूनच होती. त्याचे प्रस्तावाचे फुल तिच्या होकाराच्या पदरात अलगद जाऊन अडकले. आता रोज या बागेत आपल्या भेटी होतील! असे परस्परास आश्वासन देऊनच दोघेही माघारी फिरले.

प्राजक्ताला परत एकदा प्रेम झाले होते. तिच्या या प्रेमाच्या हिरव्या झाडावर आनंदाच्या विविध पाखरांनी बसायला सुरुवात केली. तिचे मन स्वतःला समजावीत होते. आता स्वतः इतरांप्रमाणे आपण चालू फिरू लागलो आहोत. आजवरच्या बेडवर आणि व्हीलचेअरवरच्या घालवलेल्या आयुष्यात घरूनच का असेना आपण शिकलो. डिग्री घेतली. आपल्याचसारखी देहगत असलेल्या म्हणजे -आताच्या भाषेत नाही तेव्हाच्या- अपंग असलेल्या प्रतिभावान चित्रकाराशी, कोमल हृदयाच्या कवीशी प्रेम केले होते. किती किती एकमेकाशी जुळले होतो आम्ही. मी खूप खूप भाऊक स्वभावाची आणि तो कमालीचा तत्त्वज्ञानी. प्रत्येक गोष्टींचा जरा त्रयस्थपणे विचार करणारा. आपल्याला कोणत्या गोष्टीचे आकर्षण वाटू लागले की तिच्याप्रती सजाण करत त्या सौंदर्याला काहीशी बाधा आणणारा; पण विप्लव त्याच्या या समजीमुळे आणि विलक्षण प्रतिभेमुळे आपल्याला हवासा वाटत राहिला. त्यामुळेच त्याच्यावर आपले अपार प्रेम होते; पण हे प्रेम आपण त्या अवस्थेत होतो म्हणून होते? की इतर कुणी चांगली व्यक्ती आपल्याला प्रेम करणार नव्हती, म्हणून होते? की ते आपल्या मनाची, देहाची गरज म्हणून होते?

आता आपल्याला याबद्दल काही, काहीच सांगता येणार नाही. ते तेव्हाचे दिवस होते. आणि आता ते मागे पडले आहेत. तो भूतकाळ आता आपल्याला मागेच ठेवायचा आहे. भलेही तेव्हा आपल्याला वाटले होते की विप्लव बरा झाला, तर आपल्याला सोडून जाईल; पण असे उलटे होईल अशी आपण कल्पनासुद्धा केली नव्हती. का? का? आपल्याला आपल्या दुबळेपणाची जाणीव नव्हती, का? आपण विप्लववर हा दोषारोप करत राहिलो? त्या विचारांमुळे आपण किती दुखी होतो? त्या क्षणी आपल्या मनात किती पराकोटीचे स्वार्थ दाटून आले होते? आणि आता? आता तरी आपल्या मनातून तो स्वार्थी विचार कुठे संपला आहे? आता या एवढ्या काळात अपल्यालाला विप्लवची जरा देखील आठवण झाली का?आपण आपली अर्धी अधिक संवेदना गमावली हेच खरे!

आता विप्लव कुठे असेल? कसा असेल तो? त्याच्या मनाची अवस्था कशी असेल? नाही नाही तो प्रत्येक गोष्टीचा बारीक आणि तात्विक विचार करत असतो. त्याला याबद्दल काही काहीच वाटणार नाही. वाटले तरी तो या सगळ्यांचा सुक्ष्मत्तर विचार करून या घटनांचा मेळ समजून घेईल. ठरले ना आपले आपण आता भूतकाळ विसरायचा! तर विसरायचाच!

तर मग आपण आता परत प्रेमात पडलो. आपल्या त्या आणि या आयुष्यात प्रचंड तफावत आहे; म्हणून आता आपल्याला पुढे बघायचे, पुढे जगायचे आहे. तर मग आता पुढच्याच विचार करायचा! विनम्र.... आता आपण विनम्रसाठीच जगायचं! आपल्यासाठी जगायचं!

प्राजक्ताने मोठ्या चतुराईने भूतकाळ आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात दडवण्याचा प्रयत्न केला.

पंधरा दिवसातच विनम्र व प्राजक्ता यांची काव्यमय प्रेम कथा तालुक्यातील प्रत्येक सान थोरांच्या मुखामुखावर रूढ झाली. त्यांच्या प्रेमाची कळी टपोर फुल बनून आसमंतात सुगंध पसरवीत होती. काळ सुसाट पळत होता. दिवस मास कधी उलटले आणि वर्ष कधी संपलं कळलंच नाही.

एकूण वर्षभराचा काळ लोटल्यानंतर प्राजक्ताची आणि सईची अचानक भेट झाली, ती नागपूरच्या प्रशस्त अशा बसस्थानकावर. तेव्हा प्राजक्ता विप्लव सोबत फिरायला गेली होती. तेव्हा अचानक सई व तिच्या कुटुंबास बघताच आवक झाली आणि सई प्राजक्ताला बघून तिकडे चकित! दोघींनी एकमेकींस क्षणभरच का होईना, आश्चर्याचा धक्का दिला होता! प्राजक्ता सारखी बघतच होती कारण तिच्या दृष्टीस अनाकलनीय अदृश्य पडले होते. आणि सईला प्राजक्ताची अपेक्षित अवस्था नजरेस पडली होती. पण ही आश्चर्य व्यक्त करण्याची वेळ नव्हतीच मुळी. अशोक ज्या व्हीलचेअरवर बसला होता, तिला ढकलत सई प्राजक्ताच्या दिशेने येत होती. आणि प्राजक्ता काठीचा आधार घेत विनम्रसोबत सईकडे. दोन महिन्यांपूर्वी अशोकचा रेल्वेतून उतरताना अपघात झाला होता. म्हणून सई आपल्या कुटुंबास घेऊन मायदेशी परत आली होती.

दोघींचीही गळा भेट झाली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून सारखे अश्रू गळत होते. काय बोलावं दोघींनाही काहीच सुचत नव्हते. वातावरण निशब्द झालं होतं. प्रदीर्घ श्वास घेत प्राजक्ता म्हणाली.

"हे सगळं काय झालं ग सई?"

"मी इथून गेल्यागेल्या महिन्याभरातच हा सगळा प्रसंग घडला. आता जवळपास वर्ष होत आहे अशोक असा व्हीलचेअरवर आहे. बघ जीवन हे असं असते प्राजु, आपण जे स्वप्न बघतो, जो विचार करतो, ज्या अपेक्षा करतो नेमकं तसं कधीच होत नसते. जगत असताना अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांना गृहीत धरूनच जगावे लागते. जे माझ्या जीवनात घडले, मी कुठे असे ठरवले होते? आणि तुला सुद्धा तू चालशील असे कुठे वाटले होते? जीवन हे एक विरोधाभासाचे गाठोडे आहे."

जीवनाचे सार सांगून सई चालली होती. प्राजक्ता अंतर्मुख होत सईकडे एकटक बघत राहिली.

विप्लवची सहा सहा महिन्यांनी दोनदा शस्त्रक्रिया झाल्यावर दोन वर्षानंतरची ही सारी हकीकत प्रतीकने विप्लवपुढे कथन केली. ती ऐकून त्याच्या चेहऱ्यावर कळवट स्मित उमटले आणि आयुष्य हे काळ, परिस्थिती, स्वभाव, स्वार्थ इत्यादीनुसार बदलत असते, याची त्याला पुन्हा दृढतेने जाणीव झाली.

-मनोज बोबडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रबोधन गीत

ऐक जरा साजणे...

हे असं आहे तर...